प्रीतीने तुमची उन्नती होत जावी
प्रीतीने तुमची उन्नती होत जावी
“तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर.”—मत्तय २२:३७.
१. (अ) ख्रिस्ती व्यक्तीला कोणकोणते गुण विकसित करण्याची आवश्यकता आहे? (ब) ख्रिस्ती व्यक्तिमत्त्वातला सर्वात महत्त्वाचा गुण कोणता, आणि का?
देवाने सोपवलेली सेवा चांगल्याप्रकारे पार पाडता यावी म्हणून ख्रिस्ती व्यक्तीला बरेचसे गुण आत्मसात करावे लागतात. नीतिसूत्रे यात ज्ञान, समज व बुद्धी संपादन करणे किती महत्त्वाचे आहे याविषयी सविस्तर सांगण्यात आले आहे. (नीतिसूत्रे २:१-१०) तर प्रेषित पौलाने दृढ विश्वास आणि आशा बाळगण्याविषयी सांगितले. (रोमकर १:१६, १७; कलस्सैकर १:५; इब्री लोकांस १०:३९) सहनशक्ती आणि इंद्रियदमन देखील महत्त्वाचे गुण आहेत. (प्रेषितांची कृत्ये २४:२५; इब्री लोकांस १०:३६) पण या सर्व गुणांव्यतिरिक्त एक आणखी महत्त्वाचा गुण आहे; तो नसेल तर हे बाकीचे सर्व गुण असूनही ते निरुपयोगी किंवा व्यर्थ ठरतील. तो गुण म्हणजे प्रीती किंवा प्रेम.—१ करिंथकर १३:१-३, १३.
२. येशूने प्रेमाच्या महत्त्वावर कशाप्रकारे जोर दिला आणि त्यामुळे कोणते प्रश्न उठतात?
२ येशूने देखील प्रेम हा किती महत्त्वाचा गुण आहे याविषयी सांगितले. त्याने म्हटले: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३५) प्रेम हे एका ख्रिस्ती व्यक्तीचे ओळखचिन्ह आहे. तेव्हा आपण हे जाणून घेतले पाहिजे की, प्रेम म्हणजे नेमके काय? इतर कोणत्याही गुणापेक्षा प्रेम हा आपल्या शिष्यांचा मुख्य गुण असेल असे येशूने का म्हटले? हे प्रेम आपण आपल्या मनात कसे उत्पन्न करू शकतो? आपण कोणावर प्रेम केले पाहिजे? या प्रश्नांवर विचार करुया.
प्रेम म्हणजे काय?
३. प्रेमाचे वर्णन कसे करता येईल आणि यात विचारांचा आणि भावनांचा कसा संबंध येतो?
३ ‘एखाद्या व्यक्तीबद्दल आपुलकी, जिव्हाळा, मैत्रीची भावना किंवा मनस्वी आवड असणे,’ असे एका ठिकाणी प्रेमाचे वर्णन केले आहे. हा असा गुण आहे, जो आपल्याला स्वतःचा स्वार्थ बाजूला सारून इतरांचे भले करण्याची प्रेरणा देतो. बायबलमध्ये सांगितल्यानुसार आपण एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा आपली विचारशक्ती आणि आपल्या भावना या दोन्ही गोष्टींचा त्यात समावेश होतो. विचारशक्तीचा यासाठी कारण एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ते या गोष्टीचे भान ठेवून करते की आपल्यात आणि आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्या लोकांत चांगल्या गुणांसोबत काही कमतरता देखील आहेत. शिवाय, विचारशक्तीचा उपयोग करूनच कधीकधी ख्रिस्ती व्यक्ती आपल्या स्वाभाविक भावनांविरुद्धही प्रेम करते. काही लोकांबद्दल आपल्याला स्वाभाविकपणे आवड नसली तरीसुद्धा देव आपल्याला प्रेम करण्यास सांगतो हे बायबलमधून जाणून घेतल्यावर ही व्यक्ती त्यांच्यावर प्रेम करू लागते. (मत्तय ५:४४; १ करिंथकर १६:१४) पण प्रेमाचा खरा संबंध आपल्या हृदयातील भावनांशी आहे. बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे खरे प्रेम हे केवळ विचारशक्तीवर आधारलेले नाही. तर ते मनःपूर्वक भावनांनी जुळलेले बंधन आहे.—१ पेत्र १:२२.
