व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

ज्या बाळाचा आईच्या गर्भातच मृत्यू होतो त्याच्या पुनरुत्थानाची काही आशा आहे का?

बाळाचा जन्म होण्यापूर्वीच त्याला गमावण्याचे दुःख ज्यांनी अनुभवलेले नाही त्यांना असा अनुभव आलेल्या पालकांच्या भावना कदाचित कळणार नाहीत. काही पालकांना या दुःखातून सावरणे खूप कठीण जाते. एका स्त्रीने आपल्या पाच मुलांना त्यांचा जन्म होण्याआधीच गमावले. काही काळाने तिला दोन निरोगी मुले झाली खरी, पण जन्मापूर्वीच गमावलेल्या आपल्या प्रत्येक मुलाची आठवण तिला आयुष्यभर होती. ती मुले जर जिवंत असती तर किती वर्षांची असती याचा ती नेहमी विचार करायची. अशा परिस्थितीत असणाऱ्‍या यहोवाच्या सेवकांनी जे गमावले आहे ते पुनरुत्थानाद्वारे परत मिळवण्याची आशा बाळगण्यास त्यांच्याकडे काही आधार आहे का?

प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, या प्रश्‍नाचे उत्तर आपल्याजवळ नाही. गर्भपात झालेल्या किंवा मृतावस्थेत जन्माला आलेल्या बाळाच्या पुनरुत्थानाबद्दल बायबलमध्ये एकदाही थेटपणे उल्लेख केलेला नाही. तरीपण, देवाच्या वचनात या प्रश्‍नाशी संबधित असलेली काही तत्त्वे आहेत ज्यांमुळे आपल्याला सांत्वन मिळू शकेल.

आता आपण परस्परांशी संबंधित असलेल्या दोन प्रश्‍नांवर विचार करू या. पहिला असा की यहोवाच्या दृष्टीत मानवाचे जीवन केव्हा सुरू होते, गर्भधारणेच्या वेळी की जन्माच्या वेळी? दुसरा म्हणजे, अद्याप जन्माला न आलेले मूल यहोवाच्या नजरेत एक स्वतंत्र व्यक्‍ती असते की फक्‍त स्त्रीच्या गर्भातील एक मांसाचा गोळा? बायबलमधील तत्त्वे या दोन्ही प्रश्‍नांची स्पष्ट उत्तरे देतात.

मानवाचे जीवन त्याच्या जन्माच्या वेळी नव्हे तर बऱ्‍याच आधीपासून सुरू होते हे मोशेच्या नियमशास्त्राने स्पष्टपणे दाखवले होते. असे कशावरून म्हणता येईल? भ्रूणहत्येसाठी जबाबदार असलेल्या मनुष्याला मृत्यूदंड द्यावा असे त्या नियमशास्त्रात सांगण्यात आले होते. “जिवाबद्दल जीव,” असा नियम होता. * (निर्ग. २१:२२, २३, NW) त्याअर्थी, अद्याप जन्माला न आलेले गर्भातील बाळ एक जिवंत व स्वतंत्र जीव आहे. हे मूलभूत सत्य समजल्यामुळे, गर्भपात करणे हे देवाच्या नजरेत गंभीर पाप आहे हे ओळखण्यास व त्यापासून दूर राहण्यास लाखो ख्रिश्‍चनांना मदत झाली आहे.

हे मान्य आहे, की जन्माला न आलेले बाळ एक जिवंत व स्वतंत्र जीव असते, पण यहोवाच्या नजरेत त्याचे जीवन खरेच मौल्यवान आहे का? वर सांगितलेल्या वचनानुसार जन्माला न आलेल्या बाळाच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्‍या प्रौढ व्यक्‍तीला मृत्यूदंड देण्यात यावा असा कायदा होता. त्याअर्थी, जन्माला न आलेल्या बाळाचे जीवनही देवाच्या नजरेत अतिशय मौल्यवान आहे. तसेच, बायबलमधील इतरही अनेक वचने दाखवतात की जन्माला न आलेल्या बाळालाही यहोवा एक स्वतंत्र व्यक्‍ती समजतो. उदाहरणार्थ, दावीद राजाने आपल्या एका प्रेरित स्तोत्रात यहोवाला असे म्हटले: “तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केली. . . . मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले, आणि माझा एकहि दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेविले होते.”—स्तो. १३९:१३-१६; ईयो. ३१:१४, १५.

शिवाय, जन्माला न आलेल्या बाळामध्येही त्याची वेगळी अशी ओळख करून देणारे गुण असतात आणि भविष्यात ही व्यक्‍ती बरेच काही करू शकेल हे देखील यहोवा पाहतो. इसहाकाची पत्नी रिबका हिच्या गर्भातील जुळी मुले आपसात झगडू लागली तेव्हा यहोवाने त्यांच्याविषयी एक भविष्यवाणी केली होती. या भविष्यवाणीतून असे समजते की यहोवाने आधीच या मुलांमधील काही विशिष्ट गुण पाहिले होते ज्यांचा भविष्यात अनेकांच्या जीवनावर परिणाम होणार होता.—उत्प. २५:२२, २३; रोम. ९:१०-१३.

बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानाच्या बाबतीत असलेला एक अहवालही लक्ष देण्याजोगा आहे. या अहवालात असे म्हटले आहे: “अलीशिबेने मरीयेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळकाने उडी मारली व अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली.” (लूक १:४१) या प्रसंगाबद्दल सांगताना, पेशाने वैद्य असलेल्या लूकने जो ग्रीक शब्द वापरला, तो न जन्मलेल्या बाळासाठी तसेच जन्माला आलेल्या बाळासाठीही वापरला जात असे. गव्हाणीत असलेल्या बाळ येशूबद्दल सांगतानाही त्याने हाच शब्द वापरला होता.—लूक २:१२, १६; १८:१५.

