व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेनं पुढे आले

सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेनं पुढे आले

राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करत असलेल्या आवेशी प्रचारकांमध्ये, अविवाहित बहिणींची संख्या फार उल्लेखनीय आहे. त्यांपैकी काही तर अनेक दशकांपासून दुसऱ्या देशात जाऊन सेवा करत आहेत. बऱ्याच वर्षांआधी दुसऱ्या देशात जाऊन सेवा करण्याचा निर्णय घेण्यासाठी त्यांना कोणत्या गोष्टीमुळे मदत झाली? दुसऱ्या देशात जाऊन सेवा केल्यामुळे त्यांना काय शिकायला मिळालं? आणि यामुळे त्यांना कोणते आशीर्वाद अनुभवायला मिळाले? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी, अनेक वर्षांपासून सेवा करणाऱ्या या बहिणींपैकी काहींची आम्ही मुलाखत घेतली. तुम्हीही जर एक अविवाहित बहीण असाल आणि जीवनात खरं समाधान देणाऱ्या सेवाकार्यात सहभाग घेण्याची तुमचीही इच्छा असेल, तर तुम्हाला त्यांच्या अनुभवांवरून बरीच मदत मिळू शकते. आणि खरंतर फक्त अविवाहित बहिणींनाच नाही, तर देवाच्या सर्वच सेवकांना त्यांच्या अनुभवावरून फायदा होऊ शकतो.

शंकांवर मात करणं

अनिता

परदेशात पायनियर सेवा करणं मला खरंच जमेल का, अशी शंका तुमच्या मनात कधी आली का? ७५ च्या आसपास वय असलेल्या अनिता या बहिणीच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. तिच्याही मनात अशा शंका आल्या होत्या. ती इंग्लंडमध्ये लहानाची मोठी झाली होती आणि वयाच्या १८ व्या वर्षीच तिनं पायनियर सेवा सुरू केली. ती म्हणते: “इतरांना यहोवाबद्दल शिकवायला मला मनापासून आवडायचं. पण, एखाद्या दुसऱ्या देशात जाऊन सेवा करण्याची कल्पनाही मी कधी केली नव्हती. मी नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्नही केला नव्हता आणि एखादी नवीन भाषा चांगल्या रीतीनं बोलण्याचं मी कधीही शिकू शकणार नाही याची मला खात्री होती. म्हणून जेव्हा मला गिलियड प्रशालेचं आमंत्रण मिळालं तेव्हा मला धक्काच बसला. या बहुमानासाठी अपात्र असलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला आमंत्रण मिळणं ही खरंच आश्चर्य करून टाकणारी गोष्ट होती! पण मग, नंतर मी विचार केला, ‘जर यहोवाला वाटतं की मला हे करणं शक्य आहे, तर मग मी नक्कीच प्रयत्न करेन.’ आता मागील ५० वर्षांपेक्षा जास्त काळापासून मी जपानमध्ये मिशनरी म्हणून सेवा करत आहे.” ही बहीण पुढे म्हणते: “कधीकधी मी तरुण बहिणींना मिश्किलपणे असं म्हणते, ‘तुम्हीही माझ्यासोबत या रोमांचक कार्यात सहभागी का होत नाहीत?’ आणि आनंदाची गोष्ट म्हणजे अनेकांनी हे केलंसुद्धा.”

धैर्य एकवटणे

परदेशात सेवा करणाऱ्या बऱ्याच बहिणी, परदेशात जाण्याचा निर्णय घेण्यासाठी सुरवातीला कचरत होत्या. तर मग हा निर्णय घेण्याचं धैर्य त्यांनी कसं एकवटलं?

