व्हिडिओ पाहण्यासाठी

तारण व्हावे म्हणून तुम्ही घरोघरचे प्रचारकार्य करतात का?

तारण व्हावे म्हणून तुम्ही घरोघरचे प्रचारकार्य करतात का?

 नाही. आम्ही नेहमी घरोघरचे प्रचारकार्य करतो, हे बरोबर आहे पण केवळ याद्वारेच आमचे तारण होईल, असे आम्ही मानत नाही. (इफिसकर २:८) का नाही?

 हे समजण्यासाठी एका उदाहरणाचा विचार करा: एक उदार मनुष्य, जे कोणी अमुक ठिकाणी व अमुक वेळी येतील त्या सर्वांना एक महागडे बक्षीस देण्याचे वचन देतो. या मनुष्याच्या बोलण्यावर तुमचा विश्‍वास असला तर त्यानुसार तुम्ही कराल का? नक्कीच! आणि ही गोष्ट तुम्ही कदाचित तुमच्या मित्रांना व नातेवाईकांनादेखील सांगाल, जेणेकरून त्यांनादेखील याचा फायदा होईल. त्या मनुष्याने तुम्हाला जे काही करायला सांगितले आहे ते तुम्ही ऐकले म्हणून तुम्हाला ते बक्षीस मिळालेच  पाहिजे असा त्याचा अर्थ होत नाही. त्या मनुष्याला तुम्हाला ते बक्षीस देण्याची इच्छा असल्यामुळे तुम्हाला ते मिळते.

 अशाच प्रकारे, देव सार्वकालिक जीवनाचे बक्षीस आज्ञा मानणाऱ्‍या सर्वांना देणार आहे असे आम्ही मानतो. (रोमकर ६:२३) देवाने वचन दिलेल्या बक्षिसाचा फायदा सर्वांना व्हावा म्हणून आम्ही इतरांना आमच्या विश्‍वासाबद्दल सांगण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. पण प्रचारकार्य केल्यानेच आमचे तारण होते असे आम्ही मानत नाही. (रोमकर १:१७; ३:२८) खरेच, आपण काहीही केले तरी देव देत असलेला हा अप्रतिम आशीर्वाद आपण स्वतःच्या बळावर मिळवू शकत नाही. “त्याने आपल्याला तारले. मात्र आपण मोठी सत्कृत्ये केली म्हणून नव्हे तर केवळ तो दयाळू आहे म्हणून!”—तीत ३:५, मराठी कॉमन लँग्वेज.