सांत्वन मिळवा—सांत्वन द्या
अपरिपूर्ण असल्यामुळे, आपण सर्वच आजारी पडतो. काही जण तर गंभीर रीत्या आजारी पडतात. अशा कठीण परिस्थितीचा सामना आपण कसे करू शकतो?
कुटुंबीयांकडून, मित्रांकडून आणि आपल्या ख्रिस्ती बंधुभगिनींकडून मिळणाऱ्या सांत्वनामुळे आपल्याला अशा कठीण परिस्थितीचा सामना करणे शक्य होते.
ज्याप्रमाणे जखमेवर लावलेल्या मलमामुळे जखम बरी होते व आपल्याला बरे वाटते, त्याचप्रमाणे एखाद्या मित्राच्या प्रेमळ व दयाळू शब्दांमुळे आपल्या मनाला उभारी व सांत्वन मिळते. (नीति. १६:२४; १८:२४; २५:११) पण खरे ख्रिस्ती, सांत्वन मिळवण्यासोबतच इतरांनाही सांत्वन देऊ इच्छितात. “ज्या सांत्वनाने” त्यांना “स्वतः देवाकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने . . . जे कोणी कोणत्याही संकटांत आहेत त्यांचे सांत्वन” करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. (२ करिंथ. १:४; लूक ६:३१) मेक्सिकोतील आन्टोनियो नावाच्या एका प्रांतीय पर्यवेक्षकांनी हे स्वतः अनुभवले.
आन्टोनियो यांना एक प्रकारचा रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान करण्यात आले तेव्हा ते मानसिक रीत्या खचून गेले. तरीसुद्धा, आपल्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी काय केले? ते आपली राज्यगीते आठवण्याचा व ती मोठ्या आवाजात गाण्याचा प्रयत्न करायचे, आणि त्यांतील शब्दांवर मनन करायचे. बायबलचा अभ्यास करणे व सोबतच मोठ्याने प्रार्थना करणे यांमुळेही त्यांना बरेच सांत्वन मिळाले.
असे असूनही, आन्टोनियो यांना आता याची जाणीव झाली आहे, की त्यांना सांत्वन देण्यात सहविश्वासू बंधुभगिनींचा बराच मोठा वाटा होता. ते म्हणतात: “चिंतेमुळे माझी पत्नी व मी भारावून जायचो, तेव्हा आम्ही मंडळीत वडील म्हणून सेवा करणाऱ्या आमच्या एका नातेवाइकाला प्रार्थना करण्याकरता बोलवायचो. यामुळं आम्हाला सांत्वन व मनःशांती मिळायची.” ते पुढे म्हणतात, “आमच्या कुटुंबानं आणि बंधुभगिनींनी आम्हाला खूप आधार दिला. त्यामुळंच आम्ही नकारात्मक भावनांवर इतक्या कमी वेळात मात करू शकलो.” असे प्रेमळ व काळजी घेणारे मित्र असल्याबद्दल त्यांना किती कृतज्ञ वाटते!
दुःखाच्या वेळी साहाय्यक ठरणारी आणखी एक मदत म्हणजे देवाने अभिवचन दिलेला पवित्र आत्मा. प्रेषित पेत्राने म्हटले, की पवित्र आत्मा देवाकडून एक “दान” आहे. (प्रे. कृत्ये २:३८) इ.स. ३३ मध्ये पेन्टेकॉस्टच्या दिवशी अनेक जणांचा पवित्र आत्म्याने अभिषेक करण्यात आला तेव्हा याची सत्यता सिद्ध झाली. पवित्र आत्म्याचे दान आज सर्वांसाठी व विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. तेव्हा, देवाने तुम्हालाही मोठ्या प्रमाणात हे दान द्यावे अशी त्याच्याजवळ विनंती का करू नये?—यश. ४०:२८-३१.
दुःखात असलेल्यांबद्दल काळजी व्यक्त करा
प्रेषित पौलाने अनेक कठीण समस्यांचा सामना केला. काही प्रसंगी तर तो मरता मरता वाचला. (२ करिंथ. १:८-१०) तरीसुद्धा, पौलाने मृत्यूविषयी अवाजवी भीती बाळगली नाही. आपल्याला देवाचा आधार आहे या जाणिवेमुळे त्याला सांत्वन मिळाले. त्याने लिहिले: “आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. तो आमच्यावरील सर्व संकटांत आमचे सांत्वन करितो.” (२ करिंथ. १:३, ४) पौल त्याच्यावर आलेल्या संकटांमुळे भारावून गेला नाही. त्याऐवजी, त्याने संकटांचा धीराने सामना केला आणि त्यामुळे इतरांना सहानुभूती दाखवण्यास त्याला मदत मिळाली. आणि अशा रीतीने सांत्वनाची गरज असलेल्यांना सांत्वन देण्यास तो सुसज्ज बनला.
आन्टोनियो आजारातून बरे झाल्यानंतर, त्यांना पुन्हा एकदा प्रवासी कार्य करणे शक्य झाले. पूर्वीही ते नेहमीच सहविश्वासू बंधुभगिनींबद्दल काळजी व्यक्त करायचे. पण, आता ते व त्यांची पत्नी आजारी असलेल्यांना भेट देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खास प्रयत्न करू लागले. उदाहरणार्थ, गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या एका ख्रिस्ती बांधवाला भेट दिल्यानंतर आन्टोनियो यांना कळले, की या बांधवाला सभांना जाण्याची इच्छा नव्हती. आन्टोनियो सांगतात, “त्या बांधवाला यहोवाबद्दल आणि बंधुभगिनींबद्दल प्रेम नव्हतं असं नाही, पण त्यांच्या आजारामुळं ते इतके खचून गेले, की आपला काहीच उपयोग नाही असं त्यांना वाटत होतं.”
मग आन्टोनियो यांनी त्या बांधवाला उत्तेजन देण्यासाठी काय केले? अलीकडेच झालेल्या एका समारंभात त्यांनी त्या बांधवाला सर्वांच्या वतीने प्रार्थना करण्याची विनंती केली. आपल्याला जमणार नाही असे त्या बांधवाला वाटले होते, तरीपण त्यांनी विनंती मान्य केली. आन्टोनियो सांगतात: “त्यांनी खूप सुंदर प्रार्थना केली, आणि त्यानंतर त्यांचा दृष्टिकोनच बदलला. त्यांना यहोवाच्या सेवेत पुन्हा एकदा उपयोगी वाटू लागलं.”
आपल्यापैकी सर्वांनीच कमी-जास्त प्रमाणात या ना त्या दुःखाचा सामना केला आहे. पण, पौलाने म्हटल्याप्रमाणे, यामुळे आपण सांत्वनाची गरज असलेल्यांना सांत्वन देण्यास सुसज्ज होऊ शकतो. म्हणून, आपण आपल्या बंधुभगिनींच्या दुःखांकडे लक्ष देऊ या, आणि आपला देव यहोवा याचे अनुकरण करून इतरांना सांत्वन देऊ या.