व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलमध्ये येशूबद्दलची संपूर्ण माहिती आहे का?

बायबलमध्ये येशूबद्दलची संपूर्ण माहिती आहे का?

बायबलमध्ये येशूबद्दलची संपूर्ण माहिती आहे का?

बायबलमध्ये म्हटले आहे, की येशू गुलगुथा येथे मरण पावला. पण तसे न होता तो जिवंत राहण्याची शक्यता आहे का? त्याने मरीया मग्दालीया हिच्याबरोबर लग्न करून त्यांना पुढे मुले झाली असावीत का? किंवा पृथ्वीवरील मोहमाया नाकारून तो एक साधूसंत बनला असावा का? आपण बायबलमध्ये दिलेले जे सिद्धांत वाचतो त्यांपेक्षा वेगळ्या शिकवणी येशूने दिल्या असाव्यात का?

अलीकडच्या काळात या कल्पनांना, लोकप्रिय चित्रपटांमुळे व कादंबऱ्‍यांमुळे जणू ऊतच आला आहे. या अलंकारिक कथाकादंबऱ्‍या व चित्रपट यांच्याशिवाय सा.यु. दुसऱ्‍या व तिसऱ्‍या शतकातील, अपॉक्रिफा लिखाणांवर (बायबल पुस्तकांव्यतिरिक्‍त असलेल्या लिखाणांवर) आधारित अनेक पुस्तके व लेखही आहेत जे, शुभवर्तमानांतून वगळलेली येशूविषयीची सत्य माहिती देत असल्याचा दावा करतात. हे दावे खरे आहेत का? बायबल आपल्याला येशूबद्दची सर्वच खरी माहिती पुरवते, अशी आपण खात्री बाळगू शकतो का?

या प्रश्‍नांची उत्तरे मिळण्याकरता आपण तीन मूलभूत गोष्टींवर चर्चा करू या. पहिली गोष्ट, शुभवर्तमान अहवाल लिहिणाऱ्‍या पुरुषांबद्दलची आणि त्यांनी हे अहवाल केव्हा लिहिले यांबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती आपण घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, बायबलमधील पुस्तके विश्‍वासयोग्य आहेत हे कोण व कसे ठरवतो? आणि तिसरी गोष्ट, अपॉक्रिफा लिखाणांची तसेच ही लिखाणे, बायबलमधील लिखाणांपेक्षा वेगळी कशी आहेत यांबद्दलची थोडीबहुत माहिती आपल्याला असणे आवश्‍यक आहे. *

ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने केव्हा व कोणी लिहिली?

काही विद्वानांच्या मते, मत्तयचे शुभवर्तमान सा.यु. ४१ च्या सुमारास ख्रिस्ताच्या मृत्यूच्या आठ वर्षांनंतर लिहिण्यात आले होते. पुष्कळ विद्वानांना वाटते, की ते यापेक्षाही खूप नंतर लिहिण्यात आले. पण, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतील सर्व पुस्तके सा.यु. पहिल्या शतकादरम्यान लिहिण्यात आली होती यावर सर्वांचे एकमत आहे.

येशूचे जीवन, त्याचा मृत्यू व त्याचे पुनरुत्थान पाहिलेले लोक पहिल्या शतकात हयात होते. त्यामुळे शुभवर्तमानांत येशूविषयी दिलेली माहिती सत्य आहे याला ते पुष्टी देऊ शकत होते. शुभवर्तमान अहवालांत काही चूक असती तर त्यांनी ती सहज पकडली असती. प्राध्यापक एफ. एफ. ब्रूस म्हणतात: “येशूचे प्रेषित करत असलेल्या प्रचारातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रेषितांनी लोकांना अगदी आत्मविश्‍वासाने विनंती केली; त्यांनी त्यांना, ‘आम्ही साक्षी आहोत’ फक्‍त एवढेच म्हटले नाही तर ‘ह्‍याची तुम्हाला माहिती आहे’ असेही म्हटले (प्रेषितांची कृत्ये २:२२).”

ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे लिखाण कोणी केले? येशूच्या १२ प्रेषितांपैकी काहींनी त्याचे लिखाण केले. हे आणि बायबलचे इतर लेखक जसे की याकोब, यहुदा व कदाचित मार्क, ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाली त्या सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी उपस्थित होते. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे सर्व लेखक, ज्यांत पौलाचा देखील समावेश होतो, आरंभीच्या ख्रिस्ती मंडळीच्या पहिल्या नियमन मंडळीसोबत ऐक्याने कार्य करत होते. ही मंडळी, प्रेषित आणि जेरूसलेममधील वडिलांची मिळून बनली होती.—प्रेषितांची कृत्ये १५:२, ६, १२-१४, २२; गलतीकर २:७-१०.

येशूने सुरू केलेले प्रचार व शिकवण्याचे कार्य आपल्या अनुयायांनी पुढे चालू ठेवावे अशी त्याने त्यांना आज्ञा दिली. (मत्तय २८:१९, २०) त्याने असेही म्हटले: “जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो.” (लूक १०:१६) पुढे त्याने त्यांना असे वचन दिले, की देवाचा पवित्र आत्मा म्हणजे त्याची कार्यकारी शक्‍ती त्यांना हे कार्य करण्याकरता लागणारे बळ देईल. त्यामुळे प्रेषितांनी किंवा त्यांच्या निकट सहकर्मींनी लिहिलेली लिखाणे, देवाचे ईश्‍वरप्रेरित वचन म्हणून आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी स्वीकारले; कारण, या प्रेषितांनी किंवा त्यांच्या निकट सहकर्मींनी, त्यांच्यावर देवाच्या पवित्र आत्म्याचा आशीर्वाद असल्याचा स्पष्ट पुरावा दिला होता.

काही बायबल लेखकांनी, बायबलच्या इतर लेखकांना देवाने त्याचे वचन लिहिण्याचा अधिकार व प्रेरणा दिल्याची पुष्टी दिली. जसे की, प्रेषित पेत्राने पौलाच्या पत्रांचा उल्लेख केला आणि ही पत्रे ‘इतर शास्त्रलेखांप्रमाणेच’ आहेत असे म्हटले. (२ पेत्र ३:१५, १६) प्रेषितांना व इतर ख्रिस्ती संदेष्ट्यांना देवाकडून प्रेरणा मिळाली होती, हे पौलाने देखील कबूल केले.—इफिसकर ३:५.

त्यामुळे शुभवर्तमान अहवाल विश्‍वसनीय व खरा आहे. हे अहवाल, रचलेल्या कथा-कहाण्या नाहीत. तर, या घटना प्रत्यक्ष पाहिलेल्या लोकांच्या साक्षीवर आधारित, काळजीपूर्वक लिहिलेला इतिहास आहे. शुभवर्तमान लेखकांनी हे अहवाल देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिले.

ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने ज्यांचे मिळून बनले आहे ती पुस्तके कोणी निवडली?

सम्राट कॉनस्टंटाईनच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या एका चर्चने अनेक शतकांनंतर, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने ज्यांचे मिळून बनले आहे ती पुस्तके निवडली, असा काही विद्वानांचा दावा आहे. पण वस्तुस्थिती तर वेगळीच आहे.

उदाहरणार्थ, चर्च इतिहासाचे प्राध्यापक ऑस्कर स्कारसाऊन म्हणतात: “नव्या करारात कोणत्या पुस्तकांचा समावेश करायचा व कोणत्या पुस्तकांचा करायचा नाही हे कोणत्याही चर्चमंडळाने किंवा कोणा एका व्यक्‍तीने ठरवले नाही. . . . हा प्रश्‍न अगदी साधा व तर्काला पटणारा होता: सा.यु. पहिल्या शतकातील लिखाणे, प्रेषितांनी व त्यांच्या सहकर्मींनी लिहिली आहेत असे सर्वज्ञात असल्यामुळे त्यांना विश्‍वसनीय समजले जायचे. पहिल्या शतकानंतरची लिखाणे, पत्रे किंवा ‘शुभवर्तमान,’ ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत समाविष्ट करण्यात आली नाहीत. . . . आणि असे तर कॉनस्टंटाईनच्या व त्याने स्थापन केलेले चर्च अस्तित्वात येण्याच्या कित्येक काळाआधीच करण्यात आले होते. ज्यांना त्यांच्या विश्‍वासांसाठी छळण्यात आले होते त्या ख्रिश्‍चनांनी आपल्याला नवा करार दिला आहे, सत्तारूढ चर्चने नव्हे.”

ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचा अभ्यास करणारे केन बर्डींग नावाच्या प्राध्यापकांनी, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचा संग्रह कसा करण्यात आला त्याविषयी असे म्हटले: “चर्चने आपल्या पसंतीनुसार ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचा संग्रह केला नाही. ख्रिश्‍चनांनी नेहमीच ज्या पुस्तकांना देवाचे ईश्‍वरप्रेरित वचन म्हणून स्वीकारले ते चर्चने देखील मान्य केले, असे म्हणणे जास्त योग्य ठरेल.”

पण मग, पहिल्या शतकातील त्या गरीब ख्रिश्‍चनांनी ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतील पुस्तके निवडली का? एका महत्त्वपूर्ण व शक्‍तिशाली मार्गाने ही निवड करण्यात आल्याचे बायबल आपल्याला सांगते.

ते म्हणते, की ख्रिस्ती मंडळीला ‘निरनिराळ्या प्रकारची कृपादाने’ मिळाली होती. (१ करिंथकर १२:४) पवित्र आत्म्याच्या या दानांमुळे काही ख्रिश्‍चन, देवाची प्रेरित वचने आणि लोकांची वचने यांतला फरक ओळखू शकले. यास्तव, आज ख्रिस्ती जन, बायबलमध्ये समाविष्ट असलेली पुस्तके पहिल्या शतकात ईश्‍वरप्रेरित म्हणून ओळखली जायची अशी खात्री बाळगू शकतात.

यावरून स्पष्ट होते, की ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतील पुस्तके खूप आधीच पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली संग्रहित करण्यात आली होती. सा.यु. दुसऱ्‍या शतकाच्या शेवटी काही लेखकांनी, बायबल पुस्तकांच्या विश्‍वसनीयतेवर टिपणी केली. पण याचा अर्थ असा होत नाही, की कोणती पुस्तके ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत समाविष्ट केली जावीत हा निर्णय त्यांनी घेतला. तर, देवाने आधीच, त्याच्या आत्म्याचे मार्गदर्शन मिळालेल्या आपल्या प्रतिनिधींमार्फत जे मान्य केले होते त्याचे त्यांनी समर्थन केले.

प्राचीन हस्तलिखिते देखील, आज सहसा मान्य केल्या जाणाऱ्‍या ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या संग्रहाला आधार देणारे पुरावे देतात. मूळ भाषेत ग्रीक शास्त्रवचनांची ५,००० पेक्षा अधिक हस्तलिखिते आज उपलब्ध आहेत. यांतील काही दुसऱ्‍या व तिसऱ्‍या शतकातील आहेत. अपॉक्रिफा लिखाणांना नव्हे तर या हस्तलिखितांना सा.यु. पहिल्या शतकात ईश्‍वरप्रेरित लिखाणे म्हणून मानले जात होते व त्यामुळे त्यांची नक्कल करून मोठ्या प्रमाणावर त्यांचे वाटप करण्यात आले.

ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचा आंतरिक पुरावाच, त्यांच्या विश्‍वसनीयतेचा महत्त्वपूर्ण पुरावा आहे. बायबलमधील लिखाणांचा, बायबलच्या इतर पुस्तकांमध्ये आढळणाऱ्‍या ‘सुवचनांच्या नमुन्याशी’ मेळ बसतो. (२ तीमथ्य १:१३) ही पुस्तके वाचकांना यहोवावर प्रेम करण्याचा, त्याची उपासना व सेवा करण्याचा आग्रह करतात आणि अंधश्रद्धा, भूताटकी व निर्मितीची उपासना यांच्याविरुद्ध ताकीद देतात. ऐतिहासिक रीत्या अचूक असलेल्या या पुस्तकांमधील भविष्यवाण्या खऱ्‍या आहेत. या पुस्तकांमध्ये वाचकांना, सहमानवांवर प्रेम करण्याचे उत्तेजन देण्यात आले आहे. ही ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतील पुस्तकांची वैशिष्ट्ये आहेत. पण अपॉक्रिफा लिखाणांबद्दल असे म्हणता येईल का?

अपॉक्रिफा लिखाणे वेगळी कशी आहेत?

अपॉक्रिफा लिखाणे, बायबलमधील लिखाणांपेक्षा खूप वेगळी आहेत. दुसऱ्‍या शतकाच्या मध्यकाळात अपॉक्रिफाचे लिखाण झाले. बायबलच्या पुस्तकांचे लिखाण झाल्याच्या कित्येक काळानंतर अपॉक्रिफाचे लिखाण झाले. अपॉक्रिफाच्या लिखाणांत येशू आणि ख्रिस्ती धर्म यांविषयी दिलेले वर्णन, देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेल्या शास्त्रवचनांशी मुळीच जुळत नाही.

जसे की, अपॉक्रिफातील थोमाच्या शुभवर्तमानात, येशूने अनेक विचित्र उद्‌गार काढले असा त्याचा उल्लेख करण्यात आला आहे; उदाहरणार्थ, मरीयेला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळावा म्हणून येशू तिचे रूपांतर एका पुरुषात करेल असे तो म्हणत असल्याचा उल्लेख आहे. थोमाच्या बाळ शुभवर्तमानात, लहान येशूचे वर्णन, वाईट मनाचा बालक असे करण्यात आले आहे ज्याने मुद्दामहून दुसऱ्‍या एका बालकाचा मृत्यू करवला. पौलाची आणि पेत्राची अपॉक्रिफातील कृत्ये यांत, लैंगिक संबंध पूर्णपणे वर्ज्य करण्यावर जोर देण्यात आला आहे आणि पौल व पेत्र स्त्रियांना आपल्या नवऱ्‍यांपासून वेगळे होण्याचा आग्रह करत असल्याचे वर्णन त्यांत करण्यात आले आहे. यहुदाच्या शुभवर्तमानात, भोजनाच्या वेळी प्रेषित देवाला प्रार्थना करतात तेव्हा येशूला त्यांचे हसू येत असल्याचे वर्णन आहे. अपॉक्रिफा लिखाणांतील या सर्व गोष्टी, बायबलच्या लिखाणांतील माहितीच्या अगदी विरुद्ध वाटतात.—मार्क १४:२२; १ करिंथकर ७:३-५; गलतीकर ३:२८; इब्री लोकांस ७:२६.

अनेक अपॉक्रिफा लिखाणांतून नॉस्टिक (ज्ञानवादी) लोकांचे धार्मिक विश्‍वास दिसून येतात. निर्माणकर्ता यहोवा, चांगला देव नाही, असे ते मानत असत. लोकांचे खरोखर पुनरुत्थान होणार नाही, या पृथ्वीवरील सर्व गोष्टी दुष्ट आहेत, विवाह आणि मुलांचा जन्म यांस सैतान कारणीभूत आहे, असाही त्यांचा विश्‍वास होता.

अनेक अपॉक्रिफा लिखाणांत, बायबलमधील लोकांचा उल्लेख करून त्यांच्याविषयीची जी माहिती दिली आहे ती खोटी आहे. पण मग कोणी तरी कट रचल्यामुळे, अपॉक्रिफा लिखाणांतील पुस्तकांचा बायबलमध्ये समावेश करण्यात आला नसावा, असे आहे का? अपॉक्रिफावर भाष्य केलेले एम. आर. जेम्स या विद्वानांनी असे म्हटले: “कोणी तरी कट रचल्यामुळे नव्हे तर ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतील पुस्तकांशी अपॉक्रिफा लिखाणांतील पुस्तकांचा मेळ बसत नसल्यामुळे त्यांचा त्यात समावेश झाला नाही हे उघड आहे.”

