व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इतिहास घडवणारी एक सभा

इतिहास घडवणारी एक सभा

इतिहास घडवणारी एक सभा

“ही सभा संपेल तेव्हा, तुम्ही सगळे म्हणाल, ‘ही खरोखरच इतिहास घडवणारी ईश्‍वरशासित वार्षिक सभा होती!’” असे म्हणून, यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य स्टिफन लेट यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या श्रोत्यांची तीव्र उत्सुकता आणखी वाढवली. ते सर्व जण, वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्वेनियाच्या १२६ व्या वार्षिक सभेसाठी उपस्थित होते. ही सभा, २ ऑक्टोबर २०१० रोजी, अमेरिकेतील न्यू जर्झीच्या जर्झी सिटीमध्ये असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या संमेलनगृहात भरवण्यात आली होती. या ऐतिहासिक प्रसंगाची काही ठळक वैशिष्ट्ये काय होती?

सुरुवातीच्या भाषणात बंधू लेट यांनी, बायबलमधील यहेज्केल पुस्तकात वर्णन केलेल्या यहोवाच्या स्वर्गीय रथाविषयी उत्साहपूर्ण चर्चा केली. हा विशाल, वैभवी रथ यहोवाच्या संघटनेला चित्रित करतो व खुद्द यहोवा त्याचे नियंत्रण करतो. या संघटनेचा स्वर्गीय भाग, जो आत्मिक प्राण्यांनी बनलेला आहे तो विजेच्या गतीने म्हणजे यहोवाच्या विचारांच्या गतीने वाटचाल करतो, असे बंधू लेट यांनी म्हटले. त्याचप्रमाणे, देवाच्या संघटनेचा पृथ्वीवरील भागदेखील वाटचाल करत आहे. बंधू लेट यांनी, अलीकडील काळात देवाच्या संघटनेच्या दृश्‍य भागात घडलेल्या अनेक आनंददायक घडामोडींचा उल्लेख केला.

उदाहरणार्थ, यहोवाच्या साक्षीदारांच्या अनेक शाखांचे विलीनीकरण करण्यात येत आहे. यामुळे, त्या देशांतील बेथेल गृहांत पूर्वी सेवा करणाऱ्‍या अनेकांना प्रचाराच्या कार्यावर लक्ष केंद्रित करणे शक्य होईल. दास वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्‍या नियमन मंडळाने केवळ विश्‍वासूपणेच नव्हे, तर सुज्ञतेने किंवा बुद्धिमानीनेही कार्य करत राहावे म्हणून श्रोत्यांनी नियमन मंडळासाठी प्रार्थना करत राहावी असा आर्जव बंधू लेट यांनी श्रोत्यांना केला.—मत्त. २४:४५-४७.

उत्तेजनात्मक अहवाल व हृदयस्पर्शी मुलाखती

हैटीच्या शाखा समितीवर सेवा करणारे टॅब हॉन्सबर्गर यांनी, १२ जानेवारी २०१० रोजी हैटीमध्ये झालेल्या भूकंपाचा मन हेलावून टाकणारा अहवाल सादर केला; त्या भूकंपाने देशातील सुमारे ३,००,००० लोकांचा बळी घेतला होता. तेथील पाळक लोकांना काय सांगत होते, हे बंधू हॉन्सबर्गर यांनी आपल्या अहवालात सांगितले. पाळक लोकांना म्हणत होते, की भूकंपात मरण पावलेले लोक देवाला विसरले होते म्हणून देवाने त्यांना शिक्षा दिली; पण जे चांगले होते त्यांचे देवाने संरक्षण केले. पण, आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, भूकंपात एका तुरुंगाची भिंत कोसळून पडली तेव्हा हजारो गुन्हेगार तुरुंगातून पळून गेले. म्हणूनच, आपला काळ इतका बिकट का आहे याविषयीचे सत्य शिकून हैटीतील प्रामाणिक अंतःकरणाच्या अनेक लोकांना खूप दिलासा मिळत आहे. बंधू हॉन्सबर्गर यांनी हैटीतील एका विश्‍वासू बांधवाचे शब्द उद्धृत केले. या बांधवाची पत्नी भूकंपात मरण पावली होती. त्या बांधवाने म्हटले: “मी आजपर्यंत तिच्यासाठी शोक करतो. आणखी किती दिवस मी तिच्यासाठी शोक करेन मला माहीत नाही; पण, यहोवाची संघटना दाखवत असलेल्या प्रेमामुळे मी आनंदी आहे. मला एका अद्‌भुत भविष्याची आशा आहे आणि या आशेबद्दल मी इतरांना सांगण्याचा दृढनिश्‍चय केला आहे.”

