व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

निराशाजनक परिस्थितीतही तुम्ही आनंदी असू शकता

निराशाजनक परिस्थितीतही तुम्ही आनंदी असू शकता

निराशाजनक परिस्थितीतही तुम्ही आनंदी असू शकता

ज्याला जीवनात कधीही निराशा आली नाही, असा कोण आहे? आपला स्वर्गीय पिता, यहोवा देव यानेही निराशेचे दुःख अनुभवले आहे. उदाहरणार्थ, त्याने इस्राएल लोकांना ईजिप्तच्या दास्यातून सोडवले व त्यांना अनेक आशीर्वाद दिले. तरीसुद्धा बायबल म्हणते: “[इस्राएलांनी] पुन्हा पुन्हा देवाच्या सहनशक्‍तीची परीक्षा घेतली, त्यांनी इस्राएलाच्या पवित्र परमेश्‍वराला खूप दुःख दिले.” (स्तोत्र ७८:४१, ईझी टू रीड व्हर्शन) असे असूनही, यहोवा देव सर्वदा “आनंदी” असतो.—१ तीमथ्य १:११, NW.

निराशेची कारणे अनेक असू शकतात. पण निराशेने आपल्या जीवनातला आनंद हिरावून घेऊ नये म्हणून आपण काय करू शकतो? आणि यहोवा देवाने निराशाजनक परिस्थितीला ज्या प्रकारे तोंड दिले त्यावरून आपण काय शिकू शकतो?

निराशाजनक गोष्टी

देवाचे वचन सांगते: “समय व प्रसंग सर्वांना घडतात.” (उपदेशक ९:११, पं.र.भा.) एखाद्या गुन्ह्यामुळे, दुर्घटनेमुळे किंवा आजारपणामुळे जीवनाची घडी एकाएकी विस्कळीत होऊन माणूस दुःखाच्या व निराशेच्या गर्तेत लोटला जाऊ शकतो. तसेच, “आशा लांबणीवर पडली असता अंतःकरण कष्टी होते,” असेही बायबल म्हणते. (नीतिसूत्रे १३:१२) एखाद्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत असताना आपले मन आनंदी असते, पण जर ही आशा लवकर पूर्ण झाली नाही तर आपण निराश होतो, दुःखी होतो. उदाहरणार्थ, डंकन * यांनी बरीच वर्षे मिशनरी बनण्याचे स्वप्न पाहिले होते. मिशनरी सेवेत अनेक वर्षे घालवल्यानंतर काही कारणास्तव त्यांना आपल्या पत्नीसोबत घरी परतणे भाग पडले. ते म्हणतात, “जीवनात पहिल्यांदा मला सर्वकाही व्यर्थ वाटू लागलं. माझ्यासमोर कोणतीही ध्येये नव्हती. जीवन अगदी नीरस वाटू लागलं.” कधीकधी निराशेचे दुःख कित्येक वर्षांपर्यंत आपला पाठलाग करते. क्लॅर हिच्या बाबतीत असेच घडले. ती सांगते: “सात महिन्यांची गरोदर असताना माझा गर्भपात झाला. त्याला आता कितीतरी वर्षं झाली असतील. पण आजही जेव्हा मी एखाद्या मुलाला स्टेजवर भाषण देताना पाहते तेव्हा ‘आपला मुलगाही आज इतकाच मोठा असता’ हा विचार मनात आल्याशिवाय राहात नाही.”

एखादी व्यक्‍ती आपले मन दुखावते तेव्हाही आपण निराश होतो. उदाहरणार्थ प्रेमभंग झाल्यास, घटस्फोट झाल्यास, मूल आईवडिलांच्या मनाविरुद्ध वागत असल्यास, एखाद्या सहकाऱ्‍याने विश्‍वासघात केल्यास किंवा मित्र कृतघ्नपणे वागल्यास निराशेच्या भावना येणे साहजिक आहे. आज आपण अपरिपूर्ण लोकांमध्ये व कठीण काळांत राहात असल्यामुळे निराशा उत्पन्‍न करणाऱ्‍या कारणांना अंतच नाही.

