काय वाचावे—यासंबंधी शलमोनाचा सुज्ञ सल्ला
काय वाचावे—यासंबंधी शलमोनाचा सुज्ञ सल्ला
“ग्रंथरचनेला काही अंत नाही; बहुत ग्रंथपठण देहास शिणविते.” (उपदेशक १२:१२) सुमारे ३,००० वर्षांपूर्वी सुज्ञ राजा शलमोनाने हे शब्द लिहिले तेव्हा तो वाचन करण्यास मनाई करत नव्हता. तर, आपण निवडक साहित्य वाचले पाहिजे यावर विवेचन मांडत होता. हा सल्ला आजच्यासाठी किती उचित आहे; कारण आज कोटीच्या कोटी पानांचे वाचन साहित्य दरवर्षी जगाच्या छापखान्यात छापले जात आहे!
शलमोनाने उल्लेख केलेले अनेक ‘ग्रंथ’ उभारणीकारक किंवा तजेला देणारे नव्हते. म्हणूनच त्याने असा तर्क केला, की अशा ग्रंथांचे वाचन सकारात्मक व चिरकालिक फायदे मिळण्यापेक्षा ते ‘देहास शिणविते.’
परंतु, शलमोनाला असे म्हणायचे होते का, की वाचकाचा फायदा होईल अशी उचित, विश्वसनीय मार्गदर्शन देणारी पुस्तकेच नाहीत? नाही. त्याने पुढे असेही म्हटले: “ज्ञान्यांची वचने पराण्यासारखी असतात; सभापतीचे बोल घट्ट ठोकलेल्या खिळ्याप्रमाणे असतात; एकाच मेंढपाळांपासून ती प्राप्त झाली आहेत.” (उपदेशक १२:११) होय, फायदेकारक प्रेरणा देणारी ‘पराण्यासारखी’ लिखित वचनेही आहेत. ही वचने एखाद्याला उचित मार्गाने जाण्यास प्रेरित करू शकतात. शिवाय, “घट्ट ठोकलेल्या खिळ्यांप्रमाणे” हे शब्द एखाद्याला दृढनिश्चियी व स्थिर होण्यास मदत करू शकतात.
अशी सुज्ञ वचने आपल्याला कोठे मिळू शकतील? अशा वचनांमध्ये सर्वात श्रेष्ठ वचने ती आहेत जी एकाच मेंढपाळांपासून येतात, असे शलमोन म्हणतो. (स्तोत्र २३:१) यास्तव, देवाने प्रेरित केलेल्या पुस्तकाचे अर्थात बायबलचे वाचन करण्याची निवड करणारी व्यक्ती खरोखर सुज्ञ व्यक्ती आहे. या ईश्वरप्रेरित वचनांचे नियमित वाचन केल्याने आपल्याला “पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज” होण्यास मदत मिळेल.—२ तीमथ्य ३:१६, १७.