मोरेन

मोरेन, ज्यांचं वय आता ६५ च्या आसपास आहे त्या म्हणतात: “लहानाची मोठी होत असताना मला नेहमी वाटायचं की मी एक अर्थपूर्ण जीवन जगावं. एक असं जीवन ज्यामुळे मी इतरांना मदत करू शकेन.” वयाच्या २० व्या वर्षी पायनियरांची जास्त गरज असलेल्या कॅनडामधील, क्यूबेक या ठिकाणी त्या स्थलांतरित झाल्या. त्या म्हणतात, “नंतर मला गिलियड प्रशालेला उपस्थित राहण्याचं आमंत्रण मिळालं. पण जिथं माझा मित्रपरिवार नाही अशा एका अनोळखी ठिकाणी जाण्याची मला भीती वाटायची.” त्या पुढे म्हणतात: “मला माझ्या आईचीसुद्धा काळजी वाटत होती. आजारी असलेल्या माझ्या बाबांची ती कशी काळजी घेईल याचीही मला चिंता सतावत होती. मी कितीतरी रात्र यहोवाला याविषयी कळकळून आणि रडत प्रार्थना केली. मग जेव्हा मी माझ्या आईबाबांशी याबद्दल बोलले तेव्हा त्यांनी मला हे आमंत्रण स्वीकारण्याचा आर्जव केला. मंडळीतील बंधुभगिनींनीही प्रेमळपणे मदत पुरवली. यहोवाने अशा प्रकारे पुरवलेली मदत पाहून मला या गोष्टीची खात्री पटली की तो माझीही प्रेमळपणे काळजी घेईल. तेव्हा, ते आमंत्रण स्वीकारण्यास मी पूर्णपणे तयार झाले.” मोरेन यांनी १९७९ साली पश्‍चिम आफ्रिकेत मिशनरी म्हणून सेवा करण्यास सुरवात केली आणि या ठिकाणी त्यांनी ३० पेक्षाही जास्त वर्षं सेवा केली आहे. सध्या, त्या कॅनेडामध्ये आपल्या आईची काळजी घेत आहेत. त्या आजही खास पायनियर म्हणून सेवा करतात. परदेशात सेवा करण्याच्या त्यांच्या अनुभवांबद्दल सांगताना त्या म्हणतात: “मला ज्या वेळी ज्या गोष्टींची गरज होती, त्या गोष्टी यहोवाने नेहमी पुरवल्या.”

वेन्डी

६५ च्या आसपास वय असलेल्या वेन्डी या बहिणीने तरुण असताना ऑस्ट्रेलियामध्ये पायनियर सेवा सुरू केली. त्या म्हणतात: “मी खूप लाजाळू स्वभावाची होते आणि अनोळखी लोकांशी बोलण्याची मला भीती वाटायची. पण, पायनियर सेवा सुरू केल्यानंतर मी सर्व प्रकारच्या लोकांसोबत संवाद साधण्याचं शिकले आणि त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. तसंच माझी भीतीही नाहीशी झाली. पायनियरिंगमुळे मी यहोवावर निर्भर राहण्याचं शिकत होते आणि परदेशात जाऊन सेवा करण्याची भीतीही हळूहळू कमी होत होती. तसंच, मिशनरी म्हणून जपानमध्ये ३० पेक्षा जास्त वर्षांपासून सेवा करत असलेल्या एका अविवाहित बहिणीने, मला जपानमध्ये तीन महिन्यांकरता प्रचारकार्य करण्यासाठी बोलावलं. तिच्यासोबत काम केल्यामुळे परदेशात जाऊन सेवा करण्याची माझी इच्छा आणखी प्रबळ झाली.” बहीण वेन्डी १९८५ च्या आसपास वॅनूएतू या देशात स्थलांतरित झाल्या. हा देश म्हणजे ऑस्ट्रेलियापासून १,७७० किलोमीटर पूर्वेकडे असलेलं एक लहानसं बेट.

वेन्डी आजही वॅनूएतूमध्ये सेवा करत आहेत. तिथं त्या भाषांतर विभागात (आर.टी.ओ) सेवा करतात. त्या म्हणतात: “दूरवरच्या भागात मंडळ्या आणि लहान-लहान गट स्थापित होताना पाहणं, मनाला आनंद देणारी गोष्ट आहे. या बेटांवर चाललेल्या यहोवाच्या कामात आपली एक छोटीशी भूमिका बजावणं, असा एक बहुमान आहे ज्याची तुलना कोणत्याही गोष्टीसोबत करता येणार नाही.”

