त्यांना मशीहा सापडला!
त्यांना मशीहा सापडला!
“मशीहा (म्हणजे ख्रिस्त) आम्हाला सापडला आहे.” —योहा. १:४१.
१. ‘मशीहा आम्हाला सापडला आहे,’ अशी घोषणा अंद्रियाने केली त्याआधी काय घडले?
बाप्तिस्मा देणारा योहान आपल्या दोन शिष्यांसोबत उभा आहे. येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणतो: “हा पाहा, देवाचा कोकरा!” बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाचे दोघे शिष्य, अंद्रिया आणि योहान, लगेच येशूच्या मागे जातात आणि दिवसभर त्याच्यासोबत राहतात. नंतर, अंद्रिया आपल्या भावाला म्हणजे शिमोन पेत्राला भेटून ही आनंददायक घोषणा करतो: “मशीहा (म्हणजे ख्रिस्त) आम्हाला सापडला आहे.” नंतर अंद्रिया, पेत्राला येशूकडे घेऊन जातो.—योहा. १:३५-४१.
२. मशीहासंबंधी असलेल्या भविष्यवाण्यांच्या अभ्यासामुळे आपल्याला कशी मदत होईल?
२ जसजसा काळ सरतो तसतसे अंद्रिया, पेत्र, आणि इतर जण शास्त्रवचनांचा काळजीपूर्वक अभ्यास करतील आणि येशू हाच प्रतिज्ञात मशीहा आहे असे निःसंकोचपणे म्हणतील. आता आपण बायबलमधील आणखी काही भविष्यवाण्यांचा अभ्यास करू, ज्यांवरून येशू हाच मशीहा असल्याचे सिद्ध होते. यामुळे बायबलवरील व मशीहा बनण्यासाठी यहोवाने ज्याला निवडले त्यावरील आपला विश्वास आणखी मजबूत होईल.
‘पाहा! तुझा राजा येत आहे’
३. येशूने एका राजाप्रमाणे जेरूसलेममध्ये प्रवेश केला तेव्हा कोणत्या भविष्यवाण्या पूर्ण झाल्या?
३ मशीहा जेरूसलेममध्ये एका राजाप्रमाणे प्रवेश करणार होता. जखऱ्याची भविष्यवाणी म्हणते: “सीयोनकन्ये, जोराने आनंदाचा गजर कर; यरुशलेमकन्ये, गजर कर; पाहा, तुझा राजा तुजकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे; तो लीन आहे; गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे.” (जख. ९:९) एका बायबल लेखकाने म्हटले: “परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो.” (स्तो. ११८:२६) येशूने जेरूसलेममध्ये प्रवेश केला तेव्हा लोकसमुदायाने मोठ्या आनंदाने गजर केला. येशूने त्यांना असे करण्यास सांगितले नव्हते. पण भविष्यवाणीमध्ये सांगितले होते अगदी तसेच त्यांनी केले. या दृश्याचे वर्णन करणारी बायबलमधील वचने तुम्ही वाचता, तेव्हा अशी कल्पना करा की तुम्ही स्वतः तेथे आहात आणि लोकांचे आनंदी स्वर तुम्ही ऐकत आहात.—मत्तय २१:४-९ वाचा.
४. स्तोत्र ११८:२२, २३ ची पूर्णता कशी झाली?
४ पुष्कळ लोक मशीहा म्हणून येशूचा स्वीकार करणार नव्हते, तरी देवाच्या दृष्टीने तो मौल्यवान आहे. भविष्यवाण्यांत सांगितल्याप्रमाणे, अनेक लोकांनी येशूचा द्वेष केला आणि त्याला तुच्छ लेखले. त्यांच्यामध्ये विश्वासाचा अभाव होता. (यश. ५३:३; मार्क ९:१२) पण बायबल म्हणते: “बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे ही परमेश्वराची करणी आहे; ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे.” (स्तो. ११८:२२, २३) येशूने एकदा आपल्या धार्मिक शत्रूंशी बोलताना या भविष्यवाणीचा उल्लेख केला. आणि पेत्राने म्हटले की ही भविष्यवाणी येशूविषयी व ख्रिस्ती मंडळीविषयी होती. त्याने मंडळीची तुलना एका इमारतीशी केली. एखाद्या इमारतीच्या पायाचा एकच कोनशिला, किंवा मुख्य दगड असतो. त्याच प्रकारे येशू, ख्रिस्ती मंडळीच्या पायाचा मुख्य दगड होता. ज्या लोकांमध्ये विश्वासाचा अभाव होता त्यांनी मशीहा म्हणून येशूचा स्वीकार केला नाही, पण तो “देवाच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान” असा होता.—१ पेत्र २:४-६; मार्क १२:१०, ११; प्रे. कृत्ये ४:८-११.
