मला गरज होती तेव्हाच आशा मिळाली
एकाएकी मला जाणवलं की मी पाण्यावर पालथा पडलोय. श्वास घेण्यासाठी मी डोकं वर उचलण्याचा प्रयत्न केला, पण माझी मानच हलत नव्हती. मी खूप घाबरलो. मी सरळ व्हायचा प्रयत्न केला, पण माझे हातपायपण हलत नव्हते. माझ्या नाका-तोंडात पाणी शिरू लागलं. १९९१ मध्ये उन्हाळ्यातल्या त्या दिवशी माझं आयुष्यच बदलून गेलं.
माझा जन्म सेरेंख नावाच्या शहरात झाला आणि हंगेरीतल्या टीसलडॉन या गावात मी लहानाचा मोठा झालो. जून १९९१ मध्ये, मी आणि माझे काही मित्र टीसा नदीजवळ एका अनोळखी ठिकाणी फिरायला गेलो होतो. नदीचं पाणी खूप खोल असेल असं समजून मी सरळ पाण्यात उडी मारली. पण माझा अंदाज साफ चुकीचा निघाला! माझ्या मानेची तीन हाडं आणि पाठीचा कणा मोडला. मला हालचाल करता येत नाही हे पाहून माझ्या एका मित्रानं मला हळूच उचलून बाहेर काढलं आणि मला बुडता-बुडता वाचवलं.
मी शुद्धीवर होतो त्यामुळं काहीतरी भयंकर झालंय हे मला जाणवलं. तातडीची सेवा पुरवणाऱ्या विभागाला कुणीतरी फोन केला आणि मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी एक हेलिकॉप्टर आलं. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर, माझ्या पाठीचा कणा आणखी बिघडू नये म्हणून डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन केलं. पुढं या अपघातातून सावरण्यासाठी मला बुडापेस्ट या राजधानी शहरात हलवण्यात आलं. तिथं तब्बल तीन महिने मी अंथरूणाला खिळून होतो. माझ्या खांद्याखालचं पूर्ण शरीर निकामी झालं होतं. फक्त मानेची थोडीफार हालचाल होत होती. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी मी पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून होतो. मी इतका निराश झालो होतो की आयुष्यच संपवून टाकावंसं वाटलं.
शेवटी मी घरी आलो. माझी काळजी कशी घ्यायची हे माझ्या आईवडिलांना सांगण्यात आलं. पण, ते सोपं नव्हतं. माझं करताकरता ते मनानं आणि शरीरानं पार दमून जायचे. सुमारे एका वर्षानंतर मी नैराश्यात बुडून गेलो. पण, समुपदेशकाचा सल्ला घेतल्यामुळं माझ्या अपंगत्वाकडं पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला.
त्यासोबतच मी जीवनाचाही खूप विचार करू लागलो. जीवनाचा काय उद्देश आहे? माझ्यासोबतच असं का घडलं? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी मी बरीच पुस्तकं वाचली. मी बायबलही वाचू लागलो. पण मला ते समजलं नाही. त्यामुळं मी ते वाचायचं सोडून दिलं. मी एका पाळकाशीसुद्धा बोलून पाहिलं; पण माझ्या मनाचं समाधान झालं नाही.
मग १९९४ मध्ये दोन यहोवाचे साक्षीदार आमच्या घरी आले. वडिलांनी त्यांना माझ्याशी बोलायला सांगितलं. देव लवकरच पृथ्वीचं रूपांतर नंदनवनात करेल आणि रोगराई, दुःख कायमचं काढून टाकेल असं त्यांनी मला सांगितलं. ते सगळं ऐकायला फार छान वाटलं. पण, मनात कुठंतरी अजूनही काही शंका होत्या. तरीसुद्धा मी त्यांच्याकडून दोन पुस्तकं घेतली. नंतर मी ती वाचून काढली. मला बायबलचा अभ्यास करायला आवडेल का असं साक्षीदारांनी मला विचारलं तेव्हा मी हो म्हणालो. त्यांनी मला प्रार्थना करायचंही उत्तेजन दिलं.