४. प्रेम हे सहजासहजी तुटणारे बंधन नाही असे का म्हणता येते?
४ स्वार्थी लोक कधीही कोणाशी प्रेमाचे नाते टिकवून ठेवू शकत नाहीत. कारण जी व्यक्ती एखाद्यावर खरोखर प्रेम करते ती त्याच्यासाठी आपले स्वार्थ विसरायला तयार असते. (फिलिप्पैकर २:२-४) येशूने म्हटले होते, “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता [आनंद] आहे.” जेव्हा आपण प्रेमाने प्रेरित होऊन कोणाला काही देतो किंवा कोणासाठी काही करतो तेव्हाच आपण हा आनंद खऱ्या अर्थाने अनुभवू शकतो. (प्रेषितांची कृत्ये ) प्रेमाचे बंधन हे सहजासहजी न तुटणारे बंधन आहे. ( २०:३५कलस्सैकर ३:१४) प्रेमात मैत्रीचाही समावेश आहे, पण प्रेमाचे बंधन हे मैत्रीच्या बंधनापेक्षा अधिक मजबूत असते. पती व पत्नी यांच्यात असलेल्या संबंधालाही कधीकधी प्रेम म्हणतात. पण बायबलमध्ये जे प्रेम आपल्या मनात उत्पन्न करण्याविषयी सांगितले आहे ते शारीरिक आकर्षणापुरतेच मर्यादित नाही. जे पती पत्नी एकमेकांवर खरोखर प्रेम करतात, ते काही झाले तरीही एकमेकांना अंतर देत नाहीत. वयोमानानुसार किंवा काही शारीरिक दुर्बलतेमुळे त्यांच्यात शारीरिक संबंध शक्य नसले तरीसुद्धा त्यांचे एकमेकांवरचे प्रेम कमी होत नाही.
प्रेम—अनिवार्य
५. ख्रिस्ती व्यक्तीसाठी प्रेम हा अत्यंत महत्त्वाचा गुण का आहे?
५ ख्रिस्ती व्यक्तीकरता प्रेम हा एक अनिवार्य गुण आहे असे का म्हणता येईल? पहिले कारण म्हणजे येशूने आपल्या अनुयायांना एकमेकांवर प्रेम करण्याची आज्ञा दिली. त्याने म्हटले: “मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहा. तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी म्हणून मी तुम्हाला ह्या आज्ञा करितो.” (योहान १५:१४, १७) दुसरे कारण म्हणजे, यहोवा देव स्वतः प्रेमाचे मूर्त स्वरूप आहे आणि त्याचे उपासक या नात्याने आपण त्याचे अनुकरण केले पाहिजे. (इफिसकर ५:१; १ योहान ४:१६) बायबल सांगते की यहोवाला आणि येशूला ओळखल्याने सार्वकालिक जीवन मिळते. पण आपण जर यहोवाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला नाही तर आपण त्याला ओळखतो असे खरच म्हणता येईल का? प्रेषित योहानाने हेच सांगितले: “जो प्रीति करीत नाही तो देवाला ओळखीत नाही; कारण देव प्रीति आहे.”—१ योहान ४:८.
६. प्रेमामुळे आपण जीवनातल्या वेगवेगळ्या गोष्टींत समतोल कसा साधू शकतो?
