व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपण यहोवाचे आहोत

आपण यहोवाचे आहोत

“यहोवा ज्या राष्ट्राचा देव आहे, ते सुखी आहे; जे लोक त्याने आपल्या स्वतःच्या वतनाकरता निवडले आहेत, ते सुखी आहेत.”—स्तो. ३३:१२, पं.र.भा.

गीत क्रमांक: ३१, ४८

१. सर्वकाही यहोवाचं आहे असं आपण का म्हणू शकतो? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

सर्वकाही यहोवाच्या मालकीचं आहे! “आकाश व आकाशापलीकडचे आकाश आणि पृथ्वी व तिच्यातले सर्व काही” त्याचं आहे. (अनु. १०:१४; प्रकटी. ४:११) यहोवाने मनुष्यांना निर्माण केल्यामुळे आपण सर्व जण त्याचे आहोत. (स्तो. १००:३) पण या संपूर्ण मानवजातीतून देवाने अशा काही लोकांना निवडलं आहे जे त्याच्यासाठी खूप खास आहेत.

२. बायबलनुसार असे कोण आहेत जे यहोवासाठी खास आहेत?

उदाहरणार्थ, स्तोत्र १३५ मध्ये प्राचीन इस्राएलात असणाऱ्‍या यहोवाच्या विश्‍वासू सेवकांबद्दल असं सांगण्यात आलं आहे की ते देवाची “वैयक्‍तिक मालमत्ता” होते. (स्तो. १३५:४, सुबोधभाषांतर) तसंच, होशेयने असं भाकीत केलं की काही विदेशी यहोवाचे लोक बनतील. (होशे. २:२३) जेव्हा यहोवाने इस्राएली नसलेल्या लोकांची ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करण्यासाठी निवड सुरू केली तेव्हा या भविष्यवाणीची पूर्णता झाली. (प्रे. कार्ये १०:४५; रोम. ९:२३-२६) पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त झालेल्यांना “पवित्र राष्ट्र” म्हणण्यात आलं. ते यहोवाची “खास प्रजा आहेत.” (१ पेत्र २:९, १०) पण पृथ्वीवर सर्वकाळची आशा असणाऱ्‍या सर्व विश्‍वासू ख्रिश्‍चनांबद्दल काय? यहोवा त्यांनाही ‘माझे लोक’ आणि “माझे निवडलेले” असं म्हणतो.—यश. ६५:२२.

३. (क) आज कोणाचं यहोवासोबत एक खास नातं आहे? (ख) या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

स्वर्गात अनंतकाळ जगण्याची आशा असलेला ‘लहान कळप’ आणि पृथ्वीवर अनंतकाळ जगण्याची आशा असलेली “दुसरी मेंढरे” आज “एक कळप” म्हणून यहोवाची उपासना करत आहेत. (लूक १२:३२; योहा. १०:१६) आपलं यहोवासोबत एक खास नातं आहे आणि आपण त्यासाठी किती कृतज्ञ आहोत हे यहोवाला दाखवण्याची आपली इच्छा आहे. या खास सन्मानासाठी आपण यहोवाचे आभार कसे मानू शकतो याबद्दल आपण या लेखात चर्चा करणार आहोत.

आपण यहोवाला आपलं जीवन समर्पित करतो

४. कोणत्या एका मार्गाने आपण यहोवाचे आभार मानू शकतो आणि येशूनेही हे कसं केलं?

यहोवाला आपलं जीवन समर्पित करून व बाप्तिस्मा घेऊन आपण यहोवाचे आभार मानतो. यामुळे सर्वांना कळतं की आपण यहोवाचे आहोत आणि त्याच्या आज्ञेत राहण्याची आपली इच्छा आहे. (इब्री १२:९) येशूने त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळीही असंच काहीतरी केलं. तो जरी यहोवाच्या समर्पित राष्ट्राचा भाग होता, तरी त्याने यहोवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी स्वतःला दिलं. त्या वेळी तो जणू म्हणत होता: “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे.”—स्तो. ४०:७, ८.

५, ६. (क) येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी यहोवा काय म्हणाला? (ख) आपल्या समर्पणाबद्दल यहोवाला कसं वाटतं हे समजण्यासाठी एक उदाहरण द्या.

येशूने जेव्हा बाप्तिस्मा घेतला तेव्हा यहोवाला कसं वाटलं? बायबल म्हणतं: “बाप्तिस्मा झाल्यानंतर येशू लगेच पाण्यातून वर आला आणि पाहा! आकाश उघडले व देवाचा आत्मा कबुतरासारखा येशूवर उतरताना योहानला दिसला. आणि त्याच वेळी स्वर्गातून असा आवाज ऐकू आला: ‘हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे.’” (मत्त. ३:१६, १७) येशू आधीपासून यहोवाचा होता. पण जेव्हा यहोवाने पाहिलं की फक्‍त त्याची सेवा करण्यासाठी येशू आपल्या जीवनाचा उपयोग करणार आहे, तेव्हा त्याला खूप आनंद झाला. आपणही जेव्हा आपलं जीवन यहोवाला समर्पित करतो तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो आणि यासाठी तो आपल्याला नक्की आशीर्वाद देईल.—स्तो. १४९:४.