कधीकधी आपल्या स्वतःच्या अपयशामुळेही निराशा येते. उदाहरणार्थ, एखाद्या परीक्षेत नापास झाल्यास, हवी असलेली नोकरी न मिळाल्यास किंवा एखाद्याचे मन जिंकण्यात यश न आल्यास आपण अगदी कवडीमोल आहोत असे आपल्याला वाटू शकते. तसेच, एखादी प्रिय व्यक्‍ती जेव्हा जीवनात अयोग्य निर्णय घेते तेव्हाही निराशेच्या भावना मनात येऊ शकतात. मेरी म्हणते: “माझी मुलगी यहोवाच्या सेवेत चांगली प्रगती करत होती. माझ्या चांगल्या उदाहरणाचं ती अनुकरण करेल असं मला वाटत होतं. पण अचानक जेव्हा तिनं यहोवा देवाकडे आणि आम्ही तिच्यावर केलेल्या चांगल्या संस्कारांकडे पाठ फिरवली तेव्हा मला असं वाटू लागलं जणू मी हरले. जीवनातल्या इतर क्षेत्रात मिळालेलं यश निरर्थक वाटू लागलं. मी पूर्णपणे खचून गेले.”

जीवनात असे निराशेचे प्रसंग येतात तेव्हा आपण त्यांना कशा प्रकारे तोंड देऊ शकतो? या प्रश्‍नाचे उत्तर मिळवण्याकरता यहोवाने निराशेला कसे तोंड दिले यावर आपण विचार करू या.

उपायावर लक्ष केंद्रित करा

यहोवा देवाने प्रेमळपणे पहिल्या मानवी जोडप्याच्या सर्व गरजा पुरवल्या होत्या. तरीपण त्यांनी कृतघ्न होऊन यहोवाची आज्ञा मोडली. (उत्पत्ति अध्याय २ व) यानंतर त्यांचा मुलगा काईन हा दुष्टबुद्धीने वागू लागला. यहोवाने दिलेल्या इशाऱ्‍याकडे दुर्लक्ष करून काईनाने स्वतःच्या भावाला ठार मारले. (उत्पत्ति ४:१-८) हे पाहून यहोवा किती निराश झाला असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का?

पण या निराशेमुळे यहोवा का खचून गेला नाही? कारण पृथ्वी परिपूर्ण मानवांनी भरून जावी हा उद्देश त्याच्या डोळ्यांसमोर होता. आणि हा उद्देश साध्य करण्यासाठी तो कार्य करत राहिला. (योहान ५:१७) म्हणूनच त्याने खंडणी बलिदानाची व एका राज्याची तरतूद केली. (मत्तय ६:९, १०; रोमकर ५:१८, १९) अशा रीतीने, यहोवा देवाने समस्येवर नव्हे तर उपायावर आपले लक्ष केंद्रित केले.

आपण जीवनात काय करू शकलो असतो, किंवा काय करायला हवे होते याचाच विचार करत बसण्याऐवजी, आपण सकारात्मक गोष्टींचा विचार करावा असे देवाचे वचन आपल्याला प्रोत्साहन देते. ते म्हणते: “जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‌गुण, जी काही स्तुति, त्यांचे मनन करा.”—फिलिप्पैकर ४:८.

निराशेकडे योग्य दृष्टिकोनातून पाहणे

कधीकधी अशा घटना घडतात, ज्यांमुळे एकाएकी आपल्या जीवनाला वेगळेच वळण लागते. उदाहरणार्थ, अचानक आपली नोकरी जाऊ शकते. आपल्या विवाह जोडीदाराचा मृत्यू होऊ शकतो. किंवा, मंडळीतील विशेषाधिकार, आपले आरोग्य, घर किंवा आपले मित्र आपण अचानक गमावू शकतो. अशा बदललेल्या परिस्थितीला आपल्याला कशा प्रकारे तोंड देता येईल?

आपण जीवनात कोणत्या गोष्टींना महत्त्व देऊ इच्छितो हे ठरवून घेतल्याने निराशेवर मात करण्यास साहाय्य मिळते, असे अनेकांना आढळले आहे. डंकन, ज्यांचा याआधी उल्लेख करण्यात आला आहे, ते म्हणतात: “आता आपण पुन्हा कधीही मिशनरी सेवा करू शकणार नाही असं माझ्या पत्नीला व मला जाणवलं तेव्हा आम्ही अगदी खचून गेलो. पण काही काळानंतर आम्ही दोन गोष्टींना सर्वात जास्त महत्त्व द्यायचं ठरवलं, एकतर आईची काळजी घेणं आणि शक्यतो पूर्ण वेळेच्या सेवेत राहणं. कोणताही निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा आम्ही या दोन गोष्टींवर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार करतो. असं केल्यामुळे आम्हाला निर्णय घेणं सोपं जातं.”

