जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी पुढे येण्याचे इतरांना प्रशिक्षण द्या
जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी पुढे येण्याचे इतरांना प्रशिक्षण द्या
“ज्याला पूर्ण प्रशिक्षण दिले जाते तो आपल्या गुरूसारखा होतो.”—लूक ६:४०, NW.
१. येशूने पृथ्वीवरील त्याच्या सेवेदरम्यान एका मोठ्या मंडळीचा पाया कसा घातला?
प्रेषित योहानाने आपल्या शुभवर्तमान अहवालाच्या शेवटी असे लिहिले: “येशूने केलेली दुसरीहि पुष्कळ कृत्ये आहेत, ती सर्व एकएक लिहिली तर लिहिलेली पुस्तके ह्या जगात मावणार नाहीत, असे मला वाटते.” (योहा. २१:२५) येशू पृथ्वीवर अल्प काळासाठी होता. पण या कमी वेळात त्याने सेवेत खूप कष्ट घेतले. या कमी वेळात त्याला अशा पुरुषांना शोधून प्रशिक्षित करायचे होते, जे तो स्वर्गात परतल्यावर पृथ्वीवर त्याने सुरू केलेले काम पुढे चालू ठेवणार होते. इ.स. ३३ मध्ये त्याने फक्त एका लहानशा गटाला प्रशिक्षित केले. पण या लहानशा गटाची पाहता पाहता एक मोठी मंडळी बनणार होती. आणि या मंडळीतील प्रचारकांची संख्या हजारोंच्या घरात जाणार होती.—प्रे. कृत्ये २:४१, ४२; ४:४; ६:७.
२, ३. (क) बाप्तिस्मा घेतलेल्या पुरुषांनी जबाबदाऱ्या सांभाळण्यास पुढे येण्याची आता नितांत गरज का आहे? (ख) या लेखात कोणत्या गोष्टींवर चर्चा केली जाईल?
२ आज संपूर्ण जगभरात, १,००,००० पेक्षा अधिक मंडळ्या आहेत. आणि या मंडळ्यांमध्ये सत्तर लाखांपेक्षा अधिक राज्य प्रचारक आहेत. त्यामुळे, आध्यात्मिक गोष्टींमध्ये पुढाकार घेण्यासाठी पुरुषांची गरज आहे. जसे की, मंडळ्यांमध्ये ख्रिस्ती वडिलांची अतिशय गरज आहे. हा विशेषाधिकार सांभाळण्यासाठी पुढे येत असलेल्या बांधवांची नक्कीच प्रशंसा केली पाहिजे कारण ते ‘चांगल्या कामाची आकांक्षा धरत’ आहेत.—१ तीम. ३:१.
३ परंतु, मंडळीमधील विशेषाधिकारांसाठी, हे पुरुष आपोआप पात्र ठरत नाहीत. फक्त त्यांचे शिक्षण किंवा जीवनातील अनुभव त्यांना या कामासाठी तयार करत नाही. तर, यासाठी त्यांच्याजवळ आध्यात्मिक योग्यता असली पाहिजे. त्यांच्या अंगी कदाचित अनेक कौशल्ये असतील किंवा त्यांनी अनेक गोष्टी साध्य केल्या असतील, पण याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे मंडळीत जबाबदारी मिळण्याकरता त्यांच्याजवळ आध्यात्मिक गुण असले पाहिजेत. मग मंडळीतल्या पुरुषांना या पात्रतेचे होण्यास कशा प्रकारे मदत करता येईल? येशूने म्हटले: “ज्याला पूर्ण प्रशिक्षण दिले जाते तो आपल्या गुरूसारखा होतो.” (लूक ६:४०, NW) थोर शिक्षक येशू ख्रिस्त याने आपल्या शिष्यांना अधिक जबाबदाऱ्या मिळण्याच्या पात्रतेचे होण्यास वेगवेगळ्या मार्गांद्वारे मदत केली होती. या लेखात आपण त्यापैकी काही मार्गांची चर्चा करणार आहोत आणि येशूने जे केले त्यातून आपण कोणते धडे शिकू शकतो तेही पाहणार आहोत.
