व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

रूममेटबरोबर राहणं इतकं कठीण का आहे?

रूममेटबरोबर राहणं इतकं कठीण का आहे?

तरुण लोक विचारतात . . .

रूममेटबरोबर राहणं इतकं कठीण का आहे?

“मला नीटनेटकं राहायला आवडतं; अस्ताव्यस्तपणा मुळीच खपत नाही. पण मी घरी येतो तेव्हा माझ्यासोबत राहणारा, खाली लोळून टीव्ही पाहत असतो आणि जमिनीवर पेपर पसरलेला असतो, पॉपकॉर्न इकडंतिकडं पडलेलं असतं. घरी जायचं म्हटलं तर हेच चित्र माझ्या मनात येतं आणि वाटतं, ‘नको रे बाबा! घरी जायलाच नको!’”डेव्हिड.

“माझी रूममेट आईवडिलांची खूपच लाडावलेली होती. माझ्या मते तिला असं वाटत होतं की घरात एक मोलकरीण आणि एक नोकर आहे. म्हणून सगळंकाही तिच्या मनासारखंच व्हावं असं तिला वाटायचं.”—रने. *

“अनोळखी व्यक्‍तीचे स्वभाववैचित्र्य सहन करायला शिकल्यामुळे . . . वेगवेगळ्या परिस्थितींशी जुळवून घ्यायला आणि तडजोड करायला माणूस शिकतो,” असे यु.एस. न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्टच्या एका लेखात म्हटले होते. “पण हे शिकणे फार जड जाते.” जे कोणी इतरांसोबत राहिलेले आहेत त्यांना याचा बऱ्‍यापैकी अनुभव असेल.

विद्यापीठातील बरेच विद्यार्थी खर्च कमी करण्यासाठी खोली करून एकत्र राहतात. इतर तरुण लोक पालकांपासून स्वतंत्र होण्याकरता इतरांसोबत राहायला तयार होतात. काही ख्रिस्ती तरुण, आध्यात्मिक ध्येये साध्य करण्यासाठी रूममेटसोबत राहायला तयार होतात. (मत्तय ६:३३) आपापसांत खर्च वाटून घेतल्याने पूर्ण वेळेचे सुवार्तिक होणे शक्य आहे असे त्यांना आढळले आहे. काही वेळा मिशनरी जीवनात किंवा यहोवाच्या साक्षीदारांच्या विविध शाखा दफ्तरांमध्ये सेवा करतानाही इतरांसोबत राहणे भाग पडते. *

सावध राहाने! इतरांसोबत राहत असलेल्या अनेक तरुण-तरुणींची मुलाखत घेतली. सर्वांचे यावर एकमत होते की, रूममेटची मदत फक्‍त घरभाडे भरण्यातच होत नाही—तर, रूममेट एक चांगला साथीदार असू शकतो ज्याच्याशी आपण मनमोकळेपणे बोलू शकतो किंवा एकत्र मिळून काही करू शकतो. लिन म्हणते, “आम्ही रात्री उशिरापर्यंत गप्पा मारायचो किंवा चित्रपट पाहायचो.” रने म्हणते, “रूममेटमुळे तुम्हाला खूप उत्तेजनही मिळू शकतं. एखादी नोकरी सांभाळून तुम्ही सगळा खर्च भागवण्याचा प्रयत्न करता, प्रचारही करता तेव्हा आपल्यासोबत राहणारी रूममेट आपल्याला प्रोत्साहन देते तर फार छान वाटतं.”

तथापि, इतरांसोबत राहणे—आणि विशेषकरून अगदी अनोळखी व्यक्‍तीसोबत राहणे हे एक आव्हानच असू शकते. यु.एस. न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्टने कॉलेजमधल्या स्थितीविषयी असे म्हटले: “अनेक शाळांमध्ये, ज्यांचे जमते अशांना एकत्र ठेवण्याचे अनेक प्रयत्न करूनही समाधानकारक परिणाम मिळत नाहीत.” कॉलेजमधल्या रूममेट्‌ससोबत होणारी भांडणे मारामारीच्या विकोपाला गेली आहेत! यामुळे आता इंटरनेटवर अशा वेबसाईट्‌स निघाल्या आहेत ज्यांवर विद्यार्थी आपल्या रूममेट्‌ससंबंधी सगळी गाऱ्‍हाणी सांगू शकतात. पण रूममेटबरोबर राहणे इतके कठीण का असते?

