व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमचा विवेक भरवशालायक आहे का?

तुमचा विवेक भरवशालायक आहे का?

“ताकीद देण्याचा हेतू हा आहे की, शुद्ध अंतःकरणात, चांगल्या विवेकभावात . . . उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी.”—१ तीम. १:५.

गीत क्रमांक: २२, ४८

१, २. आपल्याला विवेकबुद्धी कोणी दिली आहे, आणि त्याकरता आपण कृतज्ञ का असलं पाहिजे?

यहोवानं आपल्याला इच्छास्वातंत्र्य म्हणजे निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. पण यासोबत योग्य निवड करण्यासाठी मदत करणारा एक साहाय्यकदेखील त्यानं आपल्याला दिला आहे. यालाच आपण विवेक म्हणतो. ही आपल्यात असणारी एक अशी जाणीव आहे ज्यामुळे योग्य काय आणि अयोग्य काय यामधला फरक आपल्याला कळतो. आपण जर आपल्या विवेकाचा योग्यपणे वापर केला, तर जे योग्य आहे ते करण्यासाठी आणि जे वाईट आहे त्यापासून दूर राहण्यासाठी आपल्याला मदत होईल. शिवाय या क्षमतेमुळे आपल्याला याचा पुरावा मिळतो, की यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि आपण योग्य गोष्टींची निवड करावी अशी त्याची इच्छा आहे.

आज काही लोक बायबलची तत्त्वं माहीत नसतानाही चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात आणि वाईट गोष्टींचा द्वेष करतात. (रोमकर २:१४, १५ वाचा.) का बरं? कारण त्यांनाही विवेक आहे. हाच विवेक बऱ्याच लोकांना वाईट गोष्टी करण्यापासून रोखतो. विचार करा, जर विवेक नावाची गोष्टच या जगात नसती तर परिस्थिती किती भयंकर झाली असती! आज घडत आहेत त्यापेक्षाही वाईट गोष्टी घडल्याचं आपल्याला ऐकायला मिळालं असतं. खरंच यहोवानं आपल्याला विवेकबुद्धी दिली आहे, याबद्दल आपण त्याचे किती आभार मानले पाहिजेत!

३. आपल्या विवेकामुळे मंडळीला फायदा होतो, असं का म्हणता येईल?

बहुतेक जण आपल्या विवेकाला प्रशिक्षित करण्याचा विचारही करत नाहीत. पण आपल्या बाबतीत तसं नाही. आपल्या विवेकानं योग्य प्रकारे काम करावं असं आपल्याला वाटतं. कारण मंडळीतील ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी त्याची खूप मदत होते. योग्य आणि अयोग्य, चांगलं आणि वाईट याबद्दल असणाऱ्या बायबलच्या दर्जांची आपल्या विवेकानं आपल्याला आठवण करून द्यावी अशी आपली इच्छा आहे. पण आपल्या विवेकाला तसं प्रशिक्षित करून त्याचा वापर करण्यासाठी फक्त बायबल काय म्हणतं, एवढंच समजून घेणं पुरेसं नाही. तर देवाच्या स्तरांवर आपलं प्रेम असलं पाहिजे आणि ते आपल्या भल्यासाठी आहेत यावर आपला पक्का विश्वास असला पाहिजे. म्हणूनच पौलानं असं लिहिलं: “ताकीद देण्याचा हेतू हा आहे की, शुद्ध अंतःकरणात, चांगल्या विवेकभावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी.” (१ तीम. १:५) जेव्हा आपण आपल्या विवेकाला चांगल्या प्रकारे प्रशिक्षित करून त्याचं मार्गदर्शन स्वीकारतो, तेव्हा यहोवावरील आपलं प्रेम आणि आपला विश्वासही आपोआप वाढू लागतो. आपल्या विवेकाचा आपण ज्या प्रकारे वापर करतो त्यावरून यहोवासोबतचं आपलं नातं किती घनिष्ठ आहे आणि त्याचं मन आनंदित करण्याची आपल्याला किती मनापासून इच्छा आहे हे दिसून येतं. शिवाय, आपलं व्यक्तिमत्त्व नेमकं कसं आहे, हेदेखील आपला विवेकच आपल्याला दाखवून देतो.

४. आपल्या विवेकाला आपण कसं प्रशिक्षित करू शकतो?

