यहोवा आपले निवासस्थान
“हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आम्हाला निवासस्थान आहेस.”—स्तो. ९०:१.
१, २. दुष्ट जगाविषयी देवाच्या सेवकांना कसे वाटले आहे, आणि त्यांना एक घर आहे ते कोणत्या अर्थाने?
सध्याच्या या दुष्ट जगात तुम्हाला तुमच्या घरातील प्रेमळ व सुरक्षित वातावरणात असल्यासारखे वाटते का? नसेल, तर असे वाटणारे तुम्ही एकटेच नाही! मागील हजारो वर्षांदरम्यान, यहोवावर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्वांनाच या दुष्ट जगात परके किंवा प्रवासी असल्यासारखे वाटले आहे. उदाहरणार्थ, कनान देशात तंबूंमध्ये राहत असताना देवाच्या विश्वासू सेवकांनी “उघडपणे कबूल केले की ते परके व प्रवासी आहेत.”—इब्री ११:१३, ईझी-टू-रीड व्हर्शन.
२ त्याच प्रकारे, ज्यांचे “नागरिकत्व” स्वर्गात आहे ते ख्रिस्ताचे अभिषिक्त अनुयायीदेखील स्वतःला या दुष्ट जगात “प्रवासी व परदेशवासी” मानतात. (फिलिप्पै. ३:२०; १ पेत्र २:११) येशूने म्हटले: “मी जगाचा नाही.” येशूप्रमाणे त्याची “दुसरी मेंढरे” देखील या जगाची नाहीत. (योहा. १०:१६; १७:१६) पण, देवाच्या लोकांना “घर” नाही असे नाही. खरेतर, आपण अशा एका सुरक्षित व प्रेमळ वातावरण असलेल्या घरात राहत आहोत ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही; ज्याला आपण केवळ विश्वासाच्या डोळ्यांनी पाहू शकतो. हे कोणते घर आहे? मोशेने लिहिले: “हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आम्हाला निवासस्थान आहेस.” * (स्तो. ९०:१) यहोवा कशा प्रकारे प्राचीन काळातील त्याच्या विश्वासू सेवकांकरता एक निवासस्थान ठरला? तो आजच्या काळातील लोकांकरता कशा प्रकारे एक निवासस्थान आहे? आणि भविष्यात तो कशा प्रकारे एकमात्र सुरक्षित निवासस्थान ठरेल?
यहोवा—प्राचीन काळातील त्याच्या सेवकांचे “निवासस्थान”
३. स्तोत्र ९०:१ मध्ये आपल्याला कोणता विषय, चित्र आणि समान मुद्दा पाहायला मिळतो?
३ बायबलमध्ये वापरलेल्या अनेक शब्दचित्रांप्रमाणेच स्तोत्र ९०:१ यात एक विषय, एक चित्र आणि एक समान मुद्दा आहे. यातील विषय यहोवा आहे. चित्र आहे निवासस्थानाचे किंवा एका घराचे. यहोवा आणि निवासस्थान यात बरेच साम्य आहे. उदाहरणार्थ, यहोवा आपल्या लोकांना संरक्षण पुरवतो. हे या वास्तविकतेच्या सामंजस्यात आहे की यहोवा प्रेमाचे प्रत्यक्ष स्वरूप आहे. (१ योहा. ४:८) तो शांतीचाही देव आहे, जो आपल्या एकनिष्ठ सेवकांना “निर्भय” ठेवतो. (स्तो. ४:८) उदाहरणार्थ, त्याने विश्वासू कुलप्रमुखांशी ज्या प्रकारे व्यवहार केला त्याचा विचार करू या. सर्वात आधी आपण अब्राहामाविषयी पाहू या.
४, ५. देव अब्राहामाकरता कशा प्रकारे निवासस्थान ठरला?