६ प्रेम हा अतिशय महत्त्वाचा गुण असण्याचे एक तिसरे कारणही आहे: प्रेमामुळेच आपण आपल्या जीवनात संतुलित दृष्टिकोन बाळगून, चांगल्या हेतूने प्रत्येक कृती करू शकतो. उदाहरणार्थ, आपण सदोदित देवाच्या वचनाच्या ज्ञानात वाढत गेले पाहिजे हे आपल्याला माहीत आहे. ख्रिस्ती व्यक्तीकरता हे ज्ञान अन्नाप्रमाणे आहे. कारण या ज्ञानामुळेच तिचा आध्यात्मिक विकास होतो आणि तिला देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यास मदत मिळते. (स्तोत्र ११९:१०५; मत्तय ४:४; २ तीमथ्य ३:१५, १६) पण पौलाने या संदर्भात एक ताकीद दिली होती. त्याने म्हटले: “ज्ञान फुगविते, प्रीति उन्नति करिते.” (१ करिंथकर ८:१) ज्ञान मुळात वाईट नाही. पण आपण पापी असल्यामुळे आपल्या स्वाभाविक प्रवृत्त्या वाईट आहेत. (उत्पत्ति ८:२१) त्यामुळे, प्रेम नसल्यास ज्ञानी व्यक्ती आपल्या ज्ञानामुळे गर्वाने फुगण्याची अर्थात स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू लागण्याची शक्यता आहे. पण जर त्याच्या मनात प्रेम असेल तर असे घडणार नाही. “प्रीति . . . बढाई मारत नाही, फुगत नाही.” (१ करिंथकर १३:४) जो ख्रिस्ती प्रेमाने प्रेरित होऊन प्रत्येक कृती करतो तो खूप ज्ञान मिळवल्यावरही गर्विष्ठ बनत नाही. प्रेम त्याला नम्र राहण्यास मदत करते आणि महत्त्वाकांक्षी होण्यापासून सांभाळते.—स्तोत्र १३८:६; याकोब ४:६.
७, ८. प्रेमामुळे अधिक श्रेष्ठ गोष्टींना प्राधान्य देण्यास कशाप्रकारे मदत मिळते?
७ पौलाने फिलिप्पैकरांना लिहिले: “माझी ही प्रार्थना आहे की, तुमची प्रीति ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी; असे की, जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे; तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे.” (फिलिप्पैकर १:९, १०) ख्रिस्ती प्रेम आपल्याला पौलाच्या या सल्ल्यानुरूप ख्रिस्ती जीवनातील श्रेष्ठ गोष्टींना प्राधान्य देण्यास मदत करील. उदाहरणार्थ, पौलाने तीमथ्याला सांगितले की “कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरितो.” (१ तीमथ्य ३:१) २००० च्या सेवा वर्षात सबंध जगातील मंडळ्यांच्या संख्येत १,५०२ मंडळ्यांची भर पडली, जेणेकरून सध्या मंडळ्यांची एकूण संख्या ९१,४८७ इतकी झाली आहे. साहजिकच या मंडळ्यांची काळजी घेण्याकरता अधिक वडिलांची गरज आहे. ही गरज ओळखून जे बांधव ही विशेष जबाबदारी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत ते निश्चितच प्रशंसेस पात्र आहेत.
