व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अतीव दुःखातही आनंदी व कृतज्ञ

अतीव दुःखातही आनंदी व कृतज्ञ

जीवन कथा

अतीव दुःखातही आनंदी व कृतज्ञ

नॅन्सी इ. पोर्टर यांच्याद्वारे कथित

संयुक्‍त संस्थानाच्या आग्नेय किनाऱ्‍याजवळील बहामा बेटांवर, जून ५, १९४७ रोजी संध्याकाळी एक परदेशवास अधिकारी आम्हा दोघा नवराबायकोला अचानक भेटायला आले. त्यांच्या हातात एक पत्र होते. त्या पत्रात असे लिहिले होते, की तुमचे येथील वास्तव्य आम्हाला मान्य नसल्यामुळे “तत्काळ कॉलनी” सोडून जावे.

जॉर्ज आणि मी, बहामातील सर्वात मोठे शहर, नासॉ येथील यहोवाच्या साक्षीदारांचे पहिले मिशनरी होतो. गिलियड प्रशालेच्या आठव्या वर्गातून पदवीधर झाल्यानंतर आम्हाला येथील नेमणूक मिळाली होती. न्यू यॉर्कच्या उत्तरेकडे ही मिशनऱ्‍यांसाठी प्रशाला आहे. पण, आम्हाला इथे येऊन फक्‍त तीनच महिने झाले होते तरीसुद्धा आम्ही असे काय केले होते, की इथल्या लोकांना आम्ही नकोसे झालो होतो? आणि या गोष्टीला पन्‍नास वर्षे होऊन गेली तरी मी इथेच कशी काय टिकून राहिले?

सेवेचे प्रशिक्षण

माझ्या वडिलांचे नाव होते, हॅरी किलनर. मी माझे जीवन ज्याप्रकारे व्यतीत केले त्यावर माझ्या वडिलांचा जबरदस्त प्रभाव होता. यहोवाचे साक्षीदार होण्याकरता त्यांनी अनेक त्याग केले होते. त्यांनी माझ्यापुढे एक उत्तम आदर्श ठेवला होता. तसे पाहायला गेले तर ते तब्येतीने ठणठणीत नव्हते; तरीपण जवळजवळ प्रत्येक आठवडी ते प्रचार कार्याला जायचे. देवाच्या राज्याला ते आवेशाने प्रथम स्थान द्यायचे. (मत्तय ६:३३) आमची आर्थिक परिस्थितीसुद्धा बेताचीच होती. पण १९३० च्या दशकात कॅनडा, अल्बर्टाच्या लेथब्रीज येथील बाबांचे बुटाचे दुकान जणू आध्यात्मिक कार्याचे केंद्रच होते. यहोवाच्या साक्षीदारांचे पूर्ण वेळेचे सेवक, ज्यांना आता पायनियर म्हटले जाते ते नेहमी आमच्या घरी येऊन आपले अनुभव सांगत असल्याचे मला आठवते.

१९४३ साली, फोर्ट मॅक्लॉड व क्लारझोम, अल्बर्टा येथे मी माझी पायनियर सेवा सुरू केली. तेव्हा दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान, विरोधकांनी आपल्याविरुद्ध खोट्या बातम्या पसरवल्यामुळे प्रचार कार्यावर कॅनडात बंदी आली होती. आमचे क्षेत्र एका टोकापासून ते दुसऱ्‍या टोकापर्यंत असे १०० किलोमीटरचे होते. पण तरुण असल्यामुळे आमच्यात जोम होता त्यामुळे लहान लहान वस्त्यांमध्ये व मळ्यांमध्ये सायकलींवरून जायला किंवा पायी चालायला आम्हाला काहीही वाटायचे नाही. या काळादरम्यान मला गिलियडच्या काही पदवीधर विद्यार्थ्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांचे अनुभव ऐकून माझ्याही मनात मिशनरी होण्याची इच्छा जागृत झाली.