४ यहोवाने जेव्हा अब्राहामाला, ज्याला त्या वेळी अब्राम म्हटले जायचे, पुढीलप्रमाणे सांगितले तेव्हा त्याला कसे वाटले असावे याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो: “तू आपला देश, आपले नातेवाईक . . . सोडून मी दाखवीन त्या देशात जा.” हे शब्द ऐकून जर अब्राहाम चिंतातुर झाला असेल, तर यहोवाने पुढे जे म्हटले ते ऐकून त्याची चिंता नक्कीच नाहीशी झाली असेल. यहोवाने म्हटले: “मी तुजपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन. . . . तुझे जे अभीष्ट चिंतितील त्यांचे मी अभीष्ट करीन; तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन.”—उत्प. १२:१-३.
५ यहोवाने या शब्दांद्वारे अब्राहामाला अभिवचन दिले की तो त्याच्याकरता व त्याच्या वंशजांकरता एक सुरक्षित निवासस्थान ठरेल. (उत्प. २६:१-६) यहोवाने अब्राहामाला दिलेले त्याचे अभिवचन पूर्ण केले. उदाहरणार्थ, त्याने साराला भ्रष्ट करण्यापासून आणि अब्राहामाला मारून टाकण्यापासून इजिप्तच्या फारोला आणि गरारच्या अबीमलेख राजाला रोखले. अशाच प्रकारे, त्याने इसहाक आणि त्याची पत्नी रिबका यांचेही संरक्षण केले. (उत्प. १२:१४-२०; २०:१-१४; २६:६-११) बायबल म्हणते: “[देवाने] कोणत्याही मनुष्याला त्यांस उपद्रव करू दिला नाही, त्यांच्याकरिता त्याने राजांचाही निषेध करून म्हटले की, माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, माझ्या संदेष्ट्यांना उपद्रव देऊ नका.”—स्तो. १०५:१४, १५.
६. इसहाकाने याकोबाला काय करण्यास सांगितले, आणि याकोबाला कसे वाटले असावे?
६ त्या संदेष्ट्यांमध्ये अब्राहामाचा नातू याकोब याचाही समावेश होता. याकोबाचे लग्नाचे वय झाले, तेव्हा त्याचा पिता इसहाक याने त्याला असे म्हटले: “कनानी मुलींपैकी कोणी बायको करू नको. तर ऊठ, पदन-अराम येथे तुझ्या आईचा बाप बथुवेल याच्या घरी जा व तुझा मामा लाबान याच्या मुलींपैकी बायको कर.” (उत्प. २८:१, २) याकोबाने लगेच इसहाकाच्या आज्ञेचे पालन केले. याकोब आपल्या कुटुंबासोबत कनानमध्ये राहत होता. त्याने आपल्या कुटुंबाचे सुरक्षित वातावरण सोडले, आणि बहुधा तो एकटाच शेकडो मैल दूर असलेल्या हारानच्या प्रवासाला निघाला. (उत्प. २८:१०) त्याच्या मनात कदाचित हे प्रश्न आले असतील: ‘मला किती दिवस कुटुंबापासून दूर राहावे लागेल? माझा मामा माझे प्रेमळपणे स्वागत करून मला एक देवभीरू पत्नी देईल का?’ याकोब जर या गोष्टींविषयी चिंतित असेल, तर तो बैर-शेबापासून १०० किलोमीटर असलेल्या लूज या ठिकाणी पोचला तेव्हा त्याची चिंता नक्कीच नाहीशी झाली असावी. लूज येथे काय घडले?
७. देवाने एका स्वप्नाद्वारे याकोबाला कोणते आश्वासन दिले?
