व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला माहीत होतं का?

तुम्हाला माहीत होतं का?

पारव्यांचं किंवा कबुतरांचं अर्पण देणं इस्राएली लोकांना सोईस्कर का होतं?

मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे पारवे किंवा कबुतरं यहोवाला अर्पण केली जाऊ शकत होती. अर्पणं देण्याच्या नियमांमध्ये या दोन पक्ष्यांचा उल्लेख नेहमी सोबत करण्यात आला आहे. त्यामुळे अर्पणांसाठी पारव्यांऐवजी कबुतरं, आणि कबुतरांऐवजी पारवे वापरले जाऊ शकत होते. (लेवी. १:१४; १२:८; १४:३०) इस्राएली लोकांसाठी ही गोष्ट सोईस्कर का होती? कारण प्राचीन इस्राएलमध्ये पारवे नेहमीच मिळत नव्हते. का बरं?

पारवा

पारवे हे स्थलांतर करणाऱ्‍या पक्ष्यांमध्ये मोडतात. त्या काळात सहसा उन्हाळ्याच्या दिवसांत हे पक्षी इस्राएल देशात सगळीकडे पाहायला मिळायचे. पण दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात ते दक्षिणेकडच्या उबदार देशांमध्ये स्थलांतर करायचे आणि वसंत ऋतुत पुन्हा इस्राएलमध्ये यायचे. (गीत. २:११, १२; यिर्म. ८:७) त्यामुळे हिवाळ्यात इस्राएल देशात अर्पणासाठी पारवे मिळणं मुश्‍कील व्हायचं.

राखाडी कबुतर

याउलट, कबुतरं सहसा स्थलांतर करत नाहीत. त्यामुळे इस्राएलमध्ये ते वर्षभर मिळायचे. शिवाय ते पाळलेही जायचे. (योहान २:१४, १६ सोबत तुलना करा.) बायबल प्लान्ट्‌स ॲण्ड ॲनिमल्स  (बायबल काळातली झाडं आणि प्राणी) नावाच्या एका पुस्तकात असं म्हटलं आहे: “पॅलेस्टाईनमधल्या जवळजवळ प्रत्येक गावात कबुतरं पाळली जायची. प्रत्येक घरात या पक्ष्यांसाठी कबुतरखाने किंवा भिंतींना बिळांसारख्या खोबणी केलेल्या असायच्या.”—यशया ६०:८ सोबत तुलना करा.

भिंतीच्या खोबणीत बसलेलं कबुतर

इस्राएलमध्ये वर्षभर जे पक्षी सहज उपलब्ध व्हायचे त्यांचं अर्पण यहोवा आनंदाने स्वीकारायचा. यावरून यहोवा किती प्रेमळ आणि आपल्या सेवकांची परिस्थिती समजून घेणारा देव आहे हे दिसून येतं.