वाचकांचे प्रश्न
योहान ११:३५ या वचनात सांगितल्याप्रमाणे लाजराचे पुनरुत्थान करण्याआधी येशू का रडला?
आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तिला गमावल्याच्या दुःखामुळे साहजिकच आपण रडतो. येशूचे लाजराप्रती प्रेम होते, पण लाजराचा मृत्यू झाला म्हणून येशू रडला नाही; तर येशूला लाजराच्या नातेवाइकांप्रती कळवळा वाटला म्हणून तो रडला. हे योहानाच्या अहवालातील काही वचनांवरून लक्षात येते.—योहा. ११:३६.
लाजर आजारी असल्याचे येशू जेव्हा पहिल्यांदा ऐकतो तेव्हा तो लगेच त्याला बरे करण्यासाठी त्याच्या घरी जात नाही. अहवाल सांगतो: “[लाजर] आजारी आहे हे [येशूने] ऐकले तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी दोन दिवस राहिला.” (योहा. ११:६) त्याने असे का केले? यामागे काही कारण होते. येशू म्हणतो: “हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ म्हणजे त्याच्यायोगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे यासाठी आहे.” (योहा. ११:४) लाजराचा आजार “मरणासाठी” नव्हता, म्हणजेच त्याच्या आजाराचा शेवट मृत्यू असणार नव्हता. तर त्याच्या मृत्यूद्वारे येशू देवाचा गौरव करणार होता. ते कसे काय? येशू त्याचा प्रिय मित्र लाजर याला जिवंत करण्याद्वारे एक आश्चर्यकारक चमत्कार घडवून आणणार होता.
या प्रसंगी, येशूने त्याच्या शिष्यांशी बोलताना मृत्यूची तुलना झोपेशी केली. म्हणूनच तो त्यांना म्हणाला, “मी [लाजराला] झोपेतून उठवावयास जातो.” (योहा. ११:११) येशूच्या नजरेत लाजराला मृत्यूतून उठवणे हे जणू आईवडील आपल्या मुलाला झोपेतून उठवतात तसे होते. त्यामुळे, लाजराचा मृत्यू झाला या गोष्टीचे येशूला वाईट वाटण्याचे काही कारण नव्हते.
तर मग, येशूच्या रडण्यामागे काय कारण होते? आपल्याला याचे उत्तर अहवालात मिळते. येशू लाजराची बहीण मरीया हिला भेटला आणि तिला व इतर नातेवाइकांना त्याने रडताना पाहिले तेव्हा तो “आत्म्यात खवळला व विव्हळ झाला.” त्यांचे दुःख पाहून त्याला इतके वाईट वाटले की तो “आत्म्यात खवळला.” म्हणूनच, “येशू रडला.” आपल्या प्रिय जनांना इतके दुःखित झालेले पाहून त्याला खरेच खूप वाईट वाटले.—योहा. ११:३३, ३५.
या अहवालावरून कळते की, येणाऱ्या नवीन जगात आपल्या मरण पावलेल्या प्रिय जनांना उठवण्याची व त्यांना चांगले आरोग्य देण्याची शक्ती आणि क्षमता येशूकडे आहे. त्याचबरोबर, आपल्याला हेही समजते, की आदामाच्या पापामुळे ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले आहे त्यांच्याप्रती येशूला किती कळवळा आहे. आपल्याला या अहवालावरून हेसुद्धा शिकायला मिळते की प्रिय जनांच्या मृत्यूमुळे ज्यांना अतोनात दुःख झाले आहे त्यांच्या दुःखात आपणही सामील होणे गरजेचे आहे.
येशूला माहीत होते की तो लाजराला जिवंत करणार आहे. पण तरीही, आपल्या जवळच्या लोकांवर प्रेम असल्यामुळे त्यांचे दुःख पाहून त्याला कळवळा वाटला आणि म्हणून तो रडला. त्याचप्रमाणे, सहानुभूतीच्या भावनेमुळे कदाचित आपणही “शोक करणाऱ्यांबरोबर शोक” करण्यास प्रवृत्त होऊ. (रोम. १२:१५) याचा अर्थ आपला पुनरुत्थानाच्या आशेवर विश्वास नाही असे नाही. येशू लाजराला जिवंत करणारच होता तरीही त्याच्या दुःखी नातेवाइकांप्रती कळवळा व्यक्त करून येशू रडला आणि याद्वारे त्याने आपल्यासमोर सहानुभूती दाखवण्याचे एक उत्तम उदाहरण मांडले.