व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा कोणकोणत्या मार्गांनी आपल्यावर प्रेम दाखवतो?

यहोवा कोणकोणत्या मार्गांनी आपल्यावर प्रेम दाखवतो?

“पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पाहा!”—१ योहा. ३:१.

गीत क्रमांक: ५१, १३

१. प्रेषित योहानानं आपल्याला कशाविषयी प्रोत्साहन दिलं, आणि का?

यहोवाच्या असीम प्रेमावर खोलवर विचार करण्याचं प्रोत्साहन प्रेषित योहानानं आपल्याला दिलं आहे. १ योहान ३:१ या वचनात त्यानं म्हटलं: “पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पाहा!” यहोवा आपल्यावर किती प्रेम करतो आणि हे प्रेम तो कशा प्रकारे दाखवतो, यावर मनन केल्यामुळे त्याच्यासोबतचं आपलं नातं आणखी घट्ट होईल. शिवाय, यहोवावर आणखी जास्त प्रेम करण्यास आपण प्रवृत्त होऊ.

२. देवाचं आपल्यावर खरंच खूप प्रेम आहे, हे समजून घेणं काही जणांना कठीण का जातं?

पण दुःखाची गोष्ट म्हणजे, देवाचं आपल्यावर खरंच खूप प्रेम आहे हे समजून घेणं काही जणांना कठीण जातं. काही जण कदाचित असा विचार करत असतील, की देव फक्त नियम बनवतो आणि जो कोणी ते नियम मोडतो त्याला तो शिक्षा देतो. त्यामुळे देवाला मुळात लोकांची काळजीच नाही असं त्यांना वाटतं. शिवाय चुकीच्या समजुतींमुळे काही जण असा विचार करतात, की देव एक कठोर व्यक्ती आहे आणि त्याच्यावर प्रेम करणं शक्यच नाही. तर काही जण असाही विचार करतात की तुम्ही कसंही वागलात तरी देव तुमच्यावर प्रेम करतो, त्याच्या प्रेमाला कुठलीच अट नाही. पण बायबलचा अभ्यास केल्यामुळे तुम्हाला हे शिकायला मिळालं, की प्रेम हा यहोवाचा सर्वात मुख्य गुण आहे. आणि या प्रेमामुळेच त्यानं आपल्या पुत्राला खंडणी म्हणून दिलं. (योहा. ३:१६; १ योहा. ४:८) पण तरी, तुमच्या आयुष्यात आलेल्या काही वाईट अनुभवांमुळे यहोवाचं तुमच्यावर किती प्रेम आहे, हे समजून घेणं कदाचित तुम्हाला कठीण जात असेल.

३. यहोवाचं प्रेम समजून घेण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

यहोवाचं आपल्यावर असणारं प्रेम समजून घेण्यासाठी सर्वात आधी आपल्याला त्याच्यासोबतचं आपलं नातं समजून घेणं गरजेचं आहे. यहोवा आपला निर्माणकर्ता आहे आणि त्यानंच आपल्याला जीवन दिलं आहे. (स्तोत्र १००:३-५ वाचा.) म्हणूनच बायबलमध्ये पहिल्या मानवाला “देवाचा पुत्र” असं म्हटलं आहे. (लूक ३:३८) शिवाय, यहोवाला “आमच्या स्वर्गातील पित्या” असं म्हणण्यास येशूनं आपल्याला शिकवलं. (मत्त. ६:९) म्हणून यहोवा आपला पिता आहे, आणि जसा एक प्रेमळ पिता आपल्या मुलांवर प्रेम करतो अगदी तसंच प्रेम यहोवादेखील आपल्यावर करतो.

