व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दारिद्र्‌य निर्मूलनासाठी शर्थीचे प्रयत्न

दारिद्र्‌य निर्मूलनासाठी शर्थीचे प्रयत्न

दारिद्र्‌य निर्मूलनासाठी शर्थीचे प्रयत्न

श्रीमंतांनी केव्हाच दारिद्र्‌याचे स्वतःपुरते निर्मूलन केले आहे. पण संपूर्ण मानवजातीला दारिद्र्‌यापासून मुक्‍त करण्याचे प्रयत्न फोल ठरले आहेत. का बरे? कारण श्रीमंतांना सहसा त्यांच्या संपत्तीत व हुद्द्‌यात कोणी वाटेकरी नको असतो. प्राचीन इस्राएलमधील शलमोन नावाच्या एका राजाला देवाने असे लिहिण्यास प्रेरित केले: “पाहा, गांजलेल्याचे अश्रु गळत आहेत, पण त्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही, त्यांजवर जुलूम करणाऱ्‍यांच्या ठायी बळ आहे, पण गांजलेल्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही.”—उपदेशक ४:१.

ज्यांचा दबदबा आहे व ज्यांच्या हातात सत्ता आहे असे लोक जगातील दारिद्र्‌याचे निर्मूलन करण्याकरता संपूर्ण समाजाची मानसिकता बदलू शकतात का? वर उल्लेखण्यात आलेल्या शलमोनाने लिहिले: “पाहा, हा सर्व व्यर्थ, वायफळ उद्योग होय. जे वाकडे आहे ते सरळ होत नाही.” (उपदेशक १:१४, १५) आधुनिक दिवसांत दारिद्र्‌याचे निर्मूलन करण्यासाठी लोकांनी केलेल्या प्रयत्नांकडे पाहिल्यावर आपल्याला शलमोनाचे शब्द किती खरे आहेत ते दिसून येते.

सर्वजण श्रीमंत होऊ शकतात अशी धोरणे

एकोणीसाव्या शतकात, काही राष्ट्रे व्यापार व उद्योगधंदा करून अमाप संपत्ती गोळा करत असताना काही बडे लोक दारिद्र्‌याचे निर्मूलन करण्याचा गांभीर्याने विचार करू लागले. त्यांच्या मते पृथ्वीच्या संपत्तीचा सर्वांना समप्रमाणात लाभ झाला पाहिजे. पण तसे झाले का?

काहींना असे वाटले, की समाजवादाद्वारे आपण असा एक आंतरराष्ट्रीय वर्गहीन समाज निर्माण करू शकतो ज्यात पृथ्वीच्या मालमत्तेची समप्रमाणात वाटणी करता येईल. अर्थात जे श्रीमंत होते त्यांना ही कल्पना मुळीच रुचली नाही. पण, “प्रत्येकाने आपले सर्वोत्तम समाजाला द्यायचे आणि आपल्या गरजेनुसार समाजातून घ्यायचे” हे घोषवाक्य बहुतेकांना आवडले. जगातील सर्व राष्ट्रे समाजवाद स्वीकारतील आणि संपूर्ण जगात सुकाळ नांदेल, अशी बहुतेक जण आशा करत होते. काही श्रीमंत राष्ट्रांनी समाजवादातील काही गोष्टी स्वीकारल्या व कल्याणकारी राज्ये स्थापन केली ज्यात, सर्व नागरिकांना त्यांच्या “जन्मापासून मृत्यूपर्यंत” काळजी घेण्याचे वचन देण्यात आले. अशा प्रकारे त्यांनी, त्यांच्या लोकांतील जीवघेण्या दारिद्र्‌याचे निर्मूलन केल्याचा दावा केला.

निःस्वार्थ समाज तयार करण्याचे समाजवादाचे ध्येय होते; पण हे ध्येय त्यांना कधीच साध्य करता आले नाही. सर्व नागरिक स्वतःऐवजी समाजाच्या हितासाठी काम करतील, हा त्यांचा हेतू कागदावरच राहिला. गरिबांना मदत करण्याची कल्पना काहींना आवडली नाही; त्यांना असे वाटले, की गरिबांना जर अशी सढळ हाताने मदत केली तर ते आळशी होतील. बायबलमधील हे शब्द किती खरे ठरले आहेत: “सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा धार्मिक पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही. . . . देवाने मनुष्य सरळ असा उत्पन्‍न केला आहे, पण तो अनेक कल्पनांच्या मागे लागला आहे.”—उपदेशक ७:२०, २९.