सध्या ब्रुकलीन बेथेल कुटुंबाचे सदस्य असलेले मार्क सॅन्डर्सन यांनी फिलिपीन्झचा अहवाल सादर केला. एके काळी बंधू सॅन्डर्सन तेथील शाखा समितीचे सदस्य होते. त्या देशाने सलग ३२ वेळा राज्य प्रचारकांचा उच्चांक गाठला आहे व तेथील बायबल अभ्यासांची संख्या तिथल्या प्रचारकांपेक्षा कितीतरी जास्त आहे हे सांगताना बंधू सॅन्डर्सनच्या चेहऱ्‍यावरून आनंद ओसंडत होता. त्यांनी मीगेल नावाच्या एका बांधवाचा अनुभव सांगितला. या बांधवाच्या नातूचा खून करण्यात आला होता. खून करणाऱ्‍यावर खटला चालवण्यासाठी व त्याला तुरुंगात टाकण्यासाठी बंधू मीगेलने खूप प्रयत्न केले होते. नंतर, तुरुंगात साक्षकार्य करत असताना त्यांची भेट खून करणाऱ्‍या त्या मनुष्याशी झाली. बंधू मीगेल काहीसे घाबरले, पण तरीसुद्धा ते त्याच्याशी अगदी सौम्यपणे व प्रेमळपणे बोलले. त्यांनी शेवटी त्या मनुष्यासोबत बायबलचा अभ्यास केला; त्याने चांगला प्रतिसाद दिला व तो यहोवावर प्रेम करू लागला. आज तो एक बाप्तिस्माप्राप्त बांधव आहे. बंधू मीगेल त्याचे घनिष्ठ मित्र बनले आणि आपल्या या नवीन बांधवाची लवकरात लवकर तुरुंगातून सुटका व्हावी म्हणून ते खटपट करत आहेत. *

त्यानंतर, ईश्‍वरशासित प्रशालांच्या विभागाचे प्रशिक्षक मार्क नूमार यांनी मुलाखती घेतल्या. त्यांनी, ॲलेक्स व सेरा राइनम्यूलर, डेविड व क्रिस्टा शेफर, आणि रॉबर्ट व केट्रा सिरॅन्को या तीन वैवाहिक जोडप्यांच्या मुलाखती घेतल्या. ॲलेक्स राइनम्यूलर हे प्रकाशन समितीचे मदतनीस म्हणून सेवा करतात. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी, कॅनडामध्ये अनेकदा एकट्यानेच पायनियर सेवा करत असताना त्यांनी सत्य कसे आपलेसे केले याविषयी त्यांनी सांगितले. बेथेलमध्ये त्यांच्या जीवनावर सगळ्यात जास्त प्रभाव कोणी पाडला असे त्यांना विचारण्यात आले, तेव्हा बंधू राइनम्यूलर यांनी तीन विश्‍वासू पुरुषांची नावे घेतली. या प्रत्येक बांधवाने त्यांना आध्यात्मिक रीत्या प्रौढ बनण्यास कशा प्रकारे मदत केली होती याविषयी त्यांनी सांगितले. त्यांची पत्नी सेरा हिने एका बहिणीसोबतच्या आपल्या मैत्रीविषयी सांगितले, जिने आपल्या विश्‍वासाखातर कित्येक दशके चीनच्या तुरुंगांत घालवली होती. सेराने म्हटले की ती वैयक्‍तिक प्रार्थनांद्वारे यहोवावर विसंबू राहण्यास शिकली आहे.

शिक्षण समितिचे मदतनीस म्हणून सेवा करणारे डेविड शेफर यांनी आपल्या आईच्या अतूट विश्‍वासाबद्दल तिची प्रशंसा केली; तसेच, तरुण असताना सहायक पायनियर सेवा करता यावी म्हणून त्यांना मदत करणाऱ्‍या बांधवांविषयी त्यांनी सांगितले जे लाकूड तोडण्याचे काम करायचे. त्यांची पत्नी क्रिस्टा, बेथेल कुटुंबातील वयस्कर सदस्यांचा आपल्यावर किती प्रभाव पडला त्याच्याविषयी मोठ्या आपुलकीने बोलली; या वयस्कर बंधुभगिनींनी येशूने सांगितल्याप्रमाणे, “थोडक्याविषयी विश्‍वासू” असल्याचे दाखवले होते.—लूक १६:१०.