वरील सर्व माहिती लक्षात घेता, गर्भात असणाऱ्‍या बाळात व जन्मानंतर पहिला श्‍वास घेतलेल्या बाळात विशेष फरक आहे असे बायबल सांगते का? असे दिसत नाही. आणि वैद्यक शास्त्रातील आधुनिक शोधही याला दुजोरा देतात. उदाहरणार्थ, शास्त्रज्ञांना असे दिसून आले आहे की गर्भात असलेल्या बाळाला बाहेर जे घडते त्याची जाणीव असते व त्यास ते प्रतिसादही देऊ शकते. त्यामुळे, गर्भवती मातेला तिच्या उदरात वाढत असणाऱ्‍या बाळाबद्दल जिव्हाळा वाटतो यात काही आश्‍चर्य नाही.

गर्भाशयात वाढणाऱ्‍या बाळांची जन्माला येण्याची वेळ वेगवेगळी असू शकते. या उदाहरणाकडे लक्ष द्या, एक माता पूर्ण वाढ न झालेल्या बाळाला जन्म देते, आणि ते काही दिवसांतच मरते. दुसरी एक माता पूर्ण वाढ झालेल्या पण मृतावस्थेत असलेल्या बाळाला जन्म देते. पहिल्या ज्या मातेचा उल्लेख केला आहे तिने फक्‍त पूर्ण वाढ न झालेल्या बाळाला जन्म दिल्यामुळेच तिला तिच्या बाळाच्या पुनरुत्थानाची आशा आहे, पण त्या दुसऱ्‍या मातेला मात्र ती आशा नाही असे म्हणता येईल का?

तर मग, बायबल स्पष्टपणे शिकवते की मानवांचे जीवन गर्भधारणेपासून सुरू होते व यहोवाच्या नजरेत जन्माला न आलेले बाळही एक स्वतंत्र व मौल्यवान व्यक्‍ती आहे. बायबलमधील या सत्यांमुळे काहींना असे वाटू शकते की जन्माला न आलेल्या मृत बाळासाठी पुनरुत्थानाची आशा नाही असे म्हणणे बायबलमधील सत्यांच्या विरोधात आहे. त्यांना असेही वाटू शकते की असे म्हटल्यामुळे गर्भपाताविरुद्ध बायबलमधील या सत्यांवर आधारित असलेली जी शास्त्रवचनीय भूमिका आपण घेतो तिचे महत्त्व कमी होते.

पूर्वी, या नियतकालिकात असे काही प्रश्‍न उभे करण्यात आले होते ज्यांमुळे जन्माआधी मेलेल्या बाळांचे पुनरुत्थान खरोखर शक्य आहे का याविषयी शंका निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या स्त्रीचा गर्भपात झाला असल्यास नंदनवनात देव तिच्या गर्भात अंशतः विकसित झालेले भ्रूण घालेल का? तरीही, यावर अधिक अभ्यास व प्रार्थनापूर्वक विचार केल्यावर नियमन मंडळ या निर्णयाला पोचले की पुनरुत्थानाच्या आशेच्या संदर्भात अशा प्रकारचे प्रश्‍न महत्त्वाचे नाहीत. येशूने म्हटले: “देवाला सर्व काही शक्य आहे.” (मार्क १०:२७) येशूच्या स्वतःच्या अनुभवावरून या विधानाची सत्यता दिसून येते. त्याचे जीवन स्वर्गातून एका कुमारिकेच्या गर्भात स्थलांतरित करण्यात आले जे मानवांच्या नजरेत अगदीच अशक्य होते.

तर मग, याचा अर्थ असा होतो का की जन्म होण्याआधीच मरण पावलेल्या बाळांचे पुनरुत्थान होईल असे बायबल शिकवते? आम्ही हे पुन्हा सांगू इच्छितो की बायबल या प्रश्‍नाचे थेट उत्तर देत नाही, त्यामुळे याबद्दल ठामपणे सांगण्यासाठी मानवांजवळ काहीही आधार नाही. या विषयाबद्दल कदाचित वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य प्रश्‍न निर्माण होतील. खरेच, याबद्दल अंदाज लावण्याचे आपण टाळले पाहिजे. आपल्याला फक्‍त हे माहीत आहे की ही गोष्ट कृपाळू व दयामय असलेल्या यहोवा देवाच्या हातात आहे. (स्तो. ८६:१५) मृत्यूमुळे झालेले नुकसान पुनरुत्थानाद्वारे भरून काढण्याची त्याची मनस्वी इच्छा आहे यात काहीच शंका नाही. (ईयो. १४:१४, १५) जे योग्य आहे ते तो नेहमी करतो असा आपण भरवसा बाळगू शकतो. “सैतानाची कृत्ये नष्ट” करण्यासाठी आपल्या पुत्राला प्रेमळपणे सांगण्याद्वारे, या दुष्ट जगात जगताना आपल्याला जे दुःख अनुभवावे लागले ते सर्व दुःख नाहीसे करून तो आपल्याला सांत्वन पुरवेल.—१ योहा. ३:८.

[तळटीप]

^ परि. 6 या शास्त्रवचनांचे भाषांतर करताना काही वेळा ते अशा प्रकारे करण्यात आले आहे की ज्यावरून फक्‍त मातेच्या मृत्यूसाठी जबाबदार असणारा मृत्यूदंडास पात्र होता असे दिसते. पण, मूळ इब्री शास्त्रवचनांवरून हे कळते की या नियमात आई किंवा तिच्या जन्माला न आलेल्या बाळाच्या मृत्यूबद्दल सांगण्यात आले आहे.

[१३ पानांवरील मथळा]

यहोवा आपले सर्व दुःख नाहीसे करेल