व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला | विवाह

समस्यांवर चर्चा कशी कराल?

समस्यांवर चर्चा कशी कराल?

हे कठीण का आहे?

तुम्ही आणि तुमचा विवाहसोबती जेव्हा एका समस्येवर चर्चा करता, तेव्हा चर्चेच्या शेवटी समस्या सुटण्याऐवजी तुमच्यात जास्त दुरावा निर्माण होतो का? जर असं असेल, तर निराश होऊ नका तुम्हाला ही परिस्थिती बदलता येईल. पण त्याआधी तुम्हाला पुरुष आणि स्त्रिया कसे संवाद साधतात यातील फरक जाणून घ्यावा लागेल. *

काही गोष्टी लक्षात घ्या

स्त्रियांना कुठल्याही समस्येवर उपाय ऐकण्याआधी त्यावर बोलायला आवडतं. इतकंच काय तर कधी-कधी समस्येबद्दल बोलणं हाच त्यांच्या समस्येवरचा उपाय असतो.

“मी जेव्हा आपल्या मनातल्या सर्व गोष्टी आपल्या पतीला सांगते आणि तो मला समजून घेतो तेव्हा मला फार बरं वाटतं. मी माझी समस्या त्याला सांगितल्यानंतर काही वेळातच मला बरं वाटू लागतं.”—सिरप्पा. *

“मी जोपर्यंत माझ्या पतीला माझ्या मनात काय चाललंय ते स्पष्टपणे सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट माझ्या मनात घोळत राहते. त्याबद्दल बोलल्यावरच माझ्या मनाला समाधान मिळतं.”—इ-जीन.

“माझ्यासाठी हे एक कोडं सोडवण्यासारखं आहे. मी जेव्हा समस्येबद्दल बोलते तेव्हा जणू समस्येच्या प्रत्येक पैलूचा अभ्यास करत असते आणि त्या समस्येच्या मुळापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत असते.”—लुरडस.

पुरुष नेहमी समस्या सोडवण्यावरच लक्ष देतात. पुरुषांना प्रश्न सोडवायला, समस्यांवर उपाय शोधायला आवडतं. आणि असं करून आपण दुसऱ्यांची मदत करतो असं त्यांना वाटतं. समस्यांवर उपाय सांगून एक पती आपल्या पत्नीला दाखवतो की, ती मदतीसाठी त्याच्यावर अवलंबून राहू शकते. तेव्हा कित्येकदा आपण सुचवत असलेला उपाय पत्नी लगेच का स्वीकारत नाही हे पतीला कळत नाही. एक पती असं म्हणतो, “तुम्हाला जर समस्येवर उपाय नको असेल तर तुम्ही त्याबद्दल बोलताच कशाला, हे मला समजत नाही.”

द सेवन प्रिन्सिपल्स फॉर मेकींग मॅरेज वर्क या पुस्तकात म्हटलं आहे, “कुठलाही उपाय सुचवण्याआधी समस्या समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुमच्या सोबत्याला हे कळलं पाहिजे की त्यांची समस्या आणि त्याबद्दल त्यांच्या भावना तुम्हाला पूर्णपणे समजल्या आहेत. त्यानंतर तुम्ही त्यांना उपाय सुचवू शकता. पण बऱ्याचदा तुमच्या पत्नीला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा नसते. तर फक्त तुम्ही तिचं म्हणणं नीट ऐकून घ्यावं एवढीच अपेक्षा असते.”

तुम्ही काय करू शकता

पतींसाठी: स्वतःला पत्नीच्या जागी ठेवून तिचं बोलणं ऐकून घेण्याचा प्रयत्न करा. तोमास नावाचा पती म्हणतो: “बऱ्याचदा माझ्या पत्नीचं बोलणं ऐकून घेतल्यावर मी विचार करतो की, ‘यातून काहीच उपाय निघाला नाही.’ पण खरंतर मी तिचं बोलणं मनापासून ऐकावं इतकंच तिला हवं असतं.” स्टीफन नावाचा पती पण असंच म्हणतो: “मी माझ्या पत्नीचं बोलणं मध्येच न तोडता, पूर्णपणे ऐकून घेतो. बहुतेक वेळा असं होतं की तिचं बोलणं संपल्यावर ती म्हणते की तिला फार बरं वाटलं.”