४. (क) यहोवा कोणत्या बाबतीत मानवी पित्यांपेक्षा वेगळा आहे? (ख) या आणि पुढच्या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

सर्व मानवी पिता अपरिपूर्ण आहेत. त्यामुळे एक वडील या नात्यानं यहोवा दाखवत असलेलं प्रेम ते कधीच पूर्णपणे दाखवू शकत नाहीत. शिवाय, काहींना लहानपणी आपल्या वडिलांकडून वाईट वागणूक मिळाली असेल. आणि त्या कडू आठवणी आजही त्यांच्या मनात असतील. त्यामुळे वडिलांना एक प्रेमळ व्यक्ती म्हणून पाहणं त्यांना कठीण जातं. पण यहोवा मात्र असा नाही. (स्तो. २७:१०) तो आपल्यावर खूप प्रेम करतो आणि वेगवेगळ्या मार्गांनी तो आपली काळजी घेतो. त्यामुळे जितकी जास्त आपल्याला यहोवाच्या प्रेमाची जाणीव होईल, तितकं जास्त आपण यहोवावर प्रेम करण्यास प्रवृत्त होऊ. (याको. ४:८) यहोवा कोणत्या चार मार्गांनी आपल्यावर त्याचं प्रेम असल्याचं दाखवतो ते आता आपण पाहू या. आणि पुढील लेखात आपण अशा चार मार्गांविषयी शिकू या ज्यांद्वारे यहोवावरील आपलं प्रेम आपण व्यक्त करू शकतो.

यहोवा प्रेम आणि उदारता दाखवतो

५. प्रेषित पौलानं अथेन्समधील लोकांना काय सांगितलं?

ग्रीसच्या अथेन्स शहरातील लोक मूर्तींचा भरपूर प्रमाणात वापर करत होते हे पौलानं पाहिलं. त्यांच्या या देवांनीच त्यांना जीवन दिलं आहे असं त्यांना वाटायचं. पण खऱ्या देवाबद्दल त्यांना माहीत नव्हतं. म्हणून पौलानं त्यांना “जग व त्यांतले अवघे” निर्माण करणाऱ्या देवाबद्दल सांगितलं. त्यानं म्हटलं, “जीवन, प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो” आणि त्याच्यामुळेच आपण “जगतो, वागतो व आहो.” (प्रे. कृत्ये १७:२४, २५, २८) खरंच, जगण्यासाठी आणि जीवनाचा आनंद घेण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे त्या सर्व गोष्टी यहोवानं आपल्याला पुरवल्या आहेत. आपल्यावर असणाऱ्या प्रेमामुळे, त्यानं कोणत्या काही गोष्टी आपल्याला दिल्या आहेत यांचा आता आपण विचार करू या.

६. यहोवानं ज्या प्रकारे पृथ्वीची रचना केली त्यावरून त्याचं प्रेम कसं दिसून येतं? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

उदाहरणार्थ, यहोवानं आपल्याला एक सुंदर घर दिलं आहे. (स्तो. ११५:१५, १६) त्यानं बनवलेल्या सगळ्या ग्रहांमध्ये पृथ्वीसारखा दुसरा कोणताच ग्रह नाही. वैज्ञानिकांनी संशोधन करून कित्येक ग्रहांचा शोध लावला आहे. पण त्यांना अजून असा एकही ग्रह सापडला नाही ज्यावर मानवांना जिवंत राहण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. यहोवानं जिवंत राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीच आपल्याला पुरवल्या नाहीत तर त्यानं पृथ्वीला एक सुंदर, सोईस्कर आणि सुरक्षित ठिकाण बनवलं आहे. त्यामुळे जीवनाचा आनंद लुटणं आपल्याला शक्य होतं. (यश. ४५:१८) यहोवानं आपल्याला दिलेल्या या सुंदर पृथ्वी ग्रहाविषयी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे हे दिसून येतं.—ईयोब ३८:४, ७; स्तोत्र ८:३-५ वाचा.

७. यहोवानं ज्या प्रकारे आपली निर्मिती केली त्यावरून तो खरंच आपल्यावर प्रेम करतो हे कसं दिसून येतं?