एक शिष्य त्याचा विश्वासघात करतो आणि इतर जण त्याला सोडून जातात
५, ६. मशीहाच्या विश्वासघाताबद्दल, भविष्यवाण्यांमध्ये काय म्हटले होते? त्या भविष्यवाण्या कशा प्रकारे पूर्ण झाल्या?
५ मशीहाचा मित्र असल्याचे भासवणारा एक जण त्याचा विश्वासघात करणार होता. दाविदाने अशी भविष्यवाणी केली: “जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता, ज्याने माझे अन्न खाल्ले त्यानेहि माझ्यावर लाथ उगारिली आहे.” (स्तो. ४१:९) बायबलच्या काळात, एखाद्या व्यक्तीसोबत जेवणे हे मैत्रीचे कृत्य समजले जायचे. (उत्प. ३१:५४) तर मग, या भविष्यवाणीचा असा अर्थ होता की मशीहाचा मित्र असलेला एक जण काहीतरी भयंकर करणार होता. तो मशीहाचा विश्वासघात करणार होता! आपल्या प्रेषितांशी बोलताना येशूने या व्यक्तीचा उल्लेख केला: “मी तुम्हा सर्वांविषयी बोलत नाही, जे मी निवडले ते मला माहीत आहेत; तरी ‘ज्याने माझे अन्न खाल्ले, त्यानेहि माझ्यावर लाथ उगारली आहे,’ हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे.” (योहा. १३:१८) येशू येथे यहूदा इस्कर्योतविषयी बोलत होता, जो त्याचा अनुयायी व मित्र होता. यहूदाने येशूचा विश्वासघात केला तेव्हा दाविदाने केलेली भविष्यवाणी पूर्ण झाली.
६ मशीहाचा विश्वासघात करणारा ३० रुपयांसाठी, म्हणजे एका दासाच्या किंमतीसाठी त्याचा विश्वासघात करणार होता! मत्तयाने म्हटले, की यहूदाने केवळ ३० रुपयांसाठी येशूचा विश्वासघात केला आणि अशा प्रकारे जखऱ्या ११:१२, १३ मध्ये असलेली भविष्यवाणी पूर्ण झाली. पण मत्तय म्हणतो की यिर्मया संदेष्ट्याद्वारे जे भाकीत करण्यात आले होते ते पूर्ण झाले. खरेतर, ही भविष्यवाणी जखऱ्याच्या पुस्तकात आहे, मग मत्तय यिर्मयाचा उल्लेख का करतो? मत्तयाच्या काळात, बायबल पुस्तकांच्या एका संग्रहात—ज्यात जखऱ्याचे पुस्तकही समाविष्ट होते—यिर्मयाचे पुस्तक बहुधा प्रथम क्रमांकावर असायचे. (लूक २४:४४ पडताळून पाहा.) यहूदाने ते ३० रुपये खर्च केले नाही. त्याने ते मंदिरात फेकून दिले आणि “जाऊन गळफास घेतला.”—मत्त. २६:१४-१६; २७:३-१०.
७. जखऱ्या १३:७ मधील भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण झाली?
७ मशीहाचे शिष्य त्याला सोडून जाणार होते. जखऱ्याने लिहिले: “मेंढपाळावर प्रहार कर म्हणजे मेंढरे विखरतील.” (जख. १३:७) इ.स. ३३ मधील निसान महिन्याच्या १४ तारखेला येशूने आपल्या शिष्यांना असे सांगितले: “तुम्ही सर्व ह्याच रात्री माझ्याविषयी अडखळाल; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दाणादाण होईल.’” आणि अगदी तसेच घडले. मत्तयने म्हटले की येशूचे सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.—मत्त. २६:३१, ५६.