“मी तुम्हाला मित्र म्हटले आहे”
४. येशू त्याच्या शिष्यांचा खरा मित्र होता हे त्याने कसे दाखवून दिले?
४ येशूने आपल्या शिष्यांना, त्याच्यापेक्षा कमी दर्जाचे नव्हे तर मित्र मानले. त्याने त्यांच्याबरोबर वेळ घालवला, त्यांना विश्वासात घेतले आणि ‘आपल्या पित्यापासून ऐकलेल्या सर्व गोष्टी त्यांना सांगितल्या.’ (योहान १५:१५ वाचा.) “आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर येशूने दिले तेव्हा त्यांना किती आनंद झाला असावा! (मत्त. २४:३, ४) येशूने आपल्या अनुयायांना आपल्या मनातले विचार व आपल्या भावनादेखील सांगितल्या. जसे की, त्याचा विश्वासघात करण्यात आला त्या रात्री येशू पेत्र, याकोब आणि योहान यांना घेऊन गेथशेमाने बागेत गेला आणि तेथे त्याने अत्यंत विव्हळ होऊन यहोवाला कळकळीने प्रार्थना केली. येशूने प्रार्थनेत काय म्हटले ते त्याच्या या तीन प्रेषितांनी ऐकले नसावे, पण त्या प्रसंगाचे गांभीर्य त्यांना जाणवले असावे. (मार्क १४:३३-३८) याआधी, या तिघांनी येशूचे जे रूपांतर पाहिले होते त्याचा त्यांच्या मनावर किती जबरदस्त प्रभाव पडला असावा, याचा विचार करा. (मार्क ९:२-८; २ पेत्र १:१६-१८) येशूने आपल्या शिष्यांबरोबर केलेली घनिष्ठ मैत्री एका जहाजाच्या नांगरासारखी होती, जी भविष्यात त्यांना मिळणाऱ्या भारी जबाबदाऱ्या पेलण्याकरता स्थिर करणार होती.
५. ख्रिस्ती वडील इतरांना मदत करायला तयार आहेत हे ते कोणकोणत्या मार्गांनी दाखवू शकतात?
५ येशूप्रमाणे ख्रिस्ती वडील आज मंडळीतल्या इतरांबरोबर मैत्री करून त्यांना हवी ती मदत पुरवतात. आपल्या सहविश्वासू बंधुभगिनींमध्ये वैयक्तिक आस्था घेण्याकरता वेळ काढतात व त्यांच्याबरोबर प्रेमळ व आपुलकीचा नातेसंबंध जोडतात. वडिलांना गोपनीयता बाळगण्याची जाणीव असली तरी ते गुप्तपणे कार्य करत नाहीत. ते आपल्या बांधवांवर भरवसा ठेवतात आणि बायबलमधून स्वतः शिकलेल्या गोष्टी त्यांनाही सांगतात. वयाने लहान असलेल्या कोणत्याही सेवा सेवकाला ते कनिष्ठ किंवा कमी लेखत नाहीत. उलट, मंडळीच्या वतीने मौल्यवान सेवा करणारा तो आध्यात्मिक पुरुष आहे ज्याच्यामध्ये प्रगती करण्यास वाव आहे, असा या सेवा सेवकाबद्दल त्यांचा दृष्टिकोन असतो.
“मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे”
६, ७. येशूने आपल्या शिष्यांकरता घातलेल्या कित्त्याबद्दल आणि याचा त्यांच्यावर कोणता परिणाम झाला त्याबद्दलचे वर्णन करा.
