व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही कशा प्रकारची व्यक्‍ती बनू इच्छिता?

तुम्ही कशा प्रकारची व्यक्‍ती बनू इच्छिता?

“पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत राहून . . . तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?”—२ पेत्र ३:११.

१, २. देवाला आनंदित करण्यासाठी आपण कशा प्रकारचे लोक असणे गरजेचे आहे?

 इतरांचे आपल्याबद्दल काय मत आहे, याबद्दल सहसा अनेकांना काळजी असते. पण, ख्रिस्ती या नात्याने इतर कोणाही पेक्षा यहोवाचे आपल्याबद्दल काय मत आहे याचीच आपल्याला जास्त काळजी असू नये का? कारण शेवटी, तो सबंध विश्‍वातील सर्वश्रेष्ठ व्यक्‍ती असून सर्वांना जीवन देणाराही तोच आहे.—स्तो. ३६:९.

यहोवाच्या दृष्टिकोनातून आपण “कशा प्रकारचे लोक” असायला हवे यावर जोर देत प्रेषित पेत्राने आपल्याला “पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत” चालण्याचे प्रोत्साहन दिले. (२ पेत्र ३:११ वाचा.) देवाला आनंदित करण्यासाठी आपली ‘वर्तणूक’ पवित्र असली पाहिजे. म्हणजेच, नैतिक, मानसिक व आध्यात्मिक दृष्टीने ती शुद्ध असली पाहिजे. तसेच, आपण “सुभक्‍तीत” राहिले पाहिजे, म्हणजेच आपल्या कृतींतून देवाबद्दल आपल्याला असलेला गाढ आदर व एकनिष्ठा दिसून आली पाहिजे. यावरून स्पष्ट होते, की देवाला आनंदित करण्यात फक्‍त आपली वर्तणूकच नव्हे तर आपल्या हृदयातील भावनादेखील समाविष्ट आहेत. यहोवा “हृदयांची पारख” करणारा आहे; त्यामुळे, आपली वर्तणूक पवित्र आहे किंवा नाही, तसेच आपण खरोखर सुभक्‍तीने चालत आहोत किंवा नाही हे तो ओळखू शकतो.—१ इति. २९:१७.

३. देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाच्या बाबतीत आपण कोणते प्रश्‍न विचारात घेतले पाहिजेत?

आपण देवाला आनंदित करण्याचा प्रयत्न करावा असे दियाबल सैतानाला मुळीच वाटत नाही. किंबहुना, आपण यहोवासोबतचा आपला नातेसंबंध तोडून टाकावा असाच सैतानाचा प्रयत्न असतो. आपल्याला भुलवण्यासाठी व देवापासून दूर नेण्यासाठी तो लबाडी व फसवणूक करण्यासही मागेपुढे पाहत नाही. (योहा. ८:४४; २ करिंथ. ११:१३-१५) म्हणूनच आपण स्वतःला हे प्रश्‍न विचारले पाहिजेत: ‘सैतान कशा प्रकारे लोकांची फसवणूक करतो? यहोवासोबतच्या माझ्या नातेसंबंधाचे रक्षण करण्यासाठी मला काय करता येईल?’

सैतान कशा प्रकारे लोकांची फसवणूक करतो?

४. देवासोबतचा आपला नातेसंबंध तोडून टाकण्यासाठी सैतान काय करण्याचा प्रयत्न करतो, आणि का?

शिष्य याकोबाने लिहिले: “प्रत्येक जण त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार मोहात पडतो. तो आकृष्ट केला जातो व मोहात पडतो. मनात वासना निर्माण झाली की, तिच्या पोटी पापाचा जन्म होतो व पापाची जेव्हा पूर्ण वाढ होते तेव्हा ते मरणाला जन्म देते.” (याको. १:१४, १५, ईझी-टू-रीड व्हर्शन) देवासोबतचा आपला नातेसंबंध तोडून टाकण्यासाठी सैतान प्रामुख्याने आपल्या हृदयाला लक्ष्य बनवतो कारण आपल्या इच्छा व आकांक्षा हृदयातूनच उत्पन्‍न होतात.