काही जण त्याच्यावर दोष लावणार होते आणि त्याला मारणार होते
८. यशया ५३:८ मधील भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण झाली?
८ लोक मशीहाला न्यायालयात नेणार होते आणि त्याला मृत्यूदंड देणार होते. (यशया ५३:८ वाचा.) निसान १४ च्या सकाळी, यहुदी न्यायसभेचे सर्व सदस्य एकत्र जमले. त्यांनी येशूला दोरांनी बांधून त्याला रोमी सुभेदार पंतय पिलात याच्याकडे नेले. पिलाताने येशूची चौकशी केली आणि येशूने काहीच अपराध केला नसल्याचे सांगितले. पण, पिलाताने येशूला सोडून देण्याविषयी लोकांना विचारले तेव्हा ते ओरडून म्हणाले: “त्याला वधस्तंभावर खिळून टाका.” येशूला सोडण्याऐवजी, पिलाताने बरब्बा नावाच्या एका अपराध्याला सोडावे असे लोकांनी म्हटले. पिलाताला लोकांना खूश करायचे होते, म्हणून त्याने बरब्बाला सोडून दिले. नंतर, त्याने आपल्या शिपायांना येशूला फटके मारण्याची आणि त्याला वधस्तंभावर खिळण्याची आज्ञा दिली.—मार्क १५:१-१५.
९. स्तोत्र ३५:११ ची भविष्यवाणी येशूच्या काळात कशी पूर्ण झाली?
९ मशीहाविरुद्ध खोटे साक्षीदार उभे राहणार होते. दाविदाने लिहिले: “द्रोह करणारे साक्षीदार पुढे येतात आणि जे मला ठाऊक नाही त्याविषयी मला विचारितात.” (स्तो. ३५:११) अगदी या भविष्यवाणीत म्हटल्याप्रमाणे, “मुख्य याजक व संपूर्ण न्यायसभा हे येशूला जिवे मारण्याच्या हेतूने त्याच्याविरुद्ध खोटा पुरावा शोधीत होते.” (मत्त. २६:५९) बायबल म्हणते की खरोखर पुष्कळ लोक त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष देत होते, पण त्यांच्या साक्षीत मेळ बसत नव्हता. (मार्क १४:५६) साक्ष देणारे येशूविरुद्ध खोटे बोलत होते याची त्याच्या शत्रूंना पर्वा नव्हती. त्यांना कसेही करून येशूला ठार मारायचे होते.
१०. यशया ५३:७ मधील भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण झाली?
१० मशीहावर आरोप लावणाऱ्यांना तो उत्तर देणार नव्हता. यशयाने अशी भविष्यवाणी केली: “त्याचे हालहाल केले तरी ते त्याने सोशिले, आपले तोंडसुद्धा उघडिले नाही; वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे, तो गप्प राहिला; त्याने आपले तोंड उघडिले नाही.” (यश. ५३:७) “मुख्य याजक व वडील हे [येशूवर] दोषारोप करीत असता त्याने काहीच उत्तर दिले नाही.” पिलाताने त्याला विचारले: “हे तुझ्याविरुद्ध किती गोष्टींबद्दल साक्ष देतात, हे तुला ऐकू येत नाही काय?” पण येशूने “एकाहि आरोपाला त्याला काही उत्तर दिले नाही; ह्याचे सुभेदाराला फार आश्चर्य वाटले.” (मत्त. २७:१२-१४) येशूने आपल्या शत्रूंचा अपमान केला नाही.—रोम. १२:१७-२१; १ पेत्र २:२३.
११. यशया ५०:६ आणि मीखा ५:१ यांतील भविष्यवाण्या कशा प्रकारे पूर्ण झाल्या?