निराशाजनक अनुभव येतात तेव्हा बरेचजण परिस्थितीच्या नकारात्मक पैलूला अवास्तव महत्त्व देतात. उदाहरणार्थ, मुलांवर योग्य संस्कार करण्याच्या बाबतीत असो, एखाद्या नोकरीकरता आवश्‍यक पात्रता मिळवण्याच्या बाबतीत असो किंवा दुसऱ्‍या देशात जाऊन सुवार्तेचा प्रचार करण्याच्या बाबतीत असो; जेव्हा मनस्वी प्रयत्न करूनही आपल्याला अपेक्षित परिणाम मिळत नाहीत तेव्हा, ‘माझ्यात काही करण्याची कुवतच नाही, म्हणूनच मी नेहमी अपयशी ठरतो’ असा टोकाचा विचार आपल्या मनात येऊ शकतो. पण, मानवजातीच्या इतिहासाच्या सुरुवातीला जे घडले त्यामुळे आपल्यातच काहीतरी खोट आहे आणि म्हणून आपण अयशस्वी ठरलो असा देवाने विचार केला का? मुळीच नाही. त्याच प्रकारे, सुरुवातीला आपल्याला यश आले नाही याचा अर्थ आपण कधीच यशस्वी होऊ शकणार नाही असा विचार करणे योग्य नाही.—अनुवाद ३२:४, ५.

एखादी व्यक्‍ती आपल्याला निराश करते तेव्हा सहसा आपण त्या व्यक्‍तीवर खूप रागावतो. पण यहोवा अशा प्रकारे वागत नाही. दावीद राजाने व्यभिचार केला आणि मग त्या स्त्रीच्या नवऱ्‍याला ठार मारविले तेव्हा निश्‍चितच यहोवा त्याच्या या वागण्याने निराश झाला असेल. तरीसुद्धा, दाविदाने मनापासून पश्‍चात्ताप केला तेव्हा यहोवाने त्याला क्षमा केली आणि आपल्या सेवेत तो पुढेही त्याचा उपयोग करत राहिला. तसेच, यहोशाफाट राजाने देवाच्या शत्रूंसोबत संगनमत करण्याची चूक केली, तेव्हा यहोवाच्या संदेष्ट्याने त्याला असे म्हटले: “यामुळे परमेश्‍वराचा तुजवर कोप भडकला आहे. तथापि तुझ्या ठायी काही चांगल्या गोष्टी दिसून आल्या आहेत.” (२ इतिहास १९:२, ३) त्या एका चुकीमुळे, यहोशाफाटाने कायमचेच आपल्याला सोडून दिले आहे असा निष्कर्ष यहोवाने काढला नाही. त्याच प्रकारे, आपल्या मित्रांनी आपल्याला एखाद्यावेळी निराश केले तरी त्यांच्यात अजूनही काही चांगले गुण निश्‍चितच असतील. त्यामुळे, आपल्याला जर आपले मित्र गमवायचे नसतील, तर त्यांच्या हातून चुका होतात तेव्हा आपण खूप चिडून प्रतिक्रिया दाखवू नये.—कलस्सैकर ३:१३.

यशाकडे वाटचाल करत असताना, अधूनमधून निराशाजनक अनुभव येतीलच. पण प्रत्येक निराशाजनक अनुभवातून आपण काहीतरी शिकतो. आपल्या हातून एखादी चूक होते तेव्हा साहजिकच आपण निराश होतो. पण अशी चूक पुन्हा होऊ द्यायची नाही असा मनाशी निश्‍चय करून जर आपण आवश्‍यक पावले उचलली तर आपण निराशेवर मात करू शकतो. दावीद राजाने आपल्या हातून झालेल्या चुकांमुळे अगदी निराश होऊन असे लिहिले: “सतत कण्हण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली; . . . [पण] मी आपले पाप तुझ्याजवळ [यहोवाजवळ] कबूल केले . . . तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली.” (स्तोत्र ३२:३-५) आपण यहोवाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे असे जाणवल्यास आपण त्याच्याकडे क्षमेची याचना करून वाईट मार्ग सोडून दिला पाहिजे. आणि भविष्यात देवाच्या मार्गदर्शनाचे आपण जास्त काळजीपूर्वक पालन करू असा मनाशी निश्‍चय केला पाहिजे.—१ योहान २:१, २.