१९४५ साली जॉर्ज पोर्टर यांच्याशी माझा विवाह झाला. जॉर्ज कॅनडाच्या सॅस्कॅचेवानचे होते. त्यांचे आईवडीलही १९१६ पासून आवेशी साक्षीदार होते आणि जॉर्ज यांनी पूर्ण वेळेच्या सेवेलाच आपले जीवनध्येय बनवले होते. आमची पहिली नेमणूक, कॅनडाच्या उत्तर व्हँकूव्हर येथील लीन वॅली या सुंदर शहरात होती. त्यानंतर काही दिवसांतच आम्हाला गिलियडला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले.

आतापर्यंत मी विविध धर्मशास्त्रविषयक सेमिनरींच्या पदवीधारकांशी बोलले आहे. माझ्या प्रत्ययास एक गोष्ट आली. ती म्हणजे, त्यांच्या या शिक्षणामुळे देवावरील आणि त्याचे वचन बायबल यावरील त्यांचा विश्‍वास काही पक्का झालेला मला दिसला नाही; उलट तो उडाल्याचे मला दिसले. परंतु गिलियडमध्ये आम्हाला मिळालेल्या शिक्षणाने आमच्या विचारशक्‍तीला आणखी चालना मिळाली; याहूनही महत्त्वाचे म्हणजे या शिक्षणाने यहोवा देव आणि त्याचे वचन बायबल यांजवरील आमचा विश्‍वास आणखी दृढ केला. आमच्या गिलियड वर्गांतील विद्यार्थ्यांना चीन, सिंगापूर, भारत, आफ्रिकातील देशांत, दक्षिण अमेरिका आणि इतर ठिकाणी नेमण्यात आले. आमची नेमणूक बहामाच्या उष्णकंटिबंधाच्या बेटांवर आहे, हे आम्हाला समजले तेव्हा आम्हाला किती आनंद झाला होता हे मला अजूनही आठवते.

आम्ही कसे टिकून राहू शकलो

आमच्या सोबतच्या विद्यार्थ्यांना बराच लांबचा प्रवास करून आपापल्या नेमणुकींना जावे लागले. त्यामानाने आमचा प्रवास खूप जवळचा होता. बहामात आल्यावर आम्हाला इथले उष्ण वातावरण, निळेभोर आकाश, हिरवट-निळसर पाणी, सौम्य रंगाच्या इमारती आणि असंख्य सायकली, हे सर्व काही हळूहळू आवडू लागले. परंतु या सर्व गोष्टींपेक्षा माझ्या मनावर पडलेली पहिली छाप म्हणजे, आमची बोट आली तेव्हा आमची वाट पाहत थांबलेल्या पाच साक्षीदारांचा तो इवलासा गट. इथं आल्यावर आम्हाला समजले, की आम्ही ज्या संस्कृतीत लहानाचे मोठे झालो होतो, त्यात आणि इथल्या संस्कृतीत जमीन अस्मानाचा फरक होता. उदाहरणार्थ, माझे पती जॉर्ज मला लोकांत असतानाही स्वीटहार्ट (म्हणजे, प्रिये) म्हणायचे. पण इथले लोक फक्‍त विवाहबाह्‍य संबंधातच या शब्दाचा उपयोग करत असल्यामुळे जॉर्जना त्यांची सवय मोडावी लागली.

आमच्या दोघांचे लोकांबरोबरचे चांगले नातेसंबंध तिथल्या पाळकांच्या डोळ्यात सलू लागले. म्हणून त्यांनी, आम्ही कम्युनिस्ट आहोत असा आमच्यावर आरोप लावला. त्यामुळेच आम्हाला बहामा सोडून जाण्याविषयीचे ते पत्र मिळाले होते. त्या काळी तेथे २० सुद्धा साक्षीदार नव्हते. आम्हाला हे पत्र मिळाल्याबरोबर या सर्व साक्षीदारांनी, आम्हाला राहण्याची परवानगी देण्यात यावी म्हणून एका विनंतीवजा पत्रावर हजारो सह्‍या आणल्या. अशाप्रकारे मग, आमचे जाणे रद्द झाले.

