व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आध्यात्मिक प्रगती करण्यास पुरुषांना मदत करा

आध्यात्मिक प्रगती करण्यास पुरुषांना मदत करा

आध्यात्मिक प्रगती करण्यास पुरुषांना मदत करा

“येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.”—लूक ५:१०.

१, २. (क) येशूने केलेल्या प्रचाराला पुरुषांनी कसा प्रतिसाद दिला? (ख) या लेखात आपण कशाचे परीक्षण करणार आहोत?

 गालीलमध्ये प्रचाराच्या दौऱ्‍यावर असताना येशू व त्याचे शिष्य, एकांत स्थळी जाण्याकरता एका नावेत बसले. पण लोक मात्र त्यांच्या मागेमागे पायी आले. “सुमारे पाच हजार पुरुष . . . शिवाय स्त्रिया व मुले” इतके लोक आले होते. (मत्त. १४:२१) दुसऱ्‍या एका प्रसंगी, येशूकरवी आपले रोग बरे करण्याकरता व त्याचा उपदेश ऐकण्याकरता आणखी एक मोठा समुदाय त्याच्याजवळ आला. यात, “चार हजार पुरुष . . . शिवाय स्त्रिया व मुले” होती. (मत्त. १५:३८) या वचनांवरून कळते, की येशूकडे येणाऱ्‍यांमध्ये पुष्कळ पुरुषही होते आणि त्यांनी येशू शिकवत असलेल्या गोष्टींमध्ये आवड दाखवली. खरेतर, येशू आणखी पुष्कळांची अपेक्षा करत होता. कारण, त्याने चमत्कारिकपणे मासे मिळवून दिल्यानंतर आपला शिष्य शिमोन याला असे म्हटले: “येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.” (लूक ५:१०) त्याच्या शिष्यांनी मानवजातीच्या समुद्रात आपले जाळे टाकायचे होते आणि या जाळ्यात पुष्कळ पुरुष सापडतील, अशी अपेक्षा करायची होती.

आज आपण लोकांना बायबलचा संदेश सांगतो तेव्हा पुष्कळ पुरुष हा संदेश स्वीकारतात. (लूक ११:२८) पण त्यापैकी अनेक पुरुष, हवी तशी आध्यात्मिक प्रगती करत नाहीत. अशांना आपण कशी मदत करू शकतो? केवळ पुरुषांना शोधण्यासाठी येशूने कुठलीही एक खास सेवा सुरू केली नसली, तरी त्याच्या दिवसांतील पुरुषांसमोर असलेल्या चिंतांबद्दल तो बोलला. त्याच्या उदाहरणाचा उपयोग करून आपण, आज पुरुषांसमोर असलेल्या तीन चिंतांचा सामना करायला त्यांना कशी मदत करू शकतो त्याचे परीक्षण करून बघू या. या चिंता पुढील प्रमाणे आहेत: (१) उदरनिर्वाह कसा करायचा, (२) लोकांची भीती आणि (३) कमीपणाची भावना.

उदरनिर्वाह कसा करायचा

३, ४. (क) आज बहुतेक पुरुषांना कशाची अधिक चिंता लागली आहे? (ख) काही पुरुष आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य देण्याऐवजी पैसा कमवण्याला जास्त महत्त्व का देतात?

एकदा एक शास्त्री येशूला म्हणाला: “गुरुजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्या मागे येईन.” पण येशूने जेव्हा त्याला असे सांगितले, की “मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही,” तेव्हा त्याची द्विधा मनःस्थिती झाली. आपल्याला नंतरचे भोजन कोठून मिळेल किंवा आपल्याला राहायला जागा असेल का, ही अनिश्‍चितता त्याला तितकीशी पटलेली दिसत नाही, कारण तो येशूचा अनुयायी बनल्याचा बायबलमध्ये उल्लेख नाही.—मत्त. ८:१९, २०.

आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य देण्याऐवजी, आधी आपण आर्थिक जम बसवला पाहिजे, अशी पुरुषांची सहसा विचारसरणी असते. उच्च शिक्षण घेऊन लठ्ठ पगाराची नोकरी मिळवणे, याला बहुतेक जण सर्वाधिक महत्त्व देतात. त्यांच्या मते, बायबलचा अभ्यास केल्याने व देवाबरोबर जवळचा नातेसंबंध जोडल्याने मिळणाऱ्‍या कोणत्याही फायद्यापेक्षा, आत्ता पैसा कमवणे जास्त गरजेचे व रास्त आहे. बायबलच्या शिकवणी कदाचित त्यांना आवडत असतील, पण “प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह” यांमुळे त्यांची आहे ती आवडही कमी होते. (मार्क ४:१८, १९) त्यामुळे येशूने आपल्या शिष्यांना, जीवनात कोणत्या गोष्टींना अधिक प्राधान्य द्यायचे हे ठरवायला कशी मदत केली ते पाहा.

५, ६. प्रचार कार्यात भाग घेणे व उदरनिर्वाह करणे यांपैकी कोणत्या गोष्टीला अधिक प्राधान्य द्यायचे हे अंद्रिया, पेत्र, याकोब आणि योहान यांना कसे ठरवता आले?

अंद्रिया आणि त्याचा भाऊ शिमोन पेत्र हे दोघे मिळून मासेमारीचा व्यवसाय करत होते. योहान, त्याचा भाऊ याकोब आणि त्यांचे वडील जब्दी यांचादेखील तोच व्यवसाय होता. त्यांचा व्यवसाय इतका चांगला चालला होता, की त्यांनी काही लोकांना कामाला ठेवले होते. (मार्क १:१६-२०) अंद्रिया व योहान यांनी जेव्हा बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाकडून येशूबद्दल ऐकले तेव्हा, आपल्याला मशीहा सापडला आहे, याची त्यांना खात्री पटली. अंद्रियाने ही बातमी आपला भाऊ शिमोन पेत्र याला सांगितली आणि योहानानेसुद्धा आपला भाऊ याकोब याला सांगितले असावे. (योहा. १:२९, ३५-४१) पुढील काही महिने हे चौघेही जेव्हा येशू गालील, यहुदीया आणि शोमरोन येथे प्रचार करत होता तेव्हा त्याच्यासोबत होते. यानंतर चारही शिष्य मासेमारीचा आपला व्यवसाय करायला पुन्हा घरी आले. आध्यात्मिक गोष्टींत त्यांना आवड होती पण प्रचार कार्याला जीवनात प्राधान्य देण्याचा त्यांचा मुळीच विचार नव्हता.

काही काळानंतर येशूने पेत्र व अंद्रिया यांना त्याच्या मागे येऊन, “माणसे धरणारे” बनण्याचे आमंत्रण दिले. या दोघांनी या आमंत्रणाला कसा प्रतिसाद दिला? “लागलेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले.” याकोब व योहान यांच्या बाबतीतही असेच घडले. “लागलेच ते तारू व आपला बाप ह्‍यांना मागे सोडून त्याला अनुसरले.” (मत्त. ४:१८-२२) पूर्ण वेळेची सेवा करण्याची निवड या चौघांनी इतक्या लवकर कशी केली? त्यांचा निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घेतलेला किंवा तडकाफडकी होता का? मुळीच नाही! कारण, येशूबरोबरच्या सहवासात त्यांनी येशूचे बोलणे ऐकले होते, त्याला चमत्कार करताना पाहिले होते, धार्मिक गोष्टींबद्दल त्याला किती आवेश होता आणि त्याच्या प्रचार कार्याला लोक कसा प्रतिसाद देत होते, हेही त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते. त्यामुळे यहोवावरचा त्यांचा विश्‍वास आणि भरवसा आणखी बळकट झाला!

७. आपल्या लोकांच्या गरजा पुरवण्याचे सामर्थ्य यहोवाजवळ आहे, यावर भरवसा ठेवण्यास आपण आपल्या बायबल विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मदत करू शकतो?

