व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मला मोबाईल फोन खरोखरच लागतो का?

मला मोबाईल फोन खरोखरच लागतो का?

तरुण लोक विचारतात. . .

मला मोबाईल फोन खरोखरच लागतो का?

“माझ्याजवळ मोबाईल फोन नसला की मी एकदम गोंधळून जाते आणि खूप चिडल्यासारखं होतं.”—आकीको. *

मोबाईल फोन अनेक देशांमध्ये फार सामान्य होत आहेत. ते फार सोयीस्कर आहेत. त्यांच्याद्वारे तुमचे मित्र किंवा आईवडील तुमच्याशी आणि तुम्ही त्यांच्याशी केव्हाही, कोठेही बोलू शकता. काही मॉडेल्समध्ये लहान संदेशही पाठवता येतात आणि लंडनच्या द टाईम्सनुसार “तरुण लोकांमधील संवादाची इच्छा तृप्त करण्याची ही सर्वात अलीकडील लोकप्रिय पद्धत आहे.” इंटरनेटला जोडणारे मोबाईल फोन देखील आहेत ज्यांद्वारे वेबसाईट्‌स पाहता येतात आणि इ-मेल वापरता येते.

तुमच्याकडे कदाचित मोबाईल फोन असेल किंवा तुम्ही तो घेण्याचा विचार करत असाल. काहीही असले तरी, तुम्ही या म्हणीचा विचार करावा: “नाण्याच्या दोन बाजू असतात.” मोबाईल फोनचे फायदे असतील यात शंका नाही. पण, नाण्याच्या दुसऱ्‍या बाजूचा विचार करणे केव्हाही चांगले, कारण आपण एखादा फोन विकत घेण्याचा विचार केला तर त्याच्या तोट्यांविषयी माहीत करून घेतल्यास आपल्याला त्याचा योग्य वापर करता येईल.

‘खर्चाचा अंदाज करा’

येशूने असा सुज्ञ सल्ला दिला की, कोणताही महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्याआधी ‘खर्चाचा अंदाज करा.’ (लूक १४:२८) मोबाईल फोनच्या बाबतीत हे तत्त्व लागू करता येते का? निश्‍चितच. कदाचित सध्या तुम्हाला हा फोन फार कमी किंमतीत किंवा कदाचित मोफत मिळाला असेल. पण, १७ वर्षांच्या हेन्‍नाच्या लक्षात नंतर आल्याप्रमाणे, “बिल फार जास्त येऊ शकतं.” शिवाय, वेगवेगळे फीचर्स घेण्याचा आणि अधिकाधिक खर्चीक मॉडेल विकत घेण्याचा सतत दबावही येऊ शकतो. म्हणून हिरोशी म्हणतो: “माझी अर्ध-वेळेची नोकरी आहे आणि दर वर्षी एक नवीन मॉडेल खरेदी करायला मी पैसे साठवत असतो.” पुष्कळ तरुण असे करतात. *

तुमचे पालक तुमचे फोन बिल भरायला तयार झाले तरी खर्चाचा विचार करणे महत्त्वाचे आहे. जपानमध्ये प्रवासी कार्यात असलेले एक ख्रिस्ती सेवक म्हणतात: “काही माता केवळ आपल्या मुलांच्या मोबाईल फोनचा खर्च भागवण्यासाठी (ज्याची मुळात गरज नसेल) अर्ध-वेळेची जादा नोकरी करताहेत.” आपल्या आईवडिलांवर असा भार बनणे तुम्हाला आवडेल का?

“वेळखाऊ”

सुरवातीला फोनचा मर्यादित वापर करू लागलेल्या अनेकांच्या कालांतराने लक्षात येते की, त्यांचा यात पुष्कळ वेळ जातो आणि महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होते. मीका आपल्या कुटुंबासोबत जेवणाच्या समयी पुष्कळ वेळ घालवत असे. ती म्हणते, “पण आता, आमचं जेवण आटोपल्यावर आम्ही आपापले [मोबाईल फोन] घेऊन आपापल्या खोल्यांमध्ये गुडुप होतो.”

लंडनच्या द गार्डियननुसार “१६ आणि २० या वयोगटातील एक तृतीयांश तरुणांना लिहून संवाद साधण्याच्या इतर कोणत्याही पद्धतींमध्ये लहान संदेश पाठवणे सर्वात अधिक आवडते.” परंतु, बोलण्यापेक्षा संदेश पाठवल्याने खर्च कमी होत असला तरी हे संदेश टाईप करायला जास्त वेळ खर्च करावा लागतो. मीएको कबूल करते: “मला कुणी ‘गुडनाईट’ असा संदेश पाठवला तर मी पण ‘गुडनाईट’ लिहून पाठवते. त्यानंतर मात्र एक तासभर संदेश येत-जात असतात. या संदेशांमधलं सगळं बोलणं निरर्थक असतं.”

