व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलमध्ये समलैंगिकतेबद्दल काय सांगितलं आहे?

बायबलमध्ये समलैंगिकतेबद्दल काय सांगितलं आहे?

समलैंगिक विवाह या विषयावर अनेक देशात अजून वाद आहे. पण अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने २०१५ मध्ये, पूर्ण देशभरात समलैंगिक विवाहाला मान्यता दिली. त्यानंतर लोक इंटरनेटवर समलैंगिक विवाहाबद्दल सर्वात जास्त सर्च करत होते. लोक विचारत असलेल्या प्रश्नांपैकी एक प्रश्न हा होता की, “बायबलमध्ये समलैंगिक विवाहाबद्दल काय सांगितलं आहे?”

समलिंगी व्यक्तींमध्ये विवाह कायदेशीर आहे की नाही याबद्दल बायबल थेट उत्तर देत नाही. पण त्याऐवजी आपण हा मूलभूत प्रश्न विचारला पाहिजे की, बायबलमध्ये समलैंगिकतेबद्दल काय सांगितलं आहे?

बायबलचं परीक्षण न करताच, बऱ्याच लोकांना वाटतं की त्यांना त्यातील उत्तर माहीत आहे. पण खरंतर त्यांची उत्तरं बायबलच्या अगदी उलट आहेत. काही म्हणतात, बायबल समलैंगिकतेची निंदा करते. तर काहींचं म्हणणं आहे की बायबलमध्ये “आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर” अशी जी आज्ञा दिली आहे, त्यानुसार एक व्यक्ती कोणासोबतही लैंगिकसंबंध ठेवू शकते, अगदी समलैंगिक संबंधसुद्धा.—रोमकर १३:९.

बायबलमध्ये काय म्हटलं आहे?

खालीलपैकी कोणती वाक्य बरोबर आहेत असं तुम्हाला वाटतं?

  1. १. बायबलमध्ये समलैंगिक कृत्यांची निंदा केली आहे.

  2. २. बायबलमध्ये समलैंगिक कृत्यांना सूट देण्यात आली आहे.

  3. ३. समलैंगिक व्यक्तींचा द्वेष करण्याचं उत्तेजन बायबलमध्ये दिलं आहे.

उत्तरं

  1. १. बरोबर. बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुषसंभोग घेणारे . . . यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” (१ करिंथकर ६:९, १०) हे तत्त्वं स्त्रियांनादेखील लागू होतं.—रोमकर १:२६.

  2. २. चूक. बायबलची अशी शिकवण आहे की, शारीरिक संबंध फक्त अशा स्त्री आणि पुरुषामध्ये असले पाहिजेत ज्यांचं एकमेकांशी लग्न झालं आहे.—उत्पत्ति १:२७, २८; नीतिसूत्रे ५:१८, १९.

  3. ३. चूक. बायबलमध्ये जरी समलैंगिक कृत्यांची निंदा केली असली, तरी समलैंगिक लोकांबद्दल द्वेष, दुर्व्यवहार, पक्षपात, किंवा गैरवागणुकीला त्यात प्रोत्साहन दिलेलं नाही.रोमकर १२:१८. [1]

यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्वास आहे?

बायबलमधील नैतिक दर्जे चांगलं जीवन जगण्यासाठी सर्वात उत्तम आहेत असा यहोवाच्या साक्षीदारांचा विश्वास आहे. ते त्यानुसार जगण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. (यशया ४८:१७) [2] याचा अर्थ, यहोवाचे साक्षीदार सर्व प्रकारची वाईट लैंगिक कृत्यं टाळतात, ज्यामध्ये समलैंगिकतेचाही समावेश होतो. (१ करिंथकर ६:१८) [3] ही जीवनशैली यहोवाच्या साक्षीदारांनी स्वेच्छेने स्वीकारली आहे आणि त्याप्रमाणे जगण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे.

इतरांकडून तुम्हाला जशी वागणूक मिळण्याची इच्छा आहे तसं तुम्ही त्यांच्याशी वागायला हवं, हा सुवर्ण नियम यहोवाचे साक्षीदार पाळतात

पण असं असलं तरी यहोवाचे साक्षीदार “सर्वांबरोबर ‘शांततेने राहण्याचा’” प्रयत्न करतात. (इब्री लोकांस १२:१४) समलैंगिक कृत्यांना जरी ते मान्यता देत नसले तरी ते आपले विचार दुसऱ्यांवर लादत नाहीत. ते समलैंगिक लोकांवर अत्याचार करत नाहीत आणि त्यांच्यावर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा त्यांना आनंद होत नाही. इतरांकडून तुम्हाला जशी वागणूक मिळण्याची इच्छा आहे तसं तुम्ही त्यांच्याशी वागायला हवं, हा सुवर्ण नियम यहोवाचे साक्षीदार पाळतात.—मत्तय ७:१२.

बायबलमध्ये पक्षपात करायला शिकवलं आहे का?