येशूचे अनुकरण करून आपण आपल्या बायबल विद्यार्थ्यांना यहोवावर विश्‍वास ठेवण्यास कशी मदत करू शकतो? (नीति. ३:५, ६) आपण त्यांना जसे शिकवू त्यावर हे बहुतांशी अवलंबून आहे. देवाच्या राज्याशी संबंधित असलेल्या गोष्टींना आपण जीवनात प्रथम स्थान दिले तर तो आपल्याला विपुल आशीर्वाद देईल, असे त्याने वचन दिले आहे यावर आपण भर देऊ शकतो. (मलाखी ३:१०; मत्तय ६:३३ वाचा.) यहोवा आपल्या लोकांच्या गरजा कशा पुरवतो यावर जोर देण्याकरता आपण बायबलमधील वेगवेगळी वचने दाखवू शकतो; पण, याबाबतीत आपले स्वतःचे उदाहरण जर आपण विद्यार्थ्यासमोर ठेवले तर याचा त्याच्यावर जास्त प्रभाव पडू शकतो. आपल्याला आलेले अनुभव त्याला सांगितल्यास, यहोवावर निर्भर राहण्यास तो शिकेल. आपल्या प्रकाशनांमध्ये आलेले प्रोत्साहनदायक अनुभवदेखील आपण त्याला सांगू शकतो. *

८. (क) “परमेश्‍वर किती चांगला आहे ह्‍याचा अनुभव” बायबल विद्यार्थ्याने का घेतला पाहिजे? (ख) आपण आपल्या बायबल विद्यार्थ्याला, यहोवाचे चांगुलपण स्वतः अनुभवण्यास कशी मदत करू शकतो?

इतरांनी यहोवाचे आशीर्वाद कसे अनुभवले केवळ यांबद्दल वाचल्याने किंवा ऐकल्याने विश्‍वास मजबूत होत नाही, तर त्यासाठी आणखीही काहीतरी करावे लागते. बायबल विद्यार्थ्याला स्वतः यहोवाचे चांगुलपण अनुभवावे लागेल. स्तोत्रकर्त्याने असे गायिले: “परमेश्‍वर किती चांगला आहे ह्‍याचा अनुभव घेऊन पाहा; जो त्याच्यावर भाव ठेवितो तो पुरुष धन्य!” (स्तो. ३४:८) यहोवा चांगला आहे हे अनुभवण्यास आपण विद्यार्थ्याला कशी मदत करू शकतो? समजा आपल्या बायबल विद्यार्थ्याला, पैशाची चणचण जाणवत असेल; आणि त्यासोबतच तो, धूम्रपान, जुगार किंवा दारूबाजी यांसारख्या एखाद्या वाईट सवयीवर मात करायचादेखील प्रयत्न करत असेल. (नीति. २३:२०, २१; २ करिंथ. ७:१; १ तीम. ६:१०) वाईट सवयीवर मात करण्याकरता यहोवाला मदतीसाठी प्रार्थना करण्यास शिकवल्याने आपण त्याला यहोवाच्या चांगुलपणाचा अनुभव घेण्यास मदत करू शकतो. आठवड्याच्या बायबल अभ्यासासाठी तसेच ख्रिस्ती सभांची तयारी करून तेथे उपस्थित राहण्यासाठी वेळ काढण्याचे आपण त्याला उत्तेजन देऊ शकतो. अशा प्रकारे आध्यात्मिक गोष्टींना प्रथम स्थान दिल्याने त्याला काय फायदा होईल यावर विचार करण्याचे उत्तेजन आपण त्याला देऊ शकतो. आणि अशा प्रकारे, आपल्या प्रयत्नांना यहोवा आशीर्वादित करत आहे हे जेव्हा तो स्वतः अनुभवेल तेव्हा यहोवावरचा त्याचा विश्‍वास आणखी मजबूत होईल!

लोकांची भीती

९, १०. (क) निकदेम आणि अरिमथाईचा योसेफ यांना येशू सांगत असलेल्या गोष्टी आवडायच्या हे त्यांनी कोणाला बोलून का दाखवले नाही? (ख) आज काही पुरुष ख्रिस्ताचे अनुकरण करण्यास का कचरतात?

साथीदारांच्या दबावामुळे काही पुरुष ख्रिस्ताचे पूर्णपणे अनुकरण करण्यास कचरतील. निकदेम आणि अरिमथाईचा योसेफ यांना येशू सांगत असलेल्या गोष्टी आवडायच्या पण तसे त्यांनी कधी कोणाला बोलून दाखवले नाही, कारण जर इतर यहुद्यांना ते समजले तर ते काहीही बोलतील किंवा करतील, अशी भीती त्यांना वाटत होती. (योहा. ३:१, २; १९:३८) त्यांच्या मनातील ही भीती काल्पनिक नव्हती. धार्मिक नेत्यांचा येशूबद्दलचा राग इतका वाढला होता, की कोणी येशूवर विश्‍वास ठेवत असल्याचे कबूल केल्यास ते त्याला सभास्थानातून काढून टाकत असत.—योहा. ९:२२.