पण यहोवाकडे तर सर्वकाही आहे. मग आपण त्याला काय देऊ शकतो? एका अशा माणसाची कल्पना करा ज्याचा सुंदर फुलांचा बगिचा आहे. एकदा त्याची मुलगी त्यातलं एक फूल तोडते आणि ते त्याला देते. ते फूल जरी त्याच्या बागेतलं असलं, तरी या सुंदर भेटीबद्दल तो प्रेमळ पिता खूप आनंदी होतो. त्या भेटीवरून त्या मुलीचं तिच्या बाबांसाठी असलेलं प्रेम दिसतं. मुलीने दिलेलं ते फूल त्याला बागेतल्या इतर सर्व फुलांपेक्षा मौल्यवान वाटतं. त्याच प्रकारे आपण जेव्हा मनापासून आपलं जीवन यहोवाला समर्पित करतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो.—निर्ग. ३४:१४.

७. स्वेच्छेने यहोवाची सेवा करणाऱ्‍यांबद्दल त्याला काय वाटतं हे मलाखी कसं समजावतो?

मलाखी ३:१६ वाचा. आपलं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेणं इतकं महत्त्वाचं का आहे? आपण अस्तित्वात आलो त्या क्षणापासून आपण आपल्या निर्माणकर्त्याचे, यहोवाचे आहोत. तुम्ही जेव्हा यहोवाला तुमचा शासक म्हणून स्वीकारता आणि स्वतःचं जीवन त्याला समर्पित करता तेव्हा त्याला किती आनंद होतो याचा जरा विचार करा! (नीति. २३:१५) यहोवाची मनापासून सेवा करणाऱ्‍यांना तो ओळखतो आणि तो त्यांची नावं आपल्या स्मरणवहीत लिहितो.

८, ९. यहोवाच्या स्मरणवहीत नाव असणाऱ्‍यांकडून तो काय अपेक्षा करतो?

यहोवाच्या स्मरणवहीत, जीवनाच्या पुस्तकात आपलं नाव असावं असं जर आपल्याला वाटत असेल, तर त्यासाठी आपल्याला काहीतरी करण्याची गरज आहे. मलाखी सांगतो की आपण यहोवाचं भय मानलं पाहिजे आणि त्याच्या नावावर मनन केलं पाहिजे. आपण जर दुसऱ्‍या कोणाची उपासना केली तर यहोवाच्या स्मरणवहीतून आपलं नाव काढून टाकलं जाईल.—निर्ग. ३२:३३; स्तो. ६९:२८.

म्हणून यहोवाची इच्छा करण्याचं वचन देणं आणि मग बाप्तिस्मा घेणंच फक्‍त पुरेसं नाही. या अशा गोष्टी आहेत ज्या आपण एकदाच करतो, पण यहोवाची उपासना मात्र आपल्याला जीवनभर करायची आहे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत दररोज आपण आपल्या कार्यांद्वारे दाखवलं पाहिजे, की आपण यहोवाच्या आज्ञा पाळत आहोत.—१ पेत्र ४:१, २.

आपण जगातल्या इच्छा नाकारतो

१०. यहोवाची सेवा करणारे आणि सेवा न करणारे यांच्यामध्ये कोणता फरक असला पाहिजे?

१० आधीच्या लेखात आपण पाहिलं होतं की काईन, शलमोन आणि इस्राएली लोकांनी यहोवाची उपासना करण्याचा दावा केला. पण ते यहोवाला एकनिष्ठ राहिले नाहीत. यावरून आपण शिकतो की ‘मी यहोवाची उपासना करतो’ असं म्हणणं फक्‍त पुरेसं नाही, तर आपण वाइटाचा द्वेष करणं आणि चांगल्याची आवड धरणंही गरजेचं आहे. (रोम. १२:९) यहोवा म्हणतो की “धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद” स्पष्टपणे कळेल.—मला. ३:१८.

११. आपण फक्‍त यहोवाचीच उपासना करतो हे इतरांना स्पष्टपणे का कळलं पाहिजे?