नवीन क्षेत्रात

देवावर प्रेम करणाऱ्‍यांच्या अंतःकरणात बायबल सत्याच्या बीजाला अंकूर फुटू लागल्यामुळे आणखी गिलियड मिशनऱ्‍यांना बहामात पाठवण्यात आले. मग १९५० साली एक शाखा कार्यालय स्थापण्यात आले. दहा वर्षांनंतर, न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन येथील मुख्यालयातील एक सदस्य, बंधू मिल्टन हेन्शल यांनी बहामाला भेट दिली. त्या वेळी त्यांनी सर्व मिशनऱ्‍यांना विचारले, की बहामाच्या दुसऱ्‍या एका बेटावर जाऊन प्रचार कार्य सुरू करण्यास कोण तयार आहेत. जॉर्ज आणि मी जायची तयारी दाखवली. तेव्हापासून, लाँग बेटांवरील आमच्या ११ वर्षांच्या वास्तव्याला सुरवात झाली.

या आणि इतर बेटांनी मिळून बहामा बनले आहे. लाँग बेट १४० किलोमीटर लांब व ६० किलोमीटर रुंद आहे. आणि आम्ही राहायला आलो होतो तेव्हा तेथे शहर असे काही नव्हते. या बेटाची राजधानी क्लेरन्स टाऊनमध्ये सुमारे ५० उंबरा होत्या. तेथील जीवन अद्याप सुधरलेले नव्हते. तेथील घरांमध्ये वीज, नळ, स्वयंपाकाची व्यवस्था किंवा प्लंबिंग वगैरे काही नव्हते. त्यामुळे आम्हाला या मागासलेल्या बेटावरील राहणीमानाशी जुळवून घ्यावे लागले. येथील लोकांचा आवडीचा विषय म्हणजे आरोग्य. त्यामुळे लोकांची ख्यालीखुशाली विचारायला आम्ही “कसं काय?” असं विचारल्याबरोबर ते आम्हाला त्यांच्या आरोग्याची लांबलचक कथा सांगायचे. तेव्हापासून आम्ही लोकांना फक्‍त “नमस्ते” म्हणायला शिकलो आहोत.

आमचे बहुतेक साक्षकार्य घरोघरी म्हणण्यापेक्षा स्वयंपाकघर ते स्वयंपाकघर असे व्हायचे. कारण, इथे बहुतेकांचे स्वयंपाकघर अंगणात असायचे. गवताचे छप्पर असलेली व दगडी चूल असलेली एक लहानशी खोली म्हणजे यांचे स्वयंपाकघर. बहुतेक लोक तुम्हाला स्वयंपाकघरातच भेटू शकतात. इथले बहुतेक लोक तसे गरीबच होते. शेतकरी किंवा कोळी असलेले हे लोक अतिशय प्रेमळ. बहुतेक लोक फक्‍त धार्मिक प्रवृत्तीचेच नव्हे तर खूप अंधश्रद्धाळू देखील होते. एखादी विचित्र घटना घडली की ते लगेच, ही घटना कशाचे तरी चिन्ह आहे असे समजायचे.

इथल्या पाळकांना, लोकांच्या घरात घुसून आम्ही लोकांना वाचायला दिलेली बायबल प्रकाशने फाडायला काहीही वाटायचे नाही. भित्र्या लोकांना ते धमकवायचे. पण सर्वच लोक त्यांना घाबरायचे नाहीत. जसे की, ७० वर्षांची एक वृद्ध स्त्री बिलकूल त्यांना घाबरली नाही. तिला बायबल समजून घ्यायचे होते. कालांतराने इतर काही जणांसोबत तीही साक्षीदार बनली. अनेक आस्थेवाईक लोक सभांना येऊ लागले. काहीवेळा रविवारच्या दिवशी जॉर्जना ३०० किलोमीटरचा प्रवास करून या लोकांना सभांना उपस्थित राहायला मदत करावी लागायची.