५, ६. (क) सैतान कशाचा उपयोग करून आपल्याला त्याचे लक्ष्य बनवतो? (ख) आपल्या हृदयात अयोग्य इच्छा उत्पन्‍न करण्याच्या प्रयत्नात सैतान कोणत्या प्रलोभनांचा वापर करतो, आणि तो केव्हापासून त्यांचा वापर करत आला आहे?

आपल्या हृदयाला लक्ष्य बनवण्यासाठी सैतान कशाचा उपयोग करतो? बायबल सांगते, “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहा. ५:१९) या जगातील गोष्टींचा शस्त्रांच्या रूपात वापर करून सैतान आपल्या हृदयावर वार करतो. (१ योहान २:१५, १६ वाचा.) मागील हजारो वर्षांदरम्यान दियाबलाने या जगात त्याच्या दुष्ट हेतूंना पोषक ठरेल असे वातावरण निर्माण केले आहे. आपण या जगात राहत असल्यामुळे त्याच्या कावेबाज युक्त्यांपासून नेहमी सावध राहिले पाहिजे.—योहा. १७:१५.

सैतान निरनिराळ्या मार्गांनी आपल्या हृदयात अयोग्य इच्छा उत्पन्‍न करण्याचा प्रयत्न करतो. प्रेषित योहानाने सैतानाद्वारे वापरल्या जाणाऱ्‍या अशा तीन मार्गांचा उल्लेख केला: (१) “देहाची वासना,” (२) “डोळ्यांची वासना” आणि (३) “संसाराविषयीची फुशारकी.” येशू अरण्यात गेला असताना सैतानाने या मार्गांचा वापर करून त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला होता. वर्षानुवर्षे अशा पाशांचा उपयोग केला असल्यामुळे आज सैतान अगदी सराईतपणे त्यांचा वापर करतो. प्रत्येक मनुष्याच्या मनाचा कल ओळखून तो त्यानुसार त्याला मोहात पाडतो. या बाबतीत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण कोणती पावले उचलू शकतो हे आपण नंतर पाहणार आहोत. पण त्याआधी, दियाबलाने हव्वेच्या बाबतीत विशिष्ट प्रलोभने यशस्वीपणे कशी वापरली, पण तीच प्रलोभने देवाच्या पुत्राच्या बाबतीत वापरण्यात तो कशा प्रकारे अपयशी ठरला हे आपण पाहू या.

“देहाची वासना”

हव्वा ‘देहाच्या वासनेमुळे’ मोहाला बळी पडली (७ वा परिच्छेद पाहा)

७. हव्वेला मोहात पाडण्यासाठी सैतानाने ‘देहाच्या वासनेचा’ कशा प्रकारे उपयोग केला?

जिवंत राहण्यासाठी सर्वच मानवांना अन्‍नाची गरज असते. आपल्या निर्माणकर्त्याने पृथ्वीची अशा प्रकारे सृष्टी केली, की ती भरपूर अन्‍न उपजवू शकेल. पण, अन्‍नाच्या या स्वाभाविक इच्छेचा उपयोग करून सैतान आपल्याला देवाच्या इच्छेविरुद्ध वागण्यास प्रवृत्त करू शकतो. हव्वेच्या बाबतीत त्याने हे कसे केले ते पाहा. (उत्पत्ति ३:१-६ वाचा.) सैतानाने हव्वेला सांगितले की तिने “बऱ्‍यावाइटाचे ज्ञान करून” देणाऱ्‍या झाडाचे फळ खाल्ले तरीसुद्धा ती मरणार नाही. उलट ज्या दिवशी ती ते फळ खाईल त्या दिवशी ती देवासारखी बनेल असे त्याने सांगितले. (उत्प. २:९) अशा रीतीने, सैतानाने हव्वेला असे पटवून देण्याचा प्रयत्न केला की जिवंत राहण्यासाठी तिने देवाला आज्ञाधारक राहण्याची गरज नव्हती. पण हे साफ खोटे होते! हव्वेच्या मनात सैतानाने ही कल्पना घातली तेव्हा तिच्यापुढे दोन पर्याय होते. ती एकतर त्या कल्पनेला मनातून काढून टाकू शकत होती किंवा ती कल्पना आपल्या मनात घोळत ठेवू शकत होती. मग, हव्वेने काय केले? बागेतील इतर सर्व झाडांची फळे खाण्याची मोकळीक असूनही हव्वा बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाविषयी सैतानाने जे म्हटले होते त्याचाच विचार करत राहिली. परिणामस्वरूप, मना केलेल्या झाडाचे फळ खाण्याची इच्छा तिच्या हृदयात बळावली आणि “तिने त्याचे फळ काढून खाल्ले.” अशा रीतीने, निर्माणकर्त्याने ज्या गोष्टीची मनाई केली होती नेमक्या त्याच गोष्टीची इच्छा सैतानाने हव्वेच्या मनात उत्पन्‍न केली.

