व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला माहीत होतं का?

तुम्हाला माहीत होतं का?

इस्राएली लोक इजिप्तमध्ये गुलाम होते हे बायबलव्यतिरिक्‍त कोणत्या पुराव्यांवरून सिद्ध होतं?

बायबल सांगतं की मिद्यानी लोकांनी योसेफला इजिप्तमध्ये नेलं. त्यानंतर त्याचे पिता याकोब आपल्या कुटुंबासोबत कनानमधून इजिप्तमध्ये राहायला गेले. ते इजिप्तमध्ये नाईल नदीच्या तोंडाजवळ असलेल्या गोशेन प्रांतात स्थायिक झाले. (उत्प. ४७:१, ६) इस्राएली लोक “बहुगुणित” आणि “महाप्रबळ” होत गेले. हे पाहून इजिप्तच्या लोकांना भीती वाटली आणि त्यांनी इस्राएली लोकांना गुलाम बनवलं.—निर्ग. १:७-१४.

काही आधुनिक काळातल्या टिकाकारांनी बायबलच्या या अहवालावर प्रश्‍न उचलला आणि तो काल्पनिक असल्याचा दावा केला. तरीसुद्धा पुरावा दाखवतो की शेमी * लोक प्राचीन इजिप्तमध्ये गुलामीत होते.

उदाहरणार्थ, पुरातत्वशास्त्राचा अभ्यास करणाऱ्‍यांना उत्तर इजिप्तमध्ये प्राचीन वसाहती असल्याचे पुरावे सापडले आहेत. डॉक्टर जॉन बिमसन सांगतात की उत्तर इजिप्तच्या परिसरात शेमी लोकांची वसाहत असल्याचे २० किंवा त्यापेक्षा जास्त पुरावे मिळाले आहेत. त्यासोबतच, इजिप्त संस्कृतीचा अभ्यास करणारे जेम्स के. हॉफमेयर म्हणतात: “साधारण इ.स.पू. १८०० ते १५४० या काळात पश्‍चिम आशियातल्या शेमी लोकांना इजिप्तचं खूप आकर्षण होतं आणि म्हणून बरेचसे लोक तिथे स्थलांतरित झाले. हा काळ आणि उत्पत्तीच्या पुस्तकात उल्लेख केलेल्या अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांचा काळ एकच होता. तसंच, बायबलमध्ये त्यांच्या परिस्थितीबद्दल जे सांगितलं आहे त्यातही साम्य आहे.”

पुढे दक्षिण इजिप्तमध्ये विद्वानांना आणखी काही पुरावे मिळाले. त्यांना एक चर्मपत्र सापडलं आणि ते जवळपास इ.स.पू. २०००–इ.स.पू. १६०० या काळातलं असावं. त्यात दक्षिण इजिप्तमधल्या एका घरात काम करणाऱ्‍या गुलामांची नावं लिहिलेली होती. त्यांपैकी ४० पेक्षा जास्त नावं शेमी लोकांची होती. हे गुलाम किंवा सेवक स्वयंपाक, विणकाम आणि मजुरी करायचे. हॉफमेयर यांच्या परीक्षणानुसार त्यांचं म्हणणं आहे, की “जर थिबैदच्या [दक्षिण इजिप्तच्या] एका घराण्यात ४० पेक्षा जास्त शेमी लोक काम करायचे तर संपूर्ण इजिप्तमध्ये, खासकरून नाईल नदीच्या तोंडाशी असलेल्या भागात नक्कीच बरेचसे शेमी लोक राहत असावेत.”

पुरातत्वशास्त्राचा अभ्यास करणारे डेविड रॉल म्हणतात की त्या चर्मपत्रावर “लिहिलेली नावं बायबलमध्ये दिलेल्या नावांसारखी होती.” उदाहरणार्थ, इस्साखार, आशेर आणि शिप्रा. (निर्ग. १:३, ४, १५) ते शेवटी म्हणतात: “या ठोस पुराव्यांवरून सिद्ध होतं की इस्राएली लोक इजिप्तमध्ये गुलाम होते.”

डॉक्टर बिमसन म्हणतात: “इस्राएली लोक इजिप्तमध्ये गुलामीत होते आणि तिथून त्यांची सुटका झाली, याबद्दल बायबलमध्ये दिलेल्या माहितीचा ठोस पुरावा इतिहासातून मिळतो.”

^ परि. 4 नोहाच्या तीन मुलांपैकी एकाचं नाव शेम होतं आणि त्याच्या नावापासून शेमी हे नाव आलं आहे. शेमच्या वंशात एलामी, अश्‍शूरी, खासदी, इब्री, सूरिया आणि अरबी कुळातल्या बऱ्‍याचशा गोत्रांचा समावेश होतो.