यहोवानं आपल्यावर आणखी एका मार्गानं प्रेम दाखवलं आहे. त्यानं आपल्याला त्याच्या गुणांचं अनुकरण करण्याच्या क्षमतेसह बनवलं आहे. (उत्प. १:२७) या क्षमतेमुळेच आपल्याला त्याचं प्रेम अनुभवणं आणि त्याच्याप्रती प्रेम व्यक्त करणं शक्य होतं. यामुळेच आपल्याला जीवनात खरा आनंद मिळू शकतो हे यहोवाला माहीत आहे. शेवटी मुलं तेव्हाच सर्वात जास्त आनंदी असतात, जेव्हा पालकांचं आपल्यावर खूप प्रेम आहे याची जाणीव त्यांना असते. त्याच प्रकारे, जेव्हा यहोवासोबत आपला जवळचा नातेसंबंध असतो तेव्हाच आपण जीवनात आनंदी होऊ शकतो असं येशूनं शिकवलं. (मत्त. ५:६) खरोखर, आनंदी होण्याकरता आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी यहोवा आपल्याला पुरवतो. यावरून तो किती उदार आहे आणि त्याचं आपल्या सर्वांवर किती प्रेम आहे हे दिसून येतं.—१ तीम. ६:१७; स्तो. १४५:१६.

यहोवा आपल्याला सत्य शिकवतो

८. आपल्याला यहोवानं शिकवावं असं तुम्हाला का वाटतं?

एका पित्याचं आपल्या मुलांवर जिवापाड प्रेम असतं. त्यामुळे त्यांनी चुकीच्या मार्गाला लागावं किंवा कुणीतरी त्यांना फसवावं असं त्याला वाटत नाही. पण, बरेच पालक योग्य काय आणि अयोग्य काय यांविषयी असलेल्या बायबलच्या स्तरांना मानत नाहीत. त्यामुळे ते आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन देऊ शकत नाहीत. सहसा याचा परिणाम निराशा आणि गोंधळात होतो. (नीति. १४:१२) याउलट यहोवा “सत्यस्वरूप” देव असल्यामुळे तो आपल्या मुलांना सर्वोत्तम मार्गदर्शन देतो. (स्तो. ३१:५) तो अगदी आनंदानं आपल्याला त्याच्याबद्दलचं सत्य सांगतो आणि त्याची उपासना कशी करावी हे शिकवतो. शिवाय जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग काय आहे हेदेखील तो आपल्याला दाखवतो. (स्तोत्र ४३:३ वाचा.) पण, यहोवानं आपल्याला अशा कोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत ज्यांवरून त्याचं प्रेम दिसून येतं?

ख्रिस्ती पिता यहोवाचं अनुकरण करून आपल्या मुलांना सत्य शिकवतात आणि स्वर्गीय पिता यहोवा याच्याशी नातं जोडण्यास त्यांना मदत करतात (परिच्छेद ८-१० पाहा)

९, १०. (क) यहोवा आपल्याला त्याच्याबद्दल का शिकवतो? (ख) आपल्यासाठी असलेल्या उद्देशाबद्दल सांगण्याद्वारे यहोवानं प्रेम कसं दाखवलं आहे?

यहोवानं आपल्याला त्याच्याबद्दल सत्य शिकवलं आहे. कारण, आपण त्याला चांगल्या प्रकारे ओळखावं असं त्याला वाटतं. (याको. ४:८) उदाहरणार्थ, त्यानं आपल्याला त्याचं नाव सांगितलं आहे. खरंतर, बायबलमध्ये कोणत्याही नावापेक्षा यहोवाचं नाव सर्वात जास्त वेळा आढळतं. शिवाय, तो कसा आहे हेदेखील तो आपल्याला सांगतो. त्यानं बनवलेल्या गोष्टींचं आपण निरीक्षण करतो तेव्हा तो किती शक्तिशाली आणि बुद्धिमान आहे हे आपल्याला समजतं. (रोम. १:२०) तसंच, आपण जेव्हा बायबल वाचतो तेव्हा तो किती न्यायी आहे आणि त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे हेदेखील आपल्याला शिकायला मिळतं. यहोवाच्या सुंदर व्यक्तिमत्त्वाची आपल्याला जसजशी ओळख होते, तसतसं आपण त्याच्या आणखी जवळ जाऊ लागतो.