येशूने कोणत्याही गोष्टीमुळे आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही (८ वा परिच्छेद पाहा)

८. ‘देहाच्या वासनेचा’ उपयोग करून सैतानाने येशूला मोहात पाडण्याचा कशा प्रकारे प्रयत्न केला, आणि तो अपयशी का ठरला?

अरण्यात येशूची परीक्षा पाहण्यासाठीही सैतानाने तीच युक्‍ती वापरली. ४० दिवस व ४० रात्रींचा उपवास केल्यानंतर येशू भुकेला आहे हे ओळखून सैतानाने त्याच्या या स्वाभाविक इच्छेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. सैतानाने म्हटले, “तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्यास भाकर हो असे सांग.” (लूक ४:१-३) येशूसमोर दोन पर्याय होते: अन्‍नाची आपली गरज भागवण्यासाठी तो त्याच्या चमत्कारिक शक्‍तीचा वापर करण्यास एकतर नकार देऊ शकत होता किंवा मग त्या शक्‍तीचा वापर करण्याचे ठरवू शकत होता. या शक्‍तीचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग करणे योग्य ठरणार नाही हे येशूला ठाऊक होते. तो भुकेला होता हे खरे आहे. पण आपली भूक भागवणे हे त्याच्यासाठी यहोवासोबतचा नातेसंबंध टिकवून ठेवण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे नव्हते. त्यामुळे येशूने उत्तर दिले, “‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्‍वराच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल.’”—मत्त. ४:४; लूक ४:४.

“डोळ्यांची वासना”

९. “डोळ्यांची वासना” या शब्दांवरून काय सूचित होते आणि हव्वेच्या बाबतीत सैतानाने या प्रकारच्या प्रलोभनाचा कशा प्रकारे उपयोग केला?

योहानाने उल्लेख केलेले आणखी एक प्रकारचे प्रलोभन म्हणजे “डोळ्यांची वासना.” यावरून असे सूचित होते, की एखाद्या गोष्टीकडे नुसते पाहिल्यामुळेही त्या गोष्टीची इच्छा एखाद्या व्यक्‍तीच्या मनात उत्पन्‍न होऊ शकते. सैतानाने हव्वेला याच डोळ्यांच्या वासनेद्वारे मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. त्याने म्हटले: “तुमचे डोळे उघडतील.” मना केलेल्या त्या फळाकडे हव्वेने जितके जास्त पाहिले तितकेच ते तिला हवेहवेसे वाटू लागले. हव्वेने पाहिले की ते झाड “दिसण्यास मनोहर” होते.

१०. सैतानाने येशूला मोहात पाडण्यासाठी ‘डोळ्यांच्या वासनेचा’ कशा रीतीने उपयोग केला, आणि येशूने त्याला काय उत्तर दिले?

