व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या एकनिष्ठतेची आणि क्षमाशीलतेची कदर करा

यहोवाच्या एकनिष्ठतेची आणि क्षमाशीलतेची कदर करा

“हे प्रभू, तू चांगला आहेस आणि क्षमा करायला तयार आहेस, आणि जे सर्व तुला हाक मारतात त्यांच्यावर उदंड प्रेमदया करणारा आहेस.”—स्तो. ८६:५, पं.र.भा.

१, २. (क) क्षमा करण्यास तयार असलेल्या व एकनिष्ठ मित्रांची आपण कदर का करतो? (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांची चर्चा करणार आहोत?

 खऱ्‍या मित्राची व्याख्या तुम्ही कशी कराल? ॲश्‍ली नावाची एक ख्रिस्ती बहीण म्हणते, “माझ्या मते, खरा मित्र तो असतो, जो नेहमी तुम्हाला मदत करायला आणि तुम्ही चुकता तेव्हा तुम्हाला माफ करायला तयार असतो.” एकमेकांना निष्ठावान असणाऱ्‍या व एकमेकांच्या चुका माफ करणाऱ्‍या मित्रांबद्दल आपल्या सर्वांनाच कदर वाटते. असे मित्र आपल्यावर प्रेम करतात व त्यांच्या सहवासात आपल्याला सुरक्षित वाटते.—नीति. १७:१७.

यहोवाइतका एकनिष्ठ आणि क्षमाशील मित्र आपल्याकरता आणखी कोणीच असू शकत नाही. यहोवाबद्दल स्तोत्रकर्त्याने असे म्हटले: “हे प्रभू, तू चांगला आहेस आणि क्षमा करायला तयार आहेस, आणि जे सर्व तुला हाक मारतात त्यांच्यावर उदंड प्रेमदया [किंवा, “एकनिष्ठ प्रेम”] करणारा आहेस.” (स्तो. ८६:५) तर मग, एकनिष्ठ असणे आणि क्षमाशील असणे यांचा काय अर्थ होतो? हे सुंदर गुण यहोवा कशा प्रकारे दाखवतो? आणि हे गुण दाखवण्याच्या बाबतीत आपण त्याचे अनुकरण कसे करू शकतो? या प्रश्‍नांची उत्तरे, आपल्याला आपला खास मित्र, यहोवा याच्याबद्दलचे आपले प्रेम आणखी गाढ करण्यास मदत करतील. शिवाय, त्यामुळे एकमेकांसोबतची आपली मैत्री आणखी मजबूत करण्यासही आपल्याला मदत मिळेल.—१ योहा. ४:७, ८.

यहोवा एकनिष्ठ आहे

३. एकनिष्ठ असणे याचा काय अर्थ होतो?

एकनिष्ठा हा एक प्रेमळ गुण आहे ज्यात समर्पित वृत्ती आणि विश्‍वासूपणा यांचा समावेश होतो. एकनिष्ठ व्यक्‍ती चंचल नसते. त्याउलट, ती प्रेमळपणे एखाद्या व्यक्‍तीला (किंवा गोष्टीला) जडून राहते, अगदी कठीण परिस्थितीतसुद्धा. खरोखर, यहोवाइतका “एकनिष्ठ” कोणीच नाही.—प्रकटी. १६:५, NW.

४, ५. (क) यहोवा कशा प्रकारे एकनिष्ठा दाखवतो? (ख) यहोवा त्याच्या उपासकांशी एकनिष्ठेने वागतो यावर मनन केल्याने आपल्याला कशा प्रकारे प्रोत्साहन मिळू शकते?

यहोवा कशा प्रकारे एकनिष्ठा दाखवतो? तो कधीही त्याच्या विश्‍वासू उपासकांचा त्याग करत नाही. यहोवा आपल्या उपासकांना कसा एकनिष्ठ राहतो याविषयी त्याच्या एका उपासकाने, म्हणजे दावीद राजाने सांगितले. (२ शमुवेल २२:२६ वाचा. *) दावीद संकटांत होता तेव्हा यहोवाने एकनिष्ठपणे त्याचे मार्गदर्शन केले, त्याचे संरक्षण केले आणि त्याला संकटांतून सोडवले. (२ शमु. २२:१) दाविदाला माहीत होते, की यहोवा आपली एकनिष्ठा केवळ शब्दांतूनच व्यक्‍त करत नाही, तर ती कार्यांतून दाखवतो. यहोवा दाविदाशी एकनिष्ठेने का वागला? कारण दावीद स्वतः ‘एकनिष्ठ’ पुरुष होता. यहोवाला आपल्या उपासकांची एकनिष्ठा पाहून खूप आनंद होतो, आणि म्हणून तोदेखील त्यांना एकनिष्ठ राहतो.—नीति. २:६-८.

