व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोशवाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोशवाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

यहोशवाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे

साल होते सा.यु.पू. १४७३. इस्राएलांनी मवाबाच्या पठारावर तळ ठोकला होता. “आपली भोजनसामग्री तयार करा, कारण तुमचा देव परमेश्‍वर जो देश तुम्हाला वतन करून देणार आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तीन दिवसांच्या आत तुम्हाला ही यार्देन ओलांडायची आहे,” असे जेव्हा त्यांना सांगण्यात आले तेव्हा त्यांना किती आनंद झाला असेल. (यहोशवा १:११) त्यांचा ४० वर्षांचा वनवास लवकरच समाप्त होणार होता.

या घटनेच्या दोन दशकांपेक्षा थोड्या अधिक काळानंतर, त्यांचा नेता यहोशवा कनान देशाच्या मध्यभागी उभा राहून इस्राएलातील वृद्ध पुरूषांना उद्देशून म्हणतो: “यार्देनेपासून पश्‍चिमेस महासमुद्रापर्यंतची ही उरलेली राष्ट्रे आणि ज्या राष्ट्रांचा मी संहार केला आहे ती मी तुम्हाला तुमच्या वंशाचे वतन व्हावे म्हणून वाटून दिली आहेत. आणि तुमचा देव परमेश्‍वर स्वतः त्यांना तुमच्यापुढून हाकून लावीत असे आणि तुमच्या दृष्टीसमोरून घालवून देत असे. तुमचा देव परमेश्‍वर ह्‍याने सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्यांचा देश वतन करून घेतला.”—यहोशवा २३:४, ५.

सा.यु.पू. १४५० मध्ये यहोशवाने लिहिलेले, यहोशवा हे पुस्तक, त्या २२ वर्षांदरम्यान काय काय घडले त्याचा रोमांचक ऐतिहासिक अहवाल देणारे पुस्तक आहे. वचनयुक्‍त देशाचा ताबा घेण्यास जसे इस्राएल पुत्र सज्ज होते तसे आज आपण वचनयुक्‍त नव्या जगाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. तेव्हा यहोशवाच्या पुस्तकाकडे आपण बारकाईने लक्ष देऊ या.—इब्री लोकांस ४:१२.

‘यरीहोजवळच्या मैदानाकडे’

(यहोशवा १:१–५:१५)

यहोशवाला एक भारी जबाबदारी मिळते; यहोवा त्याला सांगतो: “माझा सेवक मोशे मृत्यु पावला आहे; तर आता ऊठ व ह्‍यांना अर्थात इस्राएल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू ह्‍या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा.” (यहोशवा १:२) यहोशवाला लाखो लोक असलेल्या एका राष्ट्राला वचनयुक्‍त देशात न्यायचे आहे. याच्या तयारीकरता तो, लवकरच ज्यावर पहिल्यांदा विजय मिळवला जाणार आहे त्या देशाची पाहणी करण्याकरता दोन हेरांना यरीहोस पाठवतो. या शहरात, राहाब नावाची एक वेश्‍या राहत होती जिला यहोवाने आपल्या लोकांच्या वतीने केलेली महत्कृत्ये ऐकिवात होती. ती हेरांना लपवून ठेवते व त्यांना मदत करते आणि आपल्याला वाचवले जाईल असे त्यांच्याकडून वचन घेते.

हेर परतल्यावर यहोशवा आणि सर्व लोक निघण्याच्या व यार्देन नदी पार करण्याच्या तयारीत आहेत. यार्देन नदी दुथडी वाहत असली तरी ते ती सहजपणे पार करतात कारण यहोवा नदीच्या पाण्याला एका बाजूने साठवून ते धरणाप्रमाणे रोखून धरतो व दुसऱ्‍या बाजूने ते मृत समुद्रात वाहून नेतो. यार्देन नदी पार केल्यानंतर इस्राएलांनी यरीहोजवळील गिलगाल येथे तळ ठोकला. चार दिवसानंतर, अबीबच्या महिन्याच्या १४ व्या दिवशी संध्याकाळी ते यरीहोच्या मैदानात वल्हांडण सण पाळतात. (यहोशवा ५:१०) दुसऱ्‍या दिवशी, ते देशांत पिकलेल्या धान्याच्या भाकरी व हुरडा खातात आणि तेव्हापासून त्यांना मान्‍ना मिळणे बंद होते. या कालावधीत, यहोशवा रानात सर्व पुरुषांची सुंता करतो.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२:४, ५—हेरांचा पिच्छा करत आलेल्या राजाच्या लोकांना राहाब चुकीची माहिती का देते? राहाब आपला जीव धोक्यात घालून हेरांना वाचवते कारण तिचा यहोवावर विश्‍वास बसला आहे. त्यामुळे, देवाच्या लोकांची हानी करू पाहणाऱ्‍या लोकांना, हेरांची माहिती देण्यात ती बाध्य नाही. (मत्तय ७:६; २१:२३-२७; योहान ७:३-१०) वास्तविक पाहता, राहाबला ‘तिच्या क्रियांमुळे’ आणि राजाच्या प्रतिनिधींची दिशाभूल करण्याच्या कृत्यामुळे देखील ‘नीतिमान ठरवण्यात आले.’—याकोब २:२४-२६.