कुमीको (दोघींच्या मध्ये)

कुमीको यांचं वय ६५ च्या आसपास आहे. जपानमध्ये पायनियर सेवा करत असताना त्यांची पायनियर सोबती असलेली बहीण नेहमी ‘आपण नेपाळमध्ये जाऊन सेवा करूयात’ असा आग्रह करायची. कुमीको म्हणतात: “याविषयी ती मला नेहमी-नेहमी म्हणत राहायची. पण मी तिला प्रत्येक वेळी नकार दिला. एक नवीन भाषा शिकण्याची आणि एका वेगळ्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची मला थोडी काळजी वाटायची. यासोबतच, परदेशात जाण्यासाठी लागणारा खर्चही जास्त होता. नेपाळमध्ये जावं की नाही यावर मी विचार करत होते. त्याच दरम्यान माझा अपघात झाला आणि काही दिवस मला हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. तिथं असताना मी विचार केला: ‘पुढं काय होईल हे कोणाला माहीत? कदाचित मला एखादा गंभीर आजार झाला, तर परदेशात जाऊन पायनियरिंग करण्याची संधी मला कधीच मिळणार नाही. मग, कमीतकमी एका वर्षासाठी तरी परदेशात जाऊन सेवा करण्यात काय हरकत आहे?’ मला हे साध्य करता यावं म्हणून मग मी यहोवाकडे मदतीची याचना केली.” हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर कुमीको यांनी काही दिवसांसाठी नेपाळला भेट दिली आणि मग नंतर त्या आणि त्यांची पायनियर सोबती नेपाळमध्ये स्थलांतरित झाल्या.

नेपाळमध्ये जवळजवळ दहा वर्षं सेवा केल्यानंतर कुमीको म्हणतात: “ज्या समस्यांबद्दल मी इतकी काळजी करत होते आणि ज्या मला खूप मोठ्या वाटत होत्या, त्या जणू तांबड्या समुद्राप्रमाणे माझ्या समोरून बाजूला झाल्या. जिथं प्रचारकांची जास्त गरज होती अशा ठिकाणी मी सेवा करण्यासाठी गेले, या गोष्टीचं मला खूप समाधान वाटतं. जेव्हा आम्ही प्रचारात घरमालकाशी बोलत असतो, तेव्हा सहसा शेजारपाजरचे पाच-सहा लोकही गोळा होतात आणि आम्ही सांगत असलेला संदेश ऐकतात. लहान मुलंसुद्धा आमच्याकडे अगदी आदरानं बायबलबद्दल असलेल्या पत्रिका मागतात. जिथं लोक इतका चांगला प्रतिसाद देतात, अशा क्षेत्रात प्रचार करणं खरंच खूप आनंद देणारा अनुभव आहे!”

आव्हानांचा सामना करणं

आपण ज्या बहिणींची मुलाखत घेतली त्या फार धाडसी होत्या. पण त्यांनाही नवीन ठिकाणी अनेक आव्हानं आली. मग त्यांनी या आव्हानांचा सामना कसा केला?

डियान

६० च्या आसपास वय असलेल्या कॅनेडाच्या डियान यांनी आयव्हरी कोस्ट (आता याला कोट दि वार असं म्हणतात) या ठिकाणी २० वर्षांसाठी मिशनरी म्हणून सेवा केली आहे. त्या म्हणतात: “सुरवातीला आपल्या कुटुंबापासून लांब राहणं मला खूप कठीण गेलं. क्षेत्रातील लोकांप्रती माझ्या मनात प्रेम उत्पन्न व्हावं म्हणून मी यहोवाकडे प्रार्थना केली. गिलियड प्रशालेतील आमच्या एका प्रशिक्षकाने, बंधू जॅक रेडफोर्ट यांनी आम्हाला सांगितलं होतं की, नेमणुकीत ज्या समस्या येतात किंवा ज्या परिस्थितींचा सामना करावा लागतो त्यामुळे कदाचित तुम्ही गोंधळून जाल. इतकंच नाही तर तिथली भयानक गरीबी पाहून तुम्हाला धक्काही बसेल. पण त्यांनी पुढे म्हटलं: ‘तुम्ही गरीबीकडे पाहू नका. तर लोकांकडे पाहा, त्यांच्या चेहेऱ्यांकडे व डोळ्यांकडे पाहा. बायबल सत्यांना जेव्हा ते ऐकतात तेव्हा त्यांची प्रतिक्रिया कशी असते त्याकडे लक्ष द्या.’ मी अगदी तेच केलं. राज्याचा सांत्वन देणारा संदेश घोषित करताना मी लोकांच्या डोळ्यांत दिसणारं तेज पाहू शकले. खरंच हा एक खूप मोठा आशीर्वादच होता!” विदेशात सेवा करण्यासाठी डियान यांना आणखी कोणत्या गोष्टीमुळे मदत झाली? त्या म्हणतात: “मी माझ्या बायबल विद्यार्थ्यांसोबत मैत्री केली. त्यांना यहोवाचे विश्वासू सेवक बनताना पाहून मला खूप आनंद मिळायचा. माझं क्षेत्र मला अगदी माझ्या घरासारखंच वाटू लागलं. आणि येशूने अभिवचन दिलं त्याप्रमाणे मला अनेक आध्यात्मिक भाऊ, बहीण, आई आणि वडील मिळाले.”—मार्क १०:२९, ३०.