यहोवा त्याच्या उपासकांशी कसा एकनिष्ठेने वागतो यावर मनन केल्याने आपल्याला प्रोत्साहन मिळते. रीड नावाच्या एका विश्‍वासू बांधवाने असे म्हटले: “दावीद संकटांत असताना यहोवा त्याच्याशी ज्या प्रकारे वागला त्याविषयी वाचल्यामुळं मला खूप साहाय्य मिळतं. दावीद जीव मुठीत घेऊन पळत होता, वेगवेगळ्या गुहांमध्ये लपत होता अशा वेळीसुद्धा यहोवानं नेहमी त्याचा सांभाळ केला. याबद्दल वाचून मला खूप दिलासा मिळतो! यामुळं मला हे आठवणीत ठेवण्यास मदत मिळते, की परिस्थिती कोणतीही असो, कितीही निराशाजनक असो, मी यहोवाला एकनिष्ठ राहिलो तर तो नेहमीच माझा सांभाळ करेल.” तुमच्याही भावना अशाच असतील यात काही शंका नाही.—रोम. ८:३८, ३९.

६. यहोवा आणखी कोणकोणत्या मार्गांनी एकनिष्ठा दाखवतो, आणि यामुळे त्याच्या उपासकांना कोणता फायदा होतो?

यहोवा आणखी कोणकोणत्या मार्गांनी एकनिष्ठा दाखवतो? तो नेहमी त्याच्या स्तरांना जडून राहतो. तो आपल्याला असे आश्‍वासन देतो: “तुमच्या वृद्धापकाळापर्यंतही मीच तो आहे.” (यश. ४६:४) बऱ्‍या-वाइटाबद्दलचे त्याचे स्तर बदलत नाहीत. या न बदलणाऱ्‍या स्तरांच्या आधारावरच तो नेहमी निर्णय घेतो. (मला. ३:६) शिवाय, यहोवाने जे अभिवचन दिले आहे ते पूर्ण करण्याद्वारे तो एकनिष्ठा दाखवतो. (यश. ५५:११) यहोवाच्या एकनिष्ठेमुळे त्याच्या सर्वच विश्‍वासू उपासकांना फायदा होतो. तो कसा? आपण यहोवाच्या स्तरांना जडून राहण्यासाठी होता होईल तितके प्रयत्न करतो, तेव्हा आपण ही खातरी बाळगू शकतो की आपल्याला आशीर्वादित करण्याचे त्याचे अभिवचन तो नक्कीच पूर्ण करेल.—यश. ४८:१७, १८.

यहोवाच्या एकनिष्ठेचे अनुकरण करा

७. आपण कोणत्या एका मार्गाने देवाच्या एकनिष्ठेचे अनुकरण करू शकतो?

  आपण यहोवाच्या एकनिष्ठेचे अनुकरण कसे करू शकतो? जे लोक समस्यांना तोंड देत आहेत अशांना मदत करण्याद्वारे आपण यहोवाचे अनुकरण करू शकतो. (नीति. ३:२७) उदाहरणार्थ, आरोग्याच्या समस्यांमुळे, कुटुंबातील सदस्यांकडून होणाऱ्‍या विरोधामुळे, किंवा वैयक्‍तिक दुर्बलतांमुळे एखादा बंधू किंवा भगिनी निराश असल्याचे तुम्हाला माहीत आहे का? तर मग, अशा बंधू किंवा भगिनीसोबत “चांगले व सांत्वनदायक शब्द” बोलण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ शकता का? (जख. १:१३) * बायबल म्हणते की “एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणास धरून राहतो.” खरेच, तुम्ही आपल्या बंधुभगिनींना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेता तेव्हा तुम्ही हे दाखवता की तुम्ही त्यांचे एकनिष्ठ व खरे मित्र आहात.—नीति. १८:२४.