८ पण जे मंडळीतील जबाबदाऱ्या मिळवण्यास प्रयत्नशील आहेत त्यांनी या जबाबदाऱ्यांमागचा मूळ उद्देश लक्षात ठेवला तर त्यांना संतुलित दृष्टिकोन बाळगण्यास मदत होईल. केवळ अधिकार मिळणे किंवा अनेक लोकांचा आदर मिळणे महत्त्वाचे नाही. आदर्श वडील, जे काही करतात ते यहोवावर आणि आपल्या बांधवांवर प्रेम असल्यामुळे करतात. असेच वडील यहोवालाही प्रिय आहेत. ते मंडळीत वर्चस्व गाजवण्याचा कधीही प्रयत्न करत नाहीत. प्रेषित पेत्राने मंडळीच्या वडिलांना योग्य मनोवृत्ती बाळगण्याचा सल्ला दिल्यानंतर त्यांना ‘नम्रतेच्या’ महत्त्वाविषयी सांगितले. मंडळीतल्या सर्वांना त्याने हा सल्ला दिला: “देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा.” (१ पेत्र ५:१-६) तेव्हा जे बांधव मंडळीत अधिक जबाबदाऱ्या मिळवण्याकरता पात्र होण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी जगभरातल्या कष्टाळू, नम्र वडिलांच्या उदाहरणाचे अनुकरण करावे. असेच वडील मंडळ्यांकरता आशीर्वाद आहेत.—इब्री लोकांस १३:७.
चांगल्या हेतूंमुळे सहनशीलता वाढते
९. भविष्यातील आशीर्वादांबद्दल यहोवाने केलेल्या प्रतिज्ञांवर ख्रिस्ती का मनन करतात?
९ प्रेमाने प्रेरित होऊन यहोवाची सेवा करण्याचे महत्त्व आणखी एका बाबतीत दिसून येते. जे लोक प्रेमापोटी यहोवाची सेवा करतात त्यांना आताच नव्हे तर भविष्यातही, कल्पना करता येणार नाही असे अद्भुत आशीर्वाद मिळतील अशी बायबलमध्ये प्रतिज्ञा करण्यात आली आहे. (१ तीमथ्य ४:८) जो ख्रिस्ती बायबलच्या प्रतिज्ञांवर पूर्ण विश्वास ठेवतो आणि यहोवा “त्याचा शोध झटून करणाऱ्यांना . . . प्रतिफळ देणारा” आहे हे ओळखतो तो कोणत्याही परिस्थितीत आपल्या विश्वासात खंबीर राहतो. (इब्री लोकांस ११:६) आपण सर्वजण देवाच्या प्रतिज्ञांची पूर्णता होण्याची वाट पाहात आहोत. प्रेषित योहानाप्रमाणे आपणही म्हणतो: “आमेन! ये, प्रभु येशू.” (प्रकटीकरण २२:२०) ज्याप्रमाणे येशूला, “जो आनंद त्याच्यापुढे होता” त्यामुळे सहनशक्ती मिळाली त्याचप्रमाणे यहोवाने त्याच्या विश्वासू सेवकांना दिलेल्या प्रतिज्ञांवर मनन केल्यामुळे आपल्यालाही सर्व परीक्षांना तोंड देण्याची शक्ती मिळेल.—इब्री लोकांस १२:१, २.
१०, ११. प्रेमाने प्रेरित होऊन यहोवाची सेवा केल्यामुळे आपल्यात सहनशीलता कशाप्रकारे निर्माण होते?
१० पण केवळ नव्या जगात राहण्याच्या इच्छेने यहोवाची सेवा केल्यास काय होईल? जर हाच आपला उद्देश असेल तर आपल्यापुढे जेव्हा समस्या येतात किंवा आपल्या अपेक्षेप्रमाणे घटना घडत नाहीत तेव्हा साहजिकच आपण उतावीळ होऊ; यहोवाच्या सेवेतला आपला आनंद नाहीसा होईल. किंबहुना यहोवापासून व त्याच्या मंडळीपासून दूर जाण्याचाही धोका आहे. (इब्री लोकांस २:१; ३:१२) पौलाने देमास नावाच्या त्याच्या पूर्वीच्या एका सोबत्याविषयी सांगितले. त्याने पौलाला सोडून दिले होते. का? कारण त्याला “ऐहिक सुख प्रिय” होते. (२ तीमथ्य ४:१०) जे केवळ स्वार्थाकरता यहोवाची सेवा करत आहेत त्यांच्याबाबतीतही हेच घडण्याची शक्यता आहे. जगातल्या क्षणिक सुखाच्या आणि आकर्षक सुसंधींच्या मागे लागून ते वाहवत जाऊ शकतात. उद्याच्या आशीर्वादांसाठी ते आज काही गोष्टींचा त्याग करू इच्छित नाहीत.
