व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमचं मन काबीज करण्यासाठी चाललेली लढाई जिंका!

तुमचं मन काबीज करण्यासाठी चाललेली लढाई जिंका!

तुमच्यावर हल्ला होत आहे! तुमचा शत्रू सैतान, एका अतिशय शक्तिशाली शस्त्राचा वापर करून तुमच्यावर हल्ला करत आहे. हे शस्त्र, तुमच्या शरीरावर नाही, तर तुमच्या मनावर वार करण्यासाठी खास तयार करण्यात आलं आहे. हे शस्त्र कोणतं आहे? मतप्रचार! (प्रॉपगॅन्डा)

सैतानाचा मतप्रचार किती घातक आहे हे प्रेषित पौलला माहीत होतं. पण, सगळ्याच ख्रिश्चनांना ते माहीत होतं असं नाही. उदाहरणार्थ, करिंथमधल्या काही ख्रिश्चनांना बहुधा वाटत होतं, की ते सत्यात खूप खंबीर आहेत; त्यामुळे, सैतान त्यांना कधीच फसवू शकणार नाही. (१ करिंथ. १०:१२) म्हणून पौलने त्यांना इशारा दिला: “ज्याप्रमाणे सापाने धूर्तपणे हव्वेला भुरळ घातली त्याप्रमाणे तुमची मनेही भ्रष्ट होऊन तुम्ही ख्रिस्तासाठी असलेला तुमचा प्रामाणिकपणा व पवित्रता गमावून बसाल, अशी मला भीती वाटते.”—२ करिंथ. ११:३.

पौलच्या या शब्दांवरून दिसून येतं, की आपण कधीही वाजवीपेक्षा जास्त आत्मविश्वास बाळगू नये. सैतानाच्या मतप्रचाराचाविरुद्ध असलेली लढाई जिंकायची असल्यास, तो करत असलेला मतप्रचार किती घातक आहे हे आपण ओळखलं पाहिजे आणि त्यापासून स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे.

मतप्रचार—किती घातक असू शकतो?

या ठिकाणी ‘मतप्रचार’ या शब्दाचा वापर, चुकीच्या किंवा खोट्या माहितीचा उपयोग करून लोकांना फसवणं किंवा त्यांच्या विचारांवर व कृत्यांवर ताबा मिळवणं, अशा अर्थाने करण्यात आला आहे. प्रॉपगॅन्डा अॅण्ड परस्यूएशन या पुस्तकानुसार, मतप्रचार हा “अतिशय खालच्या दर्जाचा, नुकसानकारक आणि अन्यायी असतो.” त्याचं वर्णन करण्यासाठी लोक सहसा, “खोटेपणा, विकृती, फसवणूक, लबाडी, [आणि] मनाचा ताबा घेणं,” अशा शब्दांचा वापर करतात.

मतप्रचार अतिशय घातक असल्याचं एक कारण म्हणजे, त्याचा अगदी नकळत व हळूहळू आपल्या विचारसरणीवर प्रभाव पडू शकतो. त्याची तुलना आपण अशा एका विषारी वायूशी करू शकतो, जो दिसत नाही किंवा ज्याचा वासही येत नाही. मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे तज्ज्ञ, वॅन्स पॅकार्ड यांनी म्हटलं की, “आपण कल्पनाही करणार नाही” इतका मतप्रचाराचा आपल्या कृत्यांवर प्रभाव पडत असतो. आणखी एक तज्ज्ञ म्हणतात, की मतप्रचाराने लोकांना अतिशय रानटी कृत्य करण्यास किंवा तर्काला सोडून वागण्यास भाग पाडलं आहे; आणि त्यामुळेच जातीसंहार, युद्ध आणि जातीच्या किंवा धर्माच्या नावाखाली लोकांचा छळ झाला आहे.—इझिली लेड्‌ए हिस्ट्री ऑफ प्रॉपगॅन्डा.

मतप्रचाराचा वापर करून जर मानव आपल्याला फसवू शकतो, तर सैतान त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आपल्याला फसवू शकतो. कारण, मानवाची निर्मित करण्यात आली तेव्हापासून तो त्याच्या वर्तनाचा अभ्यास करत आला आहे. शिवाय, आज “सगळे जग” त्याच्या नियंत्रणात असल्यामुळे खोट्या माहितीचा प्रसार करण्यासाठी तो जगातल्या कुठल्याही गोष्टीचा उपयोग करू शकतो. (१ योहा. ५:१९; योहा. ८:४४) आपल्या मतप्रचाराचा उपयोग करून लोकांची ‘मने आंधळी’ करण्यात सैतान इतका यशस्वी झाला आहे, की आज तो ‘सबंध पृथ्वीवरील लोकांना फसवत’ आहे. (२ करिंथ. ४:४; प्रकटी. १२:९) मग, सैतानाच्या मतप्रचाराचा तुम्हाला कसा प्रतिकार करता येईल?