काही लोक कदाचित असा आरोप करतील की, बायबलमध्ये समलैंगिक लोकांबद्दल पक्षपात करायला शिकवलं आहे. आणि बायबलमधील नैतिक नियमांचं पालन करणारे, दुसऱ्यांविषयी दया दाखवत नाही. आरोप करणारे म्हणतात, ‘बायबल लिहिलं गेलं त्या काळात लोक जुन्या विचारांचे होते. पण आज आम्ही सर्व वंशाच्या, वेगवेगळ्या देशात राहणाऱ्या आणि वेगळी लैंगिक आवड असणाऱ्या लोकांचा स्वीकार करतो.’ अशा लोकांसाठी समलैंगिकतेचा विरोध करणं म्हणजे लोकांच्या रंगावरून त्यांच्याशी भेदभाव करण्यासारखं आहे. पण अशी तुलना करणं योग्य आहे का? नाही, पण का नाही?

कारण समलैंगिक कृत्यांचा विरोध करणं आणि समलैंगिक लोकांचा विरोध करणं यात फरक आहे. ख्रिस्ती लोकांनी ‘सर्वांचा मान’ राखला पाहिजे असं बायबलमध्ये सांगण्यात आलं आहे. (१ पेत्र २:१७) [4] पण ख्रिस्ती लोकांनी सर्व प्रकारच्या कृत्यांचा स्वीकार केला पाहिजे असा त्याचा अर्थ होत नाही.

यावर विचार करा: समजा, तुमच्या मते सिगरेट पिणं वाईट आहे आणि त्याचा तुम्हाला तिटकारा आहे. पण जर तुमच्या कामावरील सोबत्याला सिगरेट पिण्याची सवय असेल तर? सिगरेट पिण्याबद्दल तुमचे आणि त्याचे विचार जुळत नसले म्हणून तुम्ही संकुचित विचारांचे आहात, असं म्हणणं योग्य ठरेल का? तसंच, तो सिगरेट ओढतो आणि तुम्ही ओढत नाही याचा अर्थ तुम्ही त्याच्याबाबतीत पक्षपाती आहात, असा होतो का? पण जर त्याने तुम्हाला सिगरेट पिण्याबद्दल तुमचं मत बदलायला सांगितलं तर, तोच तुमच्या विचारांची कदर न करणारा आणि पक्षपाती ठरणार नाही का?

यहोवाच्या साक्षीदारांनी बायबलमधील नैतिक दर्जांनुसार जीवन जगण्याची निवड केली आहे. बायबल ज्या गोष्टींचा विरोध करते त्याला ते मान्यता देत नाहीत. पण ज्यांची जीवनशैली त्यांच्यापेक्षा वेगळी आहे त्यांना ते तुच्छ लेखत नाहीत आणि त्यांच्यावर अत्याचारदेखील करत नाहीत.

बायबलमधील दृष्टिकोन क्रूर आहे का?

पण अशा लोकांचं काय ज्यांना समलैंगिक इच्छा आहेत? ते जन्मापासून तसेच आहेत का? जर असं असेल तर त्यांनी आपल्या इच्छांनुसार जगू नये, असं म्हणणं क्रूरता ठरणार नाही का?

एका व्यक्तीमध्ये समलैंगिक भावना का असतात ते बायबलमध्ये सांगितलेलं नाही. पण माणसांमध्ये काही भावना खूप प्रबळ असू शकतात हे सांगितलं आहे. त्यामुळे देवाला खूश करायचं असेल, तर बायबलनुसार आपण काही गोष्टी टाळल्या पाहिजेत ज्यात समलैंगिकतेचादेखील समावेश आहे.—२ करिंथकर १०:४, ५.

काही लोक म्हणतील की बायबलमधील दृष्टिकोन क्रूर आहे. पण त्यांच्या या विचारांचा अर्थ होतो की आपण आपल्या सर्व इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत. तसंच लैंगिक इच्छा या इतक्या महत्त्वाच्या आहेत की आपण त्या नियंत्रित करू नये किंवा आपल्याला त्या नियंत्रित करताही येणार नाहीत. माणसं आपल्या इच्छांचा विरोध करू शकतात असं बायबलमध्ये म्हटलं आहे. ते प्राण्यांसारखे नाहीत, ते आपल्या इच्छांवर ताबा मिळवू शकतात.—कलस्सैकर ३:५. [5]

यावर विचार करा: काही जाणकार म्हणतात की एखाद्याच्या रागीट स्वभावामागे शारीरिक किंवा मानसिक कारणं असू शकतात. एक व्यक्ती रागीट का होते हे बायबलमध्ये सांगितलेलं नाही. पण हे जरूर सांगितलं आहे की काही लोकांना नेहमी राग येऊ शकतो किंवा ते तापट वृत्तीचे असू शकतात. (नीतिसूत्रे २२:२४; २९:२२) असं असलं तरी “राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर.” असं बायबल म्हणते.—स्तोत्र ३७:८; इफिसकर ४:३१.