६ येशूच्या शिष्यांना आध्यात्मिक गोष्टींबद्दल कदर होती. पण काही वेळा त्यांच्या विचारसरणीवर, ते लहानाचे मोठे झाले त्या वातावरणाचा, शिवाय त्यांच्या संस्कृतीचा प्रभाव असल्याचे दिसून आले. (मत्त. १९:९, १०; लूक ९:४६-४८; योहा. ४:२७) अशा वेळी येशूने त्यांना भाषणबाजी केली नाही किंवा त्यांना दरडावलेदेखील नाही. किंवा, त्यांच्याकडे अवास्तव मागण्या केल्या नाहीत अथवा त्यांना करायला सांगितले एक व त्याने स्वतः दुसरे केले असे नाही. उलट त्याने त्यांच्यासाठी एक कित्ता घालून दिला.—योहान १३:१५ वाचा.
७ कोणकोणत्या बाबतीत येशूने त्यांच्यासाठी कित्ता घालून दिला? (१ पेत्र २:२१) इतरांची सेवा कसल्याही अडखळणाविना करता यावी म्हणून त्याने त्याची जीवनशैली साधी ठेवली. (लूक ९:५८) त्याने त्याची मर्यादा ओळखली आणि त्याने जे काही शिकवले ते शास्त्रवचनांतून शिकवले. (योहा. ५:१९; १७:१४, १७) त्याचे व्यक्तिमत्त्व इतके लोभस होते की लोक त्याच्याकडे बिनधास्त येत; तो दयाळूसुद्धा होता. त्याने जे काही केले ते प्रेमापोटी केले. (मत्त. १९:१३-१५; योहा. १५:१२) त्याच्या उदाहरणाचा त्याच्या प्रेषितांवर चांगला प्रभाव पडला. जसे की, याकोबाला जेव्हा मरणदंडाची शिक्षा दिली तेव्हा त्याने घाबरून हार मानली नाही तर त्याचा वध होईपर्यंत तो देवाला एकनिष्ठ राहिला. (प्रे. कृत्ये १२:१, २) योहान, ६० पेक्षा अधिक वर्षांपर्यंत येशूच्या पदचिन्हांवर चालला.—प्रकटी. १:१, २, ९.
८. तरुण पुरुषांपुढे व इतरांपुढे वडीलजन कोणते उदाहरण मांडतात?
८ आत्मत्यागी, नम्र व प्रेमळ वडील, तरुण पुरुषांना हवे असलेले उदाहरण त्यांच्यापुढे मांडतात. (१ पेत्र ५:२, ३) शिवाय, आपल्या विश्वासाद्वारे, शिक्षणाद्वारे, जीवनशैलीद्वारे व सेवेद्वारे चांगले उदाहरण मांडणाऱ्या या वडिलांना याचे समाधान मिळते, की इतर जण त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करू शकतात.—इब्री १३:७.
‘येशूने त्यांना आज्ञा देऊन पाठवले’
९. सुवार्तेचे प्रचार कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी येशूने आपल्या शिष्यांना प्रशिक्षित केले हे आपण कसे सांगू शकतो?
९ सुमारे दोन वर्षांपर्यंत आवेशाने सेवेत भाग घेतल्यानंतर येशूने आपल्या १२ प्रेषितांना प्रचार करायला पाठवून हे कार्य वाढवले. पण प्रेषितांना पाठवण्याआधी त्याने त्यांना सूचना दिल्या. (मत्त. १०:५-१४) हजारो लोकसंख्या असलेल्या एका समुदायाला चमत्काराने अन्न पुरवण्याआधी येशूने आपल्या शिष्यांना, लोकांना कसे बसवायचे व अन्नाचे वाटप कसे करायचे ते सांगितले. (लूक ९:१२-१७) यावरून स्पष्ट होते, की येशूने आपल्या शिष्यांना स्पष्ट व ठरावीक सूचना दिल्या. अशा अचूक प्रशिक्षणामुळे आणि पवित्र आत्म्याच्या शक्तिशाली प्रभावामुळे येशूचे प्रेषित, इ.स. ३३ मध्ये आणि त्यानंतर विस्तृत प्रमाणावर झालेल्या प्रचार कार्याची व्यवस्था करण्यास सज्ज झाले.