पण आपल्या विवेकाला आपण प्रशिक्षित कसं करू शकतो? त्यासाठी आपण नियमितपणे बायबलचं वाचन करून त्यावर मनन केलं पाहिजे. आणि त्यातून जे काही शिकतो ते लागू करता यावं म्हणून यहोवाला विनंती केली पाहिजे. म्हणजे केवळ वस्तुस्थिती आणि नियम लक्षात घेऊन फायदा नाही, तर त्याच्याही पुढे जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. यहोवाची चांगल्या प्रकारे ओळख करून घेणं, हाच बायबल अभ्यास करण्यामागचा आपला हेतू असला पाहिजे. म्हणजे यहोवाचं व्यक्तिमत्त्व कसं आहे आणि त्याला काय आवडतं आणि काय आवडत नाही हे आपल्याला समजेल. जसजसं आपण यहोवाबद्दल जास्त शिकत जाऊ, तसतसा आपला विवेकही योग्य आणि अयोग्य गोष्टींमध्ये फरक करण्यात आणखी सक्षम होत जाईल. आपण आपल्या विवेकाला जितकं जास्त प्रशिक्षित करू, तितकं जास्त आपण यहोवासारखा विचार करायला लागू.

५. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

पण, आपल्या मनात कदाचित असे प्रश्न येतील: निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा आपला प्रशिक्षित विवेक आपल्याला कशी मदत करेल? इतरांनी आपल्या विवेकानुसार घेतलेल्या निर्णयांना आपण कसा आदर दाखवू शकतो? आणि चांगलं ते करण्याकरता आपला विवेक आपल्याला कशा प्रकारे चालना देतो? हे जाणून घेण्याकरता चला आता आपण अशा तीन क्षेत्रांचा विचार करू या, ज्या ठिकाणी आपल्याला प्रशिक्षित विवेकाची गरज पडू शकते: (१) आरोग्याची काळजी, (२) करमणूक, आणि (३) आपलं प्रचारकार्य.

समजूतदारपणा दाखवा

६. आरोग्याच्या बाबतीत आपल्याला कोणते निर्णय घ्यावे लागतात?

बायबल आपल्याला सांगतं, की हानीकारक ठरतील अशा गोष्टी टाळण्याचा आणि खाण्या-पिण्याच्या बाबतीत समंजसपणा दाखवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. (नीति. २३:२०; २ करिंथ. ७:१) बायबलमधील हे सल्ले आपल्याला आरोग्याची चांगल्या प्रकारे काळजी घेण्याकरता मदत करतात. पण आजारपण आणि वाढतं वय या न टाळता येणाऱ्या गोष्टी आहेत. मग आरोग्याच्या बाबतीत निर्णय घ्यावे लागतात, तेव्हा कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? काही देशांमध्ये प्रचलित उपचार पद्धतींसोबत पर्यायी उपचार पद्धतीदेखील उपलब्ध आहेत. त्यामुळे, “एका यहोवाच्या सेवकाला अमुक एखादी उपचार पद्धत निवडता येईल का?” असा प्रश्न शाखा कार्यालयाला वारंवार विचारला जातो.

७. रक्ताविषयी आपण कशा प्रकारे निर्णय घेऊ शकतो?

पण कोणत्याही ख्रिस्ती व्यक्तीसाठी वैद्यकीय निर्णय घेण्याचा अधिकार ना शाखा कार्यालयाकडे आहे, ना मंडळीतील वडिलांकडे. (गलती. ६:५) पण एका ख्रिस्ती व्यक्तीला सुज्ञ निर्णय घेण्यासाठी, ख्रिस्ती वडील तिला यहोवाचा दृष्टिकोन समजून घेण्यास मदत करू शकतात. उदाहरणार्थ, देवानं आपल्याला रक्त वर्ज्य करण्याची आज्ञा दिली आहे. (प्रे. कृत्ये १५:२९) या आज्ञेमुळे एका ख्रिस्ती व्यक्तीला या गोष्टीची स्पष्ट समज मिळते, की रक्त किंवा रक्ताच्या चार प्रमुख घटकांचा समावेश असलेला कोणताही वैद्यकीय उपचार स्वीकारणं अयोग्य ठरेल. तसंच उपचाराकरता रक्ताच्या चार प्रमुख घटकांनाही विभागून काही सूक्ष्म घटक बनवले जातात. या घटकांचा समावेश असलेल्या उपचारांना स्वीकारायचं की नाही त्याविषयी योग्य निर्णय घेण्यासाठीदेखील हीच समज तिच्या विवेकाला मदत करेल. * पण वैद्यकीय उपचाराबद्दल योग्य तो निर्णय घेण्याकरता बायबलमध्ये इतरही काही तत्त्वं आहेत का?

८. आरोग्याच्या बाबतीत योग्य निर्णय घेण्यासाठी फिलिप्पै ४:५ मधील तत्त्व आपल्याला कसं मदत करू शकतं?

