व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इतरांना मदत करण्यासाठी आपण कसा लावू शकतो हातभार?

इतरांना मदत करण्यासाठी आपण कसा लावू शकतो हातभार?

एका विकसनशील देशात राहणारे वडील, बंधू फ्रान्स्‌वा यांनी असे म्हटले: “निवडणुकीनंतर अचानक सुरू झालेल्या हिंसाचारामुळं हजारो यहोवाच्या साक्षीदारांना नाइलाजानं आपली घरं सोडून पळून जावं लागलं.” ते पुढे म्हणतात: “अन्‍न आणि औषधं यांसारख्या गोष्टी अपुऱ्‍या पडू लागल्या, आणि इतर गोष्टींच्या किंमती खूप जास्त वाढल्या. बँका बंद पडल्या आणि पैसे काढण्याची यंत्रं निकामी झाली.”

या हिंसाचारामुळे ज्या बंधुभगिनींनी आपले घरदार सोडले होते ते राज्य सभागृहांत एकत्र आले. शाखा कार्यालयातील बांधवांनी या बंधुभगिनींना पैसे व जीवनावश्‍यक वस्तू पाठवण्याची लगेच व्यवस्था केली. रस्त्यावर ठिकठिकाणी अडथळे लावण्यात आले होते, पण निवडणुकीत उभे राहिलेल्या दोन्ही बाजूच्या लोकांना माहीत होते की यहोवाचे साक्षीदार राजकारणात भाग घेत नाहीत. म्हणून शाखा कार्यालयातून येणाऱ्‍या गाड्यांना ते सहसा जाऊ द्यायचे.

फ्रान्स्‌वा सांगतात: “एका राज्य सभागृहाला जाताना आमच्या व्हॅनवर गोळ्या झाडण्यात आल्या. पण आम्ही थोडक्यात बचावलो. एका सैनिकाला बंदूक घेऊन आमच्या दिशेनं पळत येत असल्याचं पाहून आम्ही लगेच गाडी मागं वळवली आणि भरधाव वेगानं शाखा कार्यालयाकडे निघालो. आम्ही जिवंत होतो त्याबद्दल यहोवाचे आभार मानले. दुसऱ्‍या दिवशी, त्या राज्य सभागृहातील १३० बंधुभगिनी सुखरूप ठिकाणी पोहचले. काही बंधुभगिनी शाखा कार्यालयात आले. जोपर्यंत हिंसाचार सुरू होता तोपर्यंत आम्ही या बंधुभगिनींचा आध्यात्मिक आणि शारीरिक रीत्या सांभाळ केला.”

फ्रान्स्‌वा असे म्हणतात: “काही काळानंतर शाखा कार्यालयाला सबंध देशातील बंधुभगिनींकडून बरीच पत्रं मिळाली ज्यात त्यांनी मनापासून आभार मानले होते. दुसऱ्‍या ठिकाणी असलेले आपले बांधव मदतीला धावून आल्याचे पाहून यहोवावरील त्यांचा भरवसा आणखी दृढ झाला.”

नैसर्गिक विपत्ती किंवा मानवनिर्मित संकटे येतात तेव्हा आपण आपल्या गरजू बंधुभगिनींना “ऊब घ्या व तृप्त व्हा” असे म्हणत नाही. (याको. २:१५, १६) तर आपण त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या शतकात दुष्काळ पडणार असल्याचा इशारा देण्यात आला तेव्हा शिष्यांनी “निश्‍चय केला की, यहूदीयात राहणाऱ्‍या बंधुजनांच्या मदतीकरता यथाशक्‍ती काही पाठवावे.”—प्रे. कृत्ये ११:२८-३०.

यहोवाचे साक्षीदार या नात्याने गरजू लोकांना भौतिक रीत्या मदत करण्याची आपली इच्छा आहे. पण लोकांना आध्यात्मिक मदतीचीसुद्धा गरज आहे. (मत्त. ४:४) लोकांना त्यांच्या आध्यात्मिक गरजेबद्दल जाणीव व्हावी आणि ही गरज पूर्ण करता यावी म्हणून येशूने त्याच्या अनुयायांवर शिष्य बनवण्याचे काम सोपवले. (मत्त. २८:१९, २०) ही कामगिरी पूर्ण करता यावी म्हणून आपण आपला वेळ, आपली शक्‍ती व साधनसंपत्ती खर्च करतो. एक संघटना या नात्याने आपण काही प्रमाणात भौतिक रीत्या मदत पुरवतो; पण संघटनेला मिळणारे अनुदान प्रामुख्याने राज्याशी संबंधित कार्यांसाठी आणि सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी वापरले जाते. अशा प्रकारे आपण देवाप्रती व शेजाऱ्‍यांप्रती आपले प्रेम असल्याचे दाखवतो.—मत्त. २२:३७-३९.

जे अनुदान देऊन यहोवाच्या साक्षीदारांच्या या कार्याला हातभार लावतात ते ही खात्री बाळगू शकतात की त्यांनी दिलेल्या अनुदानाचा योग्य आणि उत्तम रीत्या वापर केला जात आहे. तुम्ही गरजू बांधवांना मदत करू शकता का? शिष्य बनवण्याच्या कार्याला हातभार लावण्याची तुमची इच्छा आहे का? तर मग, इतरांचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुमच्या अंगी सामर्थ्य असल्यास, ते करण्यास माघार घेऊ नका.—नीति. ३:२७.