८. आपण वैवाहिक जीवनात यहोवाच्या एकनिष्ठेचे अनुकरण कसे करू शकतो?

आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना विश्‍वासू राहण्याद्वारेही आपण यहोवाच्या एकनिष्ठेचे अनुकरण करू शकतो. उदाहरणार्थ, जर आपण विवाहित असू, तर आपल्या विवाहसोबत्याला आपण विश्‍वासू राहिले पाहिजे हे आपल्याला माहीत आहे. (नीति. ५:१५-१८) म्हणून, आपण असे काहीच करणार नाही ज्यामुळे व्यभिचार करण्यास आपण प्रवृत्त होऊ. (मत्त. ५:२८) शिवाय, आपण आपल्या बंधुभगिनींविरुद्ध चुगल्या-चहाड्या करून त्यांची बदनामी करणार नाही किंवा अशा चहाड्या आपण ऐकणारसुद्धा नाही. अशा प्रकारे, आपण दाखवतो की आपण आपल्या बंधुभगिनींना एकनिष्ठ आहोत.—नीति. १२:१८.

९, १०. (क) आपण खासकरून कोणाला एकनिष्ठ राहू इच्छितो? (ख) यहोवाच्या आज्ञांचे पालन करणे नेहमीच सोपे का नसते?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण यहोवाला एकनिष्ठ राहू इच्छितो. हे आपण कसे करू शकतो? यहोवाचा दृष्टिकोन आत्मसात करण्याद्वारे; म्हणजे यहोवा ज्या गोष्टींवर प्रेम करतो त्यांवर प्रेम करण्याद्वारे आणि तो ज्या गोष्टींचा द्वेष करतो त्यांचा द्वेष करण्याद्वारे. तसेच, यहोवाच्या इच्छेनुसार वागण्याद्वारेदेखील आपण यहोवाला एकनिष्ठ राहू शकतो. (स्तोत्र ९७:१० वाचा.) आपण जितका अधिक यहोवासारखा विचार करू, तितके अधिक त्याच्या आज्ञांचे पालन करण्यास आपण प्रवृत्त होऊ.—स्तो. ११९:१०४.

१० हे खरे आहे, की यहोवाच्या आज्ञांचे पालन करणे नेहमीच सोपे नसते. त्याला एकनिष्ठ राहण्यासाठी आपल्याला कदाचित संघर्ष करावा लागेल. उदाहरणार्थ, एक अविवाहित ख्रिस्ती बहीण लग्न करू इच्छित असेल. पण, अजूनही तिला यहोवाच्या उपासकांमध्ये योग्य साथीदार मिळाला नसेल. (१ करिंथ. ७:३९) सत्यात नसलेले तिचे सहकर्मचारी तिचे लग्न जुळवून देण्याच्या हेतूने कोणाशीतरी तिची भेट घालून देण्याचा सतत प्रयत्न करत असतील. ती एकाकीपणाच्या भावनांशी झुंजत असली, तरी ती यहोवाला विश्‍वासू राहण्याचा आपला निर्धार आणखी दृढ करते. एकनिष्ठा दाखवण्याच्या बाबतीत उत्तम उदाहरण मांडणाऱ्‍या अशा बंधुभगिनींबद्दल आपल्याला मनापासून कदर वाटत नाही का? समस्यांचा सामना करत असूनही जे लोक यहोवाला विश्‍वासू राहतात अशा सर्वांना तो नक्कीच आशीर्वादित करेल.—इब्री ११:६.

“एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणास धरून राहतो.”—नीति. १८:२४ ( परिच्छेद ७ पाहा)

“एकमेकांना क्षमा करा.”—इफिस. ४:३२ ( परिच्छेद १६ पाहा)

यहोवा क्षमाशील आहे

११. क्षमाशील असण्याचा काय अर्थ होतो?

११ यहोवाच्या अप्रतिम गुणांपैकी आणखी एक गुण म्हणजे त्याची क्षमाशीलता. क्षमाशील असण्याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ, आपल्याविरुद्ध अपराध करणारी व्यक्‍ती मनापासून पश्‍चात्ताप करत असेल, तर तिला क्षमा करणे असा होतो. पण, क्षमा करणारी व्यक्‍ती अपराध खपवून घेते किंवा तो घडलाच नाही असे मानते असा याचा मुळीच अर्थ होत नाही. त्याऐवजी, त्या अपराधाबद्दल मनात राग न बाळगण्याचे ती व्यक्‍ती ठरवते. बायबल शिकवते, की आपल्या अपराधांबद्दल मनापासून पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांना यहोवा “क्षमा करायला तयार” असतो.—स्तो. ८६:५.

