व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देखणा पतंग

देखणा पतंग

देखणा पतंग

संध्याकाळचे शांत वातावरण होते; एका शानदार रेस्टॉरंटमध्ये एक पतंग उडत आला. आणि तो उडत उडत एका टेबलावर बसलेल्या बाईजवळ गेला; तिने लगेच त्याला उडवून लावले—जणू काही तो रोग-वाहक मच्छरच होता! मग तो पतंग दुसऱ्‍या टेबलापाशी गेला आणि एका मनुष्याच्या कोटाच्या कॉलरवर बसला. पण या मनुष्याची व त्याच्या पत्नीची प्रतिक्रिया अगदी वेगळी होती. ते त्या पतंगाला न्याहाळून पाहू लागले. पतंग किती सुंदर कीटक आहेत, ते कोणाला चावत नाहीत म्हणून ते कौतुकाने त्या कीटकाचे परीक्षण करू लागले.

कनेक्टीकट फुलपाखरू संघटनेचे उपसंस्थापक जॉन हिमलमेन म्हणतात की, “पतंग फारच निरुपद्रवी कीटक आहेत. त्यांना चावायला तोंड नसते आणि लुना पतंगासारखे काही प्रौढ पतंग तर काही खातही नाहीत. ते रेबीज किंवा इतर कोणत्याही रोगाचे वाहक नसतात आणि ते दंशही करत नाहीत . . . खरे तर, फुलपाखरे हे दिनचर पतंग असतात हे पुष्कळांना माहीत नाही.”

फुलपाखरांचे कौतुक सर्वांनाच वाटते पण विविध पतंग आणि त्यांचे सौंदर्य न्याहाळून पाहणारे फारसे लोक नाहीत. ‘पतंगांचे कसले सौंदर्य?’ असे तुम्ही कदाचित म्हणाल. काहींना वाटेल की, पतंग हे सुंदर फुलपाखराचे अनाकर्षक भाईबंद आहेत, पण खरे पाहता या दोघांचाही अंतर्भाव लेपिडॉप्टेरा गणात होतो; त्याचा अर्थ आहे “खवलेयुक्‍त पंख.” या देखण्या कीटकांची विविधता चकित करणारी आहे. कीटक विश्‍वकोश (इंग्रजी) यात दिल्यानुसार, लेपिडॉप्टेरा गणात सुमारे १,५०,००० ते २,००,००० ज्ञात जाती आहेत. पण त्यांपैकी, केवळ १० टक्के फुलपाखरे आहेत—बाकीचे सर्व पतंग आहेत!

इतर पुष्कळांप्रमाणेच मी पतंगांबद्दल फारसा विचार कधीच केला नाही; फक्‍त गरम कपडे पुन्हा नीट ठेवून देताना आणि कपड्यांचा नाश करणाऱ्‍या पतंगांसाठी डांबर गोळ्या घालताना मला त्यांची आठवण होत असे. मला ठाऊकच नव्हतं की, पतंगाच्या अळ्या कपडे खातात, प्रौढ झालेले पतंग कपडे खात नाहीत. *

पण पतंगांबद्दल माझा दृष्टिकोन कशामुळे बदलला असावा? काही दिवसांआधी, माझे पती आणि मी, बॉब आणि रॉन्डा नावाच्या आमच्या मित्रांकडे गेलो होतो. बॉबला पतंगांविषयी बरीच माहिती होती. त्याने मला एक लहान पेटी दाखवली ज्यामध्ये मला वाटलं एक सुंदर फुलपाखरू होतं. पण त्याने मला सांगितलं की, तो सेक्रोपिया किंवा रॉबिन पतंग आहे; उत्तर अमेरिकेत सापडणाऱ्‍या सर्वात मोठ्या पतंगांपैकी तो एक आहे. त्याच्या पंखांचा व्याप १५ सेंटीमीटर इतका असू शकतो आणि त्याचे जीवन चक्र एक वर्षांचे असते. पण या प्रौढ पतंगाचे आयुष्य फक्‍त ७ ते १४ दिवसांचे असते हे ऐकून मला आश्‍चर्याचा धक्का बसला! या सुंदर सेक्रोपिया पतंगाचे परीक्षण केल्यावर पतंगाविषयी माझं मतच बदलून गेलं.