नीतिसूत्रे १४:१५ म्हणतं: “भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकतो.” आज असे काही आजार आहेत, ज्यांवर सध्या कोणताच इलाज नाही. असं असूनही अशा आजारांना हमखास बरं करण्याचा दावा काही उपचारांमध्ये केला जातो. पण प्रत्यक्षात मात्र तसा कोणताच पुरावा त्यांच्याकडे नसतो. तेव्हा अशा उपचारांबद्दल आपण सावध असण्याची गरज आहे. पौलानं म्हटलं: “तुम्ही जे सर्व करता त्यात तुम्ही निःस्वार्थी व समजूतदार आहात, हे प्रत्येकाला दिसू द्या.” (फिलिप्पै. ४:५, सुबोध भाषांतर) आरोग्याच्या बाबतीत अवाजवी विचार करत बसण्यापेक्षा, यहोवाच्या उपासनेवर आपलं लक्ष केंद्रित करण्यासाठी समजूतदारपणा आपल्याला मदत करेल. आपण जर तब्येतीविषयीच जास्त काळजी करत राहिलो, तर कदाचित आपण स्वकेंद्रित बनू किंवा आपला दृष्टिकोन स्वार्थी बनेल. (फिलिप्पै. २:४) शिवाय या जगात परिपूर्ण आरोग्याची अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाही, हे आपण जाणतो. उलट, यहोवाची सेवा करणं हीच आपल्या जीवनातली सर्वात महत्त्वाची गोष्ट असली पाहिजे.—फिलिप्पैकर १:१० वाचा.

इतरांवर आपली मतं लादण्याचा तुम्ही प्रयत्न करता का? (परिच्छेद ९ पाहा)

९. रोमकर १४:१३, १९ मधील तत्त्व, आरोग्याच्या बाबतीत असणाऱ्या आपल्या निर्णयांवर कसा परिणाम करतं, आणि मंडळीतील एकता कशा प्रकारे धोक्यात येऊ शकते?

एक समजूतदार ख्रिस्ती स्वतःला योग्य वाटणाऱ्या गोष्टी दुसऱ्यांवर लादण्याचा मुळीच प्रयत्न करत नाही. या उदाहरणाचा विचार करा: यूरोपमधील एका देशात एका जोडप्यानं मंडळीतील इतरांना एक खास पोषक आहार (फूड सप्लीमेंट्स) सुरू करण्यासाठी खूप प्रोत्साहन दिलं. काही बंधुभगिनींना तर त्यांनी खूपच आग्रह केला. पण काहींनी ते न घेण्याचं ठरवलं. पण पुढे जेव्हा या पोषक आहाराचा म्हणावा तसा परिणाम होत नसल्याचं लक्षात आलं, तेव्हा बऱ्याच जणांना याचं खूप वाईट वाटलं. खरंच, अशा गोष्टींमुळे मंडळीच्या ऐक्यावरही परिणाम होऊ शकतो. हे खरं आहे, की या जोडप्याला स्वतःसाठी कोणत्या प्रकारचा आहार निवडावा हे ठरवण्याचा अधिकार होता. पण आरोग्याबद्दल असणारा आपला दृष्टिकोन इतरांवर लादण्याच्या आपल्या प्रयत्नात, मंडळीची एकता धोक्यात येत असेल तर हे कितपत योग्य ठरेल? प्राचीन रोममधील काही ख्रिश्चनांचीही खाण्या-पिण्याच्या गोष्टींबद्दल आणि सणासुदीच्या दिवसांबद्दल वेगवेगळी मतं होती. पण पौलानं त्यांना कोणता सल्ला दिला? त्यानं म्हटलं: “कोणी माणूस एखादा दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानतो. दुसरा कोणी सर्व दिवस सारखे मानतो. तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करून घ्यावी.” तेव्हा इतरांना अडखळण होईल असं वागण्याविषयी आपण नेहमी सावध असलं पाहिजे.—रोमकर १४:५, १३, १५, १९, २० वाचा.