१० यहोवा आपल्याला त्याच्या उद्देशाबद्दलही सांगतो. आपण त्याच्या मोठ्या कुटुंबाचा भाग आहोत आणि या कुटुंबात आपण एकतेनं व शांतीनं राहावं म्हणून त्यानं त्याच्या अपेक्षा आपल्याला कळवल्या आहेत. बायबल आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगतं की स्वतःसाठी योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवण्याचा अधिकार यहोवानं आपल्याला दिलेला नाही. (यिर्म. १०:२३) पण, आपल्यासाठी सर्वात चांगलं काय हे यहोवाला माहीत आहे. आणि म्हणून जेव्हा आपण त्याच्या अधिकाराला मानू आणि त्याच्या आज्ञांचं पालन करू तेव्हाच आपण एक शांतीपूर्ण आणि समाधानी जीवन जगू शकतो. आपल्यावर असलेल्या प्रेमामुळेच यहोवानं हे महत्त्वपूर्ण सत्य आपल्याला शिकवलं आहे.

११. यहोवानं भविष्याबद्दल आपल्याला जे सांगितलं आहे त्यावरून त्याचं प्रेम कशा प्रकारे दिसून येतं?

११ एका प्रेमळ पित्याला आपल्या मुलांच्या भविष्याची खूप काळजी असते. आपल्या मुलांनी एक समाधानी जीवन जगावं असं त्याला वाटतं. पण, दुःखाची गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांना भविष्याची काहीच कल्पना नसल्यामुळे ते खूप चिंतित आहेत. शिवाय, कित्येक जण अशा काही गोष्टींच्या मागे लागलेले आहेत ज्या जास्त काळ टिकणाऱ्या नाहीत. (स्तो. ९०:१०) पण, आपला स्वर्गीय पिता यहोवा तसा नाही. आज आपण एक समाधानी जीवन कसं जगू शकतो हे त्यानं आपल्याला शिकवलं आहे. इतकंच नाही, तर एका चांगल्या भविष्याची आशाही त्यानं आपल्याला दिली आहे. यासाठी आपण खरंच त्याचे किती आभार मानले पाहिजेत!

यहोवा आपल्या मुलांचं मार्गदर्शन करतो आणि त्यांना शिस्त लावतो

१२. यहोवानं काईनाला आणि बारूखला कशा प्रकारे मदत केली?

१२ काईनाच्या हातून एक गंभीर गोष्ट घडणार आहे हे जेव्हा यहोवानं पाहिलं, तेव्हा त्याला मदत करण्याचा प्रयत्न त्यानं केला. यहोवानं त्याला विचारलं: “तू का संतापलास? आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय?” (उत्प. ४:६, ७) पण, काईनानं यहोवाचं ऐकलं नाही आणि त्यामुळे त्याला याचे वाईट परिणाम भोगावे लागले. (उत्प. ४:११-१३) आणखी एके प्रसंगी यहोवानं बारूखच्या मनात आलेली चुकीची इच्छा पाहिली. त्याच्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे तो अगदी निराश आणि अस्वस्थ झाला होता. म्हणून यहोवानं बारूखला सांगितलं की तो करत असलेला विचार चुकीचा आहे आणि त्याला आपली विचारसरणी बदलण्याची गरज आहे. बारूखनं यहोवाचा सल्ला स्वीकारला आणि त्यामुळे त्याचा जीव वाचला.—यिर्म. ४५:२-५.

१३. यहोवानं त्याच्या विश्वासू सेवकांना कठीण प्रसंगांतून का जाऊ दिलं?

