व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तो लोकांतील चांगले गुण पाहतो

तो लोकांतील चांगले गुण पाहतो

देवाच्या जवळ या

तो लोकांतील चांगले गुण पाहतो

१ राजे १४:१३

“परमेश्‍वर सर्वांची मने पारखितो आणि त्यात जे काही विचार व कल्पना उत्पन्‍न होतात त्या त्यास समजतात.” (१ इतिहास २८:९) देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेले हे शब्द, यहोवा आपल्यामध्ये घेत असलेल्या आस्थेबद्दल आपण कृतज्ञतेने भरून जावे म्हणून लिहिण्यात आले होते. आपण परिपूर्ण नसलो तरीसुद्धा तो आपल्यातील चांगले गुण पाहतो. अबीयाविषयी त्याने १ राजे १४:१३ या वचनात काढलेल्या उद्‌गारांवरून आपल्याला हे कळते.

अबीयाचे बालपण एका दुष्ट घराण्यात गेले. त्याचा बाप यराबाम धर्मत्यागी राजघराण्याचा प्रमुख होता. * “ज्याप्रमाणे शेण अगदी साफ निघून जाईपर्यंत काढून टाकितात” तसे यराबामाच्या घराण्याचा उच्छेद करण्याचे यहोवाने ठरवले. (१ राजे १४:१०) पण त्याच्या घराण्यातल्या केवळ एकालाच अर्थात अतिशय आजारी असलेल्या अबीयाला सन्मानाने मूठमाती देण्याचा हुकूम दिला. * का बरे? “कारण इस्राएलाचा देव परमेश्‍वर याच्यासंबंधाने यराबामाच्या घराण्यात त्याच्याच ठायी काहीसा चांगुलपणा दिसून आला आहे,” असे यहोवाने म्हटले. (१ राजे १४:१, १२, १३) या वचनावरून आपल्याला अबीयाविषयी काय कळते?

अबीया यहोवा देवाचा एक विश्‍वासू उपासक होता, असे बायबलमध्ये म्हटलेले नाही. तरीपण त्याच्यामध्ये काही प्रमाणात चांगले गुण होते. त्याचा हा चांगुलपणा “परमेश्‍वर याच्यासंबंधाने” होता; कदाचित त्याच्या उपासनेच्या संबंधाने असावा. यहुदी धर्मगुरू असलेल्या लेखकांचे म्हणणे आहे, की अबीया कदाचित जेरुसलेमच्या मंदिरात जायचा किंवा इस्राएल लोकांनी जेरुसलेमला जाऊ नये म्हणून त्याच्या बापाने मुख्य प्रवेशद्वारापाशी उभ्या केलेल्या रक्षकांना त्याने काढून टाकले असावे.

अबीयात नेमके कोणते चांगले गुण होते हे आपल्याला माहीत नसले तरीसुद्धा त्याचा चांगुलपणा मात्र उल्लेखनीय होता. पहिली गोष्ट म्हणजे त्याचा चांगुलपणा अस्सल होता. हा चांगुलपणा ‘त्याच्या ठायी’ होता. आणि दुसरी गोष्ट, हा चांगुलपणा उल्लेखनीय होता. तो ‘यराबामाच्या घराण्यातील’ असूनही त्याने हा चांगुलपणा दाखवला होता. एक विद्वान असे म्हणतात: “बेकार ठिकाणी व दुष्ट कुटुंबीयासोबत राहूनही आपला चांगुलपणा टिकवून ठेवणारे लोक प्रशंसनीय आहेत.” आणखी एक विद्वान म्हणतात, की ‘काळ्याकुट्ट आकाशात तारे जसे चमकतात आणि पाने गळून गेलेल्या झाडांमध्ये देवदाराची झाडे जशी हिरवीगर्द दिसतात तसे अबीयाचा चांगुलपणा लोकांच्या नजरेत भरला.’

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, १ राजे १४:१३ या वचनातील शब्दांवरून आपण, यहोवाबद्दल आणि तो आपल्यात काय पाहतो याबद्दल काहीतरी सुरेख शिकतो. पुन्हा एकदा आठवण करा, की अबीयाच्या “ठायी” चांगुलपणा आढळला होता. असे दिसते, की यहोवाने अबीयाचे अंतःकरण, त्याच्याठायी चांगुलपणाचा लवलेश सापडेपर्यंत पारखले होते. एका विद्वानाने म्हटल्याप्रमाणे, “दगड-गोट्यांच्या ढिगाऱ्‍यात” एक दुर्मिळ मोती सापडावा तसा अबीया त्याच्या घराण्यातल्या इतर सदस्यांच्या तुलनेत होता. यहोवाने अबीयाच्या या चांगुलपणाची दखल घेतली आणि त्याला प्रतिफळ दिले. एका दुष्ट घराण्यातल्या या सदस्याला त्याने दया दाखवली.

आपण अपरिपूर्ण असलो तरी यहोवा आपल्यामध्ये चांगले गुण पाहतो, त्यांची कदर करतो, ही गोष्ट किती सांत्वनदायक आहे, नाही का? (स्तोत्र १३०:३) आपल्यामध्ये थोडातरी चांगुलपणा सापडतो का हे पाहण्याकरता यहोवा आपले अंतःकरण अगदी काळजीपूर्वकपणे पारखतो; तेव्हा अशा देवाशी जवळीक साधण्यास आपण प्रवृत्त होत नाही का? (w१०-E ०७/०१)

[तळटीपा]

^ लोकांनी यहोवाच्या उपासनेसाठी जेरुसलेमच्या मंदिरात जाऊ नये म्हणून यराबामाने इस्राएलच्या उत्तरेकडील दहा-गोत्रांच्या राज्यात वासराची उपासना सुरू केली.

^ बायबल लिहिले त्या काळात, एखाद्याला सन्मानाने मूठमाती न देण्याचा अर्थ ती व्यक्‍ती देवाला आवडत नव्हती असा होतो.—यिर्मया २५:३२, ३३.