दारिद्र्‌याचे निर्मूलन करण्याच्या प्रयत्नात, अमेरिकन स्वप्न नावाची आणखी एक कल्पना लोकांच्या डोक्यात आली. ते अशा एका जगाचे स्वप्न पाहू लागले ज्यात, जो कोणी कष्ट करू इच्छितो तो श्रीमंत बनू शकतो. त्यामुळे संपूर्ण जगभरातील अनेक राष्ट्रांनी, लोकशाही, खुला व्यापार, खुला व्यवसाय यांसारख्या योजना स्वीकारल्या; याच योजनांमुळे अमेरिका देश श्रीमंत झाला होता, असे त्यांना वाटत होते. पण सर्व राष्ट्रे हे अमेरिकन स्वप्न पाहू शकले नाहीत कारण, उत्तर अमेरिकेतील संपत्ती ही केवळ त्याच्या राजकीय व्यवस्थेमुळे त्यांना मिळालेली नव्हती. तर तेथे अमाप नैसर्गिक संपत्ती होती शिवाय आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी ते अगदी मोक्याच्या ठिकाणी होते. आणि, स्पर्धात्मक जागतिक आर्थिक व्यवस्थेमुळे, लोकांचा नेहमी फायदाच होत नाही तर त्यांचा तोटाही होतो. मग समृद्ध राष्ट्रांना, अजूनही गरीब असलेल्या राष्ट्रांना मदत करण्याचे प्रोत्साहन देणे शक्य होते का?

मार्शल योजनादारिद्र्‌याचे निर्मूलन करण्याचा मार्ग?

दुसऱ्‍या महायुद्धानंतर युरोपची अर्थव्यवस्था कोलमडून पडली. पुष्कळ युरोपियन लोकांच्या डोक्यावर उपासमारीची टांगती तलवार लटकू लागली. युरोपमधील समाजवादाबद्दल लोकांचा दृष्टिकोन बदलतो की काय, अशी अमेरिकी सरकारला काळजी वाटत होती. त्यामुळे, युरोपमधील जे देश अमेरिकी योजना स्वीकारत होते त्यांना, औद्योगिक व शेतमालाचे उत्पादन पूर्ववत करण्याकरता अमेरिकी सरकारने चार वर्षांपर्यंत आर्थिक साहाय्य दिले. मार्शल योजना म्हटला जाणारा हा युरोपियन पुनश्‍च उभारणी कार्यक्रम यशस्वी झाल्याचे मानले जाऊ लागले. पश्‍चिम युरोपमध्ये अमेरिकेचा प्रभाव वाढला आणि जीवघेणे दारिद्र्‌य जवळजवळ नाहीसे झाले. मग, संपूर्ण विश्‍वातील दारिद्र्‌याचे निर्मूलन करण्याचा हाच मार्ग होता का?

मार्शल योजना यशस्वी ठरल्यामुळे अमेरिकन सरकारने संपूर्ण जगभरातील गरीब राष्ट्रांना, शेतमालाचे उत्पादन, आरोग्य सेवा, शिक्षण व वाहतूक यांत विकास करण्यासाठी आर्थिक साहाय्य देऊ केले. या मागचा अमेरिकेचा हेतू स्वार्थीच होता, हे खुद्द अमेरिकेने कबूल केले. इतर राष्ट्रांनीही विदेशी मदत देण्याचा प्रस्ताव मांडून स्वतःचा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला. मार्शल योजनेवर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला पण साठ वर्षांनंतर या योजनेचे दुष्परिणाम दिसू लागले. या योजनेमुळे पूर्वी अत्यंत गरीब असलेल्या देशांनी, विशेषकरून पूर्व आशियाई देशांनी अभूतपूर्व संपत्ती गोळा केली हे मान्य आहे. पण इतर ठिकाणी साहाय्य मिळाल्यामुळे, बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले असले व मुलांच्या शिक्षणाची सोय झाली असली तरीसुद्धा अनेक देश अजूनही खूपच मागासलेले होते.

विदेशी मदत मिळूनही दारिद्र्‌याचे निर्मूलन का झाले नाही?

गरीब राष्ट्रांना दारिद्र्‌यातून वर येण्यास मदत करणे हे, श्रीमंत राष्ट्रांना युद्धामुळे झालेल्या हानीतून सावरायला मदत करण्यापेक्षा खूप कठीण होते. युरोपमध्ये उद्योग, व्यापार व वाहतूक, या गोष्टी युद्धाच्या आधीपासून होत्या. त्यांना फक्‍त आर्थिकरीत्या मदतीची गरज होती. पण गरीब राष्ट्रांमध्ये, विदेशी मदतीद्वारे रस्ते, शाळा व दवाखाने यांची सोय करण्यात आली असली तरी लोक अजूनही खूप हलाखीत होते. कारण, त्या देशांमध्ये व्यापार नव्हता, नैसर्गिक मालमत्ता नव्हती व इतर देशांबरोबर व्यापार करण्याची सोय नव्हती.

दारिद्र्‌याचे चक्र अतिशय जटिल आहे आणि ते सहजासहजी तोडता येत नाही. उदाहरणार्थ, रोगराईमुळे दारिद्र्‌य येते आणि दारिद्र्‌यामुळे रोगराई पसरते. कुपोषित मुले शारीरिकरीत्या व मानसिकरीत्या इतकी अशक्‍त असतात, की ती मोठी झाल्यावरही आपल्या मुलांची काळजी घेण्यास असमर्थ असतात. तसेच, श्रीमंत देश, “मदत” म्हणून गरीब राष्ट्रांना इतके अन्‍न पाठवतात की स्थानिक शेतकऱ्‍यांचा व व्यापाऱ्‍यांचा माल खपत नाही व यामुळे आणखी गरिबी पसरते. गरीब राष्ट्रांतील सरकारांना पाठवल्या जाणाऱ्‍या आर्थिक साहाय्याची चोरी होऊ शकते. यामुळे आणखी एक दुष्ट चक्र सुरू होते. हे दुष्ट चक्र म्हणजे: भ्रष्टाचार; या भ्रष्टाचारामुळे आणखी दारिद्र्‌य पसरते. खरे पाहता, विदेशी मदतीचा काही फायदा होत नाही कारण या मदतीमुळे दारिद्र्‌याचे जे मूळ कारण असते ते तसेच राहते.