बॉबने मला त्या पेटीत काही लहान ठिपके दाखवले. बॉबने खुलासा करत म्हटले: “ही अंडी आहेत आणि मी त्या अंड्यांतून पिले काढणार आहे.” म्हणजे पतंगाची पैदास? मला तर ऐकूनच कुतूहल वाटलं. पण, हे करणं तितकं सोपं नव्हतं. दोन आठवडे प्रयत्न करूनही बॉबला अंडी काही उबवता आली नाहीत. मग त्याने त्यांच्यावर थोडंसं पाणी शिंपडलं. आणि मग एका आठवड्यानंतर, एकाच दिवशी २९ अंड्यांपैकी २६ अंड्यांमधून अळ्या निघाल्या. अंड्यांमधून बाहेर पडलेल्या या नाजूक, मच्छराइतक्या अळ्या कोठेही बाहेर जाऊ नयेत म्हणून बॉबने त्यांना एका मऊ, गोल पात्रात ठेवले.

सर्वात आधी, या अळ्यांनी स्वतःच्याच अंड्याची टरफलं फस्त केली. मग, बॉबला त्यांना काही खायला द्यावं लागलं; पण हेसुद्धा सोपं नव्हतं. त्यानं यावर काही संशोधन केलं आणि मग त्यांना मेपल झाडाची पानं द्यायचं ठरवलं. मेपलच्या पानांवर या अळ्या फक्‍त फिरत राहिल्या; त्यांनी ती पानं खाल्ली नाहीत. पण, बॉबने त्यांना चेरी आणि बर्चची पाने दिली तर या अळ्यांनी त्या पानांचा फडशाच पाडला.

या बारीक अळ्यांचे रूपांतर सुरवंटांमध्ये झाले तेव्हा बॉबने त्यांना दुसऱ्‍या एका काचेच्या पेटीत घातले आणि त्यावर एक जाळी ठेवली. या काचेच्या पेटीत सुरवंटांना आणि पानांनाही योग्य प्रमाणात आर्द्रता मिळत होती. शिवाय, या पेटीमुळे हे सुरवंट बाहेर जाऊ शकत नव्हते नाहीतर चालायला सुरवात करताच या अळ्यांना भटकायची सवय असते.

भुकाळलेल्या २६ सुरवंटांना अन्‍न पुरवणे महामुश्‍कीलीचे होते. बॉबने काचेची पेटी पानांनी भरली तरी दोन दिवसात ती सगळी पाने फस्त व्हायची. मग त्याने आपल्या बहिणीला आणि एका मुलाला व मुलीला या वाढणाऱ्‍या सुरवंटांवर लक्ष ठेवायला आणि त्यांना खाद्य पुरवायला मदत करण्यासाठी सांगितले.

सुरवंटांचे अधाशासारखे खाणे केवळ त्यांच्या अळी अवस्थेकरताच नव्हे तर प्रौढावस्थेत पोषण मिळण्याकरताही फार आवश्‍यक असते. कारण प्रौढ सेक्रोपिया पतंगाला तोंड नसल्यामुळे प्रौढावस्थेत तो खातच नाही! प्रौढावस्थेतील अल्पकाळात जिवंत राहण्यासाठी त्याला अळी अवस्थेत पचवलेल्या अन्‍नावरच पूर्णतः अवलंबून राहावे लागते.

नवीन कात

सुरवंट जसजसे वाढत गेले तसतसे त्यांनी अनेकदा आपली कात टाकली. कात टाकण्याआधीच्या प्रत्येक अवस्थेला इन्स्टार म्हणतात.

सेक्रोपिया सुरवंटाची कातडी कधीच वाढत नाही; त्यामुळे सुरवंट वाढल्यामुळे त्याची कातडी तंग होऊ लागते तेव्हा ते कात टाकतात. आणि ते कात कधी टाकतील याची बॉबला कल्पना असायची कारण त्या वेळी सुरवंट आपले खाणे बंद करायचे. मग ते आपल्याभोवती रेशमाचे कोश तयार करून कित्येक दिवस त्यात निपचित पडून राहायचे; त्या दरम्यान त्यांना नवीन कातडी यायची. नवीन कातडी आल्यावर हे सुरवंट जुन्या कातडीतून फक्‍त बाहेर चालत यायचे; त्यांची जुनी कातडी रेशमाच्या कोशाला चिकटून राहायची. शेवटल्या वेळी कात टाकल्यानंतर ते किती मोठे झाले होते ते पाहून मला आश्‍चर्य वाटलं. ते जवळजवळ १२ सेंटीमीटर लांबीचे आणि माझ्या हाताच्या पहिल्या बोटापेक्षा जाड झाले होते.