४५ च्या आसपास वय असलेली अॅना ही अशियामध्ये, अशा ठिकाणी सेवा करत आहे जिथं आपल्या कार्यांवर बंदी आहे. ती म्हणते: “मी बरीच वर्षं परदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सेवा केली आहे. या दरम्यान मी ज्या बहिणींसोबत राहिले त्यांचं व्यक्तिमत्त्व व पार्श्‍वभूमी माझ्यापेक्षा खूप वेगळी होती. त्यामुळे कधीकधी आमच्यात गैरसमज उत्पन्न व्हायचे आणि आम्ही दुखावलेही जायचो. पण, जेव्हा असं व्हायचं तेव्हा मी माझ्या सोबत राहणाऱ्या बहिणींसोबतची माझी मैत्री आणखी घनिष्ठ करण्याचा प्रयत्न केला. तसंच, त्यांच्या संस्कृतीलाही चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत व्यवहार करताना मी आणखी जास्त प्रेमळपणा आणि समजूतदारपणा दाखवला. मी घेतलेल्या या मेहनतीचे चांगले परिणाम मला पाहायला मिळाले. त्या बहिणींसोबत माझी घनिष्ठ आणि कायम टिकणारी अशी मैत्री झाली आणि माझ्या नेमणुकीत टिकून राहण्यासही मला खूप मदत मिळाली.”

उटे

जर्मनीतील उटे नावाच्या बहिणीला १९९३ साली मादागास्कर इथं मिशनरी म्हणून नियुक्त करण्यात आलं. आता त्यांचं वय ५० च्या आसपास आहे. त्या म्हणतात: “सुरवातीला परिस्थितींशी जुळवून घ्यायला मला खूप अवघड गेलं. तिथली स्थानिक भाषा शिकणं, उष्ण वातावरण, तसंच मलेरिया, अमीबा आणि इतर घातक जिवाणूंशी करावा लागलेला सामना हे फार कठीण होतं. पण, बंधुभगिनींकडून मला बरीच मदत मिळाली. स्थानिक बहिणींनी, त्यांच्या मुलांनी आणि माझ्या बायबल विद्यार्थ्यांनी धीर दाखवून मला स्थानिक भाषा चांगल्या रीतीनं शिकण्यास मदत केली. मी आजारी पडले तेव्हा माझ्या मिशनरी सोबतीने खूप प्रेमळपणे माझी काळजी घेतली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यहोवाने मला खूप मदत केली. मला वाटत असणाऱ्या चिंता मी नेहमी त्याच्यापुढे व्यक्त करायचे. मग प्रार्थनेचं उत्तर मिळेपर्यंत मी धीरानं वाट पाहायचे; कधीकधी काही दिवसांसाठी तर कधीकधी काही महिन्यांसाठी. पण, यहोवाने माझ्या सर्व समस्या सोडवल्या.” आता मागील २३ वर्षांपासून बहीण उटे या मादागास्करमध्ये सेवा करत आहेत.