११ प्रतिज्ञा केलेले आशीर्वाद मिळावेत आणि सध्याच्या कठीण परिस्थितीतून सुटका मिळावी अशी इच्छा असणे योग्य आणि स्वाभाविक आहे; पण खरे प्रेम आपल्याला जीवनात सर्वात महत्त्वाचे काय हे ओळखण्यास मदत करते. जीवनात आपली नव्हे तर यहोवाची इच्छा सर्वात महत्त्वाची आहे. (लूक २२:४१, ४२) हे ओळखण्यास मदत करण्याद्वारे प्रेम आपली उन्नती करते. ते आपल्याला देवाच्या भविष्यवाण्यांची पूर्णता होईपर्यंत धीर धरण्यास मदत करते; यहोवाने जे काही आशीर्वाद आपल्याला दिले आहेत त्यात समाधानी राहण्यास ते आपली मदत करते आणि योग्य वेळी यहोवा त्याच्या सर्व भविष्यवाण्या पूर्ण करील व आणखी अनेक आशीर्वाद आपल्याला देईल हा भरवसा ते आपल्यात उत्पन्न करते. (स्तोत्र १४५:१६; २ करिंथकर १२:८, ९) पण हे सर्व आशीर्वाद मिळेपर्यंत, प्रेम आपल्याला निःस्वार्थपणे यहोवाची सेवा करण्यास मदत करते कारण “प्रीती . . . स्वार्थ पाहत नाही.”—१ करिंथकर १३:४, ५.
ख्रिश्चनांनी कोणावर प्रेम केले पाहिजे?
१२. येशूने सांगितल्याप्रमाणे आपण कोणावर प्रेम केले पाहिजे?
१२ मोशेच्या नियमशास्त्रातील दोन विधानांतून येशूने या प्रश्नाचे उत्तर दिले. त्याने म्हटले: “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर” आणि “तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीति कर.”—मत्तय २२:३७-३९.
१३. आपण यहोवाला पाहू शकत नाही तरीसुद्धा त्याच्यावर प्रेम करण्यास आपण कसे शिकू शकतो?
१३ येशूच्या शब्दांवरून हे स्पष्टपणे कळते की सर्वात आधी आपण यहोवावर प्रेम केले पाहिजे. पण जन्मतःच आपल्या मनात यहोवाबद्दल प्रेम नव्हते. हे प्रेम हळूहळू वाढत गेले. पहिल्यांदा आपण यहोवाबद्दल ऐकले तेव्हा ती माहिती आपल्याला आवडली आणि आपल्या मनात अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. नंतर हळूहळू आपण शिकलो की यहोवाने मनुष्यजातीकरता ही पृथ्वी कशाप्रकारे निर्माण केली. (उत्पत्ति २:५-२३) तसेच सबंध मानव इतिहासात यहोवाने मनुष्यांशी कशाप्रकारे व्यवहार केला, पहिल्या मानवी कुटुंबाने पाप केल्यानंतर मानवजातीला वाऱ्यावर सोडून देण्याऐवजी त्याने आपली पापापासून सुटका करण्यासाठी कशाप्रकारे तरतूद केली याविषयीही आपण शिकलो. (उत्पत्ति ३:१-५, १५) त्याला विश्वासू राहिलेल्यांवर त्याने कृपा केली आणि कालांतराने, आपल्या पापांच्या क्षमेकरता त्याच्या एकुलत्या एका पुत्राचे बलिदान दिले. (योहान ३:१६, ३६) यहोवाबद्दलचे आपले ज्ञान वाढत गेले, तसतशी आपल्या मनात त्याच्या सर्व आशीर्वादांबद्दल कृतज्ञता वाढत गेली. (यशया २५:१) राजा दाविदाने म्हटले की त्याच्यावर यहोवाने प्रेमळपणे कृपा केल्यामुळे तो यहोवावर प्रेम करत होता. (स्तोत्र ११६:१-९) आज यहोवा आपल्यावरही प्रेमळपणे कृपा करतो, आपले मार्गदर्शन करतो, आपल्याला शक्ती आणि सांत्वन देतो. त्याच्याविषयी आपण जितके अधिक जाणून घेतो तितकेच त्याच्यावरचे आपले प्रेम वाढत जाते.—स्तोत्र ३१:२३; सफन्या ३:१७; रोमकर ८:२८.
देवावरचे प्रेम आपण कसे व्यक्त करू शकतो?
१४. यहोवावर आपले प्रेम खरे आहे हे आपण कसे दाखवू शकतो?
१४ अर्थात, जगातले कित्येक लोक म्हणतात की त्यांचे देवावर प्रेम आहे. पण त्यांच्या कृत्यांवरून मात्र हे धडधडीत खोटे असल्याचे सिद्ध होते. आपण खरोखर यहोवावर प्रेम करतो हे आपण कसे दाखवू शकतो? प्रार्थनेत आपण यहोवाजवळ आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत. शिवाय आपल्या कृत्यांवरूनही आपण दाखवले पाहिजे की आपले यहोवावर प्रेम आहे. प्रेषित योहानाने म्हटले: “जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, त्याच्यामध्ये देवाची प्रीति खरोखर पूर्णत्व पावली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण त्याच्या ठायी आहो.” (१ योहान २:५; ५:३) देवाच्या वचनात आपल्याला कित्येक आज्ञा देण्यात आल्या आहेत; उदाहरणार्थ बायबल आपल्याला बांधवांसोबत एकत्र मिळण्याची व आपले आचरण नैतिकरित्या शुद्ध ठेवण्याची आज्ञा देते. तसेच आपण कधीही दिखाऊपणा करत नाही, नेहमी खरे बोलण्याचा प्रयत्न करतो आणि वाईट विचारांना थारा देत नाही. (२ करिंथकर ७:१; इफिसकर ४:१५; १ तीमथ्य १:५; इब्री लोकांस १०:२३-२५) जे गरजू आहेत त्यांना साहाय्य करण्याद्वारे देखील आपण प्रेम व्यक्त करतो. (१ योहान ३:१७, १८) शिवाय, इतरांना यहोवाविषयी सांगण्यास आपण कधीही कचरत नाही. म्हणूनच आपण जगभरात चाललेल्या राज्याच्या सुवार्तेच्या प्रचारकार्यात आवेशाने सहभाग घेतो. (मत्तय २४:१४; रोमकर १०:१०) या सर्व बाबतीत आपण देवाच्या वचनातील आज्ञांचे पालन केल्याने दाखवून देतो की आपण खरोखर यहोवावर मनापासून प्रेम करतो.
१५, १६. यहोवावर प्रेम असल्यामुळे, मागच्या वर्षी अनेकांनी काय केले?
