व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूप्रमाणे तुम्हीही नम्रता व दयाळूपणा दाखवाल का?

येशूप्रमाणे तुम्हीही नम्रता व दयाळूपणा दाखवाल का?

“ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरता कित्ता घालून दिला आहे.”—१ पेत्र २:२१.

१. येशूचं अनुकरण केल्यामुळे आपण यहोवासोबत जवळचा नातेसंबंध जोडू शकतो असं का म्हणता येईल?

सहसा ज्यांचे गुण आपल्याला आवडतात त्यांच्यासारखं वागण्याबोलण्याचा आपण प्रयत्न करतो. पण, आजपर्यंत होऊन गेलेल्या सर्व माणसांत येशू ख्रिस्ताचं उदाहरण हे अनुकरण करण्यासारखं सर्वात उत्तम उदाहरण आहे. असं का म्हणता येईल? येशूनं एकदा असं म्हटलं: “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.” (योहा. १४:९) येशू आपल्या पित्याच्या गुणांचं अगदी पूर्णपणे अनुकरण करत असल्यामुळे तो असं म्हणू शकला. त्यामुळे, जेव्हा आपण येशूबद्दल जाणून घेतो तेव्हा खरंतर आपण यहोवाबद्दल जाणून घेत असतो. आणि जेव्हा आपण येशूचं अनुकरण करतो तेव्हा आपण यहोवाचं अनुकरण करत असतो. असं केल्यामुळे आपण यहोवासोबत, म्हणजेच या विश्वातल्या सर्वोच्च व्यक्तीसोबत अगदी जवळचा नातेसंबंध जोडू शकतो. खरोखर, हा किती मोठा सन्मान आहे!

२, ३. (क) बायबलमध्ये यहोवानं येशूच्या जीवनाविषयी सविस्तर माहिती का दिली आहे? (ख) या लेखात आणि पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?

बायबलमध्ये यहोवानं आपल्याला येशूच्या जीवनाविषयी अगदी सविस्तर माहिती दिली आहे. का बरं? कारण आपण त्याच्या पुत्राची चांगल्या प्रकारे ओळख करून घ्यावी आणि त्याचं अगदी जवळून अनुकरण करावं, अशी यहोवाची इच्छा आहे. (१ पेत्र २:२१ वाचा.) येशूनं आपल्यासमोर जे उदाहरण ठेवलं आहे त्याची तुलना बायबलमध्ये पाऊलखुणांशी केली आहे. यावरून काय दिसून येतं? हेच, की आपण येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावं, म्हणजेच सर्व बाबतींत त्याचं अनुकरण करावं अशी यहोवाची इच्छा आहे. येशू परिपूर्ण होता हे खरं आहे; पण आपण येशूचं पूर्णपणे अनुकरण करावं अशी यहोवाची अपेक्षा नाही. उलट, त्याचं अनुकरण करण्याचा आपण होताहोईल तितका प्रयत्न करावा अशी त्याची इच्छा आहे.

तर आता आपण येशूच्या काही सुरेख गुणांबद्दल चर्चा करू या. या लेखात, आपण त्याचा नम्रपणा आणि दयाळूपणा यांविषयी पाहणार आहोत. आणि पुढच्या लेखात त्याचं धैर्य आणि समजदारपणा यांविषयी आपण चर्चा करू. यांपैकी प्रत्येक गुणाची चर्चा करताना आपल्याला पुढील प्रश्नांची उत्तरं मिळतील: या गुणाचा काय अर्थ होतो? येशूनं तो कशा प्रकारे दाखवला? आणि, येशूप्रमाणे आपणही तो कसा दाखवू शकतो?

येशूचा नम्रपणा

४. नम्र असण्याचा काय अर्थ होतो?