११ यशयाने भविष्यवाणी केली की ते मशीहाला मारणार होते. यशयाने लिहिले: “मी मारणाऱ्यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणाऱ्यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू यांपासून मी आपले तोंड चुकविले नाही.” (यश. ५०:६) मीखाने अशी भविष्यवाणी केली: “ते इस्राएलाच्या नियंत्याच्या गालावर सोटे मारीत आहेत.” (मीखा ५:१) मार्कने दाखवले की या भविष्यवाण्या येशूविषयी होत्या. त्याने लिहिले: “कित्येक जण त्याच्यावर थुंकू लागले, त्याचे तोंड झाकून व त्याला बुक्क्या मारून म्हणू लागले, आता दाखव आपले अंतर्ज्ञान! आणि कामदारांनी त्याला चपडाका मारून आपल्या ताब्यात घेतले.” मार्कने म्हटले की शिपायांनी “त्याच्या मस्तकावर वेताने मारिले; ते त्याच्यावर थुंकले आणि गुडघे टेकून त्यांनी त्याला नमन केले.” (मार्क १४:६५; १५:१९) अर्थात, येशूला अशी वागणूक देण्याचे काहीच कारण लोकांजवळ नव्हते.
तो मृत्यूपर्यंत देवाला एकनिष्ठ राहिला
१२. स्तोत्र २२:१६ मधील भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण झाली? यशया ५३:१२ मधील भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण झाली?
१२ मशीहाला वधस्तंभावर मारण्यात येणार होते. दाविदाने म्हटले: “दुर्जनांच्या टोळीने मला घेरिले आहे; त्यांनी माझे हातपाय विंधिले आहेत.” (स्तो. २२:१६) ही भविष्यवाणी पूर्ण झाली हे बायबल वाचकांना माहीत आहे आणि याविषयी मार्कनेही आपल्या शुभवर्तमानात सांगितले आहे. मार्कने लिहिले की सकाळी नऊ वाजताच्या सुमारास त्यांनी येशूला वधस्तंभावर खिळले. त्यांनी त्याच्या हातापायांना खिळे ठोकले. (मार्क १५:२५) आणखी एका भविष्यवाणीत म्हटले होते की मशीहा पापी लोकांसोबत मरणार होता. यशयाने लिहिले: “आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यु पावला, त्याने आपणास अपराध्यांत गणू दिले.” (यश. ५३:१२) ही भविष्यवाणी तेव्हा पूर्ण झाली जेव्हा त्यांनी “त्याच्याबरोबर दोन लुटारू, एक उजवीकडे व एक डावीकडे, असे वधस्तंभावर खिळले.”—मत्त. २७:३८.
१३. स्तोत्र २२:७, ८ मधील भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण झाली?
१३ दाविदाने भविष्यवाणी केली की लोक मशीहाचा अपमान करणार होते. (स्तोत्र २२:७, ८ वाचा.) येशू वधस्तंभावर यातना सोसत होता तेव्हा लोकांनी त्याचा अपमान केला. मत्तय आपल्याला सांगतो: “जवळून जाणारे येणारे ‘डोकी डोलवित’ त्याची अशी निंदा करीत होते की, अरे, मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणाऱ्या, तू देवाचा पुत्र असलास तर स्वतःचा बचाव कर आणि वधस्तंभावरून खाली उतर.” मुख्य याजक, शास्त्री, आणि वडीलजनांनी त्याची थट्टा केली व म्हटले: “त्याने दुसऱ्यांना वाचविले; त्याला स्वतःला वाचविता येत नाही; तो इस्राएलाचा राजा आहे; त्याने आता वधस्तंभावरून खाली उतरावे, म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. ‘तो देवावर भरवसा ठेवितो; तो त्याला हवा असेल तर त्याने त्याला’ आता ‘सोडवावे’; कारण मी देवाचा पुत्र आहे, असे तो म्हणत असे.” (मत्त. २७:३९-४३) येशूने यातना सोसल्या, पण तो शांत राहिला आणि तो कधीही अपशब्द बोलला नाही. आपल्याकरता तो सर्वोत्तम उदाहरण आहे.
१४, १५. मशीहाचे कपडे वाटून घेण्यात येतील आणि पिण्यासाठी त्याला आंब देण्यात येईल असे काही भविष्यवाण्यांत म्हटले होते. या भविष्यवाण्या कशा प्रकारे पूर्ण झाल्या?
१४ मशीहाचे कपडे वाटून घेण्यासाठी ते चिठ्ठ्या टाकणार होते. दाविदाने लिहिले: “ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात आणि माझ्या झग्यावर चिठ्ठ्या टाकितात.” (स्तो. २२:१८) नेमके तसेच घडले. बायबल म्हणते की रोमी शिपायांनी येशूला वधस्तंभावर मारल्यावर, त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याचा अंगरखा वाटून घेतला.—मत्त. २७:३५; योहान १९:२३, २४ वाचा.