१०. इतरांच्या निर्णयांचा आपण आदर का केला पाहिजे? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

१० कधी-कधी मंडळीतील एखाद्यानं ठरावीक निर्णय का घेतला हे आपण समजू शकत नाही. अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? अशा वेळी त्यानं घेतलेल्या निर्णयावर लगेचच शंका घेण्याची वृत्ती आपण टाळली पाहिजे. किंवा त्यानं आपला निर्णय बदलावा म्हणून त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्नही आपण करू नये. त्या व्यक्तीला कदाचित स्वतःच्या विवेकाला अजून जास्त प्रशिक्षण देण्याची गरज असेल. किंवा कदाचित त्याचा विवेक काही बाबतींत अजूनही कमकुवत असेल. (१ करिंथ. ८:११, १२) कोण जाणे कदाचित आपल्याच विवेकाला अजून प्रशिक्षणाची गरज असेल! आरोग्याची काळजीसंबंधी आणि इतर बाबतींत प्रत्येकानं स्वतः निर्णय घेतला पाहिजे आणि त्यासाठी स्वतःच जबाबदार असलं पाहिजे.

करमणुकीचा आनंद घ्या

११, १२. करमणुकीची निवड करण्याच्या बाबतीत बायबल आपल्याला कशा प्रकारे मदत करते?

११ करमणुकीचा आनंद लुटण्याच्या क्षमतेसह यहोवानं आपल्याला बनवलं आहे. शिवाय, “हसण्याचा समय” आणि “नृत्य करण्याचा समय असतो” असं शलमोनानंही लिहिलं आहे. (उप. ३:४) पण म्हणून प्रत्येक करमणूक फायद्याची, आनंदाची किंवा तजेला देणारी असते असं म्हणता येणार नाही. शिवाय, करमणुकीच्या निमित्तानं पुष्कळ वेळ वाया घालवण्याचंही आपण टाळलं पाहिजे. तर मग, यहोवाला मान्य असलेल्या करमणुकीचा आनंद घेण्यासाठी आपला विवेक आपल्याला कशी मदत करू शकतो?

१२ बायबल आपल्याला ‘देहाच्या कर्मांपासून’ दूर राहण्याची ताकीद देते. यात “जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा” आणि अशा इतर गोष्टींचा समावेश होतो. पौलानं लिहिलं, की “अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” (गलती. ५:१९-२१) त्यामुळे आपण स्वतःला असं विचारलं पाहिजे: ‘हिंसक आणि स्पर्धात्मक वृत्तीला किंवा राष्ट्रवादी भावनेला खतपाणी घालणाऱ्या खेळांना टाळण्यासाठी, माझा विवेक मला चालना देतो का? पोर्नोग्राफीचा (अश्‍लील साहित्य) समावेश असलेले किंवा अनैतिकता, दारूबाजी आणि भूतविद्या यांना बढावा देणारे चित्रपट पाहण्याचा मोह होतो, तेव्हा माझा विवेक मला सावध करतो का?’

१३. करमणुकीच्या बाबतीत १ तीमथ्य ४:८ आणि नीतिसूत्रे १३:२० यामधील सल्ल्याचा आपल्याला कसा फायदा होतो?

१३ करमणुकीविषयी आपल्या विवेकाला प्रशिक्षित करण्याकरता बायबलची तत्त्वं आपल्याला मदत करू शकतात. उदाहरणार्थ बायबल म्हणतं, की “शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे.” (१ तीम. ४:८) नियमित व्यायाम तजेला देणारा आणि आरोग्यासाठी फायद्याचा आहे असं अनेकांचं मत आहे. पण इतर सोबत्यांसोबत व्यायाम करण्याच्या बाबतीत काय? आपण कोणासोबत व्यायाम करतो हे पाहणं खरंच महत्त्वाचं आहे का? याविषयी आपण नक्कीच विचार केला पाहिजे. कारण नीतिसूत्रे १३:२० म्हणतं: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” यावरून स्पष्ट होतं, की करमणुकीची निवड करताना आपण आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकाचा वापर करणं फार महत्त्वाचं आहे.

१४. रोमकर १४:२-४ मधील सल्ला एका कुटुंबाला कसा लागू करता आला?

१४ क्रिस्टन आणि डॅनिएला यांना दोन तरुण मुली आहेत. क्रिस्टन म्हणतात: “आमच्या कौटुंबिक उपासनेदरम्यान एकदा आम्ही करमणुकीच्या बाबतीत चर्चा केली. मजा करण्यासाठी करमणुकीचे काही प्रकार योग्य, तर काही अयोग्य असतात याविषयी आम्हा सगळ्यांचंच एकमत होतं. पण करमणुकीसाठी कोणाची संगत योग्य असेल असं मी विचारलं तेव्हा माझ्या एका मुलीनं अशी तक्रार केली, की ‘शाळेच्या सुट्टीत काही साक्षीदार मुलं अगदी न पटण्यासारखं वागत असतात. त्यामुळे मीही त्यांच्यासारखंच वागावं का, असं मला नेहमी वाटतं.’ पण आम्ही तिला समजावून सांगितलं, की आपल्या प्रत्येकाजवळ विवेक आहे. तेव्हा, आपण कोणत्या गोष्टी करायच्या आणि त्यासाठी कोणाची संगत निवडायची ते आपण आपल्या विवेकानुसार ठरवलं पाहिजे.”—रोमकर १४:२-४ वाचा.

