खोटा तर्क करून स्वतःची फसवणूक करू नका
खोटा तर्क करून स्वतःची फसवणूक करू नका
“हे तू काय केले?” हव्वेने, मना करण्यात आलेल्या झाडाचे फळ खाल्ले तेव्हा देवाने तिला हा प्रश्न केला. ती म्हणाली: “सर्पाने मला भुरळ घातली म्हणून ते मी खाल्ले.” (उत्प. ३:१३) सैतानाने अर्थात ज्या धूर्त सापाने हव्वेला देवाची आज्ञा मोडण्यास भाग पाडले, त्याला नंतर ‘सर्व जगाला ठकविणारा जुनाट साप’ असे म्हणण्यात आले आहे.—प्रकटी. १२:९.
उत्पत्तिचा हा अहवाल दाखवून देतो, की सैतान धूर्त असून तो बेसावध लोकांची फसवणूक करण्याच्या हेतूने जाणूनबुजून खोटे बोलतो. त्याच्या या फसवणुकीला हव्वा नक्कीच बळी पडली. पण, केवळ सैतानच आपली फसवणूक करू शकतो असे नाही. तर, ‘खोटा तर्क करून स्वतःची फसवणूक करण्याच्या’ धोक्याविषयीदेखील बायबल आपल्याला इशारा देते.—याको. १:२२, NW.
आपण स्वतःची फसवणूक कधीच करू शकत नाही असे आपल्याला वाटू शकते. पण, ज्याअर्थी देवाच्या वचनात हा इशारा दिला आहे, त्याअर्थी त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. तेव्हा, आपल्याकडून आपली स्वतःची फसवणूक होणे कसे शक्य आहे आणि कोणत्या प्रकारच्या खोट्या तर्कांमुळे आपली दिशाभूल होऊ शकते याचा विचार करणे गरजेचे आहे. या बाबतीत बायबलमधील एक उदाहरण आपल्याला मदत करू शकते.
स्वतःची फसवणूक केलेल्यांचे उदाहरण
इ.स.पू. ५३७ च्या आसपास, पारसाचा राजा कोरेश याने असे फरमान काढले की बॅबिलोनमध्ये बंदिवान असलेल्या यहुद्यांनी जेरूसलेमला परत जावे व मंदिराची पुनर्बांधणी करावी. (एज्रा १:१, २) याच्या पुढच्याच वर्षी, यहोवाच्या उद्देशानुसार यहुदी लोकांनी नवीन मंदिराचा पाया घातला. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यावर यहोवाचा आशीर्वाद असल्यामुळे जेरूसलेमला परतलेल्या लोकांनी आनंद केला व त्याची स्तुती केली. (एज्रा ३:८, १०, ११) पण, लवकरच पुनर्बांधणीच्या त्यांच्या कामाचा विरोध होऊ लागला आणि लोक खचून गेले. (एज्रा ४:४) यहुदी लोक जेरूसलेमला परतले त्याच्या सुमारे १५ वर्षांनी पारसाच्या अधिकाऱ्यांनी बांधकामावर पूर्णपणे बंदी आणली. याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रांताधिकारी जेरूसलेममध्ये आले आणि त्यांनी ‘जबरीने [यहुद्यांचे] काम थांबविले.’—एज्रा ४:२१-२४.
यहुद्यांसमोर ही मोठी अडचण आली तेव्हा त्यांनी खोटा तर्क करून स्वतःची फसवणूक केली. त्यांनी स्वतःला म्हटले: “वेळ अजून आली नाही, परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही.” (हाग्ग. १:२) त्यांनी असा निष्कर्ष काढला, की मंदिर इतक्यात बांधावे अशी देवाची इच्छा नाही. देवाची इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग शोधण्याऐवजी त्यांनी आपली पवित्र कामगिरी सोडून दिली आणि स्वतःची घरेदारे बांधण्यात ते मग्न झाले. त्यामुळे देवाचा संदेष्टा हाग्गय याने सरळ सरळ त्यांना विचारले: “इकडे [यहोवाचे] मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तक्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय?”—हाग्ग. १:४.
या उदाहरणावरून तुम्ही काही शिकू शकता का? देवाचा उद्देश पूर्ण होण्याच्या समयाविषयी चुकीचा दृष्टिकोन बाळगल्यामुळे आध्यात्मिक कार्यांच्या महत्त्वावरून आपले दुर्लक्ष होऊ शकते आणि आपल्या वैयक्तिक कामात आपण गुरफटून जाऊ शकतो. उदाहरणार्थ, असे समजा की तुमच्या घरी काही पाहुणे येणार आहेत. ते येण्यापूर्वी सगळी तयारी करण्यासाठी आणि घरातील सर्व कामे उरकण्यासाठी तुमची घाई चाललेली असते. पण, तुम्हाला समजते की तुमचे पाहुणे जरा उशिरा येणार आहेत. तर मग, तुम्ही तयारी करण्याचे सोडून द्याल का?