१२. (क) यहोवा क्षमा करण्यास तयार आहे हे तो कसे दाखवतो? (ख) एखाद्याचे पाप ‘पुसून टाकणे’ याचा काय अर्थ होतो?

१२ यहोवा क्षमा करण्यास तयार आहे हे तो कसे दाखवतो? जेव्हा यहोवा क्षमा करतो, तेव्हा तो “भरपूर” क्षमा करतो; तो पूर्णपणे आणि नेहमीसाठी क्षमा करतो. (यश. ५५:७) यहोवा पूर्णपणे क्षमा करतो असे आपण का म्हणू शकतो? प्रेषितांची कृत्ये ३:१९ (वाचा.) मध्ये असलेल्या आश्‍वासनाकडे लक्ष द्या. प्रेषित पेत्राने त्याच्या श्रोत्यांना “पश्‍चात्ताप करा व वळा” असे आर्जवले. जेव्हा एक व्यक्‍ती मनापासून पश्‍चात्ताप करते, तेव्हा तिला आपल्या चुकीबद्दल मनापासून खेद वाटतो आणि तो अपराध पुन्हा न करण्याचा दृढनिश्‍चयदेखील ती करते. (२ करिंथ. ७:१०, ११) शिवाय, खऱ्‍या पश्‍चात्तापामुळे एक व्यक्‍ती आपल्या पापापासून ‘वळण्यास,’ म्हणजे चुकीचा मार्ग सोडण्यास आणि ज्या मार्गावर चालल्याने यहोवाला आनंद होईल अशा मार्गावर चालत राहण्यास ती प्रवृत्त होते. पेत्राच्या श्रोत्यांनी अशा प्रकारे पश्‍चात्ताप दाखवला असता, तर त्याचा काय परिणाम झाला असता? पेत्राने म्हटले, की त्यामुळे त्यांची पापे “पुसून टाकली” गेली असती. तेव्हा, आपण असे म्हणू शकतो की जेव्हा यहोवा क्षमा करतो, तेव्हा तो जणू पाटीवरील मजकूर पुसून टाकतो. याचाच अर्थ, तो पूर्णपणे क्षमा करतो.—इब्री १०:२२; १ योहा. १:७.

१३. “त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही” या शब्दांवरून आपल्याला कोणते आश्‍वासन मिळते?

१३ यहोवा जेव्हा क्षमा करतो तेव्हा तो नेहमीसाठी क्षमा करतो असे आपण का म्हणू शकतो? अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसोबत करण्यात आलेल्या नवीन कराराविषयी यिर्मयाने केलेल्या भविष्यवाणीचा विचार करा. या करारामुळे, खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांना खऱ्‍या अर्थाने क्षमा मिळणे शक्य होते. (यिर्मया ३१:३४ वाचा.) यहोवा म्हणतो: “मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही.” असे म्हणण्याद्वारे यहोवा आपल्याला हे आश्‍वासन देतो, की एकदा का त्याने आपले पाप क्षमा केले की मग त्या पापांबद्दल तो भविष्यात आपल्याला कधीच दोषी ठरवणार नाही. आपल्याला पुनःपुन्हा दंड देण्याच्या उद्देशाने तो त्या पापांचा विचारसुद्धा करत नाही. त्याऐवजी, यहोवा आपले पाप क्षमा करतो आणि नेहमीसाठी त्या पापांकडे पाठ फिरवतो.—रोम. ४:७, ८.

१४. यहोवाच्या क्षमाशीलतेबद्दल मनन केल्यास आपल्याला कशा प्रकारे सांत्वन मिळू शकते? एक उदाहरण द्या.