निराशेला तोंड देण्याकरता स्वतःला आताच तयार करा

भविष्यात आपल्या सर्वांनाच कोणत्या न कोणत्या प्रकारे निराशेला तोंड द्यावेच लागेल. तेव्हा, निराशाजनक परिस्थितीला तोंड देण्याकरता आपण आताच स्वतःला कशा प्रकारे तयार करू शकतो? ब्रूनो नावाच्या एका वयस्क ख्रिस्ती मनुष्याने याबाबतीत जे म्हटले ते लक्ष देण्याजोगे आहे. त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा एक निराशाजनक अनुभव त्यांना आला होता. ते म्हणतात: “मला ज्या गोष्टीने निराशेवर मात करायला मदत केली ती म्हणजे देवासोबतचा माझा नातेसंबंध. तो नातेसंबंध दृढ करण्यासाठी आधी मी जे करत होतो तेच मी पुढेही करत राहिलो. देवाने या दुष्ट जगाला का अस्तित्वात राहू दिलं आहे हे मी जाणून घेतलं होतं. तसंच, यहोवासोबत जवळचा नातेसंबंध जोडण्याकरता मी अनेक वर्षं परिश्रमपूर्वक प्रयत्न केला होता. असं केल्याचं मला मनापासून समाधान वाटतं. कारण, यहोवा माझ्या पाठीशी आहे या जाणिवेनंच मला सांत्वन दिलं आणि त्यामुळेच मला नैराश्‍यावर मात करता आली.”

भविष्याकडे पाहताना, आपण एका गोष्टीची खात्री बाळगू शकतो. स्वतःच्या किंवा इतरांच्या वागण्याने आपण वेळोवेळी निराश होत असलो तरी देव आपल्याला कधीही निराश करणार नाही. किंबहुना, देवाने म्हटले की त्याचे नाव यहोवा याचा अर्थ “मला जे व्हायचे असेल, ते मी होईन” असा होतो. (निर्गम ३:१४, NW) यावरून आपल्याला हे आश्‍वासन मिळते की त्याच्या प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी जे काही व्हावे लागेल ते तो होईल. त्याच्या राज्याद्वारे “जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि” त्याच्या इच्छेप्रमाणे घडून येईल असे त्याने अभिवचन दिले आहे. म्हणूनच प्रेषित पौलाने असे लिहिले: “माझी खात्री आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपति, . . . किंवा दुसरी कोणतीहि सृष्ट वस्तु, ख्रिस्त येशू आपला प्रभु ह्‍याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीति आहे तिच्यापासून आपल्याला विभक्‍त करावयाला समर्थ होणार नाही.”—मत्तय ६:१०; रोमकर ८:३८, ३९.

संदेष्टा यशया याच्याद्वारे देवाने अशी प्रतिज्ञा केली, “पाहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करितो; पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत.” (यशया ६५:१७) देवाची ही प्रतिज्ञा पूर्ण होण्याविषयी आपण पक्की खात्री बाळगू शकतो. लवकरच असा काळ येत आहे, जेव्हा निराशाजनक अनुभवांच्या आठवणी देखील नाहीशा होतील. त्या काळाची आशा बाळगणे किती आनंददायक आहे! (w०८ ३/१)

[तळटीप]

^ परि. 5 काही नावे बदलण्यात आली आहेत.

[२९ पानांवरील संक्षिप्त आशय]

सुरुवातीला आपल्याला अपयश आले याचा अर्थ आपण कधीच यशस्वी होऊ शकणार नाही असा विचार करणे योग्य नाही

[३० पानांवरील संक्षिप्त आशय]

आपण जीवनात काय करू शकलो असतो याचाच विचार करत बसण्याऐवजी, आपण सकारात्मक गोष्टींचा विचार करावा असे देवाचे वचन आपल्याला प्रोत्साहन देते

[३१ पानांवरील चित्रे]

मानवांनी यहोवाला निराश केले तरी तो आनंदी आहे कारण त्याचा उद्देश पूर्ण होईल याची त्याला खात्री आहे

[३२ पानांवरील चित्र]

जीवनात आध्यात्मिक गोष्टींना महत्त्व दिल्याने निराशेवर मात करण्यास साहाय्य मिळते