१० आज काही ठिकाणी एखाद्या पुरुषाने देव, बायबल किंवा धर्म यांत जरा जास्त आस्था घेतली की त्याच्याबरोबर काम करणारे लोक, त्याचे मित्र किंवा नातेवाईक लगेच त्याला त्रास देऊ लागतात. इतर ठिकाणी तर धर्म बदलण्याविषयी बोलणेसुद्धा घातक ठरू शकते. आणि एखादा पुरुष जर लष्करात, राजकारणात किंवा सामाजिक कार्यात सक्रिय असेल तर त्याच्यावर साथीदारांचा दबाव आणखी जास्त असू शकतो. जसे की, जर्मनीतील एका मनुष्याने असे कबूल केले: “तुम्ही साक्षीदार लोक बायबलमधून जे काही सांगता ते अगदी खरं आहे. पण मी जर आज साक्षीदार झालो तर उद्या सर्वांना त्याबद्दल समजेल. मग, कामाच्या ठिकाणी, शेजारीपाजारी, क्लबमध्ये लोक माझ्याबद्दल आणि माझ्या कुटुंबाबद्दल, आम्ही नेमके कोण आहोत असा विचार करतील? लोकांनी आमच्याबद्दल असं उलट-सुलट बोललेलं मला सहन झालं नसतं.”

११. लोकांच्या भीतीवर मात करण्यासाठी येशूने आपल्या शिष्यांची मानसिक तयारी कशी केली?

११ येशूचे प्रेषित भित्रट नव्हते तरीसुद्धा त्यांच्याही मनात लोकांबद्दलचे भय होते. (मार्क १४:५०, ६६-७२) लोकांचा त्यांच्यावर जबरदस्त दबाव असतानाही आध्यात्मिक प्रगती करण्यास येशूने त्यांना कशी मदत केली? पुढे होणाऱ्‍या छळाला तोंड देण्याकरता येशू त्यांची मानसिक तयारी करत होता. त्याने म्हटले: “मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हास वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य.” (लूक ६:२२) लोक त्यांची टीका करतील, हे त्यांनी अपेक्षिले पाहिजे असा येशूने त्यांना इशारा दिला. आणि ही टीका “मनुष्याच्या पुत्रामुळे” असेल. पण येशूने त्यांना अशीही खात्री दिली, की जोपर्यंत ते मदतीसाठी व शक्‍तीसाठी देवावर विसंबून राहतील तोपर्यंत देव त्यांच्या पाठीशी राहील. (लूक १२:४-१२) शिवाय येशूने नवीन लोकांना आपल्या शिष्यांबरोबर संगती करण्याचे व त्यांच्याशी मैत्री करण्याचेदेखील आमंत्रण दिले.—मार्क १०:२९, ३०.

१२. आपण आपल्या बायबल विद्यार्थ्यांना कोणकोणत्या मार्गांनी, त्यांच्या मनात असलेल्या लोकांच्या भीतीवर मात करायला मदत करू शकतो?

१२ आपणही आपल्या बायबल विद्यार्थ्यांना, त्यांच्या मनात असलेल्या लोकांच्या भीतीवर मात करायला मदत केली पाहिजे. आपल्यासमोर अमुक एक समस्या येण्याची आपण अपेक्षा करत असतो तेव्हा तिचा सामना करायला आपण सहसा सज्ज असतो. (योहा. १५:१९) जसे की, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला साधी-सोपी, मनाला पटतील अशी बायबलवर आधारित उत्तरे तयार करायला मदत करू शकता; म्हणजे, त्याच्याबरोबर काम करणारे सहकर्मी किंवा इतर जण जेव्हा त्याला प्रश्‍न विचारतील किंवा आक्षेप घेतील तेव्हा तो ही उत्तरे देऊ शकेल. आपल्याबरोबर तर त्याची मैत्री असेलच पण त्याव्यतिरिक्‍त आपण मंडळीतल्या इतर बंधुभगिनींशीही त्याची ओळख करून देऊ शकतो; खासकरून अशा लोकांशी ज्यांची परिस्थिती त्याच्यासारखीच आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण त्याला अगदी मनापासून व सातत्याने यहोवाला प्रार्थना करण्यास शिकवू शकतो. यामुळे तो स्वतः यहोवाच्या जवळ जाईल आणि यहोवाला त्याचे आश्रयस्थान व दुर्ग बनवेल.—स्तोत्र ९४:२१-२३; याकोब ४:८ वाचा.

