तुम्हाला अनंतकाळ जगायचे आहे का?
तुम्हाला अनंतकाळ जगायचे आहे का?
“म ला मृत्यूची भीती वाटत नाही. पण मला या सुंदर फुलांना सोडून जावं लागेल, याचंच मला वाईट वाटतं,” असे जपानमधील एका वृद्ध स्त्रीने म्हटले. तिच्या घरी आलेल्या एका ख्रिस्ती सेवक भगिनीला तिच्या बोलण्याचा अर्थ समजला कारण या वृद्ध स्त्रीची खूप सुंदर बाग होती. आपण मृत्यूला घाबरत नाही, असे म्हणणाऱ्या अनेकांना सृष्टीसौंदर्याची खरोखर कदर असते आणि त्यांना अनंतकाळ जगावेसे वाटते.
अनंतकाळ जगणे? पुष्कळ जण हा विचार आपल्या मनातून झटकून टाकतील. काही तर असेही म्हणतील, की त्यांना अनंतकाळ जगण्यात कसलाही आनंद वाटत नाही. पण एखाद्याला असे का वाटू शकते?
अनंत जीवन—कंटाळवाणे?
काहींना वाटते, की अनंतकाळचे जीवन कंटाळवाणे असेल. ते पुष्कळ निवृत्त लोकांच्या रटाळ जीवनाकडे बोट दाखवतील ज्यांना एकजागी बसण्याशिवाय व टीव्हीवरील कार्यक्रम बघत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. तुम्हालाही असेच वाटत असेल, तर खगोलशास्त्रज्ञ रॉबर्ट जसट्रो यांना जेव्हा असे विचारण्यात आले, की अनंत जीवन एक आशीर्वाद असेल की शाप असेल तेव्हा त्यांनी काय उत्तर दिले यावर विचार करा. जसट्रो म्हणाले: “जिज्ञासू मन आणि शिकण्याची अंतहीन इच्छा असलेल्यांसाठी ते एक आशीर्वादच ठरेल. ज्ञान आत्मसात करण्यासाठी वेळेचे बंधनच नाही हा विचार त्यांना अतिशय सांत्वनदायक वाटेल. परंतु, ज्यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता नसते आणि ज्यांच्या मनाची कवाडे बंद असतात त्यांना ते एक भीतीदायक शाप ठरेल. वेळ कसा घालवायचा, हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न असेल.”
तुम्हाला अनंत जीवन कंटाळवाणे वाटेल किंवा नाही, हे बहुतांशी तुमच्याच मनोवृत्तीवर अवबंलून आहे. तुमच्यात ‘जिज्ञासू मन आणि शिकण्याची अंतहीन इच्छा’ असेल तर, कला, संगीत, वास्तुशिल्प, बागकाम या क्षेत्रात किंवा तुमच्या आवडीचा योग्य छंद असेल तर त्यात तुम्ही किती काही साध्य करू शकाल याचा विचार करा. पृथ्वीवरील चिरकालीक जीवनामुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या विविध क्षेत्रांत तुमच्या कलांचा व गुणांचा विकास करण्याची अद्भुत आशा आहे.
प्रेम दाखवण्याच्या व अनुभवण्याच्या क्षमतेमुळेही सार्वकालिक जीवन अतिशय समाधानदायक ठरेल. आपल्याला प्रेम व्यक्त करण्याच्या या क्षमतेसह निर्माण करण्यात आले आहे; तसेच, आपल्यावर कोणीतरी प्रेम करते याची आपल्याला जाणीव होते तेव्हा याचा आपल्या जीवनावर अतिशय आरोग्यदायी परिणाम होतो. इतरांना खरे प्रेम दाखवणे व स्वतः अनुभवणे यांमुळे आपल्याला एक प्रकारचे आंतरिक समाधान मिळते जे काळ सरल्यावरही नाहीसे होत नाही. चिरकालिक जीवनामुळे आपल्याला केवळ सहमानवांबद्दलच नव्हे तर खासकरून देवाबद्दलही प्रेम विकसित करण्याची अंतहीन संधी मिळेल. प्रेषित पौलाने लिहिले: “जर कोणी देवावर प्रीती करीत असेल तर देवाला त्याची ओळख झालेली आहे.” (१ करिंथकर ८:३) विश्वाच्या सार्वभौमाची ओळख घडणे आणि त्याने आपल्याला ओळखणे—किती ही अद्भुत आशा! शिवाय, आपल्या प्रेमळ निर्माणकर्त्याविषयी शिकण्याला काही अंतच राहणार नाही. एवढे सर्व असताना सार्वकालिक जीवन कंटाळवाणे कसे काय असेल?