दारिद्र्‌याचे कारण

जेव्हा राष्ट्रे, सरकारे व लोक केवळ स्वहिताच्या संरक्षणार्थ कार्य करतात तेव्हा कमालीचे दारिद्र्‌य येते. जसे की, समृद्ध देशांतील सरकारे विश्‍वव्यापी दारिद्र्‌याचे निर्मूलन करण्याला प्राधान्य देत नाहीत कारण लोक त्यांना निवडून देत असतात व या मतदारांना त्यांना खूष ठेवायचे असते. त्यामुळेच ते, श्रीमंत राष्ट्रांतील शेतकऱ्‍यांचा व्यापार कमी होऊ नये म्हणून गरीब राष्ट्रांतील शेतकऱ्‍यांना आपला माल श्रीमंत राष्ट्रांत विकू देत नाहीत. तसेच, गरीब राष्ट्रांतील शेतकऱ्‍यांपेक्षा आपल्या देशांतल्या शेतकऱ्‍यांचा माल खपला जावा म्हणून ते आपल्या देशांतल्या शेतकऱ्‍यांना भले मोठे आर्थिक साहाय्य अर्थात सबसिडी देतात.

यावरून स्पष्ट होते, की दारिद्र्‌याचे कारण हे मानव-निर्मित आहे. स्वहिताचे संरक्षण करण्याची लोकांची व सरकारांची प्रवृत्ती हे दारिद्र्‌याचे मूळ कारण आहे. लेखाच्या अगदी सुरुवातीला उल्लेखण्यात आलेल्या शलमोन नावाच्या बायबल लेखकाने असे म्हटले: “एक मनुष्य दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करितो.”—उपदेशक ८:९.

मग दारिद्र्‌याचे निर्मूलन होण्याची काही आशा आहे का? मानवाचा स्वभाव बदलू शकणारे असे एखादे सरकार आहे का? (w११-E ०६/०१)

[६ पानांवरील चौकट]

दारिद्र्‌याची समस्या सोडवणारे नियमशास्त्र

यहोवा देवाने प्राचीन इस्राएल राष्ट्राला काही नियम दिले होते. या नियमांचे त्यांनी पालन केले तर त्यांच्यातील दारिद्र्‌य बऱ्‍याच प्रमाणात नाहीसे होणार होते. या नियमांनुसार, लेव्यांच्या याजकीय वंशाव्यतिरिक्‍त प्रत्येक कुटुंबाला जमिनीचा हिस्सा मिळाला होता. कोणत्याही कुटुंबाला, त्यांच्या हिश्‍शाची जमीन कायमची विकता येत नव्हती. जर कोणाला त्याची जमीन, आजारपण, विपत्ती किंवा आळशीपणामुळे विकावी लागली, तर योबेल वर्षी म्हणजेच पन्‍नासाव्या वर्षी त्याच्याकडून कसलीही रक्कम न घेता त्याला पुन्हा दिली जायची. दर ५० वर्षांनी सर्व जमिनी ज्यांच्या त्यांच्या मालकांना पुन्हा मिळायच्या. यामुळे कोणतेही कुटुंब पिढ्या न्‌ पिढ्या दारिद्र्‌यात राहत नव्हते.—लेवीय २५:१०, २३.

देवाच्या नियमशास्त्रात आणखी एक तरतूद होती. कधीकधी कुठल्यातरी विपत्तीमुळे एखाद्याने जर स्वतःला गुलामगिरीत विकले असेल तर त्याच्यासाठी ही दयाळू तरतूद होती. या मनुष्याला त्याच्यावरील कर्ज फेडण्याकरता त्याने ज्या किंमतीला स्वतःला विकले होते ती त्याला आगाऊ मिळायची. सात वर्षांनी जर त्याला स्वतःला पुन्हा विकत घेता आले नसेल तर त्याला सोडले जायचे. तसेच त्याने पुन्हा एकदा शेतीचे काम सुरू करावे म्हणून धान्य व गुरे दिली जायची. आणि, एखाद्या गरिबाला जर कधी उधारीवर पैसे घ्यावे लागले असतील तर नियमशास्त्रानुसार, ज्याने त्याला पैसे दिले होते तो त्या पैशांवर व्याज घेऊ शकत नव्हता. नियमशास्त्रात असेही सांगितले होते, की गरीब लोकांना धान्य गोळा करता यावे म्हणून, ज्यांच्याकडे शेती होती त्यांनी त्यांच्या शