वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीदरम्यान दुरात्मे कोठे असतील?
बायबल याचे स्पष्ट उत्तर देत नाही. परंतु, ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीदरम्यान दुरात्मे कोठे असतील याविषयी आपण तर्कशुद्ध निष्कर्ष काढू शकतो.
या हजार वर्षांच्या राजवटीच्या सुरवातीला आणि अंताला काय होईल त्याची पूर्वझलक देताना प्रेषित योहानाने म्हटले: “मी एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली होती व त्याच्या हाती एक मोठा साखळदंड होता. त्याने दियाबल, व सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे तो अजगर ह्यास धरले, आणि त्याने एक हजार वर्षेंपर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले; आणि ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांस आणखी ठकवू नये म्हणून वरून बंद करून त्यावर शिक्का मारला. त्यानंतर त्याला थोडा वेळ सोडले पाहिजे.” (प्रकटीकरण २०:१-३) या वचनात फक्त, सैतानाला अथांग डोहात टाकण्याविषयी आणि नंतर काही काळासाठी सोडवण्याविषयी सांगण्यात आले आहे. यात दुरात्म्यांबद्दल काहीही सांगण्यात आलेले नसले तरीसुद्धा हेही मानणे तर्कशुद्ध आहे की अथांग डोहाची किल्ली ज्याच्याकडे आहे तो देवदूत अर्थात गौरवी येशू ख्रिस्त दियाबलाला बांधून अथांग डोहात टाकेल तेव्हा दियाबलाबरोबर तो दुरात्म्यांनाही टाकेल.—प्रकटीकरण ९:११.
१९१४ मध्ये स्वर्गात राजा झाल्यावर येशू ख्रिस्ताने केलेल्या कारवाईचा सैतान आणि दुरात्मे यांना जबरदस्त परिणाम भोगावा लागला. प्रकटीकरण १२:७-९ म्हणते: “स्वर्गात युद्ध सुरू झाले; मीखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले, आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत [दुरात्मे] लढले; तरी त्यांचे काही चालले नाही, आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणहि उरले नाही. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला म्हणजे सर्व जगाला ठकविणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला, व त्याबरोबर त्याच्या दूतास टाकण्यात आले.” तेव्हापासून सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांना केवळ पृथ्वीवरच्या क्षेत्रापर्यंत मर्यादा आहे. आपण तर्कशुद्धपणे असे गृहीत धरू शकतो, की येशू ख्रिस्त जेव्हा पृथ्वीला सैतानाच्या दुष्ट प्रभावापासून मुक्त करण्यासाठी सैतानाला कैदेत ठेवेल तेव्हा तो सैतानाबरोबर दुरात्म्यांना देखील कैदेत ठेवेल.
बायबलमधील सर्वात पहिल्या भविष्यवाणीचा विचार करा. त्यात असे म्हटले आहे: “तू [सैतान] व स्त्री [यहोवाची स्वर्गीय संघटना], तुझी [सैतानाची] संतति व तिची संतति [येशू ख्रिस्त] यामध्ये मी [देव] परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडिशील.” (उत्पत्ति ३:१५) सर्पाचे डोके फोडण्यामध्ये ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीदरम्यान सैतानाला अथांग डोहात टाकणे समाविष्ट आहे. भविष्यवाणीत पुढे म्हटले आहे, की डोके फोडणाऱ्यामध्ये व सैतानाच्या संततीत वैर आहे. या संततीत अथवा संघटनेत, दुष्ट देवदूतांनी किंवा दुरात्म्यांनी बनलेला अदृश्य भाग देखील समाविष्ट आहे. यास्तव, येशू सैतानाला अथांग डोहात टाकेल तेव्हा तो दुरात्म्यांना देखील बांधून डोहात टाकेल, असा निष्कर्ष काढणे तर्कशुद्ध आहे. दुष्ट आत्म्यांनी अथांग डोहाविषयी अत्यंत भय दाखवले आहे यावरून हेच सूचित होते, की त्यांच्यावर येणाऱ्या बंदीची त्यांना जाणीव आहे.—लूक ८:३१.
परंतु, ज्याअर्थी, प्रकटीकरण २०:१-३ मध्ये दुरात्म्यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही त्याअर्थी, सैतानाच्या संततीच्या दृश्य भागाबरोबर त्यांचाही हर्मगिदोनात नाश झालेला असेल का? हे खरे असू शकत नाही, असे बायबल दाखवते. सैतानाच्या अंतिम परिणामाविषयी बायबल म्हणते: “ठकविणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले; त्यात ते श्वापद व तो खोटा संदेष्टा आहे; तेथे त्यास रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल.” (प्रकटीकरण २०:१०) जंगली श्वापद आणि खोटा संदेष्टा हे राजनैतिक गटांना सूचित करतात व ते सैतानाच्या दृश्य संघटनेचा एक भाग आहेत. (प्रकटीकरण १३:१, २, ११-१४; १६:१३, १४) देव जेव्हा जगातील सर्व राज्यांचा चूर्ण करील तेव्हा हर्मगिदोनात यांचाही सर्वनाश होईल. (दानीएल २:४४) बायबल, ‘सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या सार्वकालिक अग्निविषयी’ सांगते. (मत्तय २५:४१) जंगली श्वापद आणि खोटा संदेष्टा यांना ज्या “अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात” टाकण्यात आलेले असेल त्याच सरोवरात सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांना टाकण्यात येईल; म्हणजेच त्यांचा कायमचा नाश केला जाईल. सैतानाच्या संततीच्या या अधिक शक्तिशाली अदृश्य भागाचा नाश हर्मगिदोनात होणार असता तर, जंगली श्वापद आणि खोटा संदेष्टा यांच्याबरोबरच दुरात्मे देखील त्या लाक्षणिक सरोवरात असल्याचा उल्लेख नक्कीच करण्यात आला असता. प्रकटीकरण २०:१० मध्ये त्यांचा उल्लेख करण्यात आला नाही याचाच अर्थ दुरात्म्यांचा हर्मगिदोनात नाश होणार नाही.
दुरात्म्यांना अथांग डोहात टाकले जाईल असा अगदी स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही आणि त्यांना अथांग डोहातून बाहेर सोडले जाईल असेही स्पष्टपणे सांगितलेले नाही. तरीपण सैतानाप्रमाणेच त्यांचाही शेवट होणार आहे. दियाबलाबरोबर सोडल्यानंतर व हजार वर्षांच्या अंताला शेवटल्या परीक्षेच्यावेळी दियाबलाला साथ दिल्याबद्दल त्यांनाही अग्नीसरोवरात टाकण्यात येईल व अशाप्रकारे त्यांचा कायमचा विनाश होईल.—प्रकटीकरण २०:७-९.
यास्तव, प्रकटीकरण २०:१-३ मध्ये फक्त सैतानाला बांधून निष्क्रियतेच्या अथांग डोहात टाकण्याविषयी सांगितलेले असले तरी, सैतानाबरोबर त्याच्या दुरात्म्यांना देखील बांधून अथांग डोहात टाकले जाईल हा तर्कशुद्ध निष्कर्ष आपण काढू शकतो. ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीदरम्यान, पृथ्वीचे परादीसमध्ये रूपांतर करण्याच्या व मानवजातीला पुन्हा परिपूर्ण करण्याच्या देवाच्या उद्देशाची पूर्ती होण्यात सैतान किंवा त्याच्या दुरात्म्यांना आडकाठी आणण्यास परवानगी दिली जाणार नाही.