लेखन समितीचे मदतनीस रॉबर्ट सिरॅन्को यांनी आपल्या आजी-आजोबांबद्दल काही आठवणी सांगितल्या. त्यांचे चारही आजी-आजोबा अभिषिक्‍त ख्रिस्ती असून त्यांनी हंगेरीतून अमेरिकेत स्थलांतर केले होते. लहान असताना, १९५० च्या दशकात झालेल्या मोठ्या अधिवेशनांना उपस्थित राहिल्यामुळे व यहोवाची संघटना आपल्या मंडळीपेक्षा कितीतरी मोठी आहे हे पाहिल्यामुळे त्यांच्या मनावर खूप प्रभाव पडला होता. त्यांची पत्नी केट्रा, धर्मत्यागाने व इतर समस्यांनी ग्रासलेल्या एका मंडळीत पायनियर सेवा करत होती तेव्हा ती कशा प्रकारे यहोवाला एकनिष्ठ राहण्यास शिकली याबद्दल तिने सांगितले. ती विश्‍वासात टिकून राहिली व नंतर एका मंडळीत तिची खास पायनियर म्हणून नेमणूक करण्यात आली; त्या मंडळीतील एकता पाहून ती खूप प्रभावित झाली.

त्यानंतर, मानफ्रेट टोनाक यांनी इथियोपिया देशाचा अहवाल सादर केला. हा देश बायबलच्या काळातला असून आज तेथे ९,००० हून अधिक सुवार्तेचे प्रचारक आहेत. यांपैकी बरेच जण ॲडिस अबाबा या राजधानी शहरात व त्याच्या आसपास राहतात. यामुळे दुर्गम भागांत राज्य प्रचारकांची नितान्त गरज आहे. ही गरज भागवण्यासाठी, इतर देशांत राहणाऱ्‍या इथियोपियाच्या साक्षीदारांना देशातील काही दुर्गम भागांत जाऊन प्रचार करण्यासाठी बोलावण्यात आले. अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला, त्यांनी स्थानिक साक्षीदारांना उत्तेजन दिले आणि त्यांना अनेक आस्थेवाईक लोक भेटले.

रशियातील यहोवाचे साक्षीदार व त्यांचे न्यायालयीन संघर्ष यावरील परिसंवाद हे कार्यक्रमाचे ठळक वैशिष्ट्य होते. रशियाच्या शाखा समितीचे सदस्य ऑलिस बर्गडाल यांनी रशियातील व खासकरून मॉस्कोतील साक्षीदारांच्या छळाचा इतिहास सादर केला. अमेरिकेच्या शाखेतील विधी विभागाचे सदस्य फिलिप ब्रम्ली यांनी, अलीकडील महिन्यांत झालेल्या काही रोमांचकारी घडामोडींविषयी सांगितले, ज्यांत साक्षीदारांवर लावलेल्या नऊ आरोपांची सुनावणी मानवी हक्कांच्या युरोपियन न्यायालयाने ऐकली होती. या नऊ आरोपांपैकी एकाही आरोपात काहीही तथ्य नाही हे न्यायालयाने एकमताने जाहीर केले आणि कितीतरी प्रकरणांत तर, सादर केलेले वादविवाद खोडून काढण्यासाठी न्यायालयाने पद्धतशीर युक्‍तिवादही केला. या निर्णयाचे, रशियात काय परिणाम होतील हे अद्याप माहीत नसले, तरी न्यायालयाच्या निर्णयाचा इतर देशांतील प्रकरणांवर सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे अशी आशा बंधू ब्रम्ली यांनी व्यक्‍त केली.