१५ पिण्यासाठी ते मशीहाला आंब व पित्तमिश्रित द्राक्षारस देणार होते. भविष्यवाणी म्हणते: “त्यांनी मला अन्न म्हणून विष खावयास दिले, तहान भागविण्यास मला आंब दिली.” (स्तो. ६९:२१) आपल्याला माहीत आहे की ही भविष्यवाणी पूर्ण झाली, कारण मत्तय आपल्याला असे सांगतो: “त्यांनी त्याला पित्तमिश्रित द्राक्षारस प्यावयास दिला, परंतु तो चाखून पाहिल्यावर तो पिईना.” मग, “त्यांच्यातून एकाने लागलेच धावत जाऊन स्पंज घेतला आणि तो आंबेने भरून बोरूच्या टोकावर ठेवून त्यास चोखावयास दिला.”—मत्त. २७:३४, ४८.
१६. स्तोत्र २२:१ मधील भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण झाली?
१६ देवाने मशीहाला सोडून दिले आहे असे वाटणार होते. (स्तोत्र २२:१ वाचा.) मार्क आपल्याला सांगतो की नवव्या तासाला येशू मोठ्या आवाजात असे म्हणाला: “‘एलोई, एलाई, लमा सबखथनी?’ म्हणजे ‘माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला?’” (मार्क १५:३४) देवाने आपल्याला सोडले असे येशूने म्हटले, तेव्हा आता त्याचा आपल्या पित्यावर विश्वास राहिला नव्हता असा त्याचा अर्थ नव्हता. त्याला माहीत होते की त्याच्या मृत्यूच्या वेळी देव त्याच्या शत्रूंपासून त्याचे संरक्षण करणार नव्हता. येशू नेहमी देवाला एकनिष्ठ राहील हे दाखवण्याची ही एक संधी होती. येशूने मोठ्या आवाजात जेव्हा “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला?” असे म्हटले तेव्हा स्तोत्र २२:१ मधील भविष्यवाणी पूर्ण झाली.
१७. जखऱ्या १२:१० आणि स्तोत्र ३४:२० या वचनांमधील भविष्यवाण्या कशा प्रकारे पूर्ण झाल्या?
१७ मशीहाचे शत्रू त्याला भोसकणार होते. ते त्याची हाडे मोडणार नव्हते. जखऱ्याने म्हटले की जेरूसलेमच्या लोकांनी ज्याला विंधिले होते ते त्याच्याकडे पाहतील. (जख. १२:१०) आणि स्तोत्र ३४:२० म्हणते की “त्याची सर्व हाडे संभाळितो; त्यातले एकहि मोडत नाही.” प्रेषित योहानाने म्हटले की या भविष्यवाण्या पूर्ण झाल्या. त्याने लिहिले: “शिपायांतील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला; आणि लागलेच रक्त व पाणी बाहेर निघाले. ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे, त्याची साक्ष खरी आहे.” योहानाने असेही लिहिले: “‘त्याचे हाड मोडणार नाही’ हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी घडल्या. शिवाय दुसऱ्याहि शास्त्रलेखात असे म्हटले आहे की, ‘ज्याला त्यांनी विंधिले त्याच्याकडे ते पाहतील.’”—योहा. १९:३३-३७.
१८. भविष्यवाणी म्हणते की येशूला श्रीमंत लोकांच्या कबरेत ठेवले जाणार होते. ही भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण झाली?
१८ मशीहाची कबर श्रीमंतांच्या कबरांमध्ये असणार होती. (यशया ५३:५, ८, ९ वाचा.) निसान १४ च्या संध्याकाळी ‘अरिमथाईतील योसेफ नावाच्या एका धनवान मनुष्याने’ पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. योसेफ येशूला कबरेत ठेवू इच्छित होता, आणि पिलाताने त्याची विनंती मान्य केली. मत्तय आपल्याला सांगतो: “योसेफाने ते शरीर घेऊन तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळले; ते त्याने खडकात खोदलेल्या आपल्या नव्या कबरेत ठेवले, एक मोठी धोंड लोटून ती कबरेच्या दाराला लावली आणि तो निघून गेला.”—मत्त. २७:५७-६०.