जीवन—अल्पकालीन व मौल्यवान
काहींना असे वाटते, की जीवनाच्या अल्पकाळामुळेच तर ते मौल्यवान आहे. ते जीवनाची तुलना, मर्यादित प्रमाणात उपलब्ध असलेल्या सोन्याबरोबर करतील. ते म्हणतील, की जर सोनं सगळीकडे मिळू लागलं तर
कुणाला त्याची किंमत राहणार नाही. तरीसुद्धा सोनं हे नेहमीच सुंदर असेल. तसेच जीवनाच्या बाबतीतही आहे.सार्वकालिक जीवन उपभोगण्याची तुलना आपण मुबलक प्रमाणात असलेल्या हवेशी करू शकतो. एका बिघडलेल्या पाणबुडीत अडकून पडलेल्या खलाशांना हवेचे मुल्य कळेल. अशा लोकांना वाचवल्यानंतर ते, त्यांना मुबलक हवा पुन्हा घ्यायला मिळाली म्हणून तक्रार करतील, असे तुम्हाला वाटते का? मुळीच नाही!
अशा खलाशांप्रमाणे आपल्यालाही वाचवले जाऊ शकते; पण केवळ काही वर्षे जगण्याकरता नव्हे तर अनंत जीवनाच्या आशेसह. प्रेषित पौलाने लिहिले: “पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.” (रोमकर ६:२३) येशूच्या खंडणी बलिदानाद्वारे देव मानवी अपरिपूर्णता व मृत्यू काढून टाकेल आणि आज्ञाधारक मानवजातीला सार्वकालिक जीवनाची देणगी देईल. या प्रेमळ तरतुदीबद्दल आपण देवाचे किती आभार मानले पाहिजेत!
तुमच्या प्रिय जनांविषयी काय?
काही लोक असा विचार करतील: ‘माझ्या प्रिय जणांविषयी काय? ते माझ्याबरोबर नसतील तर त्यांच्याविना पृथ्वीवर अनंत जीवन जगण्यात काय अर्थ?’ तुम्ही कदाचित बायबलचे ज्ञान घेतले असेल आणि पृथ्वीवरील परादीसात सार्वकालिक जीवनाचा उपभोग घेण्याच्या संधीविषयी तुम्हाला माहीत असेल. (लूक २३:४३; योहान ३:१६, १७:३) साहजिकच, तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील सदस्य, इतर प्रिय जन आणि तुमचे आवडते मित्र तेथे असावेत, देवाच्या वचनयुक्त नव्या धार्मिक जगात तुम्ही जो आनंद लुटणार आहात तो त्यांनीही लुटावा असे तुम्हाला वाटेल.—२ पेत्र ३:१३.
पण समजा तुमच्या मित्रांना किंवा प्रिय जनांना परादीस पृथ्वीवर अनंत जीवन जगण्यात काही रस नसेल तर? निराश होऊ नका. सातत्याने शास्त्रवचनातील अचूक ज्ञान घेऊन त्यानुसार चालत राहा. प्रेषित पौलाने लिहिले: “हे पत्नी, तू आपल्या पतीला तारशील किंवा नाही हे तुला काय ठाऊक? हे पते, तू आपल्या पत्नीला तारशील किंवा नाही हे तुलाहि काय ठाऊक?” (१ करिंथकर ७:१६) लोक बदलू शकतात. उदाहरणार्थ, एकेकाळी ख्रिस्ती धर्माचा विरोध करणारा एक मनुष्य बदलला आणि नंतर तो ख्रिस्ती मंडळीत एक वडील बनला. तो म्हणतो: “माझ्या प्रेमळ कुटुंबानं, मी त्यांचा इतका विरोध करत होतो तरीसुद्धा बायबल तत्त्वांचं पालन करण्याचं सोडून दिलं नाही, याबद्दल मी खूप आभारी आहे.”
यहोवा देवाला तुमच्या आणि तुमच्या प्रिय जनांच्या जीवनाची काळजी आहे. होय, “कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.” (२ पेत्र ३:९) तुम्ही आणि तुमच्या प्रिय जनांनी चिरकाल जगावे अशी यहोवा देवाची इच्छा आहे. त्याचे प्रेम अपरिपूर्ण मानवांच्या प्रेमापेक्षाही श्रेष्ठ आहे. (यशया ४९:१५) तुम्ही देवाबरोबर चांगला नातेसंबंध विकसित कराल का? मग कदाचित तुम्ही तुमच्या प्रिय जनांनाही असे करायला मदत करू शकाल. त्यांना जरी आता अनंतजीवनाची आशा नसली तरी, बायबलच्या अचूक ज्ञानाच्या सुसंगतेत तुम्ही जीवन जगत आहात हे पाहून कदाचित त्यांची मनोवृत्ती बदलू शकते.