१० येशूच्या बाबतीत काय घडले? सैतानाने “[येशूला] जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखवली; आणि त्याला म्हटले, यांवरचा सर्व अधिकार व यांचे वैभव मी तुला देईन.” (लूक ४:५, ६) येशूला त्याच्या खऱ्‍याखुऱ्‍या डोळ्यांनी जगातील सर्व राज्ये एका क्षणात दिसणे शक्य नव्हते; पण या राज्यांचे ऐश्‍वर्य दृष्टान्तरूपात येशूला दाखवल्यास तो मोहात पडेल असे कदाचित सैतानाला वाटले असावे. सैतानाने निर्लज्जपणे येशूला म्हटले: “तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल.” (लूक ४:७) पण सैतान येशूला ज्या प्रकारची व्यक्‍ती बनवू इच्छित होता त्या प्रकारची व्यक्‍ती येशूला मुळीच बनायचे नव्हते. त्यामुळे त्याने क्षणाचाही विलंब न लावता सैतानाला असे उत्तर दिले: “‘परमेश्‍वर तुझा देव याला नमन कर व त्याचीच सेवा कर,’ असे शास्त्रात लिहिले आहे.”—लूक ४:८.

“संसाराविषयीची फुशारकी”

११. सैतानाने हव्वेला कशा प्रकारे मोहात पाडले?

११ जगातील गोष्टींचा उल्लेख करताना योहानाने ‘संसाराविषयीच्या फुशारकीचा’ उल्लेख केला. आदाम व हव्वा यांच्याशिवाय पृथ्वीवर कोणीही मानव नव्हते, तेव्हा साहजिकच त्यांना इतर लोकांपुढे “संसाराविषयीची फुशारकी” मारणे शक्य नव्हते. पण त्यांनी अहंकारीपणा नक्कीच दाखवला. हव्वेला मोहात पाडण्याचा प्रयत्न करताना सैतानाने असा दावा केला की देवाने अतिशय उत्तम असे काहीतरी तिच्यापासून राखून ठेवले होते. दियाबलाने तिला सांगितले की “बऱ्‍यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ” ती ज्या दिवशी खाईल त्याच दिवशी ती देवासारखी, बरेवाईट जाणणारी होईल. (उत्प. २:१७; ३:५) अशा रीतीने सैतानाने सुचवले की हव्वेला यहोवाच्या अधीन राहण्याची गरज नाही; ती त्याच्यापासून स्वतंत्र होऊ शकत होती. या लबाडीवर हव्वेने विश्‍वास ठेवण्यामागचे एक कारण म्हणजे तिचा अहंकार. आपण काही खरोखर मरणार नाही असे समजून, तिने मना केलेले फळ खाल्ले. पण हा तिचा ग्रह किती चुकीचा होता!

१२. सैतानाने येशूला आणखी कोणत्या एका मार्गाने मोहात पाडण्याचा प्रयत्न केला, आणि येशूची प्रतिक्रिया काय होती?

१२ हव्वेच्या अहंकारीपणाच्या तुलनेत येशूने नम्रता दाखवण्याच्या बाबतीत एक उत्तम उदाहरण मांडले! सैतानाने त्याला दुसऱ्‍या एका मार्गाने मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. पण एखादे विलक्षण कृत्य करून देवाची परीक्षा पाहण्याची कल्पनाही येशूने मनात येऊ दिली नाही. असे करणे अहंकारीपणाचे ठरले असते! त्याऐवजी येशूने सैतानाला अगदी स्पष्ट व सरळसरळ उत्तर दिले: “‘परमेश्‍वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको’ असे सांगितले आहे.”—लूक ४:९-१२ वाचा.

यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाचे रक्षण आपण कसे करू शकतो?

१३, १४. आज सैतान विशिष्ट प्रलोभनांचा कशा प्रकारे वापर करतो ते स्पष्ट करा.