रागीट स्वभावाच्या लोकांसाठी हा सल्ला क्रूर असल्याचं कोणीच म्हणणार नाही. इतकंच काय तर, जाणकार लोक अशा मूळच्या रागीट किंवा तापट स्वभावाच्या व्यक्तींना, त्यांच्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करण्याचा खूप प्रयत्न करतात.

त्याप्रमाणेच आपण बायबल स्तरांनुसार नसलेल्या सर्व गोष्टी टाळल्या पाहिजेत असं यहोवाच्या साक्षीदारांचं मत आहे. लग्न न झालेल्या स्त्री आणि पुरुषाने शारीरिक संबंध ठेवणं हेदेखील त्यात सामील आहे. या सर्व बाबतीत बायबलमध्ये दिलेला हा सल्ला लागू होतो: “तुम्ही लैंगिक अनैतिकता टाळावी व आपले शरीर पवित्र आणि सन्मानीय आहे हे लक्षात ठेवून, तुम्हातील प्रत्येकाने आपल्या शरीरावर ताबा ठेवण्यास शिकावे.”—१ थेस्सलनीकाकर ४:४, ५, सुबोधभाषांतर.

“तुम्हापैकी कित्येक तसे होते”

पहिल्या शतकात, ज्यांना येशूचे शिष्य बनायचं होतं ते वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे होते तसंच त्यांची जीवनशैली फार वेगळी होती. पण नंतर त्यातील काहींनी आपल्या जीवनशैलीमध्ये फार मोठमोठे बदल केले. उदाहरणार्थ, बायबलमध्ये त्यांच्याविषयी म्हटलं आहे: ते “जारकर्मी, मुर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुषसंभोग घेणारे” होते. आणि पुढे असंही म्हटलं आहे की, “तुम्हापैकी कित्येक तसे होते.”१ करिंथकर ६:९-११.

“तुम्हापैकी कित्येक तसे होते” याचा अर्थ असा होतो का, की त्या समलैंगिक व्यक्तींना पुन्हा कधीच समलैंगिक कृत्यं करण्याची इच्छा झाली नसेल? नाही. कारण बायबलमध्ये असंही आर्जवण्यात आलं आहे की, “आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही.”—गलतीकर ५:१६.

एका ख्रिस्ती व्यक्तीच्या मनात चुकीची इच्छा कधीच येऊ शकत नाहीत असं बायबल म्हणत नाही. पण त्यात असं म्हटलं आहे की, ती व्यक्ती त्या इच्छेनुसार वागणार नाही. ख्रिस्ती लोक अशा इच्छांवर ताबा मिळवायला शिकतात. ते त्या इच्छांवर इतका विचार करत नाही की त्यांच्या हातून वाईट कृत्यं घडतील.—याकोब १:१४, १५. [6]

इच्छा आणि कृती यांमध्ये फरक असल्याचं बायबलमध्ये सांगितलं आहे. (रोमकर ७:१६-२५) एका समलैंगिक व्यक्तीने आपल्या इच्छांवर सतत विचार करणं सोडून दिलं, तर ती त्यावर ताबा मिळवू शकते. जसं ती क्रोध, व्यभिचार, लोभ यांसारख्या वाईट गोष्टींवर ताबा मिळवू शकते तसंच ती समलैंगिक इच्छांवरसुद्धा ताबा मिळवू शकते.—१ करिंथकर ९:२७; २ पेत्र २:१४, १५.

यहोवाचे साक्षीदार बायबलमधील नैतिक तत्त्वांचं पालन करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. आपले विचार ते दुसऱ्यांवर लादत नाहीत. ज्यांची जीवनशैली त्यांच्यापासून वेगळी आहे, त्यांच्या मानवी अधिकारांच्या संरक्षणासाठी जे कायदे बनवले जातात, ते बदलण्याचेदेखील ते सुचवत नाहीत. यहोवाचे साक्षीदार देत असलेला संदेश सर्वांच्या भल्यासाठी आहे. ज्यांना तो ऐकण्याची इच्छा आहे, त्यांना तो आवडीने सांगण्यासाठी ते उत्सुक असतात.—प्रेषितांची कृत्ये २०:२०. (g16-E No. 4)

^ १. रोमकर १२:१८: “सर्व माणसांबरोबर . . . शांतीने राहा.”

^ २. यशया ४८:१७: “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो.”

^ ३. १ करिंथकर ६:१८: “जारकर्माच्या [लैंगिक अनैतिकतेच्या, NW] प्रसंगापासून पळ काढा.”

^ ४. १ पेत्र २:१७: “सर्वांस मान द्या.”

^ ५. कलस्सैकर ३:५: “तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना  . . . हे जिवे मारा.”

^ ६. याकोब १:१४, १५: “तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो तेव्हा मोहांत पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते.”