आपल्या राजाची अर्थात मशीहाची स्तुती करा!
१९. स्तोत्र १६:१० मधील भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण झाली?
१९ यहोवा मशीहाला पुनरुत्थित करणार होता. दाविदाने लिहिले की यहोवा मशीहाला अधोलोकात, म्हणजे कबरेत राहू देणार नव्हता. (स्तो. १६:१०) निसान १६ ला काही स्त्रिया येशूला ज्या कबरेत ठेवले होते तेथे आल्या. एका स्वर्गदूताला कबरेत बसलेला पाहून त्यांना किती आश्चर्य वाटले असेल याची कल्पना करा! त्या स्वर्गदूताने स्त्रियांना म्हटले: “चकित होऊ नका; वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेथकराचा शोध तुम्ही करीत आहा. तो उठला आहे, तो येथे नाही; त्याला ठेविले होते ती ही जागा पाहा.” (मार्क १६:६) नंतर, इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी, प्रेषित पेत्राने जेरूसलेममध्ये लोकांच्या एका मोठ्या समूहाशी बोलताना स्तोत्र १६ मधील दाविदाच्या भविष्यवाणीचा उल्लेख केला. त्याने दाविदाविषयी म्हटले: “पूर्वज्ञान असल्यामुळे [दावीद] ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की, ‘त्याला अधोलोकात सोडून दिले नाही’ व त्याच्या देहाला ‘कुजण्याचा अनुभव आला नाही’” (प्रे. कृत्ये २:२९-३१) देवाने आपल्या प्रिय पुत्राचे शरीर कुजू दिले नाही. याहून विलक्षण असे आणखी काहीतरी यहोवाने केले. त्याने येशूला स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थित केले!—१ पेत्र ३:१८.
२०. मशीहाच्या शासनाबद्दल भविष्यवाण्या काय म्हणतात?
२० येशू आपला पुत्र असल्याचे देव घोषित करणार होता. (स्तोत्र २:७; मत्तय ३:१७ वाचा.) येशूने जेरूसलेममध्ये प्रवेश केला तेव्हा लोकसमुदायाने त्याची आणि त्याच्या राज्याची स्तुती केली. आज आपणदेखील येशूची स्तुती करतो. त्याच्याबद्दल व त्याच्या राज्याबद्दल इतरांना सांगण्यास आपल्याला आनंद होतो. (मार्क ११:७-१०) लवकरच ख्रिस्त, “सत्य, नम्रता व न्यायपरायणता ह्यांच्या प्रीत्यर्थ” स्वारी करेल तेव्हा तो त्याच्या शत्रूंचा नाश करेल. (स्तो. २:८, ९; ४५:१-६) मग तो संपूर्ण पृथ्वीवर राज्य करेल. सर्व जण शांतीत जीवन जगतील आणि सर्वांच्या गरजा तृप्त केल्या जातील. (स्तो. ७२:१, ३, १२, १६; यश. ९:६, ७) यहोवाचा अतिप्रिय पुत्र, येशू ख्रिस्त, राजा या नात्याने याआधीच स्वर्गात राज्य करत आहे. खरोखर, यहोवाचे साक्षीदार असणे आणि या सत्यांबद्दल इतरांना सांगणे ही मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे!
तुमचे उत्तर काय आहे?
• येशूचा विश्वासघात केला जाईल व शिष्य त्याला सोडून जातील या भविष्यवाण्या कशा प्रकारे पूर्ण झाल्या?
• येशूच्या मृत्यूबद्दल असलेल्या भविष्यवाण्या कशा प्रकारे पूर्ण झाल्या?
• येशू हाच प्रतिज्ञात मशीहा आहे असा विश्वास तुम्ही का बाळगता?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१३ पानांवरील चित्र]
येशूने राजा या नात्याने जेरूसलेममध्ये प्रवेश केला तेव्हा कोणत्या भविष्यवाण्या पूर्ण झाल्या?
[१५ पानांवरील चित्र]
येशू आपल्या पापांकरता मरण पावला, पण आता तो एक राजा या नात्याने राज्य करतो