व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या संग्रहातून

“जगातल्या कोणत्याही गोष्टीला कॉलपोर्टर म्हणून सेवा करण्याच्या संधीआड येऊ देऊ नका!”

“जगातल्या कोणत्याही गोष्टीला कॉलपोर्टर म्हणून सेवा करण्याच्या संधीआड येऊ देऊ नका!”

१९३१ सालच्या सुरवातीचा तो काळ होता. पॅरिसच्या प्रसिद्ध प्लेयल सांस्कृतिक प्रेक्षागृहासमोर मोठी गर्दी जमली होती. त्या ठिकाणी २३ वेगवेगळ्या देशांतून मोठ्या संख्येनं प्रतिनिधी आले होते. अगदी नवनवीन फॅशनचे कपडे घातलेले हे लोक मोठमोठ्या टॅक्सींतून प्रेक्षागृहासमोर उतरत होते. आणि पाहता पाहता ते प्रेक्षागृह जवळजवळ ३,००० लोकांनी खचाखच भरून गेलं. हे लोक कुठला संगिताचा कार्यक्रम ऐकण्यासाठी नाही, तर बंधू जोसेफ एफ. रदरफर्ड यांचं भाषण ऐकण्यासाठी जमले होते. बंधू रदरफर्ड त्या काळी आपल्या प्रचारकार्याचं नेतृत्व करायचे. त्यांनी दिलेल्या जोरदार भाषणाचं फ्रेंच, जर्मन आणि पोलिश भाषेत भाषांतर करण्यात आलं होतं. बंधू रदरफर्ड यांचा भारदस्त आवाज संपूर्ण सभागृहात घुमत होता.

पॅरिसमध्ये झालेल्या या अधिवेशनामुळे फ्रान्समध्ये चाललेल्या प्रचारकार्याला एक नवीनच वळण मिळालं. बंधू रदरफर्ड यांनी दुसऱ्या देशांतून आलेल्या श्रोत्यांना, खासकरून तरुण साक्षीदारांना फ्रान्समध्ये कॉलपोर्टर (पायनियर) म्हणून सेवा करण्याचं उत्तेजन दिलं. ते म्हणाले: “तरुणांनो या जगातल्या कोणत्याही गोष्टीला कॉलपोर्टर म्हणून सेवा करण्याच्या संधीआड येऊ देऊ नका!” * बंधू रदरफर्ड यांचं ते हेलावून टाकणारं वाक्य इंग्लंडहून आलेल्या जॉन कूक नावाच्या तरुण बांधवाला कायमचं लक्षात राहिलं आहे.

मासेदोनियात जाऊन सेवा करण्याच्या हाकेला जसं प्रेषित पौलानं प्रतिसाद दिला, तसंच अनेकांनी फ्रान्समध्ये जाऊन सेवा करण्याच्या हाकेला प्रतिसाद दिला. (प्रे. कृत्ये १६:९, १०) जॉन कूकही नंतर मिशनरी म्हणून सेवा करू लागला. याचा परिणाम म्हणजे फ्रान्समधील कॉलपोर्टरांच्या संख्येत जबरदस्त वाढ झाली. १९३० साली तिथं फक्त २७ कॉलपोर्टर होते, पण १९३१ साली त्यांची संख्या वाढून १०४ झाली. सुरवातीच्या बऱ्याच पायनियरांना फ्रेंच भाषा बोलता येत नव्हती. तर मग, भाषेच्या या अडथळ्याचा, हलाखीच्या परिस्थितीचा आणि एकाकीपणाचा सामना करणं त्यांना कसं शक्य होणार होतं?

