व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जादूटोणा याविषयी तुम्हाला काय माहीत आहे?

जादूटोणा याविषयी तुम्हाला काय माहीत आहे?

जादूटोणा याविषयी तुम्हाला काय माहीत आहे?

जादूटोणा! हा शब्द ऐकताच तुमच्या मनात कोणती कल्पना येते?

पाश्‍चात्त्य देशांतील पुष्कळांना वाटते की हा एक अंधविश्‍वास आहे, यात काहीच खरे नाही; अथवा याविषयी चिंता करायचे काहीच कारण नाही. त्यांच्या मते, काळे झगे घातलेल्या, मोठ्या कढईत वटवाघळाचे पंख शिजवणाऱ्‍या, जादूने माणसांना बेडूक बनवणाऱ्‍या आणि काळोख्या रात्री आकाशात केरसुणीवर बसून दात विचकत दुष्टपणे हसणाऱ्‍या म्हाताऱ्‍या चेटकिणी काही खऱ्‍या नसतात; त्या फक्‍त जादूटोण्याच्या काल्पनिक विश्‍वातच असतात.

काहींना वाटते की, जादूटोणा हसण्यावारी नेण्याजोगी गोष्ट नाही. काही संशोधकांच्या मते, जगभरात निम्मे अधिक लोक असा विश्‍वास करतात की, चेटके किंवा चेटकिणी खऱ्‍या आहेत आणि ते इतरांना कोणत्याही प्रकारची हानी पोहंचवू शकतात. पुष्कळांच्या मते, जादूटोणा हा दुष्ट, हानीकारक आणि भीतिदायक प्रकार आहे. उदाहरणार्थ, आफ्रिकन धर्माबद्दल एक पुस्तक म्हणते: “आफ्रिकन लोकांचा ठाम विश्‍वास आहे की, काळी जादू, भुताटकी, चेटूक ही खरी आहेत; त्यांच्यामुळे हानी पोहंचू शकते . . . त्यांच्या समाजात चेटकिणी आणि जादूगारांचा खूप द्वेष केला जातो. आजही काही ठिकाणी आणि काही प्रसंगी त्यांना जीव जाईपर्यंत बेदम मारले जाते.”

परंतु, पाश्‍चात्त्य देशांमध्ये जादूटोण्याविषयी लोकांच्या मनातली भीती हल्ली दूर होऊ लागली आहे. आणि यामध्ये पुस्तके, टीव्ही आणि चित्रपटांचा मोठा हातभार आहे. मनोरंजन या विषयाचे अभ्यासक डेव्हिड डेव्हिस यांनी म्हटले: “जादूटोणा करणाऱ्‍यांची प्रतिमाच अचानक बदलली आहे. आता त्यांना तरुण आणि आकर्षक असे सादर केले जाते. अशा वहिवाटींना उचलण्यात हॉलीवुड अगदी पटाईत आहे. . . . चेटूक करणाऱ्‍यांचे हे मोहक स्वरूप जास्तीत जास्त लोकांना, स्त्रियांना आणि लहान मुलांनाही खूष करू शकते.” एखाद्या वहिवाटीचे रूपांतर सोन्याची अंडी देणाऱ्‍या कोंबडीमध्ये करण्यात हॉलीवुड अगदी तरबेज आहे.

काहींच्या मते, जादूटोणा ही अमेरिकेत सर्वात जास्त लोकप्रियता मिळवणारी आध्यात्मिक चळवळ बनली आहे. विकसित देशांमध्ये, स्त्री-मुक्‍ती चळवळींनी प्रेरित झाल्यामुळे आणि प्रमुख धर्मांवरून विश्‍वास उडाल्यामुळे अधिकाधिक लोक जादूटोण्याच्या विविध प्रकारांमध्ये आध्यात्मिक समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. चेटूक करण्यामध्ये इतके भिन्‍न प्रकार आहेत की, “चेटक्या” किंवा “चेटकीण” या शब्दाच्या अर्थाबद्दलही लोकांमध्ये दुमत आहे. परंतु, चेटूक करणारे सहसा स्वतःला विक्का नावाच्या धर्माशी जोडतात; “ख्रिस्तपूर्व पश्‍चिम युरोपमध्ये मूळ असलेला आणि २० व्या शतकात पुनरुज्जीवन होत असलेला निसर्गोपासक मूर्तिपूजक धर्म” असे एका शब्दकोशात या धर्माचे वर्णन केले आहे. म्हणून, पुष्कळजण स्वतःला मूर्तिपूजक किंवा नवमूर्तिपूजक असेही म्हणतात.

सबंध इतिहासात, लोकांनी चेटक्या किंवा चेटकिणींचा द्वेष केला आहे, त्यांना जाचले व छळले आहे: इतकेच नव्हे तर त्यांना ठारही मारले आहे. म्हणूनच, हल्लीचे जादूगार आपली प्रतिमा सुधारण्याचा फार प्रयत्न करताहेत. लोकांना ते कोणता संदेश देऊ इच्छितात असे एका सर्वेक्षणात चेटूक करणाऱ्‍या पुष्कळांना विचारण्यात आले. संशोधक मार्गो एडलर यांनी त्या सगळ्यांचे उत्तर या शब्दांत मांडले: “आम्ही दुष्ट नाही. आम्ही सैतानाची उपासना करत नाही. आम्ही लोकांना कोणत्याही प्रकारची हानी पोहंचवत नाही किंवा त्यांना फुसलावत नाही. आमच्यापासून कोणालाही धोका नाही. आम्ही तुमच्यासारखेच साधारण लोक आहोत. आम्हालाही कुटुंब, मुलं-बाळं आहेत; आमच्यासुद्धा काही आशा-आकांक्षा आहेत. आम्ही कोणत्याही हानीकारक पंथाचे सदस्य नाही. आम्ही विचित्र किंवा विक्षिप्त लोक नाही. . . . आम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही. . . . तुमच्यात आणि आमच्यात काहीच फरक नाही.”

आता अधिकाधिक लोक हे मत स्वीकारू लागले आहेत. पण, याचा अर्थ जादूटोण्याविषयी चिंता करण्याचे काहीच कारण नाही का? या प्रश्‍नाचे उत्तर पुढील लेखात दिले आहे.