या आनंददायक बातमीनंतर, बंधू लेट यांनी घोषणा केली, की फ्रान्सचे सरकार व यहोवाचे साक्षीदार यांच्यात करासंबंधी दीर्घ काळापासून चाललेले प्रकरण मानवी हक्कांच्या युरोपियन न्यायालयाने सुनावणीसाठी स्वीकारले आहे. हे न्यायालय अतिशय प्रतिष्ठित असून ते खूप कमी प्रकरणे सुनावणीसाठी स्वीकारते. आतापर्यंत, मानवी हक्कांच्या युरोपियन न्यायालयाने यहोवाच्या साक्षीदारांची ३९ प्रकरणे विचारात घेतली आहे व त्यांपैकी ३७ प्रकरणांत न्यायालयाने आपल्या बाजूने निकाल दिला आहे. बांधवांनी सदर बाबीसंबंधी यहोवा देवाला प्रार्थना करावी असे उत्तेजन बंधू लेट यांनी सर्वांना दिले.

शेवटचा अहवाल, मंडळीच्या वडिलांसाठी असलेल्या प्रशालांचे प्रशिक्षक, रिचर्ड मोरलन यांनी सादर केला. या प्रशालेबद्दल व त्यास उपस्थित असलेल्या वडिलांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल ते मोठ्या उत्साहाने बोलले.

नियमन मंडळाच्या सदस्यांनी दिलेली इतर भाषणे

नियमन मंडळाचे सदस्य गाय पियर्स यांनी २०११ चे वार्षिक वचन, ‘यहोवाच्या नावात आश्रय घ्या,’ यावर केंद्रित एक हृदयस्पर्शी भाषण दिले. (सफ. ३:१२, पं.र.भा.) त्यांनी म्हटले, की यहोवाच्या लोकांसाठी अनेक अर्थाने हा आनंदाचा काळ असला, तरी तो गंभीर व विचार करण्याचादेखील काळ आहे. यहोवाचा मोठा दिवस जवळ आहे; असे असले, तरी लोक अजूनही खोटा धर्म, राजकीय संघटना, धनसंपत्ती, पलायनवाद यांसारख्या गोष्टींध्ये आश्रय मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण, खरा आश्रय मिळवण्यासाठी आपण यहोवाच्या नावाचा धावा केला पाहिजे. याचा अर्थ, त्या नावाचे प्रतिनिधित्व करणाऱ्‍या व्यक्‍तीला ओळखणे, तिचा गाढ आदर करणे, तिच्यावर भरवसा ठेवणे व तिच्यावर जिवेभावे प्रेम करणे.

यानंतर, नियमन मंडळाचे सदस्य डेविड स्प्लेन यांनी, “तुम्ही देवाच्या विसाव्यात प्रवेश केला आहे का?” या विषयावर एक मनस्वी व विचारप्रवर्तक भाषण दिले. त्यांनी म्हटले, की देवाच्या विसाव्याचा अर्थ देव स्वस्थ बसून आहे असा होत नाही; कारण पृथ्वीसंबंधी असलेला देवाचा उद्देश यशस्वी रीत्या पूर्णत्वास नेण्यासाठी यहोवा व त्याचा पुत्र देवाच्या विसाव्याच्या त्या सबंध लाक्षणिक दिवसादरम्यान ‘काम करीत आहेत.’ (योहा. ५:१७) तर मग, आपण देवाच्या विसाव्यात प्रवेश कसा करू शकतो? पापापासून दूर राहणे व स्वतःच्या बळावर नीतिमान ठरण्याच्या प्रवृत्तीपासून दूर राहणे या केवळ काही गोष्टी आहेत. आपण आपल्या जीवनातून विश्‍वास प्रदर्शित केला पाहिजे; तसेच आपण देवाचा उद्देश स्मरणात ठेवून जीवन जगले पाहिजे व त्या उद्देशासाठी आपल्या परीने होईल तितके योगदान केले पाहिजे. काही वेळा, असे करणे खूप कठीण जाऊ शकते; तरीसुद्धा, आपण यहोवाच्या संघटनेकडून मिळणारा सल्ला व मार्गदर्शक सूचना स्वीकारून त्यांचे पालन केले पाहिजे. देवाच्या विसाव्यात प्रवेश करण्यासाठी शक्य तितका प्रयत्न करा अशी विनंती बंधू स्प्लेन यांनी श्रोत्यांना केली.