अगदीच सुरवातीला तेथे कोणी साक्षीदार नव्हते. पण तरीसुद्धा आम्ही दोघांनी सर्व ख्रिस्ती सभा नियमितपणे चालवून आमची आध्यात्मिकता टिकवून ठेवली. या शिवाय, दर सोमवारी रात्री आमचा टेहळणी बुरूज मासिकाच्या अभ्यासाचा कार्यक्रम असायचा. आणि आम्ही बायबल वाचन देखील नियमितरीत्या करायचो. तसेच, टेहळणी बुरूजसावध राहा! मासिकांचे अंक मिळाल्याबरोबर आम्ही ते वाचून काढत असू.

आम्ही लाँग बेटावर होतो तेव्हा माझ्या बाबांचा मृत्यू झाला. त्यामुळे १९६३ च्या उन्हाळ्यात आम्ही आईला आमच्याकडे राहायला घेऊन आलो. तिचेही वय झाले होते तरीसुद्धा तिने तेथील परिस्थितीशी स्वतःला जुळवून घेतले आणि १९७१ मध्ये तिचा मृत्यू होईपर्यंत ती आमच्यासोबत लाँग बेटांवर राहिली. आज लाँग बेटावर एक मंडळी देखील आहे. आणि नव्याने बांधलेला एक राज्यसभागृह देखील आहे.

दुःखद आव्हान

१९८० मध्ये जॉर्जना जाणवले की त्यांची तब्येत ढासळत चालली आहे. तेव्हापासून माझ्या जीवनांतल्या दुःखद अनुभवांना सुरवात झाली. माझ्या प्रिय नवऱ्‍याला, माझ्या सहचराला अल्झायमर्स आजाराच्या आहारी जात असल्याचे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहत होते. या आजारामुळे त्यांचे अख्खे व्यक्‍तिमत्त्वच बदलून गेले. शेवटी १९८७ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण त्याआधीची चार वर्षे सर्वात कठीण होती. त्यांना जमले तोपर्यंत ते माझ्याबरोबर क्षेत्र सेवेला व सभांना येत राहिले. परंतु त्यांना होत असलेला त्रास पाहून मला अक्षरशः रडू यायचे. त्यांच्या मृत्यूनंतर आपल्या ख्रिस्ती बंधूभगिनींनी माझे खरोखरच खूप सांत्वन केले. पण तरीसुद्धा मला जॉर्जची अजूनही खूप आठवण येते.

आमच्या दोघांचे वैवाहिक जीवन अतिशय सुखद होते. त्यांतील सर्वात मौल्यवान पैलू म्हणजे आमच्या दोघांतील कधीही न थांबलेला सुखद संवाद. आता जॉर्ज नाही तरी, मी यहोवाशी बोलू शकते. यहोवा त्याच्या सेवकांना “निरंतर प्रार्थना” करण्याचे, “प्रार्थनेत तत्पर” राहण्याचे व ‘सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करण्याचे’ उत्तेजन देत असल्याबद्दल मी त्याचे आमरण आभारी राहीन. (१ थेस्सलनीकाकर ५:१७; रोमकर १२:१२; इफिसकर ६:१८) यहोवाला आपल्या सर्वांच्या कल्याणाची चिंता आहे हे माहीत असल्याने आपल्याला किती सांत्वन मिळते! मला खरोखरच स्तोत्रकर्त्याप्रमाणे वाटते, ज्याने असे गायिले: “प्रभु धन्यवादित असो, तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो.” (स्तोत्र ६८:१९) येशूने म्हटले होते, की उद्याची चिंता करू नका, स्वतःच्या मर्यादा ओळखा आणि प्रत्येक दिवशी मिळणाऱ्‍या आशीर्वादांबद्दल कृतज्ञ असा. हाच जीवनाचा सर्वोत्तम मार्ग आहे, हे मला या त्याच्या सूचनेचे पालन केल्यामुळे समजले.—मत्तय ६:३४.