नम्रपणा म्हणजे काय? बऱ्याच गर्विष्ठ लोकांना वाटतं की नम्रपणा दाखवणं हे भित्रटपणाचं किंवा दुबळेपणाचं लक्षण आहे. पण हे खरं आहे का? नाही, उलट एक धैर्यवान आणि खंबीर मनाची व्यक्तीच नम्रपणे वागू शकते. नम्रपणा हा गर्व आणि उद्धटपणा यांच्या अगदी उलट आहे. नम्र असण्याकरता सगळ्यात आधी आपली वृत्ती म्हणजेच आपला स्वतःबद्दलचा दृष्टिकोन योग्य असला पाहिजे. बायबलच्या एका शब्दकोशात असं म्हटलं आहे: “देवाच्या तुलनेत आपण किती क्षुल्लक आहोत याचं भान असणं म्हणजे नम्रपणा.” तसंच, नम्र असल्यास आपण इतरांपेक्षा वरचढ आहोत असा आपण कधीही विचार करणार नाही. (रोम. १२:३; फिलिप्पै. २:३) जन्मतःच आपल्यामध्ये पापी प्रवृत्ती असल्यामुळे नम्रतेनं वागणं आपल्याला सोपं नसतं, हे खरं आहे. पण, आपल्या तुलनेत यहोवा किती महान आहे यावर खोलवर विचार केला आणि येशूच्या उत्तम उदाहरणाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला, तर आपण नक्कीच नम्रपणे वागण्याचं शिकून घेऊ शकतो.

५, ६. (क) आद्यदेवदूत मीखाएल कोण आहे? (ख) येशूचा नम्रपणा कशावरून दिसून आला?

येशूनं नम्रपणा कशा प्रकारे दाखवला? देवाचा हा पुत्र नेहमीच, म्हणजे स्वर्गात एक शक्तिशाली देवदूत असताना आणि पृथ्वीवर परिपूर्ण मानवाच्या रूपात असतानाही नम्रपणे वागला. याची काही उदाहरणं आपण पाहू या.

त्याचा स्वतःबद्दलचा दृष्टिकोन: पृथ्वीवर येण्याआधी येशूच्या जीवनात घडलेल्या एका घटनेबद्दल आपण बायबलमधल्या यहूदा या पुस्तकात वाचतो. (यहूदा ९ वाचा.) आद्यदेवदूत मीखाएल, म्हणजेच सर्वात प्रमुख देवदूत या नात्यानं येशूनं, “मोशेच्या शरीरासंबंधाने सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला” असं तिथं सांगण्यात आलं आहे. मोशेच्या मृत्यूनंतर यहोवानं त्याचं शरीर कोणत्याही मानवाला सापडणार नाही अशा ठिकाणी पुरलं होतं. (अनु. ३४:५, ६) पण, मोशेच्या शरीराचा वापर करून इस्राएली लोकांना खोटी उपासना करायला लावण्याची कदाचित सैतानाची इच्छा असावी. दियाबलाचा दुष्ट हेतू नेमका काय होता हे आपल्याला माहीत नाही. पण मीखाएलनं धैर्यानं त्याला रोखलं एवढं मात्र खरं. एका पुस्तकानुसार “विरोध करून” आणि “वाद घातला” हे शब्द “न्यायालयातील खटल्याच्या संदर्भातही” वापरले जातात. यावरून, दियाबलाला मोशेचं शरीर घेण्याचा हक्क नसल्याचा मीखाएलनं दावा केला असावा, असं या पुस्तकात म्हटलं आहे. पण, सर्वात प्रमुख देवदूत असूनही आपला अधिकार मर्यादित आहे याची येशूला जाणीव होती. त्यामुळे त्यानं अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायाधीश असलेल्या यहोवावर सोडून दिला. सैतानाचा न्याय करण्याचा हक्क केवळ यहोवालाच आहे हे येशूला माहीत होतं. खरोखर, येशू किती नम्र होता!

७. येशूचा नम्रपणा त्याच्या बोलण्यावरून आणि कार्यांवरून कसा दिसून आला?