मृत्यूमुळे तुम्ही गमावलेल्या तुमच्या प्रिय जनांविषयी काय? जे कोट्यवधी मरण पावले आहेत अशांसाठी बायबलमध्ये पुनरुत्थानाची—अर्थात, मृतावस्थेतून उठून परादीस पृथ्वीवर जगण्याची अद्भुत आशा सांगितली आहे. येशू ख्रिस्ताने असे वचन दिले: “कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.” (योहान ५:२८, २९) देवाची कसलीही माहिती न घेता जे मरण पावले अशांनाही जिवंत केले जाईल; कारण बायबल म्हणते: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.” (प्रेषितांची कृत्ये २४:१५) आपल्या प्रिय जनांचे स्वागत करणे किती आनंददायक असेल, नाही का?
चिरकालिक जीवन—एक आनंदी प्रत्याशा
जगात इतका त्रास असतानाही तुम्हाला आनंद आणि समाधान मिळू शकते तर मग परादीस पृथ्वीवरील चिरकालिक जीवनाचा तर तुम्ही नक्की आनंद लुटाल. सार्वकालिक जीवनामुळे येणाऱ्या आशीर्वादांबद्दल एका यहोवाच्या साक्षीदार भगिनीने एका स्त्रीला सांगितले तेव्हा ती स्त्री म्हणाली: “मला नाही जगायचं चिरकाल. ही ७०, ८० वर्षंच मला पुरेशी आहेत.” तिथेच एक ख्रिस्ती वडील
होते; त्यांनी या स्त्रीचे बोलणे ऐकल्यावर ते तिला म्हणाले: “तुमचा जर मृत्यू झाला तर तुमच्या मुलांना कसं वाटेलं याचा कधी तुम्ही विचार केला का?” आपली आई गेल्यावर त्यांना किती अतोनात दुःख होईल याचा जेव्हा तिने विचार केला तेव्हा तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तिने कबूल केले: “मला असं पहिल्यांदा जाणवलं, की मी किती स्वार्थी आहे. मला कळलं, की सार्वकालिक जीवनाची आशा स्वार्थी नाही; यात दुसऱ्यांसाठी जगणे समाविष्ट आहे.”काहींना वाटेल, की आपण जगलो काय आणि मेलो काय, कोणालाही यामुळे फरक पडत नाही. पण आपल्या जीवनदात्याला मात्र फरक पडतो; तो म्हणतो: “माझ्या जीविताची शपथ, कोणी दुर्जन मरावा यात मला काही संतोष नाही तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे यात मला संतोष आहे.” (यहेज्केल ३३:११) जर दुर्जनांच्या जीवनाची देवाला इतकी काळजी आहे तर त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांची तो निश्चितच मनापासून काळजी करतो.
प्राचीन इस्राएलच्या राजा दावीदाला यहोवाच्या प्रेमळ काळजीवर भरवसा होता. त्याने एकदा असे म्हटले: “माझ्या आईबापांनी मला सोडिले तरी परमेश्वर मला जवळ करील.” (स्तोत्र २७:१०) दावीदाला आपल्या आईवडिलांच्या प्रेमाची खात्री होती. तरीपण त्याला माहीत होते, की जरी त्याच्या आईवडिलांनी म्हणजे त्याच्या सर्वात जवळच्या माणसांनीसुद्धा त्याला सोडून दिले तरी यहोवा मात्र त्याला सोडणार नाही. यहोवाला आपल्याबद्दल प्रेम व काळजी आहे म्हणूनच तर तो आपल्याला सार्वकालिक जीवन आणि त्याच्याबरोबर अतूट मैत्री प्रस्थापित करण्याची संधी देऊ करतोय. (याकोब २:२३) तेव्हा, या अद्भुत देणगींचा आपण कृतज्ञापूर्वक स्वीकार करू नये का?
[७ पानांवरील चित्र]
देव आणि सहमानव यांच्याबद्दलच्या प्रेमामुळे अनंत जीवन कंटाळवाणे नव्हे तर सुखावह होईल