१३ हव्वेला व येशूला मोहात पाडण्यासाठी वापरलेल्या प्रलोभनांचा सैतान आजही वापर करतो. ‘देहाच्या वासनांचा’ फायदा घेऊन तो लोकांना अनैतिक कृत्ये करण्याचे व खाण्यापिण्याच्या बाबतीत अतिरेक करण्याचे उत्तेजन देतो. ‘डोळ्यांच्या वासनेच्या’ साहाय्याने तो लोकांना अश्‍लील दृश्‍ये, विशेषतः इंटरनेटवरील पोर्नोग्राफी पाहण्याच्या मोहात पाडतो. तसेच, “संसाराविषयीची फुशारकी” मारण्याची इच्छा असलेल्यांना तो अहंकारी बनण्यास व सत्ता, प्रसिद्धी आणि अधिकाधिक धनसंपत्ती मिळवण्याच्या मागे लागण्यास प्रवृत्त करतो.

असे प्रसंग येतात तेव्हा बायबलमधील कोणत्या तत्त्वांची तुम्हाला आठवण झाली पाहिजे? (१३ वा व १४ वा परिच्छेद पाहा)

१४ ‘जगातील गोष्टी,’ मासे धरणाऱ्‍याने गळाला लावलेल्या आमिषासारख्या आहेत. ही आमिषे आकर्षक असली तरी त्या प्रत्येकाला एक आकडा जोडलेला असतो. लोकांना ज्या सर्वसामान्य, दैनंदिन गरजा वाटू शकतात त्यांचाच उपयोग करून कधीकधी सैतान त्यांना देवाच्या नियमांविरुद्ध वागण्यास लावतो. अशा प्रकारचे मोह आपल्याला लगेच ओळखता येत नाहीत, पण सैतान त्यांच्या साहाय्याने आपल्या इच्छांवर प्रभाव पाडण्याचा आणि आपल्या मनात अयोग्य इच्छा उत्पन्‍न करण्याचा प्रयत्न करतो. तो खरेतर आपल्याला असे पटवून देण्याचा प्रयत्न करतो, की देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यापेक्षा आपल्या वैयक्‍तिक गरजांचा व सुखसोयींचा विचार करणे जास्त महत्त्वाचे आहे. आपण अशा मोहांना भुलणार का?

१५. सैतानाच्या मोहांचा प्रतिकार करण्याच्या बाबतीत आपण येशूचे अनुकरण कसे करू शकतो?

१५ हव्वा सैतानाच्या मोहांना बळी पडली, पण येशूने मात्र त्यांचा यशस्वीपणे प्रतिकार केला. प्रत्येक वेळी त्याने, “असे शास्त्रलेखात लिहिले आहे” किंवा “असे सांगितले आहे” असे म्हणून शास्त्राच्या आधारावर उत्तर दिले. जर आपण बायबलचा परिश्रमपूर्वक अभ्यास करत असू, तर आपणही शास्त्रवचनांशी चांगल्या प्रकारे परिचित होऊ. आणि यामुळे, जेव्हा आपल्यासमोर मोहात पाडणारे प्रसंग येतील तेव्हा आपल्याला ही शास्त्रवचने मनात आणणे आणि योग्य प्रकारे विचार करणे शक्य होईल. (स्तो. १:१, २) देवाला एकनिष्ठ राहिलेल्या विश्‍वासू व्यक्‍तींची शास्त्रवचनांतील उदाहरणे आठवणीत आणल्यामुळे आपल्याला त्यांचे अनुकरण करण्यास मदत मिळेल. (रोम. १५:४) यहोवाबद्दल गाढ आदर बाळगल्यामुळे, तसेच त्याला प्रिय वाटणाऱ्‍या गोष्टी प्रिय मानल्यामुळे व त्याला ज्यांचा द्वेष आहे त्या गोष्टींचा द्वेष केल्यामुळे आपले संरक्षण होईल.—स्तो. ९७:१०.

१६, १७. आपण कशा प्रकारची व्यक्‍ती आहोत यावर आपल्या समजबुद्धीचा कसा प्रभाव पडू शकतो?