यहुदी लोकांनी वेळ न दवडता मंदिराची पुनर्बांधणी करावी अशी अजूनही यहोवाची इच्छा आहे हे यहुदी लोकांना समजण्यास हाग्गय आणि जखऱ्या यांनी मदत केली हे आठवणीत आणा. हाग्गयने त्यांना असे आर्जवले: “देशातल्या सर्व रहिवाशांनो, हिम्मत धरा व कामास हाग्ग. २:४) देवाचा आत्मा आपल्या पाठीशी राहील या भरवशाने त्यांनी पुन्हा कामाला लागायचे होते. (जख. ४:६, ७) हे उदाहरण, यहोवाच्या दिवसाविषयी चुकीचा निष्कर्ष न काढण्यास आपल्याला मदत करू शकते का?—१ करिंथ. १०:११.
लागा.” (खोटा तर्क करण्याऐवजी सकारात्मक विचार करा
प्रेषित पेत्राने आपल्या दुसऱ्या पत्रात, “नवे आकाश व नवी पृथ्वी” यांच्या स्थापनेसंबंधी असलेल्या यहोवाच्या वेळापत्रकाची चर्चा केली. (२ पेत्र ३:१३) मानवी कामकाजात देव कधी हस्तक्षेप करेल की नाही या बाबतीत काही थट्टेखोरांनी शंका व्यक्त केल्याचे त्याने म्हटले. “सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे,” त्यामुळे काहीही होणार नाही असा त्यांनी तर्क केला. (२ पेत्र ३:४) पण, पेत्राला हा खोटा तर्क खोडून काढायचा होता. त्याने लिहिले: “मी तुम्हास आठवण देऊन तुमचे निर्मळ मन [“विचारशक्ती,” NW] जागृत करीत आहे.” थट्टेखोरांचा तर्क चुकीचा होता याची त्याने आपल्या ख्रिस्ती बांधवांना आठवण करून दिली. देवाने यापूर्वी सबंध पृथ्वीवर एक विध्वंसकारी जलप्रलय आणून, मानवी कामकाजात हस्तक्षेप केला होता.—२ पेत्र ३:१, ५-७.
इ.स.पू. ५२० मध्ये, खचून गेलेल्या व अक्रियाशील झालेल्या यहुदी लोकांना हाग्गयने असेच प्रोत्साहन दिले. त्याने त्यांना असा सल्ला दिला: “तुम्ही आपल्या मार्गांकडे लक्ष पुरवा.” (हाग्ग. १:५) त्यांच्या विचारशक्तीला चालना देण्यासाठी त्याने आपल्या सहउपासकांना देवाच्या उद्देशांची आणि त्याच्या लोकांसंबंधी असलेल्या त्याच्या अभिवचनांची आठवण करून दिली. (हाग्ग. १:८; २:४, ५) या प्रोत्साहनामुळे, अधिकाऱ्यांचा विरोध असतानाही बांधकामाला लगेच सुरुवात झाली. विरोधकांनी पुन्हा एकदा बांधकाम प्रकल्प उलथवून पाडण्याचा प्रयत्न केला; पण, त्यांचा डाव फसला. नंतर बंदी मागे घेण्यात आली, आणि पाच वर्षांत मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले.—एज्रा ६:१४, १५; हाग्ग. १:१४, १५.
आपल्या मार्गांकडे लक्ष देणे
हाग्गयच्या दिवसांतील यहुद्यांप्रमाणे, आपल्यासमोर समस्या येतात तेव्हा आपणही खचून जाऊ शकतो असे तुम्हाला वाटते का? तसे घडल्यास, सुवार्तेचा प्रचार करण्यातील आपला आवेश टिकवून ठेवणे आपल्याला कठीण जाऊ शकते. पण, कोणत्या कारणांमुळे आपण खचून जाऊ शकतो? आपण कदाचित या जगातील अन्यायामुळे दुःख सोसत असू. हबक्कूकचा विचार करा, ज्याने असे विचारले: “हे परमेश्वरा, मी किती वेळ ओरडू? तू ऐकत नाहीस. जुलूम झाला असे मी तुला ओरडून सांगतो तरी तू सुटका करीत नाहीस.” (हब. १:२) अंत येण्यास विलंब होत आहे असे काहींना वाटू शकते. आणि त्यामुळे एक ख्रिस्ती व्यक्ती काळाच्या निकडीकडे दुर्लक्ष करू शकते आणि त्याऐवजी आरामदायी जीवनाला प्राधान्य देऊ शकते. तुमच्या बाबतीत असेच घडत असल्याचे तुम्हाला जाणवते का? आपणही याच दिशेने विचार केला, तर आपण स्वतःची फसवणूक करत असू. तेव्हा, ‘आपल्या मार्गांकडे लक्ष देण्याविषयी’ आणि ‘आपली विचारशक्ती जागृत करण्याविषयी’ बायबलमधील सल्ल्याचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे! आपण स्वतःला असे विचारू शकतो: ‘या दुष्ट जगाचा अंत लवकरच होईल असं मला वाटलं होतं, पण तसं अजून झालं नाही याचं मला आश्चर्य वाटावं का?’