कमीपणाच्या भावना

१३. कमीपणाच्या भावनांमुळे काही जण कशा प्रकारे आध्यात्मिक गोष्टीत भाग घेण्यास कचरतील?

१३ नीट वाचता येत नसल्यामुळे, आपले बोलणे नीट व्यक्‍त करता येत नसल्यामुळे किंवा लाजाळू स्वभावामुळे काही पुरुष आध्यात्मिक गोष्टींत प्रगती करत नाहीत. काही पुरुषांना चार लोकांत आपला दृष्टिकोन किंवा आपले विचार व्यक्‍त करता येत नाहीत. अभ्यास करण्याच्या, ख्रिस्ती सभांमध्ये उत्तरे देण्याच्या किंवा आपल्या विश्‍वासाबद्दल इतरांना सांगण्याच्या नुसत्या विचारानेसुद्धा त्यांच्या अंगाचे पाणी पाणी होते. एका ख्रिस्ती बांधवाने क्षेत्र सेवेबद्दलच्या त्यांच्या लहानपणाच्या आठवणींना उजाळा देत म्हटले: “मी लहान होतो तेव्हा, दारापर्यंत जायचो, दारावरची बेल वाजवल्यासारखं करायचो आणि गपचूप मागं चालत यायचो. मला कुणी बघू नये किंवा ऐकू नये, असं मला वाटायचं. . . . घरोघरी क्षेत्र सेवेला जायच्या विचारानंच माझ्या अंगावर शहारे यायचे.”

१४. भुताने पछाडलेल्या एका मुलाला येशूचे शिष्य बरे का करू शकले नाहीत?

१४ भुताने पछाडलेल्या एका मुलाला एकदा येशूचे शिष्य बरे करू शकले नाहीत तेव्हा त्यांचा आत्मविश्‍वास किती कमी झाला असावा याचा विचार करा. या मुलाचा बाप येशूजवळ येऊन त्याला म्हणाला: “[माझा मुलगा] फेफरेकरी असून त्याचे हाल होतात; तो वारंवार विस्तवात पडतो व वारंवार पाण्यात पडतो. मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणिले, परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही.” मग येशूने त्याच्या अंगातील भूत बाहेर काढून या मुलाला बरे केले. नंतर येशूच्या शिष्यांनी येशूला विचारले: “आम्हाला ते का काढता आले नाही?” येशूने त्यांना उत्तर दिले: “तुमच्या अल्पविश्‍वासामुळे; कारण मी तुम्हास खचित सांगतो की, जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्‍वास असला तर ह्‍या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल; तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही.” (मत्त. १७:१४-२०) डोंगरासारखे अडथळे पार करण्यासाठी यहोवावर विश्‍वास असणे अतिशय महत्त्वाचे आहे. पण याच गोष्टीकडे एखाद्याने दुर्लक्ष केले व तो स्वतःच्या क्षमतांचा जास्त विचार करत असला तर काय होऊ शकते? अपयशी झाल्यामुळे तो त्याचा आत्मविश्‍वास गमावून बसू शकतो.

१५, १६. कमीपणाच्या भावनांवर मात करायला आपण आपल्या बायबल विद्यार्थ्याला कशा प्रकारे मदत करू शकतो?

१५ कमीपणाच्या भावना असलेल्या व्यक्‍तीला उत्तेजन देण्याचा एक सर्वोत्तम मार्ग म्हणजे तिला, स्वतःऐवजी यहोवावर आपले लक्ष केंद्रित करण्यास मदत करणे. पेत्राने लिहिले: “देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्‍यासाठी की, त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.” (१ पेत्र ५:६, ७) यासाठी, आपल्या बायबल विद्यार्थ्याला आध्यात्मिक मनोवृत्तीचे बनण्यास आपल्याला मदत करावी लागेल. आध्यात्मिक मनोवृत्ती असलेली व्यक्‍ती आध्यात्मिक गोष्टींना खूप मौल्यवान समजते. तिचे देवाच्या वचनावर प्रेम असते व ती आपल्या जीवनात “आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणारे फळ” दाखवते. (गलती. ५:२२, २३) ती लहानसहान गोष्टींतही प्रार्थना करते. (फिलिप्पै. ४:६, ७) शिवाय, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याकरता किंवा कोणतीही नेमणूक पार पाडण्याकरता लागणारे धैर्य व शक्‍ती मिळवण्यासाठी ती देवाकडे वळते.—२ तीमथ्य १:७, ८ वाचा.