७ लूज येथे एका स्वप्नात यहोवा याकोबाला दिसला. यहोवाने त्याला असे म्हटले: “पाहा, मी तुजबरोबर आहे; आणि जिकडेजिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन; तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही.” (उत्प. २८:१५) देवाच्या या प्रेमळ शब्दांमुळे याकोबाला नक्कीच आश्वासन आणि सांत्वन मिळाले असेल! देव कशा प्रकारे आपले अभिवचन पूर्ण करेल हे पाहण्यास उत्सुक असलेला याकोब लगबगीने पावले टाकत पुढे वाटचाल करत असल्याची तुम्ही कल्पना करू शकता का? दुसऱ्या एखाद्या ठिकाणी सेवा करण्यासाठी तुम्ही आपले घर सोडले असेल, तर याकोबाच्या मनात ज्या भावना आल्या असतील त्या तुम्ही नक्कीच समजू शकता. यहोवा तुमची काळजी घेतो याचा पुरावा तुम्ही नक्कीच पाहिला असेल यात काही शंका नाही.
८, ९. यहोवा याकोबाकरता कोणत्या मार्गांनी एक निवासस्थान होता, आणि यापासून आपण काय शिकू शकतो?
८ याकोब हारानला पोचल्यावर, त्याचा मामा लाबान याने त्याचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले आणि नंतर लेआ व राहेल यांच्याशी त्याचे लग्न लावून दिले. पण, कालांतराने लाबानाने याकोबाच्या वेतनात दहादा फेरबदल करून त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला! (उत्प. ३१:४१, ४२) तरीसुद्धा, यहोवा आपली काळजी घेईल असा भरवसा बाळगून याकोबाने हे अन्याय धीराने सहन केले; आणि खरोखरच यहोवाने त्याची काळजी घेतली! देवाने याकोबाला कनान देशात परतण्यास सांगितले तोपर्यंत या कुलप्रमुखाने “पुष्कळ शेरडे, मेंढरे, दास, दासी, उंट व गाढवे . . . संपादन केली.” (उत्प. ३०:४३) मोठ्या कृतज्ञतेने याकोबाने अशी प्रार्थना केली: “तू करुणा व सत्यता दाखवून आपल्या दासासाठी जे काही केले आहे त्याला मी पात्र नाही; मी फक्त आपली काठी घेऊन ही यार्देन उतरून गेलो होतो, आणि आता माझ्या दोन टोळ्या झाल्या आहेत.”—उत्प. ३२:१०.
९ खरोखर, मोशेने केलेली प्रार्थना किती खरी होती: “हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आम्हाला निवासस्थान आहेस!” (स्तो. ९०:१) हे शब्द आज आपल्यालाही लागू होतात. कारण, यहोवा देव, “जागा बदलणाऱ्या छायेसारखा नाही.” आजही तो त्याच्या एकनिष्ठ सेवकांकरता प्रेमळ व सुरक्षित निवासस्थान आहे. (याको. १:१७, सुबोधभाषांतर) ते कसे, पाहू या.
यहोवा—आज आपले “निवासस्थान”
१०. यहोवा आजही त्याच्या सेवकांकरता एक सुरक्षित निवासस्थान आहे असे आपण खातरीने का म्हणू शकतो?
१० कल्पना करा: तुम्ही एका जागतिक गुन्हेगारी संघटनेविरुद्ध कोर्टात साक्ष देत आहात. त्या संघटनेचा प्रमुख मोठा चतुर, शक्तिशाली आणि निष्ठुरपणे खोटे बोलणारा व खुनी आहे. दिवसाच्या शेवटी तुम्ही कोर्टातून बाहेर पडता तेव्हा तुम्हाला कसे वाटेल? सुरक्षित? मुळीच नाही! तुम्हाला नक्कीच संरक्षण मागावे लागेल. आज यहोवाचे साक्षीदार अशाच परिस्थितीत आहेत. ते बेधडकपणे यहोवाबद्दल साक्ष देत आहेत आणि त्याचा प्रमुख शत्रू सैतान याचा निर्भयपणे पर्दाफाश करत आहेत! (प्रकटीकरण १२:१७ वाचा.) पण, देवाच्या लोकांचे तोंड बंद करण्यात सैतानाला यश आले आहे का? नाही! खरेतर, आपली आध्यात्मिक रीत्या भरभराट होत आहे आणि यामागे केवळ एकच कारण आहे. ते म्हणजे: यहोवा आजही, खासकरून या शेवटल्या दिवसांत आपले शरणस्थान किंवा “निवासस्थान” आहे. (यशया ५४:१४, १७ वाचा.) असे असूनही, आपण जर स्वतःला आपल्या निवासस्थानापासून दूर नेण्याची सैतानाला अनुमती दिली, तर यहोवा आपले सुरक्षित निवासस्थान ठरणार नाही.