नियमन मंडळाचे सदस्य ॲन्थनी मॉरिस यांनी दिलेल्या शेवटच्या भाषणाचे शीर्षक होते, “आपण कशाची वाट पाहत आहोत?” बंधू मॉरिस यांनी निकडीच्या व वडीलकीच्या भावनेने पुढे होणाऱ्‍या भविष्यसूचक घडामोडींची अर्थात सर्व विश्‍वासू जण आतुरतेने वाट पाहत असलेल्या घटनांची आठवण श्रोत्यांना करून दिली. यांत, “शांति आहे, निर्भय आहे” ही घोषणा व खोट्या धर्माचा नाश या घटना समाविष्ट आहेत. (१ थेस्सलनी. ५:२, ३; प्रकटी. १७:१५-१७) या भविष्यवाण्या पूर्ण न करणाऱ्‍या घटना प्रसार माध्यमांतून झळकतील तेव्हा, “हेच हर्मगिदोन असावे” असे आपण मुळीच म्हणू नये अशी ताकीद बंधू मॉरिस यांनी दिली. त्याऐवजी, मीखा ७:७ मध्ये सांगितल्याप्रमाणे आनंदाने व धीराने वाट पाहत राहण्याचे प्रोत्साहन त्यांनी दिले. पण, त्याच वेळी त्यांनी सर्वांना असाही आर्जव केला, की ज्याप्रमाणे रणभूमीवर सैनिक एकजुटीने लढाई करतात, त्याचप्रमाणे सर्वांनी नियमन मंडळाच्या निकट सहवासात राहून कार्य करावे. त्यांनी म्हटले: “अहो परमेश्‍वराची आशा धरणारे; तुमचे मन धीर धरो.”—स्तो. ३१:२४.

सभेच्या शेवटी, इतिहास घडवणाऱ्‍या काही रोमांचक घोषणा करण्यात आल्या. नियमन मंडळाचे सदस्य बंधू जेफ्री जॅक्सन यांनी इंग्रजी भाषेचे सीमित ज्ञान असलेल्या वाचकांसाठी, प्रयोग म्हणून टेहळणी बुरूज नियतकालिकाची इंग्रजीतील सोपी अभ्यास आवृत्ती प्रकाशित करण्याच्या योजनेची घोषणा केली. मग, बंधू स्टिफन लेट यांनी घोषणा केली, की प्रांतीय पर्यवेक्षक व त्यांच्या पत्नींसाठी अमेरिकेत नियमन मंडळाद्वारे मेंढपाळ भेटी आयोजित केल्या जातील. त्यांनी नंतर अशी घोषणा केली, की सेवा प्रशिक्षण प्रशालेला आता अविवाहित बांधवांसाठी बायबल प्रशाला असे संबोधले जाईल. तसेच, ख्रिस्ती जोडप्यांसाठी बायबल प्रशाला म्हटलेली एक नवीन प्रशाला लवकरच सुरू करण्यात येईल अशीही घोषणा करण्यात आली. या प्रशालेत, ख्रिस्ती जोडप्यांना आणखी प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून यहोवाच्या संघटनेच्या कार्याला ते अधिक हातभार लावू शकतील. बंधू लेट यांनी अशी घोषणा केली, की प्रवासी पर्यवेक्षक व त्यांच्या पत्नी आणि शाखा समितीचे सदस्य व त्यांच्या पत्नी यांच्यासाठी असलेली प्रशाला आता वर्षातून दोन वेळा पॅटरसन येथे आयोजित केली जाईल आणि जे आधी या प्रशालेला उपस्थित राहिले होते त्यांना दुसऱ्‍यांदा उपस्थित राहण्याची संधी असेल.

शेवटी, दीर्घ काळापासून नियमन मंडळाचे सदस्य असलेले ९७ वर्षांचे जॉन ई. बार यांनी विनम्र व मनस्वी प्रार्थना केली आणि अशा प्रकारे अतिशय हृदयस्पर्शी रीतीने सभेची सांगता झाली. * सभा संपली तेव्हा, ‘ही खरोखर एक ऐतिहासिक सभा होती’ असेच सर्वांना वाटले.

[तळटीपा]

^ २०११ ईयरबुक ऑफ जेहोवास विटनेसेस पृष्ठे ६२-६३ पाहा.

^ बंधू बार यांचे पृथ्वीवरील जीवनक्रम ४ डिसेंबर २०१० रोजी संपुष्टात आले.

[१९ पानांवरील संक्षिप्त आशय]

उपस्थित असलेल्या सर्वांना मुलाखती खूप आवडल्या

[२० पानांवरील संक्षिप्त आशय]

यहोवाने इथियोपियातील प्रचार कार्य आशीर्वादित केले आहे