१४ यहोवाच्या क्षमाशीलतेबद्दल मनन केल्यास आपल्याला सांत्वन मिळू शकते. एक उदाहरण पाहा. एका ख्रिस्ती बहिणीला, जिला आपण इलेन म्हणू यात, अनेक वर्षांपूर्वी बहिष्कृत करण्यात आले होते. कितीतरी वर्षांनंतर तिचा मंडळीत पुन्हा स्वीकार करण्यात आला. इलेन सांगते: “यहोवानं मला क्षमा केली आहे असा माझा विश्‍वास असल्याचं मी स्वतःला समजावलं होतं आणि इतरांनाही तसं सांगितलं होतं. पण, मला नेहमी वाटायचं की तो माझ्यापासून दूर आहे आणि इतर जण त्याच्या अगदी जवळ आहेत व त्यांच्याकरता तो खरा आहे.” पण, यहोवाच्या क्षमाशीलतेचे वर्णन करण्यासाठी बायबलमध्ये दिलेल्या काही शब्दचित्रांचे वाचन व त्यांवर मनन केल्याने इलेनला दिलासा मिळाला. इलेन पुढे म्हणते: “यामुळं, मी यहोवाचं प्रेम व कोमलता अनुभवली, जी मी याआधी कधीच अनुभवली नव्हती.” तिला विशेषकरून या विचारामुळे सांत्वन मिळाले: “यहोवा आपल्या पातकांची क्षमा करतो तेव्हा आपण असे समजू नये की अशा पापांचे डाग आपल्यावर आयुष्यभर राहतील.” * इलेन म्हणते: “मला कळून चुकलंय की यहोवा मला पूर्णपणे क्षमा करू शकतो असा माझा विश्‍वास नव्हता, आणि त्यामुळं मी असा विचार केला होता की आयुष्यभर मला हा भार वाहावा लागेल. मला माहीतंय की यहोवाच्या आणखी जवळ जाण्यासाठी वेळ लागेल, पण हे शक्य आहे असं मला वाटू लागलंय. आणि मला असंही वाटतं की माझ्या मनावरचा भार हलका झाला आहे.” खरोखर, आपला देव किती प्रेमळ व क्षमाशील आहे!—स्तो. १०३:९.

यहोवाच्या क्षमाशीलतेचे अनुकरण करा

१५. आपण यहोवाच्या क्षमाशीलतेचे अनुकरण कसे करू शकतो?

१५ जे मनापासून पश्‍चात्ताप करतात त्यांना क्षमा करण्याद्वारे आपण यहोवाच्या क्षमाशीलतेचे अनुकरण करू शकतो. (लूक १७:३, ४ वाचा.) आठवणीत ठेवा, की जेव्हा यहोवा क्षमा करतो तेव्हा तो आपले पाप विसरतो; म्हणजे त्या पापांसाठी आपल्याला वारंवार दोषी ठरवत नाही. आपण जेव्हा इतरांना क्षमा करतो, तेव्हा आपणही इतरांचे अपराध विसरले पाहिजे; म्हणजे भविष्यात आपण पुनःपुन्हा त्या अपराधांची आठवण काढू नये.

१६. (क) क्षमा करणे याचा अर्थ, अपराध खपवून घेणे किंवा इतरांना आपला गैरफायदा घेऊ देणे असा होतो का? स्पष्ट करा. (ख) देवाने आपल्याला क्षमा करावी असे जर आपल्याला वाटत असेल, तर आपण काय केले पाहिजे?

 १६ क्षमा करणे याचा अर्थ, अपराध खपवून घेणे किंवा इतरांना आपला गैरफायदा घेऊ देणे असा होत नाही. तर, त्या अपराधाबद्दल मनात राग न बाळगणे असा त्याचा अर्थ होतो. आणि महत्त्वाचे म्हणजे, देवाने आपल्याला क्षमा करावी असे जर आपल्याला वाटत असेल, तर आपणही इतरांना क्षमा केली पाहिजे. (मत्त. ६:१४, १५) यहोवा हे नेहमी आठवणीत ठेवतो, की आपण “केवळ माती आहो,” म्हणजे आपण अपरिपूर्ण आहोत. (स्तो. १०३:१४) तर मग, इतर जण आपल्याविरुद्ध अपराध करतात तेव्हा आपणसुद्धा हे आठवणीत ठेवले पाहिजे, की तेदेखील आपल्याप्रमाणेच अपरिपूर्ण आहेत, आणि आपण त्यांना मनापासून क्षमा केली पाहिजे.—इफिस. ४:३२; कलस्सै. ३:१३.

क्षमा मिळवण्यासाठी आपण मनापासून प्रार्थना करू या ( परिच्छेद १७ पाहा)

१७. एखाद्या बंधू किंवा भगिनीने आपले मन दुखावले असेल, तर कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते?