५:१४, १५—“परमेश्‍वराचा सेनापति” कोण आहे? वचनयुक्‍त देशाची लढाई सुरू करण्याआधी यहोशवाला धीर द्यायला आलेला सेनापती दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द “शब्द” अर्थात मानवपूर्व अस्तित्वातील येशू ख्रिस्त आहे. (योहान १:१; दानीएल १०:१३) देवाचे लोक आज आध्यात्मिक युद्धात भाग घेत असताना गौरवी येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर आहे ही शाश्‍वती किती विश्‍वास मजबूत करणारी आहे!

आपल्याकरता धडे:

१:७-९. आध्यात्मिक प्रयत्नांमध्ये यश मिळण्याकरता, बायबलचे दररोज वाचन करणे, ते जे म्हणते त्यावर नियमाने मनन करणे व शिकलेल्या गोष्टींना आपल्या जीवनात उतरवणे महत्त्वाचे आहे.

१:११. देव आपल्या गरजा भागवेल म्हणून स्वस्थ न बसता अन्‍नसामग्री तयार करण्यास यहोशवा लोकांना सांगतो. जीवनावश्‍यक गोष्टींबद्दल चिंता न करण्याविषयी येशूने दिलेल्या सल्ल्याचा आणि “सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील” असा त्याने दिलेल्या वचनाचा अर्थ, आपण हातावर हात ठेवून स्वस्थ बसावे व आपल्या उदरनिर्वाहासाठी काहीच प्रयत्न करू नयेत, असा होत नाही.—मत्तय ६:२५, ३३.

२:४-१३. राहाबने यहोवाच्या महान कृत्यांविषयी ऐकल्यानंतर व काळाच्या निकडीची जाणीव झाल्यामुळे यहोवाच्या उपासकांची बाजू घेण्याचा निर्णय घेतला. तुम्ही काही काळापासून बायबलचा अभ्यास करीत असाल व आपण ‘शेवटल्या दिवसांत’ राहत आहोत हे तुम्ही ओळखले असेल तर देवाची सेवा करण्याचा निर्णय तुम्ही घेऊ नये का?—२ तीमथ्य ३:१.

३:१५. यरीहोला पाठवलेल्या हेरांचा वृतान्त अनुकूल असल्यामुळे, यहोशवा त्वरा करतो, यार्देन नदीचे पाणी ओसरेपर्यंतही तो थांबत नाही. खऱ्‍या उपासनेबाबत काही गोष्टी कराव्या लागतात तेव्हा, आपणही परिस्थिती आणखी सोईस्कर होईपर्यंत थांबून राहून उशीर लावण्यापेक्षा धैर्याने कार्य केले पाहिजे.

४:४-८, २०-२४. यार्देन नदीच्या पात्रातून घेतलेले १२ धोंडे इस्राएलांसाठी एक आठवण म्हणून होते. यहोवाने आपल्या आधुनिक दिवसांतील लोकांची शत्रूंपासून केलेली सुटकेची कृत्ये, ही आठवण देतात, की तो सदोदित त्यांच्याबरोबर आहे.

विजयावर विजय मिळत राहतो

(यहोशवा ६:१–१२:२४)

यरीहो शहराच्या “वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या; कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही.” (यहोशवा ६:१) मग या शहरावर कब्जा कसा काय मिळवायचा? यहोवा यहोशवाला युद्धाच्या योजनेविषयी सांगतो. लवकरच शहराच्या भिंती जमीनदोस्त केल्या जातात व शहराचा नाश केला जातो. केवळ राहाब आणि तिचे घराणे वाचते.

पुढे, राजधानी शहर आय यावर विजय मिळवला जातो. तेथील माहिती काढण्यासाठी पाठवलेले हेर असा वृत्तान्त देतात, की या शहरात फार कमी रहिवासी असल्यामुळे या शहराचा नाश करण्याकरता फार कमी पुरूष लागतील. परंतु, जवळजवळ ३,००० सैनिकांना जेव्हा शहरावर कब्जा करण्यासाठी पाठवण्यात येते तेव्हा आय शहरातील लोकांना पाहून हे सैनिक मागे पळतात. का बरे? कारण या युद्धात यहोवा इस्राएलांच्या पाठीशी नसतो. यहुदाच्या वंशातल्या आखानाने यरीहोवरील आक्रमणाच्या वेळी पाप केले होते. हे प्रकरण हाताळल्यानंतर यहोशवा आय शहरावर हल्ला करतो. एकदा पराभूत केलेल्या इस्राएली लोकांशी आयचा राजा पुन्हा युद्ध करायला तयार होतो. पण यहोशवा एका युद्धनीतीद्वारे आय शहराच्या वीरांच्या फाजील भरवशाचा फायदा घेऊन त्यांच्यावर विजय मिळवतो.

गिबोन “मोठे शहर” आहे, ते आय शहरापेक्षाही मोठे आहे आणि त्यातील सर्व पुरूष “बलाढ्य” आहेत. (यहोशवा १०:२) यरीहो व आय शहरांवर इस्राएलांनी विजय मिळवल्याचे ऐकल्यानंतर गिबोनी लोक यहोशवाला फसवून त्याच्याबरोबर शांतीची वाचा बांधतात. पण गिबोनी लोकांनी इस्राएलांबरोबर तह केला हे ऐकल्यावर आजूबाजूची राष्ट्रे त्यांना धोका समजू लागतात. पाच राजे एकत्र येतात आणि गिबोनावर हल्ला करतात. इस्राएली गिबोन्यांना वाचवतात आणि हल्ला करणाऱ्‍यांना पूर्णपणे पराभूत करतात. यहोशवाच्या नेतृत्वाखाली इस्राएलने दक्षिणी व पश्‍चिमी नगरांबरोबर केलेल्या इतर युद्धांतही विजय मिळवला तसेच ते उत्तरेकडील राजांच्या युतीलाच पराजित करतात. यार्देनेच्या पश्‍चिमेकडच्या एकूण ३१ राजांना पराभूत करण्यात येते.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१०:१३—ही अनोखी घटना घडणे कसे शक्य आहे? स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या यहोवाला “काही असाध्य आहे काय?” (उत्पत्ति १८:१४) यहोवाच्या मनात आले तर तो पृथ्वीच्या हालचालीत फेरफार करू शकतो ज्यामुळे पृथ्वीवर राहणाऱ्‍यांना, सूर्य आणि चंद्र स्तब्ध आहेत असे वाटेल. किंवा तो, पृथ्वी आणि चंद्राच्या हालचाली न बदलता, सूर्य आणि चंद्राच्या किरणांचे अशाप्रकारे वक्रीभवन करू शकतो ज्यामुळे या दोन्ही तेजस्वी गोलातून प्रकाश चमकत राहील. काहीही असो, मानव इतिहासात “असा दिवस त्यापूर्वी किंवा त्यानंतरहि आला नाही.”—यहोशवा १०:१४.

१०:१३—याशाराचा ग्रंथ काय आहे? २ शमुवेल १:१८ मध्ये पुन्हा, “धनुष्य” नामक गीताच्या संबंधाने या ग्रंथाचा उल्लेख करण्यात आला आहे. इस्राएलचा राजा शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्याबद्दल विलाप व्यक्‍त करणारे हे गीत आहे. याशाराचा ग्रंथ कदाचित, इस्राएलच्या इतिहासातील अविस्मरणीय घटनांवर आधारित असलेल्या गीतांचा किंवा कवितांचा संग्रह असावा व इब्री लोकांमध्ये तो सर्वपरिचित होता.

आपल्याकरता धडे:

६:२६; ९:२२, २३. यरीहोच्या नाशाच्या वेळी यहोशवाने उच्चारलेला शाप सुमारे ५०० वर्षांनंतर पूर्ण झाला. (१ राजे १६:३४) नोहाने आपला नातू कनान याला दिलेला शाप, गिबोनी लोक जेव्हा दास बनले तेव्हा पूर्ण झाला. (उत्पत्ति ९:२५, २६) यहोवाचे वचन नेहमीच खरे ठरते.

७:२०-२५. काही जण म्हणतील, की आखानाने केलेली चोरी हा अतिशय क्षुल्लक अपराध होता व त्यामुळे इतरांची हानी झाली नाही, असा ते तर्क करतील. असे लोक, चोरीची लहानमोठी कृत्ये व बायबल नियमांविरुद्ध केलेले क्षुल्लक अपराध यांच्याबद्दलही असाच दृष्टिकोन बाळगतील. परंतु आपण यहोशवाप्रमाणे, बेकायदेशीर किंवा अनैतिक कृत्ये करण्याच्या दबावाला ठामपणे प्रतिकार केला पाहिजे.

९:१५, २६, २७. आपण एखाद्याला दिलेले वचन गंभीर समजून ते पूर्ण केले पाहिजे.

यहोशवा शेवटली मोठी कामगिरी हाती घेतो

(यहोशवा १३:१–२४:३३)

नव्वदी गाठणारा थकलेला यहोशवा देशाची वाटणी करायला सुरवात करतो. ही खरोखरच एक मोठी कामगिरी आहे! रऊबेनी, गादी व मनश्‍शेच्या अर्ध्या वंशाला यार्देन नदीच्या पूर्वेकडील हिस्सा आधीच वतन मिळाला आहे. उरलेल्या वंशांना चिठ्या टाकून पश्‍चिमेकडचा भाग आता वतन मिळतो.

एफ्राईमच्या क्षेत्रातील शिलो येथे निवासमंडप उभारण्यात येतो. कालेबाला हेब्रोन नगर मिळते आणि यहोशवाला तिम्नाथ-सेहर मिळते. लेव्यांना ४८ नगरे आणि ६ शरणपुरे दिली जातात. यार्देनेच्या पूर्वेकडील आपल्या वतनाला पुन्हा येत असताना रऊबेनी, गादी व मनश्‍शेच्या वंशातील योद्धे ‘एक भव्य मोठी वेदी बांधतात.’ (यहोशवा २२:१०) यार्देनेच्या पश्‍चिमेकडील वंशातील लोकांना ही बातमी कळते तेव्हा त्यांना हे धर्मत्यागाचे कृत्य वाटते व वंशावंशातच लढाई सुरू होता होता थांबते; आपापसात योग्य दळणवळण केल्यामुळे मोठा रक्‍तपात टळतो.

तिम्नाथ-सेरह येथे काही काळ राहिल्यानंतर यहोशवा इस्राएलचे वडील जन, प्रमुख, न्यायाधीश व अमलदार ह्‍यांना बोलावणे पाठवतो आणि निडर राहा, यहोवाशी विश्‍वासू राहा असे त्यांना आर्जवतो. नंतर यहोशवा इस्राएलच्या सर्व वंशांना शखेमात एकत्र जमायला सांगतो. तेथे तो, अब्राहामापासून यहोवा आपल्या लोकांशी कशाकशा प्रकारे वागला ते सांगतो आणि पुन्हा एकदा तो लोकांना “परमेश्‍वराचे भय धरा, त्याची सेवा सात्विकतेने व खऱ्‍या मनाने करा” असा आर्जव करतो. लोक त्याला म्हणतात: “आमचा देव परमेश्‍वर ह्‍याचीच आम्ही सेवा करणार आणि त्याचीच वाणी आम्ही ऐकणार.” (यहोशवा २४:१४, १५, २४) यानंतर यहोशवा वयाच्या ११० व्या वर्षी मरण पावतो.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१३:१—हे, यहोशवा ११:२३ मध्ये जे म्हटले आहे त्याच्या विरोधात नाही का? नाही. कारण, वचनयुक्‍त देशावर मिळवलेल्या विजयाचे दोन पैलू होते: पहिल्या पैलूत, कनान देशाच्या ३१ राजांना पराभूत करणाऱ्‍या व त्यांची सत्ता मोडणाऱ्‍या राष्ट्रीय युद्धाचा समावेश होता आणि दुसऱ्‍या पैलूत, वांशिक व वैयक्‍तिक कार्यांद्वारे देशावर पूर्ण ताबा घेतला जातो हे समाविष्ट होते. (यहोशवा १७:१४-१८; १८:३) इस्राएल पुत्र कनान्यांना पूर्णपणे पिटाळून लावू शकले नाही; परंतु जे उरले होते त्यांच्यापासून इस्राएलला काही धोका नव्हता. (यहोशवा १६:१०; १७:१२) यहोशवा २१:४४ म्हणते, की यहोवाने “त्यांना सर्वत्र स्वास्थ्य दिले.”

२४:२—अब्राहामाचा पिता तेरह मूर्तीपूजक होता का? सुरवातीला तेरह यहोवा देवाचा उपासक नव्हता. तो कदाचित ऊर देशात सर्वत्र ज्याची उपासना केली जायची त्या सीन नावाच्या चंद्र दैवताचा भक्‍त होता. यहुदी परंपरेनुसार तेरह कदाचित एक मूर्तीकार असावा. परंतु, देवाच्या आज्ञेवरून जेव्हा अब्राहामाने ऊर सोडले तेव्हा तेरहही त्याच्याबरोबर हारानास गेला.—उत्पत्ति ११:३१.

आपल्याकरता धडे:

१४:१०-१३. कालेब ८५ वर्षांचा होता तरीसुद्धा तो हेब्रोनच्या परिसरातल्या लोकांना पिटाळून लावण्याची कठीण कामगिरी मागून घेतो. अनाकी लोकांनी हा परिसर व्यापला होता; हे असामान्य आकाराचे लोक होते. पण चार पावसाळे पाहिलेला हा योद्धा यहोवाच्या मदतीने त्यांच्यावर विजय मिळवतो आणि हेब्रोन एक शरणपूर बनते. (यहोशवा १५:१३-१९; २१:११-१३) कालेबच्या उदाहरणातून आपल्याला, कठीण ईश्‍वरशासित नेमणुकी न टाळण्याचे उत्तेजन मिळते.

२२:९-१२, २१-३३. इतरांच्या हेतूंबद्दल चुकीचा न्याय करण्याविषयी आपण सावध राहिले पाहिजे.

‘एकही गोष्ट व्यर्थ गेली नाही’

वयोवृद्ध यहोशवा इस्राएलमधील जबाबदार पुरूषांना सांगतो: “आपला देव परमेश्‍वर ह्‍याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या; त्यातली एकहि व्यर्थ गेली नाही.” (यहोशवा २३:१४) यहोशवाचा ऐतिहासिक वृत्तान्त याचे सचित्र उदाहरण आहे!

प्रेषित पौलाने लिहिले: “धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्‍या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले.” (रोमकर १५:४) आपण ही शाश्‍वती बाळगू शकतो, की देवाने दिलेल्या वचनांवरील आपल्या आशेचे निराशेत रुपांतर होणार नाही. एकही वचन निष्फळ ठरणार नाही; ती सर्व पूर्ण होतीलच.

[१० पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

यहोशवाच्या नेतृत्वाखाली विजय मिळवलेला देश

बाशान

गिलाद

अराबा

नेगेब

यार्देन नदी

क्षारसमुद्र

यब्बोकाचे खोरे

आर्णोनचे खोरे

हासोर

मादोन

लशारोन

शिम्रोन

यकनाम

दोर

मगिद्दो

केदेश

तानख

हेफेर

तिरस

अफेका

तप्पूहा

बेथेल

आय

गिलगाल

यरीहो

गेजेर

यरुशलेम

मक्केदा

यर्मूथ

अदुल्लाम

लिब्ना

लाखीश

एग्लोन

हेब्रोन

दबीर

अराद

[९ पानांवरील चित्र]

राहाब नावाच्या वेश्‍येला ‘नीतिमान का ठरवण्यात आले’ हे तुम्हाला माहीत आहे का?

[१० पानांवरील चित्र]

‘यहोवाचे भय धरून त्याची सेवा करा,’ असे यहोशवाने इस्राएल लोकांना आर्जवले

[१२ पानांवरील चित्र]

आखानाने केलेली चोरी एक क्षुल्लक अपराध नव्हता; या चोरीचे गंभीर परिणाम घडले

[१२ पानांवरील चित्र]

‘विश्‍वासाने यरीहोचे गावकूस पडले.’—इब्री लोकांस ११:३०