व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चुकांबद्दल योग्य दृष्टिकोन

चुकांबद्दल योग्य दृष्टिकोन

डॅन आणि मार्गरेट * यांची मुलगी, जावई आणि दोन नातवंडं, त्यांच्या घरी काही दिवसांसाठी आले होते. ते जाणार त्या दिवशी मार्गरेटने त्यांच्यासाठी एक खास बेत ठेवला. मार्गरेट एक निवृत्त शेफ होती. तिच्या नातवंडांची आवडती डिश म्हणजे मॅकरोनी अॅन्ड चीज. तिने तीच डिश बनवण्याचं ठरवलं.

सगळे टेबलवर जेवायला बसले, तेव्हा मार्गरेटने ती खास डिश बाहेर आणली आणि टेबलच्या मधोमध ठेवली. जसं तिने झाकण उघडलं आणि ती निराश झाली कारण त्या भांड्यात नुसताच गरम चीज सॉस होता. त्यात मॅकरोनीच नव्हती. खरंतर मार्गरेट मॅकरोनी हा मुख्य पदार्थच टाकायला विसरली! *

आपल्या सर्वांकडून चुका होतात; मग आपलं वय किंवा अनुभव कितीही असला तरीही. आपण कधीकधी अविचारीपणे बोलतो किंवा चुकीच्या वेळी एखादी गोष्ट करतो. कधीकधी तर आपण एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो किंवा ती विसरून जातो. पण मग प्रश्‍न येतो, की चुका का होतात? आपण त्यांना कसं हाताळू शकतो? चुका टाळता येऊ शकतात का? आपण जर चुकांबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवला, तर आपल्याला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील.

चुकांबद्दल आपला आणि देवाचा दृष्टिकोन

आपण एखादी चांगली गोष्ट करतो आणि लोक आपली प्रशंसा करतात तेव्हा अगदी आनंदाने आपण ती स्वीकारतो. तसंच केलेल्या चांगल्या गोष्टीसाठी आपण जबाबदार आहोत, हे आपण मान्यसुद्धा करतो. मग जेव्हा आपण चुका करतो, तेव्हासुद्धा आपण तोच जबाबदारपणा दाखवू नये का? आपल्या हातून अजाणपणे चूक झाली किंवा ती कोणाच्या लक्षात जरी आली नाही, तरीही आपण ती चूक कबूल करू नये का? नम्रता दाखवल्यामुळे असं करण्यासाठी आपल्याला मदत होईल.

आपण जर स्वतःबद्दल खूप जास्त विचार करत असू, तर आपण केलेल्या चुका क्षुल्लक होत्या असं दाखवण्याचा किंवा दुसऱ्‍यांवर ढकलण्याचा प्रयत्न करू. इतकंच काय, तर आपण ती चूक केलीच नाही असंदेखील कदाचित आपण म्हणू. असं केल्यामुळे वाईट परिणाम घडू शकतात. म्हणजे कदाचित समस्या तशीच राहील किंवा निर्दोष व्यक्‍तीवर आळ येईल. असं करण्यात आपण आज जरी यशस्वी झालो, तरी आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की “आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतःविषयी देवाला हिशोब देईल.”—रोमकर १४:१२.

देव चुकांबद्दल वाजवी दृष्टिकोन बाळगतो. बायबलमध्ये स्तोत्र या पुस्तकात देवाबद्दल म्हटलं आहे, की तो “दयाळू व कृपाळू” आहे. तसंच, “तो सर्वदाच दोष देत राहणार नाही; तो आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही,” असंही त्यात म्हटलं आहे. आपण अपरिपूर्ण आहोत आणि जन्मतःच आपल्यात कमतरता आहेत, हे देव जाणतो. आपण “केवळ माती आहो हे तो आठवतो.”—स्तोत्र १०३:८, ९, १४.