अनोळखी व्यक्‍तीसोबत राहणे

मार्क म्हणतो, “एका अनोळखी व्यक्‍तीसोबत राहण्याचा अनुभव आगळावेगळा असतो. तो कसा असेल हे आपल्याला माहीत नसतं.” होय, ज्याच्या आवडीनिवडी आपल्यापेक्षा वेगळ्या आहेत अशा व्यक्‍तीसोबत राहण्याचा विचार अस्वस्थ करणारा असू शकतो. ख्रिश्‍चनांच्या बऱ्‍याच आवडीनिवडी सारख्या असू शकतात आणि त्यांच्याजवळ एकमेकांशी बोलायलाही पुष्कळ असू शकते हे मान्य आहे. पण तरीसुद्धा, डेव्हिड कबूल करतो: “रूममेटबद्दल माझ्या मनात खूप भीती होती.’”

पण झाले असे की, डेव्हिडबरोबर राहणाऱ्‍याची पार्श्‍वभूमी देखील त्याच्यासारखीच होती. मात्र प्रत्येक वेळी असे जमून येतेच असे नाही. मार्क म्हणतो: “माझ्यासोबत आधी जो राहत होता तो जास्त बोलका नव्हता. पण एकमेकांसोबत राहताना बोलणं आवश्‍यक असतं. पण हा बोलायचाच नाही. मग, मला चीड येऊ लागली.”

वेगवेगळ्या पार्श्‍वभूमींमुळेही वेगळेच ताणतणाव निर्माण होऊ शकतात. लिन म्हणते: “आपण पहिल्यांदा स्वतंत्र होतो तेव्हा आपल्याला आपल्या पद्धतीने गोष्टी कराव्याशा वाटतात. पण मग लक्षात येतं की, इतरजणही आपल्यासोबत आहेत आणि त्यांचाही विचार करावा लागतो.” अर्थात, आपल्या कुटुंबाच्या उबदार कोशातून बाहेर आल्यावर इतर लोकांचे विचार आपल्यापेक्षा किती भिन्‍न असू शकतात हे पाहून आपल्याला धक्का बसू शकतो.

वेगळ्या पार्श्‍वभूमी, वेगळ्या पद्धती

एखाद्या व्यक्‍तीवर त्याच्या आईवडिलांकडून झालेल्या—किंवा न झालेल्या संस्कारांवर बरेच काही अवलंबून असते. (नीतिसूत्रे २२:६) फर्नांडो नावाचा तरुण म्हणतो: “मला सगळं व्यवस्थित हवं असायचं पण माझा रूममेट मात्र फार गचाळ. आमच्या कपाटाचंच पाहा: तो सगळ्या वस्तू इकडंतिकडं फेकून द्यायचा. पण मला सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे अडकवलेल्या आवडायच्या.” काही वेळा, लोकांच्या दर्जात जमीनअस्मानाचा फरक असू शकतो.

रने आठवून सांगते: “माझी एक रूममेट होती आणि तिची खोली खूप अस्ताव्यस्त असायची. मी अशाही मुलींसोबत राहिलीय जे जेवल्यावर टेबल कधी पुसून काढत नाहीत किंवा दोन-दोन, तीन-तीन दिवस खरकटी भांडी तशीच सिंकमध्ये राहू देतात.” होय, घरकामाच्या बाबतीत, काही रूममेट नीतिसूत्रे २६:१४ मधील शब्दांचा योग्य नमुना असतात; तेथे म्हटले आहे: “दरवाजा आपल्या बिजागऱ्‍यांवर फिरतो, तसा आळशी आपल्या अंथरुणावर लोळतो.”

दुसऱ्‍या बाजूला, स्वच्छतेच्या बाबतीत अति करणाऱ्‍या व्यक्‍तीसोबतही राहायला फार मजा येत नाही. ली नावाची एक तरुणी म्हणते: “तिची स्वच्छता मोहीम म्हणजे प्रत्येक तासाला असायची. मी स्वतः काही गचाळ नाही पण कधी कधी मी माझ्या पलंगावर पुस्तकं राहू देते. तिला तेही खपायचे नाही.”

व्यक्‍तिगत स्वच्छतेच्या बाबतीतही प्रत्येकाचे वेगळे विचार असतील. मार्क म्हणतो: “माझा रूममेट अगदी शेवटल्या क्षणापर्यंत झोपून राहतो. मग सरळ वॉशबेसिनकडे धाव घेतो, केसांवर जरा पाणी शिंपडतो की, साहेब घराबाहेर पडायला तयार!”

पार्श्‍वभूमी आणि व्यक्‍तिमत्वातील फरकांमुळेही मनोरंजनाच्या आवडीनिवडी वेगळ्या असू शकतात. मार्क आपल्या रूममेटबद्दल म्हणतो, “संगीताच्या बाबतीत आमच्या आवडी वेगळ्या आहेत.” परंतु, परस्परांबद्दल आदरभाव असेल तर अशा वेगळेपणाचा फायदा होऊ शकतो आणि दोघांनाही आपल्या आवडीनिवडी वाढवता येतील. पण सहसा वेगळेपणामुळे भांडणे होतात. फर्नांडो म्हणतो, “मला स्पॅनिश संगीत आवडतं, पण माझा रूममेट सतत टीका करत राहतो.”