११. कुलप्रमुखांपासून आपण कोणता धडा शिकू शकतो?
११ कुलप्रमुखांपासून आपण आणखी एक गोष्ट शिकू शकतो. ते जरी कनान देशात राहत असले, तरी ते त्या देशातील लोकांपासून वेगळे होते. त्यांनी कनानच्या लोकांच्या दुष्ट व अनैतिक मार्गांचा द्वेष केला. (उत्प. २७:४६) ते देवाच्या तत्त्वांनुसार चालले; त्यामुळे काय करावे व काय करू नये याविषयीच्या लांबलचक यादीवर ते अवलंबून राहिले नाहीत. त्यांना यहोवाबद्दल व त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जे माहीत होते ते त्यांच्यासाठी पुरेसे होते. तो त्यांचे निवासस्थान असल्यामुळे त्यांना या जगाचे आकर्षण वाटले नाही. त्याउलट, ते या जगापासून जितके होईल तितके दूर राहिले. त्यांनी आपल्याकरता किती उत्तम उदाहरण मांडले! तुम्हीदेखील, सोबती व मनोरंजन निवडण्याच्या बाबतीत विश्वासू कुलप्रमुखांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करता का? दुःखाची गोष्ट म्हणजे ख्रिस्ती मंडळीतील काहींच्या बाबतीत असे दिसून आले आहे की काही प्रमाणात त्यांना सैतानाच्या या जगात सुरक्षित वाटते. अगदी थोड्याच प्रमाणात का होईना तुम्हालाही तसेच वाटत असेल, तर याविषयी देवाला प्रार्थना करा. हे जग सैतानाचे आहे हे आठवणीत असू द्या. या जगातून त्याची निर्दय व स्वार्थी मनोवृत्ती प्रतिबिंबित होते.—२ करिंथ. ४:४; इफिस. २:१, २.
१२. (क) यहोवाने त्याच्या विश्वासू सेवकांकरता कोणत्या तरतुदी केल्या आहेत? (ख) या तरतुदींबद्दल तुम्हाला कसे वाटते?
१२ यहोवाने त्याच्या विश्वासू सेवकांसाठी म्हणजे जे त्याला आपले निवासस्थान बनवतात त्यांच्यासाठी अनेक आध्यात्मिक तरतुदी केल्या आहेत. सैतानाच्या कुयुक्त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आपण या तरतुदींचा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे. ख्रिस्ती सभा आणि कौटुंबिक उपासना या तरतुदींपैकी आहेत. तसेच, आपण जीवनातील समस्यांचा सामना करत असताना आपल्याला सांत्वन व साहाय्य पुरवण्यासाठी देवाने मानवांमध्ये “देणग्या” दिल्या आहेत, म्हणजे त्याने ख्रिस्ती वडिलांना नेमले आहे. (इफिस. ४:८-१२) नियमन मंडळाचे सदस्य या नात्याने अनेक वर्षे सेवा केलेल्या बंधू जॉर्ज गँगस यांनी असे लिहिले: “मी देवाच्या लोकांच्या सान्निध्यात असतो तेव्हा मला कुटुंबातील सुरक्षित वातावरणात, आध्यात्मिक नंदनवनात असल्यासारखं वाटतं.” तुम्हालाही असेच वाटते का?
१३. इब्री लोकांस ११:१३ या वचनातून आपण कोणता महत्त्वपूर्ण धडा शिकू शकतो?