१०, ११. नवीन बांधवांना कोणकोणत्या मार्गांद्वारे सलग प्रशिक्षण दिले जाऊ शकते?
१० एक पुरुष जेव्हा बायबल अभ्यास स्वीकारतो तेव्हापासून त्याचे आध्यात्मिक प्रशिक्षण सुरू होते. त्याला नीट वाचता यावे म्हणून कदाचित आपल्याला त्याला मदत करावी लागेल. आपण त्याच्याबरोबर बायबलचा अभ्यास करत असताना, इतरही अनेक मार्गांनी त्याला मदत देऊ शकतो. तो ख्रिस्ती सभांना नियमितपणे उपस्थित राहायला लागला, की त्याचे आध्यात्मिक प्रशिक्षण सुरू होते. उदाहरणार्थ, तो ईश्वरशासित सेवा प्रशालेत भाग घेतो, बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक बनतो, वगैरे वगैरे. बाप्तिस्मा घेतल्यानंतर, त्याला राज्य सभागृहाचे मेंटेनन्स यासारख्या कामासाठी आणखी प्रशिक्षण मिळू शकते. अशा रीतीने एका बांधवाला हे पाहायला मदत केली जाऊ शकते, की सेवा सेवक बनण्याच्या पात्रतेचे होण्याकरता त्याने काय काय करणे आवश्यक आहे.
११ बाप्तिस्मा घेतलेल्या बांधवाला जेव्हा एखादी नेमणूक दिली जाते तेव्हा मंडळीतले एखादे वडील त्याला त्या नेमणुकीशी संबंधित असलेले कार्यतंत्र समजावून सांगतील आणि आवश्यक ते प्रशिक्षणही देतील. हे प्रशिक्षण प्राप्त करणाऱ्या बांधवाला, त्याच्याकडून काय अपेक्षिले जात आहे हे समजले पाहिजे. त्याला जे सांगितले जाते ते त्याला जर नीट समजत नसेल तर तो या कामास पात्र नाही, असे कोणतेही प्रेमळ वडील पटकन विचार करणार नाहीत. तर, त्याने सुधारणा केल्या पाहिजेत अशा बाबी ते त्याच्या निदर्शनास आणून देतील आणि ध्येयांची व कार्यपद्धतींची त्याच्याबरोबर बसून पुन्हा एकदा चर्चा करतील. वडिलांच्या या प्रयत्नांना हे नवीन बांधव किती उत्तम प्रतिसाद देत आहेत व इतरांची सेवा केल्यामुळे त्यांना किती आनंद मिळतो हे जेव्हा ते अनुभवतात तेव्हा वडिलांनाही हे पाहून आनंद होतो.—प्रे. कृत्ये २०:३५.
“जो सुज्ञ असतो तो उपदेश ऐकतो”
१२. येशूने दिलेला सल्ला प्रभावकारी का ठरला?
१२ येशूने प्रत्येक शिष्याची गरज ओळखून त्याला त्यानुसार सल्ला देऊन प्रशिक्षण दिले. जसे की, काही शोमरोन्यांनी येशूचा स्वीकार केला नाही तेव्हा याकोब व योहानाने, आकाशातून अग्नी आणून त्यांचा नाश करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा येशूने त्यांना खडसावले. (लूक ९:५२-५५) याकोब व योहान यांच्या आईने, त्या दोघांच्या सांगण्यावरून येशूला अशी विनंती केली, की देवाच्या राज्यात त्यांना मोठी पदे मिळावीत. तेव्हा येशू थेट या दोघा भावांना उद्देशून म्हणाला: “माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही, तर ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला त्यांच्यासाठी तो आहे.” (मत्त. २०:२०-२३) येशूने सर्व वेळी स्पष्ट, व्यावहारिक व देवाच्या तत्त्वांवर आधारित सल्ला दिला. त्याने आपल्या शिष्यांना या तत्त्वांवर तर्क करायला शिकवले. (मत्त. १७:२४-२७) येशूने आपल्या अनुयायांची मर्यादा ओळखली आणि त्यांच्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा केली नाही. त्याने नेहमी खऱ्या प्रेमाने प्रवृत्त होऊन त्यांना सल्ला दिला.—योहा. १३:१.