हे करून पाहा: पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही आपल्या पत्नीसोबत कुठल्या समस्येवर चर्चा करत असाल तर तिने न मागता सल्ला द्यायचा प्रयत्न करू नका. ती बोलत असताना, इथं तिथं न बघता नीट लक्ष देऊन ऐका. तुम्ही नीट ऐकत आहात हे तिला कळण्यासाठी होकारार्थी मान हलवू शकता. तिचं बोलणं तुम्हाला समजलं हे दाखवण्यासाठी तुम्ही तिच्या बोलण्यातले काही मुद्दे पुन्हा म्हणून दाखवू शकता. चार्लस् नावाचा पती म्हणतो, “कधी-कधी माझ्या पत्नीला फक्त हेच जाणून घ्यायचं असतं की तिला काय वाटतं हे मला समजतंय आणि मी तिच्या बाजूने उभा आहे.”—बायबल तत्त्व: याकोब १:१९.

पत्नींसाठी: तुमच्या पतीकडून तुमची काय अपेक्षा आहे ते त्यांना सांगा. एलेनी नावाची पत्नी म्हणते, “आपल्याला काय हवंय हे आपल्या जोडीदाराला माहीत असायला हवं अशी आपण अपेक्षा करतो. पण कधी-कधी आपल्याला ते स्पष्टपणे सांगावं लागतं.” याबाबतीत ईनेज नावाची पत्नी असं सुचवते: “मी असं बोलू शकते, ‘मला एक गोष्ट सारखी सतावत आहे आणि मला ती तुम्हाला सांगायची आहे. तुम्ही काही करू नका फक्त माझं बोलणं ऐकून घ्या. मला कसं वाटतंय तेवढं समजून घ्या.’”

हे करून पाहा: जर तुमच्या पतीने तुमचं बोलणं पूर्ण होण्याआधीच उपाय सुचवला तर लगेच हे ठरवू नका की, तो तुमच्या भावना समजून घेत नाही. याउलट तो तुमच्या मनावरचा भार हलका करण्याचा प्रयत्न करत आहे. एस्तेर नावाची पत्नी म्हणते: “मी रागावण्याऐवजी असा विचार करते की, माझे पती माझी किती काळजी करतात. मला जे बोलायचंय ते ऐकून घेतातच पण त्यासोबतच माझी मदतदेखील करण्याची त्यांची इच्छा असते.”—बायबल तत्त्व: रोमकर १२:१०.

दोघांसाठी: दुसऱ्यांनी आपल्याशी जसं वागावं अशी आपली अपेक्षा असते आपणही त्यांच्याशी तसंच वागण्याचा प्रयत्न करतो. पण समस्यांवर यशस्वी रीतीने चर्चा करण्यासाठी तुम्ही हा विचार केला पाहिजे, की तुमच्या जोडीदाराला तुम्ही त्यांच्याशी कसं वागलेलं आवडेल. (१ करिंथकर १०:२४) मिगेल नावाचा पती याबद्दल म्हणतो: “जर तुम्ही पती आहात तर समंजसपणे ऐकण्यास तयार राहा. जर तुम्ही एक पत्नी आहात तर कधीकधी पती सुचवत असलेले उपाय ऐकून घ्या. जेव्हा तुम्ही दोघेही तडजोड करायला तयार होता तेव्हा दोघंही आनंदी राहता.”—बायबल तत्त्व: १ पेत्र ३:८. (g16-E No. 3)

^ परि. 4 पुढे जी चर्चा केली आहे तसे स्वभाव कदाचित प्रत्येक पती आणि पत्नीचे नसतील. तरीदेखील या लेखात दिलेली तत्त्वं सर्वच विवाहित व्यक्तींना मदत करू शकतात. ही तत्त्वं त्यांना एकमेकांना समजून घ्यायला आणि चांगल्या प्रकारे संवाद साधायला मदत करतील.

^ परि. 7 या लेखातील नावं बदलण्यात आली आहेत.