१३ कुलप्रमुखांचा आणखी एक अनुकरणीय गुण म्हणजे त्यांच्या सभोवताली असलेल्या लोकांपेक्षा ते वेगळे आहेत हे दाखवण्याची त्यांची तयारी. पहिल्या परिच्छेदात सांगितल्याप्रमाणे, त्यांनी “उघडपणे कबूल केले की ते परके व प्रवासी आहेत.” (इब्री ११:१३) आपण जगातील इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्याचा तुम्ही निर्धार केला आहे का? हे खरे आहे, की असे करणे नेहमीच सोपे नसते. पण, देवाच्या मदतीने आणि तुमच्या ख्रिस्ती बंधुभगिनींच्या साहाय्याने असे करण्यात तुम्ही सफल होऊ शकता. आठवणीत ठेवा, तुम्ही एकटेच नाही. यहोवाच्या इच्छेप्रमाणे करू इच्छिणाऱ्या सर्वांनाच संघर्ष करावा लागतो! (इफिस. ६:१२) असे असूनही, आपण यहोवावर भरवसा ठेवल्यास आणि त्याला आपले निवासस्थान बनवल्यास आपण या संघर्षात विजयी ठरू शकतो.
१४. यहोवाच्या सेवकांनी कोणत्या “नगराची” वाट पाहिली?
१४ आणखी एक महत्त्वाची गोष्ट ही आहे: अब्राहामाचे अनुकरण करण्याद्वारे बक्षिसावर आपले लक्ष केंद्रित ठेवा. (२ करिंथ. ४:१८) प्रेषित पौलाने लिहिले, की “पाये [“खरे पाये,” NW] असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची [अब्राहाम] वाट पाहत होता.” (इब्री ११:१०) ते ‘नगर’ मशीही राज्य असल्याचे सिद्ध झाले. अर्थातच, अब्राहामाला त्या “नगराची” वाट पाहावी लागली. पण एका अर्थी आपल्याला वाट पाहण्याची गरज नाही. मशीही राज्य आता स्वर्गात शासन करत आहे. इतकेच नव्हे, तर दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या पुराव्यांवरून दिसून येते, की लवकरच ते राज्य या पृथ्वीचा पूर्णपणे ताबा घेईल. हे राज्य तुमच्याकरता खरेखुरे आहे का? तुम्ही स्वतःला या जगापासून दूर ठेवून देवाच्या राज्याला जीवनात प्रथम स्थान देता का?—२ पेत्र ३:११, १२ वाचा.
अंताच्या अगदी जवळ असताना आपले “निवासस्थान”
१५. जे सध्याच्या या जगावर भरवसा ठेवतात त्यांचे भविष्य कसे असेल?
१५ जसजसा सैतानाच्या या जगाचा अंत जवळ येईल, तसतशा या जगातील समस्या आणखीनच बिकट होतील. (मत्त. २४:७, ८) मोठ्या संकटादरम्यान परिस्थिती नक्कीच जास्त कठीण होईल. पायाभूत सुविधा मिळेनाशा होतील आणि लोकांना आपल्या अस्तित्वाचीच भीती वाटू लागेल. (हब. ३:१६, १७) घोर नैराश्यामुळे ते जणू “गुहांत व डोंगरांतील” खडकांत शरण घेतील. (प्रकटी. ६:१५-१७) पण, खरोखरच्या गुहा असोत अथवा डोगरांसमान असलेल्या राजकीय व व्यापारी संघटना असोत, त्या संघटना त्यांना संरक्षण देऊ शकणार नाहीत.
१६. ख्रिस्ती मंडळीकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, आणि का?
१६ पण, यहोवाचे लोक मात्र त्यांच्या निवासस्थानाचा, म्हणजे यहोवा देवाच्या संरक्षणाचा आनंद पुढेही अनुभवतील. हबक्कूक संदेष्ट्याप्रमाणे ते “परमेश्वराच्या ठायी हर्ष” पावतील. ते “तारण देणाऱ्या देवाविषयी” उल्लास करतील. (हब. ३:१८) त्या खळबळजनक काळादरम्यान यहोवा कोणत्या मार्गांनी त्यांचे “निवासस्थान” ठरेल? हे तर येणारा काळच सांगेल. पण, एका गोष्टीची आपण खातरी बाळगू शकतो: ज्याप्रमाणे इस्राएल लोक संघटितपणे इजिप्तमधून बाहेर पडले, त्याप्रमाणे “मोठा लोकसमुदाय” संघटित राहील व देवाचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी जागरूक राहील. (प्रकटी. ७:९; निर्गम १३:१८ वाचा.) हे मार्गदर्शन देवाने ठरवलेल्या व्यवस्थेद्वारे, कदाचित मंडळीद्वारे मिळेल. खरे पाहता, यशया २६:२० (वाचा.) मध्ये पूर्वभाकीत केलेल्या संरक्षक ‘खोल्यांचा’ संबंध जगभरातील हजारो मंडळ्यांशी आहे असे दिसते. तुम्हाला मंडळीच्या सभा मौल्यवान वाटतात का? मंडळीद्वारे यहोवा जे मार्गदर्शन पुरवतो त्यानुसार तुम्ही लगेच पावले उचलता का?—इब्री १३:१७.
१७. यहोवा कशा प्रकारे मरण पावलेल्या त्याच्या एकनिष्ठ सेवकांचेही “निवासस्थान” आहे?
१७ मोठे संकट सुरू होण्यापूर्वी जे देवाला विश्वासू राहून मरण पावतील तेदेखील यहोवाच्या संरक्षणात, त्यांच्या निवासस्थानात राहतील. ते कसे? विश्वासू कुलप्रमुखांचा मृत्यू झाल्याच्या कितीतरी काळानंतर यहोवाने मोशेला म्हटले: “मी . . . अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव आहे.” (निर्ग. ३:६) येशूने हे शब्द उद्धृत करून पुढे म्हटले: “तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंतांचा आहे; कारण त्याला सर्वच जिवंत आहेत.” (लूक २०:३८) खरोखर, जे लोक यहोवाला विश्वासू राहून मरण पावले आहेत ते जणू त्याच्या दृष्टीत जिवंत आहेत; त्यांचे पुनरुत्थान निश्चितच होईल.—उप. ७:१.
१८. नवीन जगात कोणत्या एका खास मार्गाने यहोवा त्याच्या लोकांकरता एक “निवासस्थान” ठरेल?
१८ लवकरच येणार असलेल्या नवीन जगात यहोवा आणखी एका अर्थाने त्याच्या लोकांचे “निवासस्थान” ठरेल. प्रकटीकरण २१:३ मध्ये असे म्हटले आहे: “पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील.” सुरुवातीला, यहोवा आपला प्रतिनिधी येशू ख्रिस्त याच्या माध्यमातून पृथ्वीवरील त्याच्या प्रजेसोबत वस्ती करेल. हजार वर्षांच्या शेवटी, पृथ्वीबद्दल असलेला देवाचा उद्देश साध्य केल्यानंतर येशू त्याचे राज्य त्याच्या पित्याला सोपवेल. (१ करिंथ. १५:२८) त्यानंतर, परिपूर्ण बनलेल्या मानवजातीला मध्यस्थ म्हणून येशूची गरज राहणार नाही; यहोवा त्यांच्यासोबत असेल. भविष्याकरता आपल्याला किती अद्भुत आशा लाभली आहे! तर मग, तोपर्यंत आपण प्राचीन काळातील देवाच्या विश्वासू सेवकांचे अनुकरण करण्याद्वारे यहोवाला आपले “निवासस्थान” बनवू या.
^ ईझी-टू-रीड व्हर्शन या भाषांतरात स्तोत्र ९०:१ चे भाषांतर असे करण्यात आले आहे: “प्रभू तू सदैव आमचे घर बनून राहिला आहेस.”