१३, १४. (क) कोणाला सल्ल्याची आवश्यकता असते? (ख) आध्यात्मिक प्रगती करत नसलेल्या बांधवाला एखादे वडील जातीने सल्ला देत असल्याची उदाहरणे सांगा.
१३ ख्रिस्ती मंडळीत जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी पुढे येत असलेल्या प्रत्येक पुरुषाला कधी न् कधी तरी सल्ल्याची किंवा बायबलमधील मार्गदर्शनाची आवश्यकता असते. नीतिसूत्रे १२:१५ मध्ये म्हटले आहे: “जो सुज्ञ असतो तो उपदेश ऐकतो.” एक तरुण बांधव म्हणतो: “मी माझ्या अपरिपूर्णतेचा जास्त विचार करत होतो. पण एका वडिलांनी मला, या अपरिपूर्णतांकडे योग्य दृष्टिकोनातून पाहण्याचा सल्ला दिला.”
१४ मंडळीतल्या एखाद्या पुरुषाची, अयोग्य वतर्नामुळे आध्यात्मिक प्रगती मंदावली आहे, असे जर वडिलांच्या लक्षात आले तर ते सौम्य वृत्तीने त्याला ताळ्यावर आणण्यास पुढाकार घेतात. (गलती. ६:१) प्रसंगी, एखाद्या प्रवृत्तीमुळे मंडळीतल्या एखाद्या पुरुषाला सल्ला द्यावा लागेल. जसे की, एखाद्या बांधवाची अंग चोरण्याची प्रवृत्ती असेल. अशा वेळी एखादे वडील त्या बांधवाचे लक्ष, येशू हा एक आवेशी राज्य प्रचारक होता व त्याने आपल्या अनुयायांना शिष्य बनवण्याची आज्ञा दिली आहे, या गोष्टीकडे वेधून त्याला मदत करतील. (मत्त. २८:१९, २०; लूक ८:१) किंवा एखादा बांधव महत्त्वाकांक्षी अर्थात मी कोणीतरी मोठा आहे अशी कदाचित त्याची मनोवृत्ती असेल. तेव्हा मंडळीतले एखादे वडील त्याला, मोठेपण मिळवण्याचे धोके पाहण्यास येशूने आपल्या शिष्यांना कशी मदत केली ते सांगू शकतात. (लूक २२:२४-२७) एखाद्या बांधवाची क्षमा करण्याची मनोवृत्ती नसेल तर? तर, स्वतःचे एक मोठे कर्ज माफ झालेले असतानाही दुसऱ्याचे लहानसे कर्ज माफ करण्यास तयार नसलेल्या दासाचा दृष्टांत सांगितल्यास, या बांधवाच्या मनावर त्याची कायमची छाप पडू शकेल. (मत्त. १८:२१-३५) एखाद्या बांधवाला सल्ला द्यायचा असतो तेव्हा वडिलांनी तो लवकरात लवकर दिला तर त्या बांधवाला त्याचा फायदा होऊ शकेल.—नीतिसूत्रे २७:९ वाचा.
‘स्वतःला प्रशिक्षित करत राहा’
१५. एका पुरुषाचे कुटुंब त्याला, इतरांची सेवा करण्यास कशा प्रकारे सहकार्य देऊ शकते?
१५ मंडळीतल्या पुरुषांना, जबाबदारी सांभाळण्यासाठी पुढे येण्याचे प्रशिक्षण देण्यात वडीलजन पुढाकार घेतात; पण मंडळीतले इतर जण त्यांच्या या प्रयत्नांना पाठिंबा देऊ शकतात. जसे की, त्या पुरुषाचे कुटुंबसुद्धा त्याला पुढे येण्यास मदत करू शकते, नव्हे त्यांनी तसे केलेच पाहिजे. हा बांधव जर मंडळीत आधीपासूनच वडील असेल, तर त्याच्या प्रेमळ बायकोच्या व निःस्वार्थ मुलांच्या सहकार्याचादेखील त्याला फायदा होऊ शकेल. वडील या नात्याने त्याला मिळालेली जबाबदारी त्याने यशस्वीपणे पार पाडावी असे जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी त्याला मंडळीची कामे करण्याची स्वेच्छेने सूट दिली पाहिजे. त्यांची ही आत्मत्यागी मनोवृत्ती पाहून त्याला आनंद मिळेल आणि इतर जण त्यांची प्रशंसा करतील.—नीति. १५:२०; ३१:१०, २३.
१६. (क) मंडळीतील जबाबदारी सांभाळण्यास पुढे येण्याचा निर्णय प्रामुख्याने कोणाचा असला पाहिजे? (ख) मंडळीतील जबाबदाऱ्या सांभाळण्यास पुढे येण्यासाठी एखाद्या पुरुषाला काय करावे लागेल?
१६ मंडळीतल्या या बांधवाला जबाबदारी सांभाळण्यास पुढे येण्याचे उत्तेजन व सहकार्य मंडळीतले इतर जण देऊ शकत असले तरीसुद्धा त्याने स्वतःहून हा निर्णय घेतला पाहिजे. (गलतीकर ६:५ वाचा.) इतरांना मदत करण्याकरता किंवा सेवेमध्ये पूर्ण सहभाग घेण्याकरता एखाद्या बांधवाने सेवा सेवक किंवा वडीलच असले पाहिजे असे नाही. तरीपण, मंडळीमध्ये जबाबदाऱ्या सांभाळण्यास पुढे येण्याचा अर्थ, बायबलमध्ये सांगितलेल्या अटी पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करणे असा होतो. (१ तीम. ३:१-१३; तीत १:५-९; १ पेत्र ५:१-३) तेव्हा, एक पुरुष जर सेवा सेवक किंवा वडील म्हणून सेवा करू इच्छित असेल पण त्याला अजून तसे नियुक्त करण्यात आलेले नसेल, तर त्याने कोणकोणत्या बाबतीत आध्यात्मिक प्रगती करणे गरजेचे आहे याकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी त्याला नित्यनेमाने बायबलचे वाचन, मनःपूर्वक वैयक्तिक अभ्यास, एकाग्रतेने मनन, मनापासून प्रार्थना व ख्रिस्ती सेवेत आवेशाने भाग घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे तो पौलाने तीमथ्याला दिलेल्या पुढील सल्ल्याचे व्यक्तिशः पालन करू शकतो: “सुभक्तीचे ध्येय ठेवून स्वतःला प्रशिक्षित करत राहा.”—१ तीम. ४:७, NW.
१७, १८. बाप्तिस्मा घेतलेल्या एखाद्या बांधवाच्या मनात चिंता, कमीपणाच्या भावना किंवा सेवा करण्याची उत्सुकताच नसेल तर तो काय करू शकतो?
१७ पण मंडळीतला एखादा पुरुष, चिंता किंवा कमीपणाच्या भावना यांमुळे जबाबदारी सांभाळण्यास पुढे येत नसेल तर काय? तर त्याने यहोवा देव आणि येशू ख्रिस्त आपल्यासाठी काय काय करतात यावर विचार करावा. यहोवा तर ‘प्रतिदिन आपला भार वाहतो.’ (स्तो. ६८:१९) तर मग, आपला स्वर्गीय पिता या बांधवाला मंडळीमध्ये जबाबदारी सांभाळण्यास पुढे येण्याकरता साहाय्य करू शकतो. तसेच, सेवा सेवक किंवा वडील या नात्याने सेवा न करणाऱ्या बांधवाने, देवाच्या संस्थेत जबाबदारीची कामे पार पाडण्यासाठी प्रौढ पुरुषांची अत्यंत गरज आहे, या गोष्टीवर विचार केल्यास त्याला याचा फायदा होईल. असे केल्याने, तो त्याच्या मनातील नकारात्मक विचार काढून टाकण्यास प्रवृत्त होऊ शकेल. तो पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करू शकतो आणि ही गोष्ट लक्षात ठेवू शकतो, की मनातून चिंता व कमीपणाच्या भावना काढून टाकण्यासाठी त्याला पवित्र आत्म्याचे फळ असलेली शांती व आत्मसंयम यांची आवश्यकता आहे. (लूक ११:१३; गलती. ५:२२, २३) शिवाय, जो योग्य हेतू बाळगून जबाबदारी सांभाळण्यासाठी पुढे येतो त्याला यहोवा आशीर्वादित करतो, याची तो खात्री बाळगू शकतो.