मोबाईल फोन वापरणाऱ्‍या सर्वांनी थोडे थांबून एका महिन्यात फोनवर ते किती वेळ घालवतात याचा विचार केला तर त्यांना खूप आश्‍चर्य वाटेल. तेजा नावाची एक १९ वर्षांची मुलगी कबूल करते: “पुष्कळांच्या बाबतीत मोबाईल फोन वेळेची बचत करण्याऐवजी वेळखाऊ साधन ठरते.” तुमच्याजवळ मोबाईल फोन असणे आवश्‍यक असले तरी त्याचा वापर करताना वेळेविषयी सतर्क असणे महत्त्वाचे आहे.

मारिया नावाची एक ख्रिस्ती तरुणी म्हणते: “ख्रिस्ती संमेलनांमध्ये पुष्कळ तरुण लोक एकमेकांना क्षुल्लक संदेश पाठवत राहतात. ही फार सामान्य गोष्ट आहे!” ख्रिस्ती सेवेत सहभागी होणाऱ्‍या तरुणांमध्येही हे आढळले आहे. बायबलमध्ये ख्रिश्‍चनांना आध्यात्मिक कार्यहालचालींसाठी वेळ काढण्याचा सल्ला दिला आहे. (इफिसकर ५:१६, NW) पण टेलिफोनवरील संवादात हा मौल्यवान वेळ वाया जातो ही किती दुःखाची गोष्ट!

गुप्त संवाद

मारिया आणखी एका धोक्याविषयी सांगते: “सगळे फोन घरी न जाता थेट त्या व्यक्‍तीकडे जात असल्यामुळे आपली मुले कोणाशी बोलताहेत किंवा फोन वापरताहेत की नाही हेसुद्धा पालकांना कळण्याचा मार्ग नसतो आणि हे धोक्याचे ठरू शकते.” अशाप्रकारे, काही युवक मोबाईल फोनच्या द्वारे विरुद्धलिंगी व्यक्‍तीसोबत गुप्ततेत संपर्क ठेवतात. यामुळे काहीजण सावध राहत नाहीत; इतरांसोबत सहसा बोलताना जे दर्जे पाळले जातात त्यांकडे ते कानाडोळा करतात. ते कसे?

“फोनवर संदेश पाठवताना, [तरुण मंडळी] काय करते यावर कोणीही पाळत ठेवू शकत नाही,” असे लंडनच्या द डेली टेलिग्राफ यात म्हटले आहे. संदेश घेणाऱ्‍या व्यक्‍तीला आपण दिसत नाही किंवा आपले बोलणे ऐकू येत नाही याचा आपल्यावर परिणाम होऊ शकतो. टीमो म्हणतो, “काहींना वाटते की, संदेश भावनिक नसतात. काही वेळा तोंडावर बोलून दाखवायला कठीण वाटणाऱ्‍या गोष्टी लिहून पाठवल्या जातात.”

केको, ही १७ वर्षांची ख्रिस्ती मुलगी मोबाईल फोनचा वापर करू लागली तेव्हा तिने आपल्या बऱ्‍याच मित्रमैत्रिणींना आपला नंबर दिला. आणि असे झाले की, तिच्या मंडळीतल्या एका मुलाला ती दररोज संदेश पाठवू लागली. केको म्हणते: “सुरवातीला आम्ही असंच इकडच्या तिकडच्या गोष्टी करत होतो, पण हळूहळू आम्ही एकमेकांच्या समस्यांविषयी बोलू लागलो. आमच्या मोबाईल फोनच्या द्वारे आम्ही आमचंच एक विश्‍व तयार केलं.”

पण काही गंभीर घडण्याआधी तिला तिच्या पालकांकडून आणि ख्रिस्ती वडिलांकडून मदत मिळाली. आता ती कबूल करते: “मला मोबाईल फोन देण्याआधीच माझ्या पालकांनी मला विरुद्धलिंगी व्यक्‍तीसोबत एकसारखे संदेश पाठवण्याविषयी बरीच ताकीद दिली होती, पण तरीही मी त्याला दररोज संदेश पाठवायचे. मी फोनचा योग्य वापर करत नव्हते.” *

आपली “विवेकबुद्धी शुद्ध” राखावी असे उत्तेजन बायबल आपल्याला देते. (१ पेत्र ३:१६) याचा अर्थ, कोइची म्हणते त्याप्रमाणे मोबाईल फोन वापरताना, इतर कोणत्याही व्यक्‍तीने आपले संदेश पाहिले किंवा आपल्याला फोनवर बोलताना ऐकले तर “लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेले” असे आपण व्हावे. नेहमी लक्षात ठेवा की, आपल्या स्वर्गीय पित्यापासून कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. बायबल म्हणते: “[देवाच्या] दृष्टीला अदृश्‍य अशी कोणतीहि निर्मिति नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रगट केलेले आहे.” (इब्री लोकांस ४:१३) मग, गुप्ततेत असा संबंध ठेवायचा प्रयत्न का करावा?