१३ यहोवाचं आपल्यावर प्रेम असल्यामुळेच तो आपलं मार्गदर्शन करतो आणि आपल्याला शिस्त लावतो. गरज असते तेव्हा तो आपल्यात सुधारणा तर करतोच, पण त्याशिवाय तो आपल्याला प्रशिक्षणही देतो. (इब्री १२:६) बायबलमध्ये आपण यहोवाच्या अशा विश्वासू सेवकांविषयी वाचतो ज्यांना आणखी चांगली व्यक्ती बनण्याकरता यहोवानं मदत केली होती. उदाहरणार्थ, योसेफ, मोशे आणि दावीद यांनी अतिशय कठीण परिस्थितीचा सामना केला होता. त्या सबंध काळात यहोवा त्यांच्यासोबत होता. पुढे, जेव्हा यहोवानं त्यांच्यावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या तेव्हा या कठीण काळात शिकायला मिळालेल्या गोष्टींचा त्यांना फायदा झाला. यहोवा आपल्या लोकांना कशा प्रकारे मदत करतो आणि प्रशिक्षण देतो याविषयी जेव्हा आपण बायबलमध्ये वाचतो, तेव्हा यहोवाचं आपल्यावर खरंच खूप प्रेम आहे याची आपल्याला जाणीव होते.—नीतिसूत्रे ३:११, १२ वाचा.

१४. आपल्या हातून एखादी चूक घडते तेव्हा यहोवा आपल्याला कसं प्रेम दाखवतो?

१४ आपल्या हातून जेव्हा एखादी चुकीची गोष्ट घडते तेव्हा यहोवानं आपल्यावर प्रेम करायचं सोडून दिलं आहे, असा याचा अर्थ होत नाही. कारण, आपण जर यहोवाकडून मिळालेला सल्ला स्वीकारला आणि पश्‍चात्ताप दाखवला तर तो आपल्याला “भरपूर” प्रमाणात क्षमा करतो असं बायबल सांगतं. (यश. ५५:७) दाविदानं यहोवाच्या क्षमाशीलतेबद्दल जे लिहिलं त्यावरून तो किती दयाळू आहे ते आपल्याला समजतं. त्यानं म्हटलं: “तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो; तो तुझे सर्व रोग बरे करतो; तो तुझा जीव विनाशगर्तेंतून उद्धारतो; तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालतो; पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत.” (स्तो. १०३:३, ४, १२) यहोवा वेगवेगळ्या मार्गांनी आपल्याला शिस्त लावतो आणि आपलं मार्गदर्शन करतो. तर मग जेव्हा आपल्याला काही सुधारणा करण्यासाठी सांगितलं जातं तेव्हा त्या करण्यासाठी आपण लगेचच तयार असतो का? हे नेहमी लक्षात असू द्या की यहोवाचं आपल्यावर प्रेम असल्यामुळेच तो आपल्याला शिस्त लावतो.—स्तो. ३०:५.

यहोवा आपलं रक्षण करतो

१५. यहोवा आणखी कोणत्या मार्गानं आपल्यावर प्रेम दाखवतो?

१५ एक प्रेमळ पिता नेहमी आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपला पिता यहोवादेखील असाच आहे. स्तोत्रकर्त्यानं त्याच्याविषयी म्हटलं: “तो आपल्या भक्तांच्या जीवाचे रक्षण करतो. तो त्यांस दुर्जनांच्या हातांतून सोडवतो.” (स्तो. ९७:१०) आपल्या डोळ्यांना आपण किती जपतो, याचा विचार करा. जसं डोळ्याआड येणारी एखादी गोष्ट आडवण्यासाठी आपण पटकन हात पुढे आणतो, तसंच यहोवादेखील त्याच्या लोकांना तितकंच जपतो. त्यांचं संरक्षण करण्यासाठी तो पटकन पाऊल उचलतो.—जखऱ्या २:८ वाचा.

