तुम्ही सर्वकाळ पृथ्वीवर राहू शकता
किती अद्भुत आशा! आपल्या निर्माणकर्त्याने आपल्याला याच पृथ्वीवर सदासर्वकाळाचं जीवन देण्याचं वचन दिलं आहे. पण अनेकांना यावर विश्वास ठेवायला कठीण जातं. ते म्हणतात: ‘प्रत्येकाला कधी न् कधी मरावं लागणार आहे. जीवन आणि मृत्यू हे नैसर्गिक चक्राचा भाग आहेत.’ इतरांना वाटतं की अनंतकाळ जगणं शक्य आहे, पण ते या पृथ्वीवर नाही. ते म्हणतात की मृत्यूनंतर स्वर्गात गेल्यावरच एका व्यक्तीला सर्वकाळाचं जीवन मिळतं. तुम्हाला काय वाटतं?
या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याआधी बायबल पुढील तीन प्रश्नांचं काय उत्तर देतं ते आपण पाहू या: मानवांना ज्या प्रकारे निर्माण करण्यात आलं होतं त्यावरून तो किती काळ जगू शकतो हे कसं दिसून येतं? पृथ्वीसाठी आणि मानवजातीसाठी देवाचा मूळ उद्देश काय आहे? मानवांवर मृत्यू कसा ओढवला?
मानवाची अनोखी रचना
देवाने या पृथ्वीवर बनवलेल्या सर्व सजीवांमध्ये मनुष्याची रचना अनोखी आहे. कशा प्रकारे? बायबल म्हणतं की देवाने फक्त मानवालाच त्याच्या “प्रतिरूपाचा” आणि त्याच्याशी “सदृश” असा बनवला होता. (उत्पत्ति १:२६, २७) याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ मानवांना देवाच्या हुबेहूब प्रतिरूपात बनवलं आहे. त्यांच्यात देवासारखेच प्रेम, न्याय आणि इतर गुण आहेत.
त्याचबरोबर मानवांना विचार आणि तर्क करण्याच्या देणगीसोबत चांगलं व वाईट ओळखण्याची क्षमता आणि देवाला जाणून घेऊन त्याच्याशी नातं जोडण्याची इच्छाही देण्यात आली आहे. यामुळेच आपण या विश्वाच्या अफाट शक्तीची, निसर्गातल्या विलक्षण गोष्टींची, तसंच कलेची, संगीताची आणि काव्याची कदर बाळगू शकतो. मानवांच्या बाबतीत सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे आपल्या निर्माणकर्त्याची उपासना करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. या सर्व गोष्टींमुळे मानव आणि पृथ्वीवर राहणारे इतर सजीव यांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे.
पुढील प्रश्नावर विचार करा: देवाने जर आपल्याला फक्त काही काळ जगण्यासाठी बनवलं असतं, तर त्याने आपल्याला हे अद्भुत गुण देऊन ते वाढवण्याची आणि त्यात सुधारणा करण्याची असीम क्षमता दिली असती का? नाही. खरंतर, मानवांनी याच पृथ्वीवर अनंतकाळपर्यंत जगावं, म्हणून देवाने त्यांना हे अनोखे गुण आणि क्षमता दिल्या आहेत.
देवाचा मूळ संकल्प
काही जण म्हणतात की मानवांनी या पृथ्वीवर अनंतकाळासाठी राहावं अशी देवाची मुळीच इच्छा नव्हती. ते दावा करतात की देवाने पृथ्वीला एका तात्पुरत्या घरासारखं बनवलं आहे. एक असं घर, ज्यात देवासोबत कायमस्वरूपी स्वर्गात राहण्याच्या योग्यतेचं कोण आहे याची चाचणी केली जाते. पण, जर हे खरं असतं, तर पृथ्वीवर चालणाऱ्या सर्व दुष्टतेसाठी आणि वाईट गोष्टींसाठी देव जबाबदार आहे असा याचा अर्थ झाला असता. पण मग ही गोष्ट देवाच्या व्यक्तिमत्त्वाच्या अगदीच उलट ठरली असती. नाही का? कारण बायबल त्याच्याबद्दल म्हणतं: “त्याचे सर्व मार्ग न्यायाचे अनुवाद ३२:४.
आहेत; तो विश्वसनीय देव आहे; त्याच्या ठायी अनीती नाही; तो न्यायी व सरळ आहे.”—पृथ्वीसाठी असलेल्या देवाच्या मूळ संकल्पाबद्दल बायबल स्पष्टपणे असं सांगतं: “स्वर्ग तर परमेश्वराचा आहे, पण पृथ्वी त्याने मानवजातीला दिली आहे.” (स्तोत्र ११५:१६) यावरून समजतं की देवाने मानवजातीला कायमस्वरूपी राहण्यासाठी सुंदर पृथ्वी बनवली आहे. तसंच आपल्याला सर्वकाळाचं अर्थभरीत जीवन जगण्यासाठी लागणारी सर्व साधनंही त्याने या पृथ्वीवर पुरवली आहेत.—उत्पत्ति २:८, ९.