११ यहोवाने आपल्याला त्याची प्रजा म्हणून निवडलं आहे, यासाठी आपण त्याचे खूप आभारी आहोत. आपली आध्यात्मिक प्रगती “सर्वांना स्पष्टपणे दिसून” आली पाहिजे. (मत्त. ५:१६; १ तीम. ४:१५) स्वतःला विचारा: ‘मी यहोवाला एकनिष्ठ आहे हे इतरांना दिसून येतं का? मी यहोवाचा साक्षीदार आहे हे मी इतरांना अभिमानाने सांगतो का?’ आपण यहोवाचे आहोत हे सांगताना जर आपल्याला लाज वाटत असेल, तर हे पाहून यहोवाला किती वाईट वाटेल याची कल्पना करा.—स्तो. ११९:४६; मार्क ८:३८ वाचा.

तुम्ही यहोवाचे साक्षीदार आहात हे तुमच्या जीवनशैलीतून दिसून येतं का? (परिच्छेद १२, १३ पाहा)

१२, १३. कोणत्या गोष्टींमुळे काहींना यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळखणं कठीण गेलं आहे?

१२ दुःखाची गोष्ट आहे की काही साक्षीदारांनी ‘जगाच्या आत्म्याचं’ अनुकरण केलं आहे. यामुळे ते जवळजवळ यहोवाची उपासना न करणाऱ्‍यांसारखेच ठरले आहेत. (१ करिंथ. २:१२) “जगाचा आत्मा” लोकांना स्वार्थी इच्छांवर लक्ष केंद्रित करायला भाग पाडतो. (इफिस. २:३) उदाहरणार्थ, आपले कपडे कसे असावेत याबद्दल बरंचसं मार्गदर्शन मिळालं असतानाही, काहींनी शालीन नसलेले कपडे घालण्याची निवड केली आहे. ते ख्रिस्ती सभांनाही तंग किंवा टाईट आणि अंगप्रदर्शन करणारे कपडे घालतात. तसंच ते जगातल्या लोकांसारखी आणि लक्ष वेधणारी केशभूषा करतात. (१ तीम. २:९, १०) अशा प्रकारची केशभूषा व वेशभूषा केल्यामुळे आपण यहोवाचे साक्षीदार आहोत की नाही असा प्रश्‍न कदाचित लोकांना पडू शकतो.—याको. ४:४.

१३ तसंच काही साक्षीदारांनी आपल्या वागणुकीतून दाखवलं आहे की ते काही प्रमाणात या जगाचे भाग आहेत. उदाहरणार्थ, काही जण पार्ट्यांमध्ये अशा प्रकारे नाचले व वागले आहेत जे ख्रिश्‍चनांसाठी अयोग्य आहे. काहींनी तर असे फोटो आणि कमेंट्‌स सोशल मिडियावर टाकले आहेत ज्यावरून त्यांची शारीरिक विचारसरणी दिसून येते. त्यांनी कदाचित गंभीर पाप केलं नसेल आणि त्यासाठी त्यांना ताडना मिळाली नसेल. पण त्यांचा वाईट प्रभाव अशा बंधुभगिनींवर पडू शकतो जे या जगापासून वेगळे राहण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत.—१ पेत्र २:११, १२ वाचा.

जे पूर्णपणे यहोवाची बाजू घेत नाहीत त्यांच्या प्रभावात येऊ नका

१४. यहोवासोबत असलेलं आपलं खास नातं सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

१४ आपलं लक्ष “शरीराची वासना, डोळ्यांची वासना आणि आपल्या धनसंपत्तीचा दिखावा” यांवर केंद्रित करण्यासाठी हे जग आपल्याला प्रवृत्त करतं. (१ योहा. २:१६) पण आपण यहोवाचे असल्यामुळे आपण वेगळे आहोत. आपण “देवाच्या इच्छेविरुद्ध असलेल्या सर्व गोष्टींचा व जगाच्या वासनांचा धिक्कार” करतो आणि “या जगाच्या व्यवस्थेत समंजसपणे, नीतीने आणि सुभक्‍तीने जीवन” जगतो. (तीत २:१२) आपल्या संपूर्ण जीवनशैलीवरून म्हणजे आपली बोली, खाणं-पिणं, कपडे आणि काम यांवरून सर्वांना हे स्पष्टपणे दिसून आलं पाहिजे की आपण यहोवाचे आहोत.—१ करिंथ. १०:३१, ३२ वाचा.

आपण “एकमेकांवर अगदी मनापासून प्रेम” करतो

१५. आपण इतर बंधुभगिनींशी दयेने आणि प्रेमाने का वागलं पाहिजे?

१५ आपण ज्या प्रकारे आपल्या बंधुभगिनींशी वागतो त्यावरून आपण दाखवतो की आपल्याला यहोवासोबत असलेल्या आपल्या नात्याची कदर आहे. आपण जसे यहोवाचे आहोत तसे आपले बंधुभगिनीही यहोवाचे आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवल्यामुळे आपण त्यांच्याशी प्रेमाने आणि दयेने वागू. (१ थेस्सलनी. ५:१५) हे किती महत्त्वाचं आहे? येशूने त्याच्या शिष्यांना म्हटलं: “तुमचं एकमेकांवर प्रेम असलं, तर यावरूनच सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.”—योहा. १३:३५.