भाषेच्या अडथळ्याचा सामना

दुसऱ्या देशांतून आलेले कॉलपोर्टर फ्रेंच भाषेत राज्याचा संदेश लिहिलेल्या टेस्टमनी कार्डचा (साक्ष पत्रिका) वापर करून इतरांना सुवार्ता सांगायचे. पॅरिसमध्ये अगदी धैर्यानं प्रचार करणारा जर्मन भाषिक बांधव सांगतो: “आपला देव किती शक्तिशाली आहे हे आम्हाला माहीत होतं. पण तरी सेवाकार्यात असताना आमच्या छातीत धडधड व्हायची. पण, ती लोकांच्या भीतीमुळे नव्हे, तर फ्रेंच भाषेतली अवघड शब्द आम्हाला आठवतील का, या भीतीमुळे. कारण, फ्रेंच भाषेत ‘व्हूले-वू प्लिह सेथ काह्थ, सिल व्हू प्ले? [तुम्ही हे कार्ड वाचू शकता का?]’ असं म्हणावं लागायचं. पण, हे कितीही कठीण असलं तरी आमचं काम खूप महत्त्वाचं आहे याची जाणीव आम्हाला होती.”

सुरवातीचे कॉलपोर्टर सायकल आणि मोटरसायकलचा उपयोग करून फ्रान्समध्ये सुवार्ता घोषित करायचे

बिल्डिंगमध्ये प्रचार करताना घराची रखवाली करणारे लोक सहसा कॉलपोर्टरांना हाकलून लावायचे. एके दिवशी इंग्लंडच्या दोन बहिणी प्रचार करत असताना एका रखवाली करणाऱ्या व्यक्तीला भेटल्या. थोडीफार फ्रेंच भाषा बोलता येणाऱ्या या बहिणींना त्यानं रागातच, तुम्हाला कोणाला भेटायचं आहे, असं विचारलं. त्याच्याशी बोलताना एका बहिणीला दारावर एक लहान पाटी दिसली. त्यावर लिहिलं होतं: “टोह्ने ल्यू बूटून [बेल वाजवा].” त्या बहिणीला वाटलं की ते घरमालकाचं नाव आहे आणि ती अगदी उत्साहानं त्याला म्हणाली: “आम्ही ‘टोह्ने ल्यू बूटून’ मॅडमला भेटायला आलो आहोत.” पण, अशा घटनांना गमतीनं घेतल्यामुळे या आवेशी कॉलपोर्टरांना निराश न होता आनंदानं सेवा करत राहण्यास मदत झाली!

हलाखीची परिस्थिती आणि एकाकीपणाचा सामना

१९३० च्या दशकात फ्रान्समधील बहुतेक लोकांना हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. याच परिस्थितीचा सामना दुसऱ्या देशांतून आलेल्या कॉलपोर्टरांनाही करावा लागला. मोना बर्जोस्का या इंग्लंडच्या बहिणीला आणि तिच्यासोबत असणाऱ्या पायनियर बहिणीला सहन कराव्या लागलेल्या परिस्थितीविषयी ती म्हणते: “आमचं राहण्याचं ठिकाण अगदी साधंसुधं असायचं. आणि हिवाळ्यात खोली गरम ठेवणं ही एक मोठी समस्याच होती. थंड पडलेल्या खोलीत राहण्याशिवाय आमच्या जवळ काही पर्याय नव्हता. सकाळी तोंड धुण्यासाठी तर आम्हाला अक्षरशः पाण्याच्या जगवर जमलेला बर्फ तोडावा लागायचा.” अशा प्रकारच्या परिस्थितीमुळे सुरवातीचे पायनियर निराश झाले का? नक्कीच नाही! त्यांच्यापैकी एक पायनियर, आपल्या भावना व्यक्त करत म्हणतो: “आमच्याजवळ फारसं असं काही नव्हतं, पण कोणत्याही गोष्टीची कमी आम्हाला भासली नाही.”—मत्त. ६:३३.