देवाला खरंच माझी काळजी आहे याची मला खातरी पटली
आमच्यात चर्चा होत गेल्या तसं माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं मला थेट
बायबलमधून मिळत गेली. देवाला खरंच माझी काळजी आहे याचीही मला खातरी पटली. दोन वर्षं बायबलचा अभ्यास केल्यानंतर शेवटी १३ सप्टेंबर १९९७ मध्ये घरातच अंघोळीच्या मोठ्या टबमध्ये माझा बाप्तिस्मा झाला. तो दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस होता.पुढं २००७ साली मी बुडापेस्टमध्ये अपंग लोकांसाठी असलेल्या एका आश्रमात राहायला गेलो. तिथं गेल्यामुळं, मी ज्या काही चांगल्या गोष्टी शिकलो त्या इतरांना सांगण्याच्या अनेक संधी मला मिळाल्या. हवामान चांगलं असतं तेव्हा मी बाहेर पडतो आणि लोकांशी बोलतो. खास माझ्यासाठी तयार केलेल्या व्हिलचेअरमुळं मला हे जमतं. माझ्या खांद्याखालचं शरीर निकामी असल्यामुळं मी माझ्या हनुवटीनं व्हिलचेअर चालवतो.
माझ्या मंडळीतल्या एका कुटुंबानं मला पैशाची थोडीफार मदत केली. त्या पैशानं मी असा एक लॅपटॉप घेतला जो माझ्या डोक्याच्या हालचाली ओळखतो आणि म्हणून मी त्यावर काम करू शकतो. या लॅपटॉपमुळं मी इंटरनेटचा वापर करून लोकांना फोन करू शकतो. तसंच, घरोघरचं प्रचार कार्य करताना माझ्या मंडळीच्या सदस्यांना जे लोक घरी भेटत नाहीत अशांना मी इ-मेल पाठवतो. इतरांना मदत केल्यामुळं माझं संवाद कौशल्य बरंच सुधरलं आहे. अशा प्रकारे व्यस्त राहिल्यानं मी स्वतःचं दुःख कुरवाळत बसत नाही.
मी ख्रिस्ती सभांनासुद्धा जाऊ शकतो. राज्य सभागृहाजवळ पोहचल्यानंतर माझे आध्यात्मिक बांधव मला माझ्या व्हिलचेअरसह उचलून पहिल्या मजल्यावर असलेल्या सभागृहात घेऊन जातात. सभेमध्ये श्रोत्यांना उत्तरं देण्यासाठी हात वर करायला सांगितलं जातं तेव्हा माझ्या शेजारी बसलेला बांधव माझ्यासाठी हात वर करतो. मग तो माझं बायबल किंवा अभ्यासाचं पुस्तक माझ्यासमोर धरतो आणि मी उत्तर देतो.
माझं अंग सतत दुखत असतं आणि प्रत्येक गोष्टीसाठी मला इतरांवर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळं मी आत्ताही कधीकधी खचून जातो. पण, यहोवा देवासोबत असलेल्या मैत्रीमुळं खूप सांत्वन मिळतं. कारण मी त्याच्यासमोर माझं मन मोकळं करतो तेव्हा तो ऐकतो याची मला खातरी असते. तसंच, दररोज बायबलचं वाचन केल्यामुळं आणि माझ्या आध्यात्मिक बंधुभगिनींच्या मदतीमुळं मला धीर मिळतो. त्यांची मैत्री, त्यांचा आधार आणि ते माझ्यासाठी करत असलेल्या प्रार्थना यांमुळं मानसिक आणि भावनिक रीत्या स्थिर राहणं मला शक्य होतं.
मला गरज होती तेव्हाच यहोवानं माझं सांत्वन केलं. तसंच, त्यानं मला एका नवीन जगात परिपूर्ण आरोग्य मिळण्याची आशाही दिली आहे. त्यामुळं मी आतुरतेनं त्या दिवसाची वाटत पाहतो जेव्हा मी चालू शकेन, उड्या मारू शकेन आणि देवानं माझ्यावर केलेल्या अपार प्रेमासाठी त्याची स्तुती करू शकेन.—प्रेषितांची कृत्ये ३:६-९. ▪ (g14-E 11)