१६, १७. यहोवा कोणकोणत्या मार्गांनी आपल्या लोकांचं रक्षण करतो?

१६ उदाहरणार्थ, आपल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी यहोवा देवदूतांचा वापर करतो. त्यानं पूर्वीही त्यांचा उपयोग केला होता आणि आजही करतो. (स्तो. ९१:११) आपल्या लोकांचा बचाव करण्यासाठी यहोवानं आपल्या देवदूताद्वारे एका रात्रीत १,८५,००० अश्शूरी सैनिकांना ठार केलं. (२ राजे १९:३५) तसंच, पहिल्या शतकात पेत्र, पौल आणि इतरांना तुरुंगातून सोडवण्याकरताही यहोवानं देवदूतांचा वापर केला. (प्रे. कृत्ये ५:१८-२०; १२:६-११) आणि आज आपल्या दिवसांतही तो देवदूतांचा वापर करतो. उदाहरणार्थ, अलीकडेच आफ्रिकेत एक भयंकर युद्ध झालं होतं. लढाई, चोरी, बलात्कार आणि खून यांमुळे तिथं अक्षरशः हाहाकार माजला होता. आपल्या बऱ्याच बांधवांनी सर्वकाही गमावलं पण तरी त्यात कोणाचा मृत्यू झाला नाही. यहोवा आपली काळजी करत आहे आणि त्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे हे त्यांनी अनुभवलं. अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करत असतानाही ते आनंदी होते. जेव्हा मुख्यालयाचे प्रतिनिधी तिथं गेले आणि त्यांनी त्यांची विचारपूस केली तेव्हा ते म्हणाले, “यहोवाच्या कृपेनं आम्ही सर्व सुखरूप आहोत!”

१७ पण, हेदेखील खरं आहे की यहोवाच्या काही सेवकांना त्याला विश्वासू राहिल्यामुळे आपला जीवदेखील गमवावा लागला आहे. उदाहरणार्थ, स्तेफनाला आणि त्याच्यासारख्या इतरांना देवाला विश्वासू राहिल्यामुळे मारून टाकण्यात आलं. यहोवा कधीकधी अशा गोष्टींना घडू देतो. पण, एक समूह या नात्यानं तो त्याच्या लोकांचं नेहमी रक्षण करतो. सैतान ज्या वेगवेगळ्या मार्गांनी त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतो त्यांबद्दल तो त्यांना आधीच इशारा देतो. (इफिस. ६:१०-१२) यासाठी तो बायबलचा आणि आपल्या संघटनेद्वारे प्रकाशित केलेल्या प्रकाशनांचा उपयोग करतो. उदाहरणार्थ, इंटरनेट, पैशाची हाव आणि अनैतिक व हिंसक मनोरंजन किती धोकादायक आहेत हे त्यानं आपल्याला आधीच सांगितलं आहे. यावरून हे स्पष्ट होतं की यहोवाचं आपल्या लोकांवर प्रेम आहे आणि त्यांचं रक्षण करण्याची त्याची मनापासून इच्छा आहे.

एक मोठा बहुमान

१८. यहोवा तुमच्यावर दाखवत असलेल्या प्रेमाबद्दल तुम्हाला कसं वाटतं?

१८ यहोवाच्या सेवेत घालवलेल्या सबंध काळाचा विचार केल्यानंतर मोशेला याची खात्री पटली की यहोवाचं त्याच्यावर प्रेम आहे. म्हणून मोशेनं म्हटलं: “तू आपल्या दयेने आम्हाला प्रभातीच तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरित होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालवू.” (स्तो. ९०:१४) आपण यहोवाचं प्रेम ओळखू शकतो आणि त्याचं प्रेम अनुभवू शकतो हा आपल्याला मिळालेला एक मोठा बहुमानच आहे! तेव्हा, प्रेषित योहानानं म्हटलं तसं आपणही म्हणू: “पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पाहा.”—१ योहा. ३:१.