बायबल लेखकांनी धर्मत्यागाविषयी इशारा दिला होता

बायबलच्या लिखाणांत अनेक ठिकाणी आपण, ख्रिस्ती मंडळीला भ्रष्ट करणाऱ्‍या धर्मत्यागी लोकांविषयी इशारा दिल्याचे पाहतो. खरेतर, पहिल्या शतकातच या धर्मत्यागाची सुरुवात झाली होती; पण याचा प्रसार होण्याचे प्रेषितांनी रोखले होते. (प्रेषितांची कृत्ये २०:३०; २ थेस्सलनीकाकर २:३, ६, ७; १ तीमथ्य ४:१-३; २ पेत्र २:१; १ योहान २:१८, १९; ४:१-३) या इशाऱ्‍यांनी, प्रेषितांच्या मृत्यूनंतर येशूच्या शिकवणींच्या विरोधात सर्रासपणे आढळणाऱ्‍या लिखाणांवर प्रकाश टाकला.

पण हे दस्तऐवज जुने व पवित्र आहेत, असे काही विद्वानांना व इतिहासकारांना वाटेल. समजा: आज काही विद्वान, भरवशालायक नसलेल्या व निव्वळ करमणुकीकरता छापल्या जाणाऱ्‍या मासिकांतून व कट्टरपंथीयांच्या प्रकाशनांतून काही पाने गोळा करून ती एका तळघरात जपून ठेवतात. मग, ही गोळा केलेली लिखाणे, अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहेत म्हणून ती सत्य व विश्‍वसनीय ठरतील का? १,७०० वर्षांनंतर त्या पानांवर छापलेल्या लबाड्या व अर्थहीन गोष्टी, फक्‍त जुन्या आहेत म्हणून त्या सत्य आहेत असा दावा आपण करू शकतो का?

मुळीच नाही. तसेच, येशूने मरीया मग्दालीया हिच्याबरोबर लग्न करणे वगैरे सारख्या अपॉक्रिफा लिखाणांतील तर्काला न पटणाऱ्‍या गोष्टी खऱ्‍या असल्याचा दावा केला जाऊ शकत नाही. आपल्याजवळ विश्‍वसनीय माहिती उपलब्ध असताना आपण अशा अविश्‍वसनीय गोष्टींवर का म्हणून भरवसा ठेवायचा? देवाच्या पुत्राविषयी आपण जितकी माहिती घेतली पाहिजे अशी देवाची इच्छा आहे ती सर्व माहिती बायबलमध्ये उपलब्ध आहे; या माहितीवर आपण डोळे झाकून विश्‍वास ठेवू शकतो. (w१०-E ०४/०१)

[तळटीप]

^ परि. 4 बायबलमध्ये ६६ पुस्तके आहेत. ही संग्रहित पुस्तके देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आल्याचा खात्रीदायक पुरावा आहे व ही पुस्तके देवाच्या वचनाचा आवश्‍यक व महत्त्वपूर्ण भाग आहेत.

[२८ पानांवरील चित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

येशूचे जीवन बायबलचे ग्रीक भाषेत केलेले लिखाण अपॉक्रिफा लिखाण

सा.यु.पू. २ सा.यु. ३३ ४१ ९८ १३० ३००

[२६ पानांवरील चित्राचे श्रेय]

Kenneth Garrett/National Geographic Image Collection

प्रेषित पौलाने चमत्कार केले; त्याने मरण पावलेल्या एकाला जिवंतही केले. हे सर्व करायला त्याचप्रमाणे बायबलमधील पुस्तके लिहायला देवाच्या आत्म्याने त्याला प्रेरित केल्याचा भक्कम पुरावा दिला