१५ ज्यांचे यहोवावर प्रेम असते त्यांना जीवनात योग्य निर्णय घेण्यास मदत मिळते. मागच्या वर्षी २,८८,९०७ जणांना, यहोवावर प्रेम असल्यामुळे आपले जीवन त्याला समर्पित करून या निर्णयाचे प्रतीक म्हणून बाप्तिस्मा घेण्यास प्रवृत्त केले. (मत्तय २८:१९, २०) त्यांचे समर्पण अर्थपूर्ण होते. कारण त्यामुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली आहे. उदाहरणार्थ, गेजमंड हा अल्बेनियातील एक लोकप्रिय व उत्कृष्ट बास्केटबॉल खेळाडू होता. काही वर्षे तो व त्याची पत्नी बायबलचा अभ्यास करत होते. त्यांच्यापुढे अनेक अडथळे येऊनही शेवटी ते राज्य प्रचारक बनू शकले. मागच्या वर्षी गेजमंडचा बाप्तिस्मा झाला; २००० सालादरम्यान अल्बेनिया येथे बाप्तिस्मा घेतलेल्या ३६६ जणांपैकी तो होता. गेजमंडविषयी एका वृत्तपत्रात आलेल्या वृत्तात असे म्हटले होते: “त्याचे जीवन उद्देशपूर्ण बनले आहे आणि यामुळे तो व त्याचे कुटुंबीय पूर्वी कधी नव्हते इतके आनंदी आहेत. जीवनात काय काय मिळवता येईल याविषयी आता तो विचार करत नाही, तर इतरांची मदत करण्याकरता काय काय करता येईल याविषयी तो विचार करू लागला आहे.”
१६ याचप्रमाणे ग्वाम येथे नुकताच बाप्तिस्मा झालेली एक बहीण एका ऑईल कंपनीत काम करत होती. तिला बढतीची एक अतिशय आकर्षक ऑफर देण्यात आली. या बहिणीने आपल्या कंपनीत कित्येक वर्षांपासून अविरत प्रगती केली होती; आणि आता तिला कंपनीची पहिली महिला व्हाईस प्रेसिडेंट होण्याची संधी देण्यात आली होती. पण तिने आपले जीवन यहोवाला समर्पित केले होते. त्यामुळे, आपल्या पतीसोबत चर्चा केल्यानंतर या नवीन बहिणीने तिला देण्यात आलेली ऑफर नाकारली. त्याऐवजी, पायनियर होऊन पूर्णवेळची सेवा करता यावी म्हणून ती पार्ट-टाईम काम करू लागली आहे. यहोवावर असलेल्या प्रेमामुळेच तिला पैशाच्या मागे लागण्याऐवजी पायनियर होऊन यहोवाची सेवा करण्याची प्रेरणा मिळाली. तिच्याप्रमाणेच जगभरात ८,०५,२०५ जणांनी यहोवावर असलेल्या प्रेमाने प्रवृत्त होऊन २००० सालादरम्यान वेगवेगळ्या प्रकारच्या पायनियर सेवेत भाग घेतला. या सर्व पायनियर बंधूभगिनींचे प्रेम आणि त्यांचा विश्वास खरोखर कौतुकास्पद नाही का?
येशूबद्दल प्रेम व्यक्त करणे
१७. येशूला प्रेमाचे अतिशय उत्कृष्ट उदाहरण का म्हणता येईल?
१७ प्रेमाने प्रेरित होऊन जीवनात प्रत्येक कृती करण्याचे अतिशय उत्कृष्ट उदाहरण येशू ख्रिस्ताचे आहे. पृथ्वीवर जन्म होण्याआधी स्वर्गात असताना त्याचे आपल्या पित्यावर आणि सबंध मानवजातीवर प्रेम होते. बुद्धीच्या रूपात त्याला चित्रित करण्यात आले असताना तो म्हणाला: ‘मी त्याच्यापाशी कुशल कारागीर होतो; मी त्याला नित्य आनंददायी होतो; त्याच्यासमोर मी सर्वदा हर्ष पावत असे; त्याच्या पृथ्वीवर मी हर्ष करी; मनुष्यजातीच्या ठायी मी आनंद पावे.’ (नीतिसूत्रे ८:३०, ३१) या प्रेमामुळेच येशू स्वर्ग सोडून या पृथ्वीवर एक असहाय बालक म्हणून जन्माला आला. दीनदुबळ्यांशी तो नेहमी प्रेमाने व दयेने वागला आणि यहोवाच्या शत्रूंकडून त्याने बऱ्याच यातना निमूटपणे सोसल्या. शेवटी, सर्व मानवजातीकरता तो वधस्तंभावर खिळला गेला. (योहान ३:३५; १४:३०, ३१; १५:१२, १३; फिलिप्पैकर २:५-११) योग्य मनोवृत्तीने प्रेरित होऊन सर्वकाही त्याने केले. हे आपल्याकरता किती उत्तम उदाहरण आहे!