१६ जिच्या व्यक्‍तिमत्त्वाला जगाच्या नव्हे, तर देवाच्या विचारसरणीने आकार दिला आहे अशा प्रकारची व्यक्‍ती बनण्याकरता आपण आपल्या समजबुद्धीचा वापर करावा असे प्रोत्साहन प्रेषित पौल आपल्याला देतो. (रोम. १२:१, २) आपण कोणत्या गोष्टींना आपल्या मनात थारा देतो यावर कडक नियंत्रण ठेवण्याच्या गरजेवर जोर देत पौल म्हणतो: “तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो.” (२ करिंथ. १०:५) आपण कशा प्रकारची व्यक्‍ती आहोत यावर आपल्या विचारांचा जबरदस्त प्रभाव असतो. त्यामुळे, आपण सतत चांगल्या गोष्टींचे मनन केले पाहिजे.—फिलिप्पै. ४:८.

१७ जर आपण अयोग्य विचारांना व इच्छांना आपल्या मनात घर करू दिले, तर साहजिकच आपण पवित्र आहोत असे म्हणता येणार नाही. आपण “शुद्ध” अंतःकरणाने यहोवावर प्रीती करणे गरजेचे आहे. (१ तीम. १:५) पण हृदय हे कपटी असल्यामुळे जगातील गोष्टींचा आपल्यावर किती खोलवर प्रभाव पडत आहे हे कदाचित आपल्या लक्षातही येणार नाही. (यिर्म. १७:९) म्हणूनच, बायबलमधून आपण जे शिकतो त्याच्या आधारावर प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करून, आपण विश्‍वासात आहोत किंवा नाही याची “परीक्षा” करणे व आपली “प्रतीती” पाहणे महत्त्वाचे नाही का?—२ करिंथ. १३:५.

१८, १९. आपण ज्या प्रकारची व्यक्‍ती बनावे अशी यहोवाची इच्छा आहे त्याच प्रकारची व्यक्‍ती बनण्याचा संकल्प आपण का केला पाहिजे?

१८ जगातील गोष्टींचा प्रतिकार करण्यास आपली मदत करू शकेल अशी आणखी एक गोष्ट म्हणजे योहानाचे हे प्रेरित शब्द नेहमी आठवणीत ठेवणे: “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहा. २:१७) सैतानाच्या जगातील सर्व गोष्टी वास्तविक आणि कायम टिकून राहणाऱ्‍या आहेत असे कोणाला वाटू शकते. पण, एक ना एक दिवस त्यांचा निश्‍चितच अंत होईल. सैतानाच्या जगात आपण काहीही मिळवले तरी ते क्षणभंगुर आहे हे लक्षात ठेवल्यास आपण त्याच्या प्रलोभनांना कधीच भुलणार नाही.

१९ प्रेषित पेत्र आपल्याला आर्जव करतो, की “देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करत” असताना आपण देवाला आनंद वाटेल अशा प्रकारची व्यक्‍ती बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देवाच्या दिवसाविषयी तो म्हणतो, “त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टितत्त्वे तप्त होऊन वितळतील.” (२ पेत्र ३:११, १२) तो दिवस लवकरच येणार आहे आणि तेव्हा यहोवा सैतानाच्या जगाचा संपूर्ण विनाश करेल. पण तोपर्यंत, या जगातील गोष्टींचा उपयोग करून, सैतानाने ज्याप्रमाणे हव्वेला व येशूला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला होता, त्याप्रमाणे आपल्यालाही मोहात पाडण्याचा तो नक्कीच प्रयत्न करत राहील. आपण हव्वेसारखे होऊन स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याचा कधीही प्रयत्न करू नये. असे करणे सैतानाला आपला देव मानण्यासारखे ठरेल. त्याऐवजी आपण येशूसारखे होऊन अशा प्रलोभनांचा प्रतिकार केला पाहिजे, मग ती कितीही हवीहवीशी व आकर्षक वाटत असली तरीसुद्धा. तेव्हा, आपण ज्या प्रकारची व्यक्‍ती बनावे अशी यहोवाची इच्छा आहे त्याच प्रकारची व्यक्‍ती बनण्याचा संकल्प आपण सर्व जण करू या.