पित्याप्रमाणे देवाला वाटतं, की त्याच्या मुलांनीसुद्धा चुकांबद्दल त्याच्यासारखाच दृष्टिकोन बाळगला पाहिजे. (स्तोत्र १३०:३) देवाने त्याच्या शास्त्रवचनांत म्हणजे बायबलमध्ये बरेच प्रेमळ सल्ले आणि मार्गदर्शन दिले आहेत. यामुळे आपल्या आणि इतर जणांच्या चुका योग्यपणे हाताळण्यासाठी आपल्याला मदत होईल.

चुका होतात तेव्हा . . .

जेव्हा एखादी चूक होते, तेव्हा ती कशामुळे घडली यावर विचार करण्यासाठी किंवा त्याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी एक व्यक्‍ती सहसा आपला बराच वेळ आणि मानसिक शक्‍ती खर्च करते. पण असं करण्याऐवजी क्षमा मागून, मतभेद सोडवून आपली मैत्री टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणं सुज्ञपणाचं ठरणार नाही का? तुम्ही अशी एखादी चूक केली आहे का, ज्यामुळे तुम्हाला किंवा इतरांना त्याचा त्रास झाला होता किंवा वाईट परिणामांना तोंड द्यावं लागलं होतं? तर मग, स्वतःवर रागावण्याऐवजी किंवा दुसऱ्‍यांवर आळ घेण्याऐवजी समस्या सोडवण्यासाठी मेहनत घ्या. दुसऱ्‍या कोणत्यातरी गोष्टीमुळे चूक झाली असेल, असा दावा केल्याने विनाकारण तणाव निर्माण होऊ शकतो आणि समस्या आणखीनच गंभीर होऊ शकते. त्याऐवजी चुकांमधून बोध घ्या, त्या सुधारा आणि योग्य ते करा.

दुसऱ्‍यांच्या हातून चूक झाली, तर ‘असं व्हायला नको होतं’ अशी प्रतिक्रिया सहजच देऊन आपण मोकळे होतो. पण असं करण्याऐवजी येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या सल्ल्याचं पालन करणं योग्य राहील. तो म्हणाला होता: “ज्या गोष्टी इतरांनी आपल्यासाठी कराव्यात असं तुम्हाला वाटतं त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी केल्या पाहिजेत.” (मत्तय ७:१२) आपल्या हातून एखादी चूक झाली, मग ती लहान असली तरी दुसऱ्‍यांनी आपल्याशी दयाळूपणे वागावं किंवा त्या चुकीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं, असं आपल्याला वाटत असतं. मग तशीच दया दुसऱ्‍यांना दाखवण्याचा आपणही पुरेपूर प्रयत्न करायला नको का?—इफिसकर ४:३२.

चुका टाळण्यासाठी मदत करणारी तत्त्वं

“चुकीचा अंदाज, अपुरं ज्ञान किंवा दुर्लक्ष करणं” या गोष्टींमुळे चुका होतात, असं एका शब्दकोशात म्हटलं आहे. यांपैकी एखाद्या किंवा या सर्व गोष्टींमुळे प्रत्येक व्यक्‍ती कधी ना कधी चुकते. पण शास्त्रवचनांतल्या काही मूलभूत तत्त्वांवर विचार केल्याने, आपल्या हातून कमी चुका होतील.

नीतिसूत्रे १८:१३ मध्ये असंच एक तत्त्व दिलं आहे. तिथे म्हटलं आहे: “ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते.” म्हणून नेमकं काय घडलं, ते पूर्णपणे ऐकून घेण्यासाठी वेळ द्या आणि उत्तर देण्याआधी विचार करा. असं केल्यामुळे, आपण तडकाफडकीने बोलण्याचं किंवा वागण्याचं टाळू. तसंच, नीट लक्ष देऊन मिळवलेल्या माहितीमुळे आपल्याला खूप मदत होऊ शकते. आणि त्यामुळे आपण चुकीचे निर्णय घेणार नाही आणि चूक करणार नाही.