१८ मंडळीत जबाबदारी सांभाळण्यास पुढे येण्याची उत्सुकता एखाद्या बाप्तिस्मा घेतलेल्या बांधवात नसेल तर? सेवा करण्याची इच्छाच या बांधवात नसेल तर? “देव तुम्हामध्ये कार्य करीत आहे; तोच त्याची इच्छा तुम्हास कळवितो; ती पूर्ण करण्यास तोच तुम्हाला समर्थ करतो,” असे प्रेषित पौलाने लिहिले. (फिलिप्पै. २:१३, सुबोध भाषांतर) सेवा करण्याची इच्छा देव देतो आणि त्याचा आत्मा ही पवित्र सेवा पार पाडण्यासाठी शक्ती देऊ शकतो. (फिलिप्पै. ४:१३) शिवाय, जे बरोबर आहे ते आपल्या हातून घडो अशी प्रार्थनादेखील हा बांधव देवाला करू शकतो.—स्तो. २५:४, ५.
१९. “सात मेंढपाळ व आठ लोकनायक” उभे केले जातील, असे बायबलमध्ये जे म्हटले आहे त्यावरून आपल्याला कोणते आश्वासन मिळते?
१९ इतरांना प्रशिक्षित करण्यासाठी वडीलजन करत असलेले प्रयत्न यहोवा आशीर्वादित करतो. आणि मंडळीमध्ये जबाबदारी सांभाळण्यास पुढे येणारेदेखील यहोवाचा आशीर्वाद अनुभवतात. देवाच्या लोकांमध्ये पुढाकार घेण्याकरता “सात मेंढपाळ व आठ लोकनायक” अर्थात, आवश्यक असलेले योग्यताप्राप्त पुरुष उभे केले जातील असे बायबलमध्ये आश्वासन देण्यात आलेले आहे. (मीखा ५:५) त्यानुसार, कितीतरी ख्रिस्ती पुरुषांना हे प्रशिक्षण मिळत आहे आणि ज्याने यहोवाची स्तुती होते अशा सेवेचे सुहक्क सांभाळण्यासाठी अनेक नम्र जन पुढे येत आहेत हे किती स्तुतीयोग्य आहे!
तुमचे उत्तर काय असेल?
• येशूने आपल्या शिष्यांना भारी जबाबदारी पेलण्यास पात्र ठरण्याकरता कशी मदत केली?
• मंडळीतील पुरुषांना पुढाकार घेण्यास मदत करताना वडीलजन येशूचे अनुकरण कसे करू शकतात?
• एखादा पुरुष मंडळीत जबाबदारी सांभाळण्यास पुढे येऊ पाहतो तेव्हा त्याच्या कुटुंबातील सदस्य त्याला कशा प्रकारे सहकार्य देऊ शकतात?
• मंडळीत जबाबदारी सांभाळण्यास पुढे येण्याकरता एक पुरुष स्वतः काय करू शकतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[३१ पानांवरील चित्रे]
तुमचा बायबल विद्यार्थी प्रगती करू इच्छितो तेव्हा तुम्ही त्याला कोणते प्रशिक्षण देऊ शकता?
[३२ पानांवरील चित्र]
मंडळीत जबाबदारी सांभाळण्यास पुढे येण्याची इच्छा, पुरुष कसे दाखवू शकतात?