तुमचा बायबल प्रशिक्षित विवेक तुम्हाला धोके टाळण्यास मदत करू शकतो (परिच्छेद १४ पाहा)

१५. करमणुकीच्या बाबतीत मत्तय ६:३३ मधील सल्ला आपल्याला कसा उपयोगी ठरू शकतो?

१५ तुम्ही करमणुकीसाठी किती वेळ घालवता? सभा, प्रचारकार्य आणि बायबल अभ्यास यांसारख्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात पहिलं स्थान आहे की करमणुकीला? तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे? येशूनं म्हटलं: “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” (मत्त. ६:३३) वेळ कसा घालवायचा हे ठरवताना, तुमचा विवेक तुम्हाला येशूच्या या सल्ल्याची आठवण करून देतो का?

प्रचारकार्याचं प्रोत्साहन

१६. आपला विवेक प्रचारकार्याबद्दल आपल्याला कशा प्रकारे प्रोत्साहन देऊ शकतो?

१६ चांगल्या प्रकारे प्रशिक्षित असलेला विवेक केवळ चुकीच्या गोष्टींबद्दल आपल्याला सावध करत नाही, तर त्यासोबत चांगल्या गोष्टी करण्याचं प्रोत्साहनही देतो. या चांगल्या गोष्टींमध्ये प्रचारकार्याचं कामही येतं. मग ते औपचारिक असो किंवा अनौपचारिक. पौलानंही सुवार्ता सांगितली आणि म्हटलं: “मला ती सांगणे भाग आहे; कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार!” (१ करिंथ. ९:१६) आपणही याबाबतीत पौलाचं अनुकरण केलं पाहिजे. आपण असं केलं तर आपण योग्य ते करत आहोत, याविषयी आपला विवेकही आपल्याला शाबासकी देईल. शिवाय, इतरांना सुवार्ता सांगितल्यामुळे आपण त्यांच्याही विवेकाला योग्य ते करण्यास चालना देत असतो. पौल पुढे म्हणतो: “सत्य प्रगट करून देवासमक्ष प्रत्येक माणसाच्या सद्द्विवेकाला आपणास पटवतो.”—२ करिंथ. ४:२.

१७. एका तरुण बहिणीनं कशा प्रकारे आपल्या विवेकानुसार कार्य केलं?

१७ जॅकलिन १६ वर्षांची असताना तिच्या वर्गात जीवशास्त्राचा तास सुरू होता. त्या वेळी वर्गामध्ये उत्क्रांतिवादावर शिकवलं जात होतं. ही बहीण म्हणते, “माझा विवेक मला बोचत होता. त्यामुळे वर्गात चाललेल्या चर्चेमध्ये मला नेहमीप्रमाणे सहभाग घेता येत नव्हता. उत्क्रांतीच्या सिद्धांताला स्वीकारणं मला शक्य नव्हतं. तेव्हा शिक्षकांना भेटून मी माझ्या विश्वासाबद्दल त्यांना सांगितलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांनी फार चांगल्या प्रकारे माझं ऐकून घेतलं आणि निर्मितीविषयी सगळ्या वर्गासमोर माझं मत सांगण्याची संधी मला दिली.” जॅकलिननं त्या वेळी आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकाचं ऐकलं, याबद्दल आता तिला खूप समाधान वाटतं. जॅकलिनप्रमाणे तुमचाही विवेक तुम्हाला योग्य ते करण्यास उत्तेजन देतो का?

१८. चांगल्या आणि भरवशालायक विवेकाची आपल्याला का गरज आहे?

१८ यहोवाच्या तत्त्वांनुसार आणि त्याच्या स्तरांनुसार जगणं हाच आपला उद्देश आहे. आणि आपला विवेक हा उद्देश साध्य करण्यास आपल्याला मदत करतो. आपण जर दररोज देवाच्या वचनाचा अभ्यास करून त्यावर मनन केलं आणि जे शिकतो ते आपल्या जीवनात लागू केलं, तर आपण आपल्या विवेकाला चांगल्या प्रकारे प्रशिक्षित करू शकतो. असं केल्यामुळे विवेकाची ही सुंदर भेट आपल्या ख्रिस्ती जीवनासाठी एक भरवशालायक मार्गदर्शक शाबीत होईल!