व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नवी सोप्या इंग्रजीतील आवृत्ती

नवी सोप्या इंग्रजीतील आवृत्ती

नवी सोप्या इंग्रजीतील आवृत्ती

आम्हाला हे घोषित करण्यास आनंद होत आहे, की या अंकापासून इंग्रजीतील टेहळणी बुरूज अभ्यास आवृत्तीसोबत दर महिन्याला, सोप्या इंग्रजीतील आवृत्तीदेखील प्रकाशित केली जाईल. सुरुवातीला एका वर्षासाठी प्रयोग म्हणून आम्ही ही आवृत्ती प्रकाशित करत आहोत. या नव्या आवृत्तीत अभ्यास लेख असतील आणि उर्वरित जागेत इतर निवडक लेख असतील. यहोवाच्या साक्षीदारांतील अनेक जणांची महत्त्वाची आध्यात्मिक गरज या व्यवस्थेमुळे पूर्ण केली जाईल असा विश्‍वास आम्हाला वाटतो. असे का म्हणता येईल?

फिजी, घाना, केनिया, लायबेरिया, नायजीरिया, पापुआ न्यु गिनी व सालोमन बेटे यांसारख्या देशांत राहणाऱ्‍या आपल्या बांधवांच्या सर्वसामान्य व्यवहाराची भाषा ही इंग्रजीच आहे. या देशांतील बांधव इतर स्थानिक भाषा बोलत असले, तरीसुद्धा मंडळीच्या सभा व क्षेत्र सेवाकार्यात सहसा इंग्रजीच वापरली जाते. पण, ही इंग्रजी आपल्या प्रकाशनांत वापरल्या जाणाऱ्‍या इंग्रजी भाषेच्या तुलनेत सोपी असते. तसेच, यहोवाच्या लोकांपैकी इतर काही जण दुसऱ्‍या देशांत स्थायिक झाले आहेत. इंग्रजी भाषेचे फारसे ज्ञान नसूनही, त्यांना या देशांत इंग्रजीचा वापर करावा लागतो. शिवाय, येथे त्यांना स्वतःच्या मातृभाषेतील सभांना उपस्थित राहणे शक्य नाही.

टेहळणी बुरूज अभ्यासात दर आठवडी विचारात घेतले जाणारे लेख, आपल्याला समयोचित आध्यात्मिक पोषण पुरवण्याचे प्रमुख माध्यम आहेत. म्हणूनच, सभेला उपस्थित असलेल्या सर्वांना या साहित्याचा पुरेपूर फायदा घेता यावा या उद्देशाने सोप्या इंग्रजीतील आवृत्तीत साधे शब्द तसेच सोपे व्याकरण व वाक्यरचना वापरण्यात आली आहे. या आवृत्तीचे मुखपृष्ठ नेहमीच्या आवृत्तीपेक्षा वेगळे असेल. पण यातील उपशीर्षके, परिच्छेद, उजळणीचे प्रश्‍न तसेच चित्रे इत्यादी नेहमीच्या अभ्यास आवृत्तीसारखेच असतील. यामुळे, सर्व जण आपल्या आवडीनुसार दोन्हीपैकी कोणत्याही आवृत्तीचा वापर करून टेहळणी बुरूज अभ्यासात सहभाग घेऊ शकतील. या दोन आवृत्तींच्या भाषेतील फरक पाहण्यासाठी याच अंकाच्या पहिल्या अभ्यास लेखातील दुसऱ्‍या परिच्छेदाचे खाली दिलेले उदाहरण पाहावे.

आम्ही आशा करतो की ज्यांनी यहोवाला पुढीलप्रमाणे प्रार्थना केली होती अशा अनेकांना या नवीन व्यवस्थेमुळे त्यांच्या प्रार्थनांचे उत्तर मिळेल: “तुझ्या आज्ञा शिकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी मला मदत कर.” (स्तो. ११९:७३, ईझी-टू-रीड व्हर्शन) इंग्रजीचे मर्यादित ज्ञान असलेल्यांना तसेच इंग्रजी बोलणाऱ्‍या काही लहान मुलांनासुद्धा दर आठवड्याच्या टेहळणी बुरूज अभ्यासासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयारी करण्यास या नव्या आवृत्तीमुळे मदत होईल अशी आम्हाला खात्री वाटते. यहोवाचे संपूर्ण “बंधुवर्गावर” प्रेम असल्यामुळे, सर्वांना मुबलक प्रमाणात आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासाठी तो ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाचा’ उपयोग करत आहे, याबद्दल आपण त्याचे मनापासून आभारी आहोत.—१ पेत्र २:१७; मत्त. २४:४५.

यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