पृथ्वीवर असताना येशूच्या बोलण्यावरून आणि त्यानं केलेल्या कार्यांवरून त्याचा नम्रपणा दिसून आला. त्याचं बोलणं: येशूनं कधीही आपल्या बोलण्यातून इतरांचं लक्ष स्वतःकडे वेधण्याचा प्रयत्न केला नाही. उलट, आपल्या पित्याला सर्व गौरव मिळावं अशी त्याची इच्छा होती. (मार्क १०:१७, १८; योहा. ७:१६) शिष्यांशी बोलताना येशूनं कधीही त्यांना तुच्छ लेखलं नाही. किंवा, त्यांच्या मनात कमीपणाच्या भावना येतील अशा प्रकारे तो कधीही त्यांच्याशी बोलला नाही. उलट, त्यांना आदर दिला. तसंच, त्यांच्या चांगल्या गुणांबद्दल त्यांची प्रशंसा करण्याद्वारे त्यांच्यावर भरवसा असल्याचं त्यानं दाखवलं. (योहा. १:४७; लूक २२:३१, ३२) त्याची कार्ये: येशू अगदी साधं जीवन जगला. त्यानं कधीही धनसंपत्ती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. (मत्त. ८:२०) इतर जण जे काम करायला तयार नव्हते असं हलक्या दर्जाचं काम करायला तो तयार होता. (योहा. १३:३-१५) तसंच, आज्ञापालन करण्याद्वारेही येशूनं आपल्यासमोर नम्रपणाचं सर्वात उत्तम उदाहरण मांडलं. (फिलिप्पैकर २:५-८ वाचा.) गर्विष्ठ वृत्तीच्या लोकांना सहसा इतरांनी सांगितल्याप्रमाणे वागायला मुळीच आवडत नाही. पण येशू तसा नव्हता. यहोवानं सांगितलेल्या सर्व गोष्टींचं त्यानं नम्रपणे पालन केलं. इतकंच काय, तर यहोवाच्या आज्ञेनुसार वागण्यासाठी येशूनं मरणदेखील सोसलं. खरोखर, येशू नम्र होता यात काहीही शंका नाही.—मत्त. ११:२९.

येशूसारखे नम्र व्हा

८, ९. आपण नम्र आहोत हे कशावरून दिसून येईल?

आपण कशा प्रकारे येशूसारखे नम्र होऊ शकतो? स्वतःबद्दल आपला दृष्टिकोन: नम्रता आपल्याला आपल्या अधिकाराच्या मर्यादेत राहण्यास मदत करेल. इतरांना दोषी ठरवण्याचा आपल्याला हक्क नाही हे आपण नेहमी लक्षात ठेवू. त्यामुळे, आपण त्यांची टीका करणार नाही, किंवा त्यांच्या हेतूंविषयी शंका घेणार नाही. (लूक ६:३७; याको. ४:१२) नम्र असल्यास आपण कधीही “फाजील धार्मिक” होणार नाही. दुसऱ्या शब्दांत, इतरांजवळ आपल्यासारखी कौशल्ये किंवा विशेषाधिकार नसल्यामुळे आपण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असा आपण कधीही विचार करणार नाही. (उप. ७:१६) नम्र मनोवृत्तीचे वडील मंडळीतल्या बंधुभगिनींपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजत नाहीत. उलट, हे प्रेमळ मेंढपाळ इतरांना स्वतःपेक्षा “श्रेष्ठ” मानतात. म्हणजेच ते स्वतःपेक्षा इतरांना जास्त महत्त्व देतात.—फिलिप्पै. २:३; लूक ९:४८.

डब्ल्यू. जे. थॉर्न नावाच्या एका बांधवांचं उदाहरण घ्या. त्यांनी १८९४ सालापासून प्रवासी पर्यवेक्षक म्हणून सेवा सुरू केली होती. बऱ्याच वर्षांनंतर त्यांना एक नवीन नेमणूक देण्यात आली. न्यूयॉर्क इथं असलेल्या संस्थेच्या मालकीच्या, ‘किंग्डम फार्म’ या शेतमळ्यावर कोंबड्यांची निगा राखण्याचं काम त्यांना देण्यात आलं. आपण यापेक्षा काहीतरी महत्त्वाचं काम करू शकलो असतो, असा विचार कधीही त्यांच्या मनात आला की ते लगेच स्वतःला अशी आठवण करून द्यायचे: “अरे कस्पटा! गर्व करण्यासारखं आहे काय तुझ्यात?” (यशया ४०:१२-१५ वाचा.) खरंच, किती नम्र वृत्ती!

१०. आपण बोलण्यात आणि कार्यांत नम्र कसे असू शकतो?