बायबलमध्ये आणखीन एक तत्त्व दिलं आहे: “शक्यतो, सर्व माणसांसोबत होईल तितके शांतीने राहा.” (रोमकर १२:१८) सहकार्य देण्याचा आणि शांती टिकवून ठेवण्याचा, तुमच्याकडून होताहोईल तितका प्रयत्न करा. इतरांसोबत काम करताना त्यांना आदर द्या त्यांच्याशी दयाळूपणे वागा. तसंच, त्यांची प्रशंसा करा आणि त्यांना प्रोत्साहन द्या. कारण अशा वातावरणात, कोणी अविचारीपणे बोललं किंवा वागलं, तर त्याला क्षमा करायला किंवा त्या चुकीकडे दुर्लक्ष करायला सोपं जातं. आणि समजा खूप मोठी चूक जरी झाली, तरी परिस्थिती प्रेमळपणे सुधारली जाऊ शकते किंवा समस्या सोडवली जाऊ शकते.

चूक झाल्यावर सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. त्यातून तुम्ही काही बोध घेऊ शकता का, यावर विचार करा. तुम्ही जे बोललात किंवा जे केलं, त्यासाठी कारणं शोधण्यापेक्षा त्या संधीचं चीज करा. तुम्हाला कोणते चांगले गुण विकसित करण्याची गरज आहे त्यावर विचार करा. धीर, दयाळूपणा, संयम, सौम्यता, शांती आणि प्रेम हे गुण तुम्ही विकसित करण्याची गरज आहे का? (गलतीकर ५:२२, २३) झालेल्या चुकीतून तुम्ही कमीत कमी हे तरी नक्की शिकाल, की पुढच्या वेळी तुम्ही कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. चूक झाल्यावर स्वतःविषयीच जास्त विचार करत बसू नका. पण याचा अर्थ बेजबाबदार होणं असंही नाही. तसंच, तणावपूर्ण वातावरण थंड करण्यासाठी विनोदी वृत्ती बाळगा.

योग्य दृष्टिकोन ठेवल्यामुळे फायदा होतो

चुकांबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगल्याने त्यांना नीट हाताळण्यासाठी मदत होईल. इतरांसोबत आपले शांतीपूर्ण संबंध राहतील. इतकंच काय, तर आपलंसुद्धा मन शांत असेल. आपल्या चुकांमधून आपण नेहमी शिकत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण यामुळे आपण समंजस होऊ. तसंच, आपण इतरांची पसंतीसुद्धा मिळवू. चूक झाल्यावर आपण अगदी निराश होणार नाही किंवा स्वतःला तुच्छ लेखणार नाही. इतर जणांनासुद्धा चुकांचा सामना करावा लागतो याची जाणीव ठेवल्यामुळे, आपल्याला त्यांच्या आणखीन जवळ जायला मदत होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपण देवाच्या प्रेमाचं आणि मनापासून क्षमा करण्याच्या गुणाचं अनुकरण करायला शिकलं पाहिजे. असं केल्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो.—कलस्सैकर ३:१३.

लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या मार्गरेटच्या चुकीमुळे त्या प्रसंगाची मजा गेली का? कुटुंबाचा आनंद हिरावला का? मुळीच नाही. कारण सर्वांनी आणि खासकरून मार्गरेटने तो प्रसंग जास्त गंभीरपणे न घेता, हसण्यावारी नेला. सगळे आनंदाने जेवले आणि तेसुद्धा मॅकरोनीशिवाय! खूप वर्षांनंतर जेव्हा तिची नातवंडं मोठी झाली, तेव्हा त्यांनी आपल्या मुलांना हसत हा मॅकरोनीचा प्रसंग सांगितला. तसंच, आजी-आजोबांच्या गोड आठवणीसुद्धा जाग्या केल्या. कारण जे घडलं होतं, ती तर फक्‍त एक चूक होती. ▪

^ परि. 2 नावं बदलण्यात आली आहेत.

^ परि. 3 मॅकरोनी आणि चीज या डिशमध्ये मुख्यतः मॅकरोनी पास्ता आणि चीज सॉस असतो.