१९३१ साली पॅरिसमध्ये झालेल्या अधिवेशनाला इंग्लंडहून आलेले पायनियर

या आवेशी कॉलपोर्टरांना एकाकीपणाचाही सामना करावा लागायचा. १९३० च्या दशकातील सुरवातीच्या काळात फ्रान्समध्ये फक्त ७०० च्या आसपास प्रचारक होते. शिवाय, बहुतेक जण देशात वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले होते. तर मग एकाकीपणातही आनंदी राहण्यासाठी या कॉलपोर्टरांना कशामुळे मदत झाली? मोना आणि तिच्यासोबत असणाऱ्या पायनियर बहीणीलाही एकाकीपणाचा सामना करावा लागला. ती म्हणते: “एकाकीपणाचा सामना करण्यासाठी आम्ही सोबत मिळून संस्थेची प्रकाशनं नियमितपणे वाचायचो. त्या काळात पुनर्भेट किंवा बायबल अभ्यास घेण्याची पद्धत नव्हती म्हणून संध्याकाळी आमच्याकडे भरपूर वेळ असायचा. या वेळेत आम्ही घरच्यांना आणि खासकरून इतर पायनियर बंधुभगिनींना पत्र लिहायचो. पत्रात आम्ही त्यांना आम्हाला आलेले चांगले अनुभव सांगायचो आणि त्यामुळे एकमेकांना उत्तेजन मिळायचं.”—१ थेस्सलनी. ५:११.

त्या स्वार्थत्यागी कॉलपोर्टरांनी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन बाळगला. फ्रान्समध्ये पायनियर म्हणून काम केल्याच्या काही दशकांनंतर त्यांनी जी पत्रं शाखा कार्यालयाला पाठवली, त्यावरून हे दिसून येतं. अॅनी क्रिगिन नावाच्या एका अभिषिक्त बहिणीनं १९३१ ते १९३५ सालादरम्यान आपल्या पतीसोबत फ्रान्समध्ये पायनियरिंग केली. त्यांनी फ्रान्सच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास केला. पायनियरिंगच्या त्या काळाबद्दल सांगताना ती म्हणते: “आमचं जीवन आनंदी होतं आणि बऱ्याच रोमांचक घटनांनी भरलेलं होतं. आम्हा पायनियरांची घट्ट मैत्री होती. ‘मी लावलं, अपुल्लोसानं पाणी घातलं, पण देव वाढवत गेला’ या प्रेषित पौलाच्या शब्दांप्रमाणे, अनेक वर्षांआधी लोकांना मदत करण्याची जी संधी आम्हाला मिळाली, ती खरंच आमच्यासाठी एक रोमांचक अनुभव ठरली.”—१ करिंथ. ३:६.

त्या सुरवातीच्या पायनियर बंधुभगिनींनी धैर्य आणि आवेश दाखवण्याच्या बाबतीत आपल्यासमोर खरंच एक अप्रतिम उदाहरण मांडलं आहे. आज ज्यांना आपली सेवा वाढवण्याची इच्छा आहे ते त्यांच्या या उदाहरणाचं अनुकरण करू शकतात. आता फ्रान्समध्ये जवळजवळ १४,००० पायनियर आहेत. त्यांच्यातील अनेक जण विदेशी-भाषिक गटांत किंवा मंडळ्यांमध्ये सेवा करत आहेत. * आधीच्या पायनियरांप्रमाणेच तेदेखील या जगातल्या कोणत्याच गोष्टीला आपल्या सेवेआड येऊ देत नाहीत!—फ्रान्समधील आमच्या संग्रहातून.

^ परि. 4 फ्रान्समध्ये स्थलांतरित झालेल्या पोलिश लोकांच्या प्रचारकार्याबद्दल जाणून घेण्यासाठी १५ ऑगस्ट २०१५ च्या टेहळणी बुरूजमधील सत्य शिकण्यासाठीच यहोवानं तुम्हाला फ्रान्समध्ये आणलं आहे” हा लेख पाहा.

^ परि. 13 २०१४ सालच्या अहवालानुसार फ्रान्सच्या शाखा कार्यालयाच्या देखरेखीखाली ९०० पेक्षा जास्त मंडळ्या आणि गट कार्य करत आहेत. ते ७० वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांना सत्य शिकून घेण्यास मदत करत आहेत.