१० आपलं बोलणं: आपण खरोखर नम्र असलो, तर आपण दुसऱ्यांशी ज्या पद्धतीनं बोलतो त्यावरून ते दिसून येईल. (लूक ६:४५) दुसऱ्यांशी बोलताना, आपल्याजवळ कोणकोणते विशेषाधिकार आहेत किंवा आपण कायकाय केलं याविषयीच आपण सतत बोलणार नाही. (नीति. २७:२) त्याऐवजी, आपल्या भाऊबहिणींनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल आपण त्यांची प्रशंसा करू. तसंच, स्वतःपेक्षा त्यांच्या चांगल्या गुणांबद्दल आणि कौशल्यांबद्दल आपण जास्त बोलू. (नीति. १५:२३) आपली कार्ये: नम्र मनोवृत्तीचे ख्रिस्ती या जगात नाव कमावण्याचा किंवा प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीत. उलट, यहोवाची जास्तीत जास्त सेवा करता यावी म्हणून ते साधेपणानं जगण्याचा प्रयत्न करतात; आणि यासाठी ते हलकं समजलं जाणारं काम करायलाही लाजत नाहीत. (१ तीम. ६:६, ८) पण, नम्रपणे वागण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे आज्ञांचं पालन करणं. म्हणून, यहोवाच्या संघटनेकडून मिळणारं मार्गदर्शन आपण नम्रपणे स्वीकारून त्याचं पालन केलं पाहिजे. तसंच, मंडळीत पुढाकार घेणाऱ्या बांधवांच्या सूचनांचंही आपण नम्रपणे पालन केलं पाहिजे.—इब्री १३:१७.

येशूचा दयाळूपणा

११. दयाळूपणा म्हणजे काय?

११ दयाळूपणा म्हणजे काय? “दयाळू” हा शब्द ऐकल्यावर एका सौम्य, प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या व्यक्तीचं चित्र समोर येतं. दयाळूपणा हा प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे; आणि करुणा व कळवळा या भावनांसारखा तो आहे. यहोवा आणि येशू हे गुण दाखवतात असं बायबल सांगतं. (लूक १:७८; २ करिंथ. १:३; फिलिप्पै. १:८) बायबलच्या शब्दांचं स्पष्टीकरण देणाऱ्या एका पुस्तकात असं सांगितलं आहे, की एखाद्या गरजू माणसाला पाहून त्याच्याबद्दल वाईट वाटणं, इतकाच दयाळूपणाचा अर्थ होत नाही. तर दयाळूपणाची भावना असलेल्या व्यक्तीला “इतकी काळजी वाटते की काहीतरी मदत केल्याशिवाय तिला राहवत नाही.” इतरांचं जीवन आनंदी बनवण्याचा ती व्यक्ती प्रयत्न करते, असं या पुस्तकात म्हटलं आहे. तेव्हा, दयाळूपणा हा इतरांना मदत करण्यासाठी प्रवृत्त करणारा गुण आहे.

१२. येशूच्या मनात इतरांबद्दल करुणा होती हे कशावरून दिसून येतं, आणि दयाळूपणामुळे त्यानं काय केलं?

१२ येशूनं दयाळूपणा कशा प्रकारे दाखवला? त्याच्या दयाळू भावना आणि कार्ये: येशूच्या मनात इतरांबद्दल करुणा होती. एकदा, आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे दुःखी असलेल्या एका विधवेला पाहून येशूला तिची दया आली आणि त्यानं तिच्या मुलाला पुन्हा जिवंत केलं. (लूक ७:११-१५) तसंच, जेव्हा लोकांचा एक मोठा समुदाय येशूकडे आला, तेव्हा येशूला “त्यांचा कळवळा आला,” आणि त्यामुळे तो “त्यांना बऱ्याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला.” (मार्क ६:३४) त्या लोकांपैकी ज्यांनी येशूच्या शिकवणींचं पालन केलं त्यांच्या जीवनाला एक नवा अर्थ मिळाला! पुढे, जेव्हा लाजराचा मृत्यू झाला, तेव्हा मरीया आणि इतरांना त्याच्यासाठी रडताना पाहून येशूसुद्धा त्यांच्यासोबत रडला. (योहान ११:३२-३५ वाचा.) पण तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं लाजराचं पुनरुत्थान केलं. (योहा. ११:३८-४४) येशूच्या या दयाळू कृत्यामुळे स्वर्गीय जीवनाची आशा असलेल्यांमध्ये कदाचित लाजराचा समावेश झाला असावा. या सर्व उदाहरणांवरून हेच स्पष्ट होतं की येशूचा दयाळूपणा ही फक्त एक भावना नव्हती. तर, दयाळूपणामुळे त्यानं गरजू आणि दुःखी लोकांना मदत केली.—मत्त. १५:३२-३८; २०:२९-३४; मार्क १:४०-४२.