१८. (अ) येशूबद्दलचे प्रेम आपल्या मनात कसे वाढू लागते? (ब) आपले येशूवर प्रेम आहे हे आपण कसे दाखवून देतो?
१८ चांगल्या मनाचे लोक शुभवर्तमानाच्या पुस्तकांत येशूच्या जीवनाविषयी वाचतात आणि त्याच्या विश्वासू जीवनामुळे आपल्याला किती आशीर्वाद मिळाले आहेत यावर मनन करतात तेव्हा त्यांच्या मनात येशूबद्दलचे प्रेम वाढत जाते. “[येशूला] पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीति करिता,” असे पेत्राने ज्यांना उद्देशून लिहिले होते त्यांच्याप्रमाणे आज आपण आहोत. (१ पेत्र १:८) आपण येशूवर विश्वास ठेवतो, अर्थात हा विश्वास कृतीतून दाखवतो आणि येशूच्या स्वार्थत्यागाचे अनुकरण करतो तेव्हा आपण दाखवून देत असतो की आपले त्याच्यावर प्रेम आहे. (१ करिंथकर ११:१; १ थेस्सलनीकाकर १:६; १ पेत्र २:२१-२५) एप्रिल १९, २००० रोजी येशूच्या मृत्यूच्या स्मारकविधीकरता उपस्थित असलेल्या १,४८,७२,०८६ जणांना येशूवर आपण का प्रेम केले पाहिजे याची आठवण करून देण्यात आली. उपस्थितांची ही संख्या अभूतपूर्व होती. आज इतक्या लोकांना येशूच्या बलिदानाकरवी मिळणारे तारण प्राप्त करण्याची इच्छा आहे हे जाणून आपल्याला किती प्रोत्साहन मिळते! खरोखर यहोवा व येशू यांना आपल्याबद्दल असलेले प्रेम आणि आपल्याला त्यांच्याबद्दल असलेले प्रेम आपल्या उन्नतीस कारणीभूत ठरते.
१९. पुढच्या लेखात प्रेमाविषयी कोणत्या प्रश्नांवर विचार केला जाईल?
१९ येशूने म्हटले होते की आपण यहोवावर आपल्या पूर्ण मनाने, जिवाने, बुद्धीने व शक्तीने प्रीती केली पाहिजे. पण आपण आपल्या शेजाऱ्यावर स्वतःप्रमाणेच प्रीती केली पाहिजे असेही त्याने म्हटले होते. (मार्क १२:२९-३१) यात कोणाकोणाचा समावेश होतो? आणि शेजाऱ्यांबद्दल प्रेम व्यक्त केल्यामुळे जीवनात संतुलित दृष्टिकोन ठेवण्यास आणि योग्य मनोवृत्तीने प्रत्येक कृती करण्यास आपल्याला कशी मदत मिळते? या प्रश्नांची उत्तरे पुढच्या लेखात पाहू.
तुम्हाला आठवते का?
• प्रेम अत्यंत महत्त्वाचा गुण का आहे?
• आपण यहोवावर प्रेम करायला कसे शिकू शकतो?
• आपले यहोवावर प्रेम आहे हे आपल्या कृतींतून आपण कसे दाखवू शकतो?
• येशूबद्दलचे प्रेम आपण कसे दाखवू शकतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१०, ११ पानांवरील चित्रे]
प्रेम आपल्याला या जगातील दुःखांपासून मुक्तता मिळण्याकरता धीराने थांबून राहण्यास मदत करते
[१२ पानांवरील चित्र]
येशूचे महान बलिदान आपल्याला त्याच्यावर प्रेम करण्याची प्रेरणा देते