फोन—एक समस्या

भांडणाचे आणखी एक मोठे कारण म्हणजे टेलिफोनचा वापर. मार्क म्हणतो: “मला वेळेवर झोपायला आवडतं. पण माझा रूममेट जागा राहून फोनवर बोलत राहतो. काही वेळाने मग राग येऊ लागतो.” लिन देखील आठवून सांगते: “काही वेळा माझ्या रूममेटचे मित्रमैत्रिणी पहाटे तीन, चार वाजता फोन करायचे. ती नसली तर मलाच उठून फोन घ्यावा लागायचा.” यावर उपाय? “आम्ही दोघींनी आपापले फोन घेतले.”

परंतु, सर्वच तरुणांना स्वतःचा फोन घेता येत नाही आणि पुष्कळांना दोघा-तिघांत मिळून एक फोन ठेवावा लागतो. यामुळे काही वेळा फार तणाव वाढू शकतो. रने म्हणते: “माझी एक रूममेट आपल्या बॉयफ्रेंडशी तासन्‌तास फोनवर बोलत राहायची. एकदा तिला फोनचं ४००० रुपये बिल आलं. आम्ही सर्वांनी मिळून ते पैसे भरावेत अशी तिची अपेक्षा होती कारण आम्ही सर्वांनी फोनचं बिल आपापसात वाटून घ्यायचं ठरवलं होतं.”

फोन वापरायची संधी मिळणे ही देखील एक समस्या असू शकते. ली म्हणते, “माझ्यासोबत राहणारी एक मुलगी माझ्यापेक्षा वयाने मोठी होती. आणि आमच्याजवळ एकच फोन होता. आणि मीच सारखी फोनवर बोलत राहायचे कारण माझ्या पुष्कळ मैत्रिणी होत्या. ती कधीच काही बोलली नाही. मला वाटलं, तिला फोन हवा असेल तर ती मला सांगेल. पण आता मला कळतं की मी किती अविचारी होते.”

एकान्तपणाचा अभाव

डेव्हिड म्हणतो, “प्रत्येकाला काही काळ एकटेपणा हवा असतो. काही वेळा, मला काहीच न करता फक्‍त आराम करावासा वाटायचा.” पण, तुम्ही इतरांसोबत राहत असता तेव्हा एकटे राहायला सहजासहजी मिळत नाही. मार्कसुद्धा म्हणतो: “मला कधी कधी एकटं राहायला आवडतं. पण तसा एकाकीपणा मिळणं फार कठीण आहे. माझ्यासोबत राहणाऱ्‍याचा आणि माझा नित्यक्रम सारखाच आहे. त्यामुळे एकटं राहायला मिळत नाही.”

काही प्रसंगी येशू ख्रिस्ताने देखील एकांतात राहणे पसंत केले. (मत्तय १४:१३) त्यामुळे आपल्यासोबत राहणाऱ्‍या व्यक्‍तीमुळे वाचन, अभ्यास किंवा मनन करणे, अशक्य नाही तरी कठीण झाल्यास काही वेळा राग येऊ शकतो. मार्क म्हणतो: “अभ्यास करणं कठीण आहे कारण घरात काही ना काही तरी सतत चालतच असतं. त्याचे मित्र येतात, तो फोनवर बोलत असतो किंवा टीव्ही पाहत असतो नाहीतर रेडिओ ऐकत असतो.”

तथापि, रूममेटसोबत जुळवून घेणे हे कठीण असले तरी हजारो तरुणांना यात यश मिळाले आहे. तुम्हालाही हे कसे करता येईल याविषयी पुढील लेखांमध्ये काही व्यावहारिक मार्गांची चर्चा केली जाईल. (g०२ ४/२२)

[तळटीपा]

^ काही नावे बदलण्यात आली आहेत.

^ हा सल्ला खासकरून तरुणांना उद्देशून दिला असला तरी परिस्थिती बदलल्यामुळे जसे की, विधवा किंवा विधूर झाल्यामुळे इतरांसोबत राहू लागलेल्या प्रौढांकरताही हे मदतदायी ठरू शकते.

[१२, १३ पानांवरील चित्र]

संगीताच्या विविध आवडीनिवडींमुळे समस्या निर्माण होऊ शकते

[१४ पानांवरील चित्र]

एकमेकांचा विचार न केल्यास तणाव निर्माण होऊ शकतो