“स्वर्ग तर परमेश्वराचा आहे, पण पृथ्वी त्याने मानवजातीला दिली आहे.”—स्तोत्र ११५:१६
मानवांसाठी असलेल्या संकल्पाबद्दलही बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे. त्याने पहिल्या मानवी जोडप्याला सांगितलं होतं: “पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा; . . . पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा.” (उत्पत्ति १:२८) त्यांच्या घराची, पृथ्वीवर असलेल्या नंदनवनाची काळजी घेण्याचा व त्याचा विस्तार करण्याचा मोठा बहुमान त्यांना मिळाला होता! यावरून कळतं की आदाम-हव्वा व त्यांच्या वंशजांना स्वर्गात राहण्याचं बक्षीस मिळणार नव्हतं, तर पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आली होती.
आपण का मरतो?
मग आपण का मरतो? बायबल म्हणतं की देवाच्या आत्मिक प्राण्यांपैकी एकाने, म्हणजे पुढे जाऊन दियाबल सैतान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंडखोराने एदेन बागेतली देवाची व्यवस्था कोलमडून टाकण्याचा प्रयत्न केला. त्याने हे कसं केलं?
आपल्या पहिल्या आईवडिलांना, आदाम-हव्वाला देवाच्या विरुद्ध बंड करण्यासाठी सैतानाने प्रवृत्त केलं. सैतानाने दावा केला की देव त्यांना स्वतःसाठी चांगलं-वाईट ठरवण्याचा हक्क न देण्याद्वारे त्यांच्यापासून काहीतरी चांगलं लपवून ठेवत आहे. हे ऐकून आदाम-हव्वाने सैतानाची बाजू घेण्याचा आणि देवाविरुद्ध बंड करण्याचा निर्णय घेतला. याचा काय परिणाम झाला? देवाने सांगितल्याप्रमाणे कालांतराने त्यांचा मृत्यू झाला. पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाळासाठी राहण्याची आशा त्यांनी गमावली.—उत्पत्ति २:१७; ३:१-६; ५:५.
आदाम-हव्वाने केलेल्या या बंडाळीचा परिणाम सर्व मानवांवर झाला आहे. देवाचं वचन म्हणतं: “ज्या प्रकारे एका माणसाद्वारे [आदामद्वारे] पाप जगात आले आणि पापाद्वारे मरण आले, त्याच प्रकारे मरण सर्व माणसांमध्ये पसरले, कारण त्या सर्वांनी पाप केले होते.” (रोमकर ५:१२) आपल्या पहिल्या आईवडिलांद्वारे वारशाने मिळालेल्या पाप आणि मृत्यूमुळे आपण मरतो. देवाच्या पूर्वनियोजित किंवा आपल्या समजशक्तीच्या पलीकडे असलेल्या कोणत्याही योजनेमुळे नाही.
तुम्ही सर्वकाळ पृथ्वीवर राहू शकता
एदेन बागेत झालेल्या बंडाळीमुळे पृथ्वीसाठी आणि मानवांसाठी असलेला देवाचा मूळ उद्देश निष्फळ झाला नाही. आपल्याला वारशाने मिळालेल्या पाप आणि मृत्यूच्या गुलामीतून सोडवण्यासाठी, देव प्रेम आणि न्याय या गुणांमुळे प्रेरित झाला. प्रेषित पौलने सांगितलं: “पापाची मजुरी मृत्यू आहे, पण देवाचे कृपादान, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्याद्वारे सर्वकाळाचे जीवन हे आहे.” (रोमकर ६:२३) प्रेमामुळेच देवाने “आपला एकुलता एक पुत्र [येशू ख्रिस्त] दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं.” (योहान ३:१६) खंडणी म्हणून स्वतःला स्वेच्छेने देण्याद्वारे येशूने आदामद्वारे गमावलेले सर्वकाही परत मिळवून दिले. a
पृथ्वी नंदनवन बनेल हे देवाने दिलेलं वचन लवकरच पूर्ण होईल. तुम्ही जर येशूने दिलेली सूचना लक्षात ठेवली, तर हे सुंदर भविष्य नक्कीच तुम्हाला मिळू शकतं. त्याने म्हटलं: “अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाणारा दरवाजा रुंद आणि रस्ता पसरट आहे व त्यातून जाणारे बरेच जण आहेत; तर जीवनाकडे जाणारा दरवाजा अरुंद आणि रस्ता अडचणीचा आहे व फार कमी लोकांना तो सापडतो.” (मत्तय ७:१३, १४) तेव्हा तुम्ही जी निवड कराल त्यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे. मग तुम्ही कोणती निवड कराल?
a खंडणीमुळे तुम्हाला कसा फायदा होतो, याबद्दल आणखी माहितीसाठी कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकाचा धडा २७ पाहा. हे पुस्तक यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलं आहे आणि ते तुम्हाला www.ps8318.com/mr या वेबसाईटवरून मोफत डाऊनलोड करता येईल.