बायबलमध्ये पूर्वभाकीत केलेला काळ
या जगाच्या अंताविषयी येशूने जे म्हटले होते त्याचा विचार करा. शेवटच्या दिवसांबद्दल येशूने जी भविष्यवाणी मार्क १३:३३-३७) असाच इशारा आपल्याला हर्मगिदोनाच्या अर्थात यहोवाच्या मोठ्या दिवसाच्या भविष्यसूचक वर्णनामध्ये आढळतो. (प्रकटी. १६:१४-१६) वारंवार हा इशारा देण्याची गरज काय? आपण खूप काळ वाट पाहिली असे वाटून काही लोक आपली निकडीची भावना गमावून बसण्याचा धोका आहे. त्यामुळेच अशा इशाऱ्यांची आपल्याला गरज आहे.
केली होती त्याबद्दल मार्कचा अहवाल दाखवून देतो की येशूने वारंवार आपल्याला जागृत राहण्याचा सल्ला दिला. (या जगाच्या अंताची वाट पाहत असताना आपण सतत जागृत असले पाहिजे हे येशूने एक उदाहरण देऊन समजावले. त्याने अशा एका घरधन्याबद्दल सांगितले ज्याच्या घरात चोरी झाली होती. तो ही चोरी कशी टाळू शकला असता? रात्रभर जागे राहण्याद्वारे. येशूने या उदाहरणाच्या शेवटी असा सल्ला दिला: “तुम्हीहि सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.”—मत्त. २४:४३, ४४.
या उदाहरणावरून दिसून येते, की आपल्याला दीर्घ काळ वाट पाहावी लागली, तरी आपण वाट पाहण्यास तयार असले पाहिजे. या दुष्ट जगाचा अंत आपल्या अपेक्षेप्रमाणे लगेच झाला नाही याची आपण अवाजवी चिंता करत बसू नये. यहोवाची “वेळ अजून आली नाही” असा चुकीचा तर्क करून आपण स्वतःची फसवणूक करू नये. अशा विचारसरणीमुळे, राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यातील आपला आवेश मंदावू शकतो.—रोम. १२:११.
खोटे तर्क समूळ उपटून टाका
खोटा तर्क करण्याच्या बाबतीत गलतीकर ६:७ यातील तत्त्व लागू होते: “फसू नका; . . . माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.” जमिनीच्या एका भागात जर पेरणी केली नाही, तर त्या ठिकाणी लगेच गवत उगवू लागते. त्याचप्रमाणे, आपण आपली विचारशक्ती जागृत केली नाही, तर खोटे तर्क सहज आपल्या मनात मूळ धरू शकतात. उदाहरणार्थ, आपण कदाचित असा विचार करू, की ‘देवाचा दिवस नक्कीच येईल, पण इतक्यात नाही.’ अशा प्रकारच्या विचारसरणीमुळे, ईश्वरशासित कार्यांसंबंधी आपण अगदी निश्चिंत होण्याची शक्यता आहे. काही काळाने, आपल्या आध्यात्मिक दिनक्रमाकडे आपले दुर्लक्ष होऊ लागते. असे झाल्यास, देवाचा दिवस अचानक आपल्यावर झडप घालू शकतो.—२ पेत्र ३:१०.
पण, “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा” काय आहे याची आपण निरंतर स्वतःला खातरी करून दिली, तर खोटे तर्क आपल्या मनात मूळ धरू शकणार नाहीत. (रोम. १२:२) या बाबतीत आपली मदत करण्यासाठी देवाच्या वचनाचे नियमित वाचन करणे सगळ्यात उत्तम. यहोवा नेहमी आपल्या नियुक्त वेळी कार्य करतो यावरील आपला भरवसा शास्त्रवचनांचे वाचन केल्याने अधिक मजबूत होऊ शकतो.—हब. २:३.
बायबल अभ्यास, प्रार्थना, नियमितपणे सभांना उपस्थित राहणे, प्रचार कार्य करणे, व त्यासोबतच इतरांना प्रेमळपणे साहाय्य करणे या गोष्टी आपल्याला यहोवाच्या ‘दिवसाची वाट पाहत राहण्यास’ मदत करतील. (२ पेत्र ३:११, १२) या बाबतीत आपण जी चिकाटी दाखवू त्याची यहोवा नक्कीच दखल घेईल. प्रेषित पौल आपल्याला आठवण करून देतो: “चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.”—गलती. ६:९.
देवाचा दिवस येण्यास अजून बराच अवकाश आहे असा खोटा तर्क करून स्वतःची फसवणूक करण्याची ही वेळ नाही. उलट, यहोवाचा दिवस जवळ असल्यामुळे, आपली अंतःकरणे स्थिर करण्याची ही वेळ आहे.
[४ पानांवरील चित्र]
हाग्गय आणि जखऱ्या यांनी यहुदी लोकांना बांधकाम करण्याचा आर्जव केला
[५ पानांवरील चित्र]
चोर येणार आहे हे घरधन्याला माहीत असते, तर त्याने काय केले असते?