कोश तयार करणे

अळी अवस्थेतील शेवटल्या टप्प्यानंतर प्रत्येक सुरवंटाने आपल्या भोवती एक कोश तयार केला; हा कोश म्हणजे एका काडीला चिकटवलेला करड्या धाग्यांचा गोळा होता. सेक्रोपिया पतंग दोन प्रकारचे कोश तयार करतात. एक कोश, मोठा, सैल, ढगळ असून त्याचे बुड गोलाकार व तोंड निमुळते असते. दुसऱ्‍या प्रकारचे कोश जरा लहान आणि घट्ट विणलेले व लंबगोलाकार असून त्याची दोन्ही तोंडे निमुळती असतात. दोन्ही प्रकारच्या कोशांच्या आत आणखी एक घट्ट विणलेले कोश असते. सेक्रोपियांचे कोश सहसा विटकरी, तपकिरी, फिकट हिरवे किंवा करड्या रंगाचे असतात. उत्तर अमेरिकेतील पतंगांच्या इतर जातीच्या कोशांपेक्षा, सेक्रोपिया पतंगांचे कोश खूप मोठे असतात—चक्क दहा सेंटीमीटर लांब आणि पाच ते सहा सेंटीमीटर रुंद असतात. आणि -३४ डिग्री सेल्सियस इतक्या कमी तापमानातही या कोशांच्या आतील सुरवंट सुरक्षित राहतात.

एकदा हे सुरवंट कोशावस्थेत गेल्यावर आम्हाला वाट पाहत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. पुढच्या वसंत ऋतूतच ते कोशातून बाहेर पडले; म्हणजे बॉबला प्रौढावस्थेतील पतंग मिळाल्याच्या तब्बल एका वर्षानंतर ते बाहेर पडले. कोश उभे राहावेत म्हणून बॉबने सर्व कोशाच्या काड्या एका प्लॅस्टिक फोमवर ठेवल्या. पाहता पाहता, एक सोडून बाकीच्या सर्व कोशांतून सेक्रोपिया पतंग बाहेर पडले; बॉबने धरलेल्या धीराचे व घेतलेल्या परिश्रमाचे सार्थक झाले.

पतंगांबद्दल अधिक प्रशंसा

सेक्रोपियाच्या अद्‌भुत जीवन चक्राचे दर्शन घडल्यामुळे, लाईटभोवती फडफडणाऱ्‍या किंवा इमारतींवर बसलेल्या पतंगांकडे माझे लक्ष जाऊ लागले आहे. मला त्यांच्याविषयी आणखी जाणून घेण्याची प्रेरणा देखील मिळाली आहे. उदाहरणार्थ, पतंग आणि फुलपाखरे उड्डाण करण्यात पटाईत आहेत, काही जाती तर फार दूरपर्यंत स्थलांतर करतात हे मला समजले आहे. चिमुकल्या डायमंडबॅक पतंगाच्या पंखांचे अंतर फक्‍त २५ सेंटीमीटर इतके आहे; तरीसुद्धा तो अनेकदा युरोप आणि ब्रिटनच्या दरम्यान, खवळणारा उत्तर समुद्र पार करून ये-जा करत असतो. स्पिंक्स किंवा हॉक पतंग, हमिंगबर्डप्रमाणे फुलांवर हवेतच तरंगतात.

सेक्रोपियाचे जीवनचक्र पाहिल्यावर काही काळानंतर, मला एक सेक्रोपिया पतंग एका दिव्याखाली झुडुपावर बसलेला दिसला. पतंगाच्या पंखांवरील खवले अत्यंत नाजूक असल्यामुळे त्यांना हातांनी कधीच पकडू नये. पण, आपला हात त्याच्यासमोर धरला तर कदाचित तो हातावर येऊन बसेल. मी माझा हात पुढे केल्यावर तो माझ्या मधल्या बोटावर येऊन बसला. पण नंतर तो झाडांवर उडून गेला. त्याला उडताना पाहून मला अगदी फुलपाखराची आठवण झाली. पुढच्या वेळी, तुम्ही “फुलपाखरू” पाहिलं, तर पुन्हा एकदा निरखून पाहा. कदाचित तो असाच एखादा सुंदर आणि निरुपद्रवी पतंग असावा.—सौजन्याने. (g०१ ६/८)

[तळटीप]

^ काही पतंगांच्या अळ्या पीकांचेही खूप नुकसान करतात.

[१८, १९ पानांवरील चित्रे]

१. रॉबिन पतंग (सेक्रोपिया)

२. पॉलीथिमस पतंग

३. सनसेट पतंग

४. ॲटलस पतंग

[चित्राचे श्रेय]

Natural Selection© - Bill Welch

A. Kerstitch

[२० पानांवरील चित्रे]

सेक्रोपिया पतंगाच्या विविध अवस्था:

१. अंडी

२. अळी

३. प्रौढ पतंग

[चित्राचे श्रेय]

Natural Selection© - Bill Welch