मर्यादा ठेवा

तुम्ही मोबाईल फोन घेण्याचा विचार करत असल्यास, तुम्हाला खरोखर तो लागतो का याचा काळजीपूर्वक विचार करणे सर्वात उत्तम ठरेल. तुमच्या आईवडिलांशी यावर चर्चा करा. काहींना यन्‍ना या तरुणीसारखे वाटते; ती म्हणते: “मोबाईल फोन बाळगणे ही एक फार मोठी जबाबदारी आहे जी तरुणांना पेलता येण्यासारखी नाही.”

असा फोन घेण्याचा तुम्ही विचार केला तरी त्याचा मर्यादित वापर करणे महत्त्वाचे आहे. तो कसा करता येईल? योग्य मर्यादा ठेवा. उदाहरणार्थ, काही निवडक फीचर्स वापरा किंवा फोनवर मर्यादित वेळ आणि पैसा खर्च करा. बहुतेक फोन कंपन्या तुमच्या वापराविषयी तपशीलवार अहवाल देत असल्यामुळे, आपल्या आईवडिलांसोबत अधूनमधून तुम्ही फोन बिलचे परीक्षण करू शकता. काहीजण, अनावश्‍यक वापर होऊ नये म्हणून आगाऊ पैसे भरलेल्या मोबाईल फोनचा वापर करतात.

त्याचप्रमाणे, फोन आणि संदेशांना तुम्ही केव्हा आणि कशाप्रकारे उत्तर देता याचाही काळजीपूर्वक विचार करा. स्वतःची काही रास्त मार्गदर्शक तत्त्वे बनवा. शिन्जी म्हणतो: “मी माझा मेलबॉक्स दिवसातून एकदाच उघडतो, आणि सहसा महत्त्वाच्या संदेशांनाच उत्तर देतो. त्यामुळे, आता माझ्या मित्रमैत्रिणी मला निरर्थक संदेश पाठवत नाहीत. आणि समजा एखादा महत्त्वाचा संदेश असलाच तर ते मला कसेही फोन करतीलच.” शिवाय, तुम्ही कोणत्या व्यक्‍तींशी संवाद करता त्याबाबतीतही निवडक असा. आपला फोन नंबर देण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. चांगल्या संगतीच्या संबंधाने असलेले दर्जे नेहमी लागू करा.—१ करिंथकर १५:३३.

बायबल म्हणते: “सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो; . . . मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो.” (उपदेशक ३:१, ७) यावरून स्पष्ट होते की, मोबाईल फोनसाठीही “मौन धरण्याचा समय” असतो. आपल्या ख्रिस्ती सभा आणि सेवाकार्य फोन वापरण्याचा नव्हे तर देवाची उपासना करण्याचा “उचित काळ” आहे. रेस्टॉरंट आणि सिनेमागृहातील व्यवस्थापक सहसा आपल्या ग्राहकांना मोबाईल फोनचा वापर करण्यास मनाई करतात. या विनंतींचा आपण आदर करतो. मग, विश्‍वातील सार्वभौम व्यक्‍तीला आपण तितका आदर तरी दाखवू नये का?

पुष्कळ जण, कोणताही महत्त्वाचा फोन येणार नसला तर आपला फोन बंद करून ठेवतात, किंवा महत्त्वाच्या कार्यांमध्ये गोवलेले असताना सायलंट मोडवर करून ठेवतात. काहीजण मोबाईल फोन सोबत ठेवत नाहीत. कारण बहुतेक गोष्टी नंतरही करता येतात.

तुम्ही मोबाईल फोन घेण्याचा निर्णय घेतलाच तर त्यावर तुमचे नियंत्रण असू द्या; तुम्ही त्याचे गुलाम बनू नका. स्पष्टतः, तुम्हाला सावध राहून कोणत्या गोष्टी अधिक महत्त्वाच्या आहेत याचा विचार करण्याची गरज आहे. बायबल आपल्याला उत्तेजन देते: “तुमचा समंजसपणा सर्वांना कळून येवो.” (फिलिप्पैकर ४:५, NW) मोबाईल फोन घेण्याचा तुम्ही निर्णय घेतलाच तर त्याचा वापर करण्यासंबंधाने आपला समंजसपणा प्रकट करण्याचा निर्धार करा.

(g०२ १०/२२)

[तळटीपा]

^ काही नावे बदलण्यात आली आहेत.

^ शाळेनंतरच्या नोकऱ्‍यांविषयीच्या चर्चेकरता, “तरुण लोक विचारतात—पैसा कमवण्यात गैर काय?” हा ऑक्टोबर ८, १९९७ च्या सावध राहा! अंकातील लेख पाहा.

^ नियमितपणे विरुद्धलिंगी व्यक्‍तीशी बोलणे किंवा फोनवरून त्याला संदेश पाठवणे हा डेटिंगचा प्रकार होईल. कृपया, ऑगस्ट २२, १९९२ च्या सावध राहा! या इंग्रजी अंकातील “तरुण लोक विचारतात—एकमेकांशी बोलण्यात काय हरकत आहे?” हा लेख पाहा.

[२० पानांवरील चित्रे]

काही युवक मोबाईल फोनद्वारे गुप्त संबंध ठेवतात