१६. लोकांसाठी असलेल्या यहोवाच्या प्रेमाबद्दल मोशेच्या नियमशास्त्रातून आपण काय शिकतो?

१६ आपण मंडळीतल्या इतरांशी कसं वागावं हे समजण्यासाठी मोशेच्या नियमशास्त्रातल्या एका उदाहरणावर विचार करा. यहोवाच्या मंदिरात काही भांडी फक्‍त उपासनेसाठी वापरली जायची. लेव्यांना या भांड्यांची काळजी घेण्याबद्दल नियमशास्त्रात स्पष्टपणे सूचना देण्यात आल्या होत्या. आणि या सूचनांचं पालन न करणाऱ्‍याला मारून टाकलं जायचं. (गण. १:५०, ५१) उपासनेसाठी असणाऱ्‍या वस्तूंच्या वापराबद्दल जर यहोवाला इतकी काळजी होती, तर लोकांनी त्याच्या एकनिष्ठ समर्पित सेवकांसोबत कसं वागावं याची त्याला किती जास्त काळजी असेल! आपण त्याच्यासाठी किती मौल्यवान आहोत हे आपल्याला माहीत असावं अशी त्याची इच्छा आहे. तो म्हणतो: “जो कोणी तुम्हास स्पर्श करेल तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करेल.”—जख. २:८.

१७. यहोवा कोणत्या गोष्टीकडे लक्ष देतो?

१७ आपले सेवक एकमेकांशी कसं वागतात याकडे यहोवा लक्ष देतो असं मलाखी सांगतो. (मला. ३:१६) “जे आपले आहेत त्यांना यहोवा ओळखतो.” (२ तीम. २:१९) आपण जे करतो व बोलतो ते सर्वकाही यहोवाला माहीत आहे. (इब्री ४:१३) आपण आपल्या बंधुभगिनींशी दयेने वागलो नाही तर ते यहोवा पाहतो. पण आपण जेव्हा पाहुणचार, उदारता, क्षमाशीलता आणि दयाळूपणा दाखवतो तेव्हा यहोवा याकडेही लक्ष देतो याची आपण खातरी बाळगू शकतो.—इब्री १३:१६; १ पेत्र ४:८, ९.

यहोवा आपल्या लोकांचा त्याग करणार नाही

१८. यहोवाने आपल्याला त्याचे लोक होण्यासाठी निवडलं आहे याबद्दल आपण त्याचे आभार कसे मानू शकतो?

१८ यहोवाचे लोक असण्याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत हे आपल्याला त्याला दाखवायचं आहे. आपल्याला माहीत आहे की यहोवाला आपलं जीवन समर्पित करणं आपल्या जीवनातला सर्वात सुज्ञ निर्णय होता. आपण जरी “एका बिघडलेल्या व विकृत पिढीत” राहत असलो, तरी आपण “निर्दोष, निरागस व निष्कलंक” राहून या “जगामध्ये प्रकाशाप्रमाणे चमकत” राहू शकतो. (फिलिप्पै. २:१५) म्हणून यहोवाला न आवडणाऱ्‍या गोष्टी टाळण्याचा आपला निश्‍चय पक्का आहे. (याको. ४:७) तसंच, आपण आपल्या बंधुभगिनींना प्रेम आणि आदर दाखवतो कारण तेही यहोवाचे आहेत.—रोम. १२:१०.

१९. जे यहोवाचे आहेत त्यांना तो कसं प्रतिफळ देतो?

१९ बायबल अभिवचन देतं: “परमेश्‍वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही.” (स्तो. ९४:१४) यहोवा खातरीने सांगतो की काहीही झालं तरी तो आपल्यासोबत असेल. आपला मृत्यू जरी झाला तरी तो आपल्याला विसरणार नाही. (रोम. ८:३८, ३९) “आपण जर जगतो, तर यहोवासाठी जगतो; आणि जर मरतो, तर यहोवासाठी मरतो. त्यामुळे, आपण जगलो किंवा मेलो, तरी यहोवाचेच आहोत.” (रोम. १४:८) आपण त्या वेळेची आतुरतेने वाट पाहत आहोत जेव्हा यहोवा त्याच्या सर्व एकनिष्ठ सेवकांना मृत्यूच्या निद्रेतून उठवून जिवंत करेल. (मत्त. २२:३२) आजही आपण आपल्या पित्याकडून आलेल्या भेटवस्तूंचा आनंद लुटत आहोत. बायबल म्हणतं: “यहोवा ज्या राष्ट्राचा देव आहे, ते सुखी आहे; जे लोक त्याने आपल्या स्वतःच्या वतनाकरता निवडले आहेत, ते सुखी आहेत.”—स्तो. ३३:१२, पं.र.भा.