विश्वास मजबूत करा

सैतानाच्या मतप्रचाराविरुद्ध लढा देण्याचा एक साधासोपा मार्ग येशूने आपल्याला सांगितला. त्याने म्हटलं, की सत्य समजून घ्या म्हणजे सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. (योहा. ८:३१, ३२) युद्धात, खरी किंवा भरवशालायक माहिती कुठून मिळेल हे सैनिकाला माहीत असणं खूप गरजेचं असतं; कारण, त्याला फसवण्यासाठी शत्रू खोटी माहिती पसरवू शकतो. आपल्याबाबतीत काय? आपल्याला खरी किंवा भरवशालायक माहिती कुठून मिळू शकते? यहोवाने त्याचं वचन, बायबल यात ती दिली आहे. सैतानाच्या मतप्रचाराविरुद्ध लढा देण्यासाठी आवश्यक असलेली माहिती तुम्हाला त्यातच मिळेल.—२ तीम. ३:१६, १७.

अर्थात, ही गोष्ट सैतानालासुद्धा माहीत आहे. त्यामुळेच, बायबलचं वाचन व अभ्यास करण्यापासून आपल्याला विचलित करण्यासाठी सैतान त्याच्या नियंत्रणात असलेल्या जगाचा उपयोग करतो. पण, ‘सैतानाच्या कुयुक्त्यांमुळे’ फसवले जाऊ नका! (इफिस. ६:११, तळटीप) सत्याचं केवळ वरवर ज्ञान असणं पुरेसं नाही. सत्याबद्दल सखोल ज्ञान घेण्यासाठी मेहनत करणं गरजेचं आहे. (इफिस. ३:१८) नोएम चॉमस्की नावाच्या लेखकाने म्हटल्याप्रमाणे, “खरी माहिती कोणीही तुमच्या डोक्यात घालणार नाही. तुम्हाला स्वतःलाच ती मिळवावी लागेल.” त्यामुळे, दररोज शास्त्रवचनांचं काळजीपूर्वक परीक्षण करण्याद्वारे स्वतः ती मिळवण्याचा प्रयत्न करा.—प्रे. कार्ये १७:११.

तुमचं मन काबीज करण्यासाठी चाललेली लढाई जिंकण्यासाठी, मतप्रचार किती घातक आहे हे ओळखा आणि त्यापासून स्वतःचं संरक्षण करा

एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या; ती म्हणजे, तुम्ही स्पष्टपणे किंवा तर्कशुद्धपणे विचार करावा असं सैतानाला मुळीच वाटत नाही. का? कारण, “लोकांना तर्कशुद्धपणे विचार करण्यापासून रोखलं जातं,” तेव्हा मतप्रचाराचा “हेतू साध्य होण्याची जास्त शक्यता असते.” (मिडिया अॅण्ड सोसायटी इन द ट्‌वेन्टियथ सेंच्युअरी) त्यामुळे, ऐकलेल्या कोणत्याही गोष्टीवर काळजीपूर्वक विचार केल्याशिवाय विश्वास ठेवू नका. (नीति. १४:१५) यहोवाने तुम्हाला विवेक अर्थात ‘विचारशक्ती’ आणि ‘तर्कबुद्धी’ दिली आहे; तेव्हा, तुमचा विश्वास मजबूत करण्यासाठी यांचा उपयोग करा.—नीति. २:१०-१५; रोम. १२:१, २.

ऐक्य टिकवून ठेवा

खोट्या मतप्रचाराला बळी पडलेले सैनिक घाबरून जातात आणि त्यामुळे ते लढाईसाठी सहसा तयार होत नाहीत. अशा मतप्रचारामुळे ते आपसात भांडण करण्याची किंवा इतर सैनिकांपासून वेगळे होण्याचीही शक्यता असते. जर्मनीच्या एका सैन्य-अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव होण्यामागचं एक कारण म्हणजे, खोटा मतप्रचार. तो अधिकारी म्हणाला, की खोट्या मतप्रचाराचा लोकांवर इतका परिणाम झाला जणू त्यांना संमोहित (हिप्नोटाइज) करण्यात आलं होतं असं वाटलं. ख्रिश्चनांमध्ये असलेलं ऐक्य नष्ट करण्यासाठी सैतान अशाच पद्धतींचा उपयोग करतो. उदाहरणार्थ, तो बांधवांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. तसंच, बांधवांनी यहोवाची संघटना सोडून द्यावी म्हणून तो त्यांना असा विचार करायला लावतो, की संघटनेत काहीतरी चुकीचं किंवा अन्यायी घडत आहे.

म्हणूनच, फसवले जाऊ नका! देवाच्या वचनात दिलेल्या सल्ल्याचं पालन करा आणि आपल्या बंधुभगिनींसोबत ऐक्याने राहा. उदाहरणार्थ, बायबल आपल्याला “मोठ्या मनाने क्षमा” करण्याचं आणि कोणतेही मतभेद लवकरात लवकर मिटवून टाकण्याचं प्रोत्साहन देतं. (कलस्सै. ३:१३, १४; मत्त. ५:२३, २४) तसंच, आपण मंडळीपासून कधीच दूर जाऊ नये, असा इशाराही बायबल आपल्याला देतं. (नीति. १८:१) सैतानाच्या मतप्रचाराचा प्रतिकार करण्यासाठी तुम्ही नेहमी तयार आहात याची खातरी करत राहा. स्वतःला विचारा, ‘मागे अमुक एका बांधवाने माझं मन दुखावलं तेव्हा मी कसा वागलो? यहोवाचं मन आनंदी होईल असा वागलो, की सैतानाचं मन आनंदी होईल असा वागलो?—गलती. ५:१६-२६; इफिस. २:२, ३.

भरवसा ठेवा

अधिकाऱ्यांना विश्वासू नसलेले सैनिक सहसा चांगल्या प्रकारे लढू शकत नाहीत. म्हणूनच, सैनिकांचा त्यांच्या अधिकाऱ्यांवर असलेला विश्वास किंवा भरवसा खचवण्यासाठी शत्रू खोट्या मतप्रचाराचा वापर करतो. अधिकाऱ्यांच्या हातून एखादी चूक झाली, तर त्याचा फायदा घेऊन शत्रू म्हणू शकतो: “ते भरवसा ठेवण्यालायक नाहीत!” आणि “त्यांच्यामुळे स्वतःचं नुकसान का करून घेता?” नेमक्या याच तंत्राचा सैतान वापर करतो. यहोवा त्याच्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी ज्यांचा उपयोग करत आहे, त्यांच्यावर असलेला तुमचा भरवसा खचवण्याचा सैतान प्रयत्न करतो.

मग, यापासून तुम्ही स्वतःचं रक्षण कसं करू शकता? काहीही झालं, तरी यहोवाच्या संघटनेत राहण्याचा आपला निर्धार पक्का करा. देवाच्या लोकांचं नेतृत्व करणारे पुरुष अपरिपूर्ण असले, तरी नेहमी त्यांना एकनिष्ठ राहा व सहकार्य करा. (१ थेस्सलनी. ५:१२, १३) धर्मत्यागी लोक, तसंच आपली फसवणूक करणारे इतर जण संघटनेत समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. (तीत १:१०) ते सांगत असलेल्या गोष्टी खऱ्या वाटत असल्या, तरी “लगेच गोंधळून जाऊ नका.” (२ थेस्सलनी. २:२) त्याऐवजी, पौलने तीमथ्यला दिलेल्या सल्ल्याप्रमाणे, तुम्ही ‘ज्या गोष्टी शिकलात’ आणि त्या ‘कोणापासून शिकलात’ हे नेहमी लक्षात ठेवा. (२ तीम. ३:१४, १५) आपल्याला सत्य शिकवण्यासाठी जवळजवळ शंभर वर्षांपासून यहोवा ज्या विश्वासू दासाचा उपयोग करत आहे त्यावर भरवसा ठेवण्यासाठी भरपूर पुरावे उपलब्ध आहेत.—मत्त. २४:४५-४७; इब्री १३:७, १७.