१३. येशू इतरांशी कशा प्रकारे बोलला? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

१३ त्याचं बोलणं: येशूच्या दयाळूपणामुळे तो इतरांशी, खासकरून दुःखीकष्टी लोकांशी अतिशय प्रेमानं बोलायचा. यशयानं लिहिलेल्या शब्दांचा वापर करून प्रेषित मत्तयानं येशूबद्दल म्हटलं: “चेपलेला बोरू तो मोडणार नाही, व मिणमिणती वात तो विझवणार नाही.” (यश. ४२:३; मत्त. १२:२०) या शब्दांचा काय अर्थ होतो? येशूनं कधीही इतरांचा अपमान केला नाही किंवा त्यांच्याशी कठोरपणे व्यवहार केला नाही. उलट, त्यांच्या मनाला आनंद वाटेल अशाच पद्धतीनं तो त्यांच्याशी बोलायचा. “भग्नहृदयी” म्हणजेच दुःखी लोकांना त्यानं आशेचा संदेश दिला. (यश. ६१:१) तसंच, दुःखीकष्टी लोकांना तो म्हणाला, “माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.” (मत्त. ११:२८-३०) देवाला त्याच्या प्रत्येक उपासकाबद्दल काळजी आहे अशी येशूनं आपल्या शिष्यांना खात्री दिली. इतकंच काय, तर जगात सहसा ज्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं अशा ‘लहानांचीही’ देव दखल घेतो असं येशूनं सांगितलं.—मत्त. १८:१२-१४; लूक १२:६, ७.

येशूसारखे दयाळू व्हा

१४. दयेची भावना आपण कशी दाखवू शकतो?

१४ येशूसारखंच आपणही दयाळूपणा कसा दाखवू शकतो? आपल्या मनातील दयेची भावना: दयेची भावना एखाद्याच्या मनात सहजपणे येत नसली, तरी ‘करुणा आणि ममता’ यांसारख्या भावना उत्पन्न करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, असं बायबल आपल्याला सांगतं. या भावना ख्रिस्ती व्यक्तिमत्त्वाचा भाग आहेत, आणि आपण सर्वांनी हे नवं व्यक्तिमत्त्व विकसित करावं अशी यहोवाची अपेक्षा आहे. (कलस्सैकर ३:९, १०, १२ वाचा.) मग तुमच्या मनातील दयेची भावना तुम्हाला कशी दाखवता येईल? बायबल म्हणतं, आपली अंतःकरणे “विशाल करा.” (२ करिंथ. ६:११-१३) जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याजवळ आपलं मन मोकळं करते किंवा तिला वाटणारी काळजी व्यक्त करते तेव्हा तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकून घ्या. (याको. १:१९) मग असा विचार करा: ‘माझ्यावर अशी वेळ आली असती तर मला कसं वाटलं असतं? इतरांकडून मी काय अपेक्षा केली असती?’—१ पेत्र ३:८.

१५. जे दुःखात आहेत अशांना आपण कशी मदत करू शकतो?

१५ आपली दयाळू कार्ये: दयाळूपणामुळे आपल्याला इतरांना, खासकरून जे दुःखीकष्टी आहेत त्यांना मदत करण्याची प्रेरणा मिळेल. आपण अशा लोकांना मदत कशी करू शकतो? रोमकर १२:१५ यात असं म्हटलं आहे: “शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा.” बरेचदा, लोकांना त्यांच्या समस्यांवरील उपाय नको असतात; तर त्यांना फक्त सांत्वन हवं असतं. त्यांच्याबद्दल आपुलकी दाखवणारी, त्यांचं ऐकून घेणारी मायेची माणसं त्यांना हवी असतात. एक बहीण, जिला तिच्या मुलीच्या मृत्यूनंतर मंडळीतल्या बंधुभगिनींकडून सांत्वन मिळालं, ती म्हणते, “भाऊबहीण घरी आले, माझ्याजवळ बसले, रडले. हे सांत्वन माझ्यासाठी फार मोठं होतं.” वेगवेगळ्या मार्गांनी इतरांना मदत करण्याद्वारेही दयाळूपणा दाखवला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही मंडळीतल्या एखाद्या विधवा बहिणीच्या घरातलं छोटंमोठं दुरुस्तीचं काम करून देऊ शकता. किंवा, एखाद्या वयस्क भावाला किंवा बहिणीला आपल्यासोबत सभांना घेऊन येऊ शकता, तसंच प्रचाराला जायला किंवा डॉक्टरकडे जायलाही तुम्ही त्यांना मदत करू शकता. दयेचं एक छोटं कार्यदेखील एखाद्याच्या जीवनात फार मोठी गोष्ट ठरू शकते. (१ योहा. ३:१७, १८) पण, दयाळूपणा दाखवण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे सुवार्ता सांगण्याच्या कार्यात जास्तीत जास्त सहभाग घेणं. प्रामाणिक मनाच्या लोकांना मदत करण्याचा यापेक्षा उत्तम मार्ग नाही!