१६ काही विद्यार्थ्यांना, वाचन व संभाषण करण्यासाठी व्यावहारिक मदतीची गरज भासू शकते. काहींना, यहोवाबद्दल माहीत होण्यापूर्वी त्यांनी केलेल्या वाईट कामांमुळे आपण त्याची सेवा करण्यास पात्र नाही असे वाटेल. अशा विद्यार्थ्यांना फक्‍त आपल्या प्रेमळ, सहनशील साहाय्याची गरज असेल. “निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर दुखणाइतांना आहे,” असे येशूने म्हटले होते.—मत्त. ९:१२.

अधिकाधिक पुरुषांना ‘धरा’

१७, १८. (क) क्षेत्र सेवेत आपण होता होईल तितक्या पुरुषमंडळीला कशा प्रकारे भेटू शकतो? (ख) पुढील लेखात आपण कोणत्या विषयाचा अभ्यास करणार आहोत?

१७ केवळ बायबलमध्येच असलेला व अगदी मनापासून संतृप्ती देणारा संदेश अधिकाधिक पुरुष स्वीकारतील, अशी आपली सदिच्छा आहे. (२ तीम. ३:१६, १७) तेव्हा क्षेत्र सेवेत होता होईल तितक्या पुरुषांना आपण कसे भेटू शकतो? संध्याकाळच्या वेळी, शनिवार-रविवारच्या दुपारच्या वेळी किंवा जास्तीत जास्त पुरुषमंडळी घरी असते अशा सुटीच्या दिवशी साक्षकार्यात जास्त भाग घेण्याद्वारे आपण होता होईल तितक्या पुरुषांना भेटू शकतो. घरोघरचे कार्य करत असताना शक्य असल्यास, घरातल्या पुरुषाबरोबर बोलता येईल का, असे आपण विचारू शकतो. योग्य असते तेव्हा पुरुष सहकर्मींना आपण अनौपचारिक साक्ष देऊ शकतो आणि मंडळीतल्या अशा बहिणींच्या पतींना भेटू शकतो जे सत्यात नाहीत.

१८ प्रचार कार्यात भेटणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीला आपण जेव्हा बायबलमधील संदेश सांगतो तेव्हा कृतज्ञ मनोवृत्तीचे लोक आपल्याला चांगला प्रतिसाद देतील याची खात्री बाळगू शकतो. सत्यामध्ये खरी आवड दाखवणाऱ्‍यांना आपण धीराने मदत करू या. पण, मंडळीतल्या बाप्तिस्मा घेतलेल्या पुरुषांना आपण देवाच्या संस्थेत जबाबदाऱ्‍या सांभाळण्यासाठी पुढे येऊन त्याच्या पात्रतेचे होण्यास कशी मदत करू शकतो? पुढील लेखात या प्रश्‍नाची चर्चा केली जाईल.

[तळटीप]

^ टेहळणी बुरूजमध्ये छापून आलेल्या जीवनकथा पाहा.

तुमचे उत्तर काय असेल?

• आध्यात्मिक गोष्टींना जीवनात प्रथम स्थान देण्यास पुरुषांना कशा प्रकारे मदत करता येईल?

• साथीदारांच्या किंवा मित्रांच्या दबावाचा सामना करण्यास आपण बायबल विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मदत करू शकतो?

• कोणत्या गोष्टींमुळे काहींना कमीपणाच्या भावनांवर मात करायला मदत मिळू शकेल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२५ पानांवरील चित्र]

पुरुषांना सुवार्ता सांगण्याकरता तुम्ही संधी बनवता का?

[२६ पानांवरील चित्र]

परीक्षांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही तुमच्या बायबल विद्यार्थ्यांची मानसिक तयारी कशी करू शकता?