घाबरून जाऊ नका

सैतान आपल्या मतप्रचाराचा फक्त धूर्तपणेच नाही, तर काही वेळा उघडपणेसुद्धा वापर करतो. कधीकधी तो आपल्याला घाबरवून टाकण्याचा प्रयत्न करतो. खरंतर, भीती किंवा दहशत निर्माण करणं हे “मतप्रचाराच्या सगळ्यात जुन्या तंत्रांपैकी एक आहे.” (इझिली लेड्‌ए हिस्ट्री ऑफ प्रॉपगॅन्डा) ब्रिटिश प्राध्यापक, फिलिप्प एम. टेलर यांनी आपल्या लिखाणांत म्हटलं, की शत्रूवर वर्चस्व करण्यासाठी अश्शूरी लोक दहशतीचा आणि खोट्या मतप्रचाराचा एकसाथ वापर करायचे. सैतानसुद्धा भीतीचा, उदाहरणार्थ माणसाची भीती, छळाची भीती किंवा मृत्यूची भीती यांचा वापर करून तुम्हाला यहोवाची सेवा करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करेल.—यश. ८:१२; यिर्म. ४२:११; इब्री २:१५.

पण, सैतानाला असं मुळीच करू देऊ का! येशूने म्हटलं: “जे शरीर नष्ट करतात, पण नंतर यापेक्षा जास्त काही करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका.” (लूक १२:४) यहोवाने तुमचा सांभाळ करण्याचं, तुम्हाला “असाधारण सामर्थ्य” देण्याचं आणि सैतानाच्या हल्ल्यांचा प्रतिकार करण्यास मदत करण्याचं अभिवचन दिलं आहे, आणि ते तो नक्कीच पूर्ण करेल याची पक्की खातरी बाळगा.—२ करिंथ. ४:७-९; १ पेत्र ३:१४.

अर्थात, काही वेळा तुम्हाला कमजोर वाटू शकतं किंवा भीती वाटू शकते. पण अशा वेळी, यहोवाने यहोशवाला जो प्रोत्साहनदायक सल्ला दिला होता त्याची आठवण करा. यहोवा म्हणाला: “खंबीर हो, हिंमत धर, घाबरू नको, कचरू नको; कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.” (यहो. १:९) तुम्हाला कधी भीती वाटली तर लगेच यहोवाला प्रार्थना करा आणि आपल्या सगळ्या चिंता त्याला सांगा. असं केल्यास तुम्ही खातरी बाळगू शकता, की “सर्व समजशक्तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती . . . तुमच्या मनाचे व बुद्धीचे रक्षण करेल.” आणि, सैतानाच्या कोणत्याही मतप्रचाराचा प्रतिकार करण्यास लागणारं बळ तुम्हाला मिळेल.—फिलिप्पै. ४:६, ७, १३.

देवाच्या लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी अश्शूरी लोकांच्या संदेशवाहकाने, म्हणजे रब-शाके याने कोणत्या मतप्रचाराचा वापर केला हे तुम्हाला आठवतं का? तो देवाच्या लोकांना असा विचार करायला लावू पाहात होता, की त्यांना कोणीही, अगदी यहोवासुद्धा वाचवू शकणार नाही. मग त्याने असा दावा केला, की यहोवानेच अश्शूरी लोकांना यरुशलेमचा नाश करण्यास सांगितलं आहे. त्यावर यहोवाने काय म्हटलं? त्याने म्हटलं: “अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी ज्या शब्दांनी माझा उपमर्द केला आहे ते शब्द तू ऐकले आहेत; त्यांनी तू घाबरू नको.” (२ राजे १८:२२-२५; १९:६) मग, यहोवाने आपला स्वर्गदूत पाठवून केवळ एका रात्रीत १,८५,००० अश्शूरी सैनिकांचा नाश केला.—२ राजे १९:३५.

नेहमी यहोवाचं ऐका आणि सुज्ञपणे वागा

तुम्ही कधी असा एखादा चित्रपट पाहिला आहे का, ज्यात एखाद्याला फसवलं जात असल्याचं त्याच्या लक्षातच येत नाही? अशा वेळी, तुम्हाला त्याला अक्षरशः ओरडून सांगावंसं वाटलं का, की ‘विश्वास ठेवू नकोस! ते तुला फसवत आहेत!’ अगदी त्याचप्रमाणे, स्वर्गदूतसुद्धा तुम्हाला जणू म्हणत आहेत: “सैतानाच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका!”

तेव्हा, सैतानाच्या मतप्रचारापासून दूर राहा! (नीति. २६:२४, २५) सर्व गोष्टींच्या बाबतीत यहोवाचं ऐका आणि त्याच्यावर भरवसा ठेवा. (नीति. ३:५-७) यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे आणि तो मनापासून तुम्हाला आर्जव करत आहे: “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर.” (नीति. २७:११) असं केल्यास, तुमचं मन काबीज करण्यासाठी चाललेली लढाई तुम्ही नक्कीच जिंकाल!