आपल्या भावांबद्दल व बहिणींबद्दल तुम्हाला मनापासून कळकळ आहे का? (परिच्छेद १५ पाहा)

१६. मनानं खचलेल्यांना आपण धीर कसा देऊ शकतो?

१६ आपलं दयाळूपणाचं बोलणं: आपल्या मनातील दयाळूपणाच्या भावनेमुळे, मनानं खचलेल्यांना “धीर” देण्याची आपल्याला आपोआपच प्रेरणा मिळेल. (१ थेस्सलनी. ५:१४) अशा लोकांना आपल्या बोलण्याद्वारे आपण धीर कसा देऊ शकतो? आपल्याला त्यांची मनापासून काळजी वाटते हे आपण त्यांना सांगू शकतो. तसंच, आपण त्यांची प्रशंसा करू शकतो. त्यांच्या चांगल्या गुणांकडे व कौशल्यांकडे आपण त्यांचं लक्ष वेधू शकतो. शिवाय, ‘यहोवा देवानं तुम्हाला सत्य जाणून घ्यायला मदत केली, त्याअर्थी नक्कीच त्याचं तुमच्यावर प्रेम आहे,’ अशी आपण त्यांना आठवण करून देऊ शकतो. (योहा. ६:४४) जे दुःखी किंवा अगदी निराश आहेत त्यांची यहोवाला काळजी आहे आणि तो त्यांना कधीही विसरणार नाही असं सांगण्याद्वारे आपण त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो. (स्तो. ३४:१८) सांत्वनासाठी आसूसलेल्यांना आपल्या प्रेमळ शब्दांमुळे खूप दिलासा मिळू शकतो.—नीति. १६:२४.

१७, १८. (क) मंडळीतील वडिलांकडून यहोवाची काय अपेक्षा आहे? (ख) पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?

१७ वडिलांनो, तुम्ही यहोवाच्या कळपातल्या मेंढरांशी दयाळूपणे वागावं अशी तो तुमच्याकडून अपेक्षा करतो. (प्रे. कृत्ये २०:२८, २९) यहोवाच्या मेंढरांना शिकवण्याची, त्यांना प्रोत्साहन देण्याची आणि आनंदानं उपासना करण्यास त्यांना साहाय्य करण्याची तुमच्यावर जबाबदारी आहे हे नेहमी लक्षात असू द्या. (यश. ३२:१, २; १ पेत्र ५:२-४) एक दयाळू आणि प्रेमळ वडील कधीही बांधवांवर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करणार नाही. तो नियम बनवून किंवा बांधवांना दोषी वाटायला लावून, त्यांच्या शक्तिपलिकडे कार्य करायला त्यांना भाग पाडणार नाही. उलट, मंडळीतील बंधुभगिनींनी आनंदी असावं अशी एका प्रेमळ वडिलाची इच्छा असते. तसंच, बांधवांचं यहोवावर प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी ते यहोवाची होताहोईल तितक्या चांगल्या प्रकारे सेवा करतील असा भरवसा तो बाळगतो.—मत्त. २२:३७.

१८ येशूचा नम्रपणा आणि त्याचा दयाळूपणा यावर आपण जितकं जास्त मनन करू, तितकंच त्याचं अनुकरण करण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल. पुढच्या लेखात, आपण येशूच्या धैर्याचं आणि समजदारपणाचं कशा प्रकारे अनुकरण करू शकतो यावर चर्चा करू या.