जीवन अधिक आशीर्वादित बनलं

परदेशात जिथं, राज्य प्रचारकांची जास्त गरज आहे अशा ठिकाणी जाऊन सेवा करणाऱ्या इतर सेवकांप्रमाणेच या अविवाहित बहिणींनीदेखील त्यांच्या जीवनात अनेक आशीर्वाद अनुभवले आहेत. हे आशीर्वाद कोणते आहेत?

हिडे

मूळच्या जर्मनीच्या व ७० च्या आसपास वय असलेल्या हिडे नावाच्या बहिणीच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. त्या १९६८ पासून आयव्हरी कोस्ट (आता याला कोट दि वार असं म्हणतात) इथं मिशनरी सेवा करत आहेत. त्या म्हणतात: “मला जो सर्वात मोठा आशीर्वाद अनुभवायला मिळाला आहे तो म्हणजे, माझ्या आध्यात्मिक मुलांना सत्याच्या मार्गावर चालत असताना पाहणं. मी ज्यांचा बायबल अभ्यास घेतला होता त्यांपैकी आता काही पायनियर आहेत, तर काही मंडळीत वडील या नात्यानं सेवा करत आहेत. बरेच लोक मला आई किंवा आजी म्हणतात. त्यांपैकी मंडळीतील एक वडील आणि त्याचं कुटुंब तर मला त्यांच्या घरातीलच एक सदस्य मानतं. याचा अर्थ यहोवाने मला एक मुलगा, सून आणि तीन नातवंडं दिली आहेत.”—३ योहा. ४.

कॅरेन (दोघींच्या मध्ये)

कॅनडातील कॅरेन, ज्यांचं वय आता ७० च्या आसपास आहे त्यांनी २० पेक्षा जास्त वर्षं पश्‍चिम आफ्रिकेत सेवा केली आहे. त्या म्हणतात: “मिशनरी सेवेनं मला आणखी जास्त प्रमाणात त्याग करण्यास, प्रेम दाखवण्यास आणि धीर धरण्यास शिकवलं. तसंच, वेगवेगळ्या देशांतील बंधुभगिनींसोबत कार्य केल्यामुळे माझा दृष्टिकोनही संकोचित राहिला नाही. एखादी गोष्ट करण्याचे वेगवेगळे मार्ग असू शकतात हे मी शिकले. आणखी एक मोठा आशीर्वाद म्हणजे संपूर्ण जगभरात माझे अनेक चांगले मित्र आहेत. आमच्या जीवनात आणि नेमणुकांमध्ये बरेच बदल झाले असले, तरी आमची मैत्री मात्र अजूनही कायम राहिली आहे.”

इंग्लंडची मार्गरेट यांचं वय आता ७५ ते ८० च्या जवळपास आहे. त्यांनी लाओस इथं मिशनरी सेवा केली आहे. त्या म्हणतात: “विदेशात सेवा केल्यामुळे मी स्वतः हे पाहू शकले की, यहोवा कशा प्रकारे सर्व वंशाच्या आणि पार्श्वभूमीच्या लोकांना स्वतःकडे आकर्षित करतो. या अनुभवामुळे माझा विश्वास आणखी मजबूत झाला. तसंच, मला या गोष्टीचीही पूर्ण खात्री पटली आहे की, यहोवा त्याच्या संघटनेचं मार्गदर्शन करत आहे आणि तो त्याचे सर्व उद्देश पूर्ण करेल.”

विदेशात सेवा करणाऱ्या अविवाहित बहिणींनी, यहोवाच्या सेवेत एक अप्रतिम उदाहरण मांडलं आहे! खरंच, त्या आपल्या प्रशंसेस पात्र आहेत. (शास्ते ११:४०) आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांच्याप्रमाणेच आणखी बऱ्याच बहिणीही सेवा करण्यास पुढे येत आहेत. (स्तो. ६८:११) तर मग सेवाकार्य करण्यासाठी तुम्हीही आपल्या परिस्थितीत काही फेरबदल करू शकता का? या लेखात ज्या आवेशी बहिणींची मुलाखत घेण्यात आली आहे, त्यांच्या उदाहरणाचं अनुकरण करण्याची तुमची तयारी आहे का? जर तुमचीही तयारी असेल, तर तुम्ही अनुभव घेऊन पाहाल की यहोवा देव हा खरंच किती चांगला आहे!—स्तो. ३४:८.