व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचे साक्षीदार विश्‍वासाने बरे करण्याचा दावा करतात का?

यहोवाचे साक्षीदार विश्‍वासाने बरे करण्याचा दावा करतात का?

वाचक विचारतात . . .

यहोवाचे साक्षीदार विश्‍वासाने बरे करण्याचा दावा करतात का?

▪ यहोवाच्या साक्षीदारांमध्ये, विश्‍वासाने बरे करण्याची प्रथा नाही. येशूप्रमाणे त्यांचाही असाच विश्‍वास आहे, की देवाच्या राज्याची आनंदाची बातमी लोकांना कळवणे ही आज त्यांची मुख्य जबाबदारी आहे. ते असाही विश्‍वास करतात, की खऱ्‍या ख्रिश्‍चनांची ओळख, विश्‍वासाने बरे करण्याच्या प्रथेने नव्हे तर याहूनही अधिक महत्त्वपूर्ण असलेल्या कार्याने होते.

पहिल्या शतकात येशू ख्रिस्ताने रोग्यांना बरे केले. आणि येशूने केलेले हे चमत्कार आज आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. येशूने असे चमत्कार करून ही गॅरंटी दिली, की देवाच्या राज्यात राजा या नात्याने तो राज्य करेल तेव्हा, “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.”—यशया ३३:२४.

पण मग आज जे असे चमत्कार करत आहेत त्यांच्याबद्दल काय? चर्चला जाणाऱ्‍या ख्रिस्ती लोकांमध्ये व काही गैरख्रिस्ती धर्मांमध्येही असे बरेच लोक आहेत जे विश्‍वासाने, चमत्काराने रोग बरे करण्याचा दावा करतात. पण येशू, त्याच्या नावाने “मोठे चमत्कार” करणाऱ्‍यांना अगदी कडक इशारा देतो. तो त्यांना म्हणेल: “मी तुम्हाला कधीच ओळखीत नव्हतो. अहो दुष्कृत्ये करणाऱ्‍यांनो तुम्ही माझ्यापासून निघून जा.” (मत्तय ७:२२, २३, सुबोध भाषांतर) मग, आजच्या दिवसात चमत्काराने लोकांचे रोग बरे करत असल्याचा दावा करणाऱ्‍यांना देवाची संमती आहे का, किंवा त्यांच्यावर देवाचा आशीर्वाद आहे का?

येशूने आजारी लोकांना कसे बरे केले होते त्याबद्दल बायबल काय सांगते ते आपण पाहू या. बायबलमधील या अहवालांची तुलना आपण, आज जे चमत्काराने लोकांचे रोग बरे करत असल्याचा दावा करतात त्यांच्याशी करू या म्हणजे आपल्याला, आज होणारे चमत्कार देवाकडून होतात किंवा नाही हे लगेच ठरवता येईल.

येशूने चमत्काराने लोकांचे रोग बरे करून अनुयायी किंवा लोकांचा समुदाय स्वतःकडे कधीही आकर्षित केला नाही. तर त्याने बहुतेकदा लोकांचे आजार बरे केले ते लोकसमुदायासमोर नव्हे तर लोकांच्या नजरेआड केले. आणि ज्यांना-ज्यांना त्याने बरे केले त्यांना-त्यांना त्याने सांगितले, की या चमत्काराविषयी कोणाला सांगू नकोस.—लूक ५:१३, १४.

येशूने कधीही चमत्कारांच्या बदल्यात लोकांकडून पैसे घेतले नाहीत. (मत्तय १०:८) त्याचे सर्व चमत्कार नेहमीच यशस्वी ठरले. त्याच्याकडे येणारे सर्व प्रकारचे रोगी बरे झाले. त्याच्याकडे येणाऱ्‍या रोगी लोकांच्या विश्‍वासाच्या आधारावर त्यांचे बरे होणे अवलंबून नव्हते. (लूक ६:१९; योहान ५:५-९, १३) शिवाय, येशूने मृत लोकांनाही जिवंत केले होते!—लूक ७:११-१७; ८:४०-५६; योहान ११:३८-४४.

आणि त्याने चमत्कार केले तरी येशूच्या सेवेचा मुख्य उद्देश, चमत्कारांद्वारे लोकांना भावुक बनवून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे नव्हता. तर, त्याचे मुख्य काम, देवाच्या राज्याची आनंदाची बातमी सांगणे होते. येशूने त्याच्या अनुयायांना, लोकांना देवाच्या राज्याविषयी कसे शिकवायचे त्याचे प्रशिक्षण दिले. आणि मग हे शिष्य, लोकांना देवाच्या राज्यात परिपूर्ण आरोग्य मिळवण्याच्या आशेविषयी शिकवणार होते.—मत्तय २८:१९, २०.

हे खरे आहे, की येशूच्या पहिल्या शतकातील अनुयायांना, रोग बरे करण्याचे दान मिळाले होते; पण हे दान काही काळानंतर संपणार होते. (१ करिंथकर १२:२९, ३०; १३:८, १३) खऱ्‍या ख्रिश्‍चनांना आज, रोग बरे करण्याच्या कार्यांद्वारे नव्हे तर त्यांच्यात असलेल्या निःस्वार्थ प्रेमाद्वारे ओळखले जाते. (योहान १३:३५) आजच्या दिवसात चमत्काराने लोकांचे रोग बरे करण्याचा दावा केला जातो खरा, पण त्यामुळे सर्व जातीतून व वंशांतून येणाऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्ये एकी निर्माण झालेली नाही, शिवाय त्यांच्यामध्ये असे निःस्वार्थ प्रेमही दिसून येत नाही.

पण, एक असा गट आहे ज्यांच्यामध्ये असे खरे प्रेम आहे. त्यांचे प्रेम इतके घनिष्ठ आहे की मानवांच्या अगदी रक्‍तपाती झगड्यांतही ते एकमेकांची किंवा इतर कोणाचीही कत्तल करण्यास नकार देतात. कोण आहेत ते? ते आहेत यहोवाचे साक्षीदार. संपूर्ण जगभरात ते ख्रिस्तासारखे प्रेम दाखवणारे म्हणून नावाजलेले आहेत. वेगवेगळ्या जातीच्या, वंशाच्या, राष्ट्राच्या, संस्कृतीच्या व पार्श्‍वभूमीच्या लोकांमध्ये ऐक्य आणणे हे चमत्कारापेक्षा कमी नाही; आणि हा चमत्कार देवाच्या पवित्र आत्म्यानेच शक्य झाला आहे. तुम्हाला पाहायचे आहे का हे सर्व? मग, यहोवाच्या साक्षीदारांच्या एखाद्या सभेला उपस्थित राहा व स्वतःच्या डोळ्यांनी हा चमत्कार पाहा. (w१०-E १०/०१)

[२७ पानांवरील चित्र]

आज चमत्काराने रोग बरे करणारे (उजवीकडच्या चित्रातील) लोक दाखवून देतात का, की देवाच्या शक्‍तीने ते हे करत आहेत?