 १७ अर्थात, क्षमा करणे नेहमीच सोपे नसते. पहिल्या शतकातील काही अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनाही आपसातील मतभेद मिटवणे कठीण वाटले होते. (फिलिप्पै. ४:२) जर एखाद्या बंधू किंवा भगिनीने आपले मन दुखावले असेल, तर कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते? ईयोबाचा विचार करा. त्याचे मित्र, अलीफज, बिल्दद आणि सोफर यांनी त्याच्यावर आधारहीन आरोप लावले तेव्हा त्याला खूप दुःख झाले होते. (ईयो. १०:१; १९:२) सरतेशेवटी, यहोवाने ईयोबावर खोटे आरोप लावणाऱ्‍यांना ताडन दिले. देवाने त्यांना ईयोबाकडे जाण्यास आणि त्यांच्या पापांकरता अर्पण सादर करण्यास सांगितले. (ईयो. ४२:७-९) पण, ईयोबानेही काहीतरी करावे असे यहोवाने म्हटले. त्याने म्हटले, की ईयोबाने आरोप लावणाऱ्‍यांकरता प्रार्थना करावी. यहोवाच्या म्हणण्याप्रमाणे ईयोबाने केले आणि त्याच्या या क्षमाशील मनोवृत्तीमुळे यहोवाने त्याला आशीर्वादित केले. (ईयोब ४२:१०, १२, १६, १७ वाचा.) यावरून आपण काय शिकू शकतो? हेच की कोणी आपले मन दुखावले असेल, तर आपण त्याच्यासाठी प्रार्थना केल्यास, त्याच्याबद्दल मनात राग न बाळगण्यास आपल्याला साहाय्य मिळेल.

यहोवाच्या गुणांची मनापासून कदर करत राहा

१८, १९. आपण कशा प्रकारे यहोवाच्या प्रेमळ व्यक्‍तिमत्त्वाबद्दल आपली कदर आणखी वाढवू शकतो?

१८ यहोवाच्या प्रेमळ व्यक्‍तिमत्त्वातील विविध गुणांबद्दल चर्चा केल्याने आपल्याला नक्कीच उत्तेजन मिळाले आहे. आपण पाहिले, की आपण यहोवाकडे निःसंकोचपणे जावे असे त्याला वाटते, तो निःपक्षपाती, उदार, समंजस, एकनिष्ठ आणि क्षमाशील आहे. अर्थात, यहोवाबद्दल आणखी अगणित गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. सदासर्वकाळ त्याच्याबद्दल शिकत राहण्याचा आनंद आपल्याला लाभणार आहे. (उप. ३:११) या बाबतीत आपण प्रेषित पौलाच्या शब्दांशी सहमत आहोत. त्याने असे लिहिले: “अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे!” यहोवाचे प्रेम आणि त्याच्या ज्या सहा गुणांविषयी आपण शिकलो त्यांच्याबद्दल असेच म्हणता येईल.—रोम. ११:३३.

१९ तेव्हा, आपण सर्वच जण यहोवाच्या प्रेमळ व्यक्‍तिमत्त्वाबद्दल आपली कदर वाढवत राहू या. त्याच्या गुणांविषयी जाणून घेण्याद्वारे, त्यांच्यावर मनन करण्याद्वारे आणि आपल्या जीवनात ते गुण लागू करण्याद्वारे आपण असे करू शकतो. (इफिस. ५:१) असे केल्यास, आपणही स्तोत्रकर्त्याच्या भावनांशी सहमत होऊ. त्याने म्हटले: “माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे यातच माझे कल्याण आहे.”—स्तो. ७३:२८.

^ दुसरे शमुवेल २२:२६ (मराठी कॉमन लँग्वेज): “निष्ठावंतांशी तू निष्ठेने वागतोस, सरळाशी सरळ आहेस.”

^ या बाबतीत मार्गदर्शक सूचनांसाठी, टेहळणी बुरूज, १५ जानेवारी १९९५ अंकातील “तुम्ही अलीकडेच एखाद्याला उत्तेजन दिले आहे काय?” आणि १ एप्रिल १९९५ अंकातील “प्रीती व सत्कर्मे करण्यासाठी उत्तेजन द्या—कशा प्रकारे?” हे लेख पाहा.