आदर्श नेतृत्वाचा शोध
आदर्श नेतृत्वाचा शोध
“कृपा करून निघून जा, पुष्कळ झाले तुमचे. आता हात जोडतो, क्षणभरही इथं थांबू नका!”—ऑलिव्हर क्रॉमवेल यांचे ब्रिटिश संसदेचे सदस्य लियोपोल्ड एमरी यांनी उद्धृत केलेले शब्द.
दुसऱ्या महायुद्धाचे विध्वंसक भयनाट्य गेले आठ महिने सुरू होते; ब्रिटन व त्याच्या मित्र राष्ट्रांकरता परिस्थिती फारशी अनुकूल दिसत नव्हती. नेत्तृत्वात बदल होणे अत्यावश्यक आहे असे लियोपोल्ड एमरी व सरकारातील इतरांना वाटत होते. त्यामुळे मे ७, १९४० रोजी कॉमन्स सभेत, एमरी यांनी पंतप्रधान नेव्हल चेंबरलेन यांना उद्देशून वरील शब्द उद्धृत केले. तीन दिवसांनंतर चेंबरलेन यांनी राजीनामा दिला आणि विंस्टन चर्चिल यांनी त्यांची जागा घेतली.
नेत्तृत्वाची गरज ही माणसाची एक मूलभूत गरज आहे; पण कोणताही नेता ही गरज भागवेल असे नाही. कुटुंबातसुद्धा, पित्याने योग्यप्रकारे नेत्तृत्व केले तरच त्याची पत्नी व मुले आनंदी राहू शकतात. मग एखाद्या राष्ट्राचे, किंबहुना जगाचे नेत्तृत्व करणाऱ्याकडून लोकांच्या कमी अपेक्षा असतील का? म्हणूनच, आज चांगले नेते शोधून सापडत नाहीत ही काही आश्चर्याची गोष्ट नाही.
परिणामस्वरूप, हजारो वर्षांपासून असंख्य राज्याभिषेक, क्रांत्या, सरकार उलथून पाडण्याचे प्रकार, नियुक्त्या, निवडणुका, राजकीय खून व राज्यबदल घडून आले आहेत. राजे, पंतप्रधान, भूपाल, राष्ट्रपती, मुख्य-सचिव व हुकूमशाह सत्तेवर येतात व जातात. अगदी शक्तिशाली शासक देखील कधीकधी अनपेक्षित बदलांमुळे अचानक सत्तेवरून पडतात. (“अचानक सत्तेवरून पडलेले” शीर्षकाची पृष्ठ ५ वरील चौकट पाहा.) तरीपण कार्यक्षम व टिकणारे असे नेतृत्व काही हाती लागत नाही.
“समाधान मानण्याशिवाय पर्याय नाही”—की आहे?
त्यामुळे एक चांगला नेता शोधण्याच्या बाबतीत बऱ्याच जणांनी आशाच सोडून दिली आहे. काही देशांत लोकांची ही निराशा व उदासीनता खासकरून निवडणुकीच्या काळात दिसून येते. जेफ हिल हे आफ्रिकेतील एक पत्रकार म्हणतात: “आपल्या जीवनातील हालअपेष्टा दूर करण्याच्याबाबतीत आपण किती असहाय्य आहोत याची जाणीव झाल्यामुळे लोक सहसा [मतदानाविषयी] उदासीन बनतात किंवा अजिबातच [मतदान] करत नाहीत. . . . आफ्रिकेत, लोक मतदान करत नाहीत याचा अर्थ ते सद्य परिस्थितीत समाधानी आहेत असा होत नाही. किंबहुना, आपली गाऱ्हाणी ऐकून घेणारा कोणी नाही असे वाटणाऱ्या लोकांनी मदतीकरता
केलेला हा आक्रोश असतो.” याच धर्तीवर, संयुक्त संस्थानांतील एका वृत्तपत्रातील लेखकाने येऊ घातलेल्या निवडणुकीसंबंधी असे लिहिले: “या निवडणुकीत एखादा परिपूर्ण असा उमेदवार उभा राहायला हवा होता.” पुढे तो म्हणतो: “पण परिपूर्ण असा उमेदवारच नाही. कधीच नसतो. आहे त्यात समाधान मानण्याशिवाय पर्याय नाही.”खरोखरच मानवजातीजवळ या अपरिपूर्ण नेत्यांवर ‘समाधान मानण्याशिवाय’ पर्याय नाही का? मानवी नेते लोकांच्या गरजा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत याचा अर्थ आदर्श नेतृत्व आपल्याला कधीच लाभणार नाही असे समजावे का? नाही. सर्वात उत्तम प्रकारचे नेतृत्व आपल्या आवाक्यात आहे. मानवजातीकरता आदर्श नेता कोण आहे आणि त्याच्या नेतृत्वामुळे तुमच्यासहित—सर्व पार्श्वभूमीच्या कोट्यवधी लोकांना कशाप्रकारे फायदा पोचू शकेल याविषयी पुढील लेखात पाहू या.
[३ पानांवरील चित्रे]
वरती डावीकडे: नेव्हल चेंबरलेन
वरती उजवीकडे: लियोपोल्ड एमरी
खाली: विन्सटन चर्चिल
[चित्राचे श्रेय]
चेंबरलेन: छायाचित्र Jimmy Sime/Central Press/Getty Images; एमरी: छायाचित्र Kurt Hutton/Picture Post/Getty Images; चर्चिल: The Trustees of the Imperial War Museum (MH २६३९२)