सेवेतील आनंददायक अनुभव

ख्रिस्ती सेवेत मी स्वतःला व्यस्त ठेवत असल्यामुळे माझ्या जीवनात घडलेल्या गोष्टींवर अधिक विचार करायला मला वेळ मिळत नाही. त्यामुळे मला निराश करू शकणाऱ्‍या सर्व भावना मी टाळू शकते. इतरांना बायबलचे सत्य शिकवण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. त्यामुळे आध्यात्मिकरीत्या मी व्यस्त राहते आणि माझ्या जीवनालाही स्थैर्य मिळते.—फिलिप्पैकर ३:१६.

एकदा मला एका स्त्रीकडून एक फोन कॉल आला. ४७ वर्षांपूर्वी मी तिला राज्याचा संदेश सांगितला होता. १९४७ मध्ये आम्ही बहामात आलो होतो तेव्हा आमचा जो पहिला बायबल विद्यार्थी होता त्याची ती मुलगी. तिचे आईवडील, सर्व भाऊ-बहिणी आणि त्यांची मुले आणि नातवंडे सर्व यहोवाचे साक्षीदार बनले होते. तिच्या कुटुंबातील ६० पेक्षा अधिक सदस्य साक्षीदार बनले होते. फक्‍त तिनेच सत्याचा अद्याप स्वीकार केला नव्हता. पण आता ती यहोवा देवाची सेवक बनण्यास तयार झाली होती. मी आणि जॉर्ज बहामात आलो होतो तेव्हा तेथे मुठभर साक्षीदार होते. पण आता तेथे १,४०० पेक्षा अधिक साक्षीदार आहेत. हे पाहून मला किती आनंद होतो म्हणून सांगू!

कधी कधी लोक मला विचारतात, की तुम्हाला स्वतःची मुलं नाहीत तर तुम्हाला वाईट वाटत नाही का? अर्थात, मुलं असणं हा एक आशीर्वादाच आहे. तरीपण, माझी आध्यात्मिक मुलं, नातवंडं, पतवंडं मला दाखवत असलेलं प्रेम हे कदाचित काही खऱ्‍या पालकांना देखील मिळत नसेल. होय, ‘चांगले ते करणारे’ व ‘सत्कर्माविषयी धनवान असलेले’ लोकच जगात सर्वात सुखी लोक आहेत. (१ तीमथ्य ६:१८) त्यामुळे माझे शरीर मला साथ देते त्याप्रमाणे मी सेवेत व्यस्त राहते.

एकदा, मी दातांच्या दवाखान्यात गेले होते. तेथे एक तरुण स्त्री माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली: “तुम्ही मला ओळखत नाही. पण मी तुम्हाला ओळखते. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे, की मला तुम्ही खूप आवडता.” मग तिने तिला सत्य कसे मिळाले होते व बहामात मिशनरी आल्याबद्दल ती यहोवाची किती आभार मानते हे सांगितले.

दुसऱ्‍या एका प्रसंगी, मी सुटीवरून आले होते. (सध्या मी, नासॉ येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यालयात राहते.) तर माझ्या खोलीच्या दाराजवळ कोणीतरी एकच गुलाबाचं फूल ठेवलं होतं. आणि त्याच्या शेजारी एक चिठ्ठी होती: “तुम्हाला घरी आलेलं पाहून आम्हाला आनंद वाटतो.” या सर्व गोष्टींमुळे माझं अंतःकरण कृतज्ञतेनं भरून येतं. यहोवाने त्याच्या वचनाकरवी, संघटनेकरवी व आत्म्याकरवी किती प्रेमळ लोक बनवले आहेत हे पाहून मी यहोवावर खूप प्रेम करते. खरेच, आपल्या सभोवतालच्या लोकांच्या वागणुकीद्वारे आपल्याला यहोवाच्या प्रेमळ काळजीचा अनुभव मिळतो.

कृतज्ञतेने ओसंडून वाहणे

माझे जीवन नेहमीच सुरळीत गेले आहे असे नाही; आताही काही बाबतीत मला त्रास आहेच. परंतु माझ्याजवळ अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल मी आभारी आहे. सेवेत मिळणारा आनंद, सर्व ख्रिस्ती बंधूभगिनींकडून मला मिळणारे प्रेम व ममता, यहोवाच्या संघटनेकडून मिळणारी प्रेमळ काळजी, बायबलमधील सत्याचे ज्ञान, प्रिय जनांचे पुनरुत्थान होईल तेव्हा त्यांना भेटण्याची आशा आणि यहोवाच्या एका विश्‍वासू सेवकाबरोबरच्या ४२ वर्षांच्या माझ्या वैवाहिक जीवनातील गोड आठवणी—या सर्वांबद्दल मी आभारी आहे. लग्नाआधी मी यहोवाला प्रार्थना केली होती, की माझ्या पतीला पूर्ण वेळेच्या सेवेत टिकून राहण्यास मदत करायला मला शक्‍ती दे. जॉर्जना पूर्ण वेळेची सेवा खूप आवडायची. यहोवाने माझ्या प्रार्थनेचं मला उत्तर दिलं. त्यामुळे यहोवाला विश्‍वासू राहून मी माझे आभार व्यक्‍त करू इच्छिते.

बहामा हे पर्यटन स्थळ असल्यामुळे या उष्ण ठिकाणची मजा लुटायला येण्यासाठी पर्यटक हजारो डॉलर खर्च करतात. यहोवाची संघटना जेथे कोठे पाठवेल तेथे जाऊन यहोवाची सेवा करण्याचा मी निर्णय घेतल्यामुळे, मला या बेटांच्या एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत प्रवास करून देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्याचा सुहक्क लाभला आहे. परंतु त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, मला येथील सर्वात प्रिय बंधूभगिनींना ओळखण्याचा आणि त्यांनी मला दिलेले प्रेम जपून ठेवण्याचा सुहक्क मिळाला आहे.

माझ्या आईवडिलांना ज्यांनी सत्य दिले त्यांचे मी मनापासून आभार मानते. कारण, माझ्या आईवडिलांनी मग माझ्या बालमनात सत्याचे बीज पेरले व देवाच्या राज्याला प्रथम स्थान देण्याची माझ्यामध्ये एक इच्छा जागृत केली. आजही यहोवाच्या तरुण सेवकांनी, विस्तृत सेवेच्या महान संधींकडे नेणाऱ्‍या ‘द्वारातून’ आत प्रवेश केल्यास त्यांनाही माझ्यासारखेच अनेक आशीर्वाद मिळू शकतात. (१ करिंथकर १६:९) “देवाधिदेव” यहोवा, याचा आदर करण्याकरता तुम्ही आपले जीवन खर्ची घातल्यास तुमचेही अंतःकरण कृतज्ञतेने ओसंडून वाहील.—अनुवाद १०:१७; दानीएल २:४७.

[२४ पानांवरील चित्र]

व्हिक्टोरिया, बी.सी., येथे १९४४ साली रस्त्यावरील साक्षकार्य करताना

[२४ पानांवरील चित्र]

जॉर्ज व मी १९४६ साली, गिलियड प्रशालेत उपस्थित राहिलो

[२५ पानांवरील चित्र]

१९५५ साली जॉर्जबरोबर नासॉ, बहामास येथील मिशनरी गृहासमोर

[२६ पानांवरील चित्र]

डेडमॅन्स के येथील मिशनरी गृह; येथे आम्ही १९६१ ते १९७२ पर्यंत कार्य केले