देवाची दृष्टी तुमच्यावर आहे का?
देवाची दृष्टी तुमच्यावर आहे का?
यहोवा, आपला महान सृष्टिकर्ता खरोखर पाहू शकतो का? होय, अवश्य पाहू शकतो! याविषयी बायबल हा साधा तर्क करते: ‘ज्याने डोळा बनविला तो पाहाणार नाही काय?’ (स्तोत्र ९४:९) यहोवाची दृष्टी मनुष्यांच्या दृष्टिपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. यहोवा, आपले बाहेरील रूपच पाहत नाही तर, तो आपली “हृदये पारखितो,” आणि आपली “अंतःकरणे तोलून” पाहू शकतो. (नीतिसूत्रे १७:३; २१:२) होय, आपले विचार, आपले हेतू, आणि आपल्या मनातील इच्छा, या सर्व गोष्टींचे परीक्षण करण्याची क्षमता देवाजवळ आहे.
आपल्या जीवनात आपण तोंड देत असलेल्या समस्यांची यहोवाला जाणीव आहे, आणि जेव्हा आपण त्याविषयी त्याच्याजवळ विनवणी करतो तेव्हा तो आपले ऐकतो. स्तोत्रकर्त्याने लिहिले: “परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात. परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करितो.” (स्तोत्र ३४:१५, १८) हे जाणून आपल्याला सांत्वन मिळत नाही का, की यहोवाला आपल्या परिस्थितीची जाणीव आहे आणि आपण मनापासून केलेल्या याचना तो कान लावून ऐकतो?
गुप्तपणे केल्या जाणाऱ्या कामांचीसुद्धा यहोवाला जाणीव आहे. होय, “ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रगट केलेले आहे.” (इब्री लोकांस ४:१३) म्हणून आपण चांगले किंवा वाईट जे काही करतो त्या सर्वांवर देवाची नजर असते. (नीतिसूत्रे १५:३) उदाहरणार्थ, उत्पत्ति ६:८, ९ मध्ये म्हटले आहे की “नोहावर परमेश्वराची कृपादृष्टि होती” आणि तो “देवाबरोबर चालला.” होय, नोहा यहोवाच्या पसंतीस उतरला. त्याला देवाचे आशीर्वादही मिळाले, कारण तो देवाला आज्ञाधारक राहिला व त्याच्या नीतिमान तत्त्वांना जडून राहिला. (उत्पत्ति ६:२२) त्याउलट, नोहाच्या काळातील लोक हिंसाचारी व दुराचारी होते. या स्थितीकडे देवाने डोळेझाक केली नाही. “पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले.” कालांतराने, यहोवाने दुष्ट लोकांचा नाश केला, परंतु नोहा व त्याच्या कुटुंबाला वाचवले.—उत्पत्ति ६:५; ७:२३.
तुमच्यावर यहोवा कृपादृष्टी करेल का? खरोखर, “परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्यं प्रगट करितो.” (२ इतिहास १६:९) लवकरच, देव पुन्हा एकदा, पृथ्वीवरून सर्व दुष्ट लोकांचा नाश करील आणि मनाच्या लीन जनांचा बचाव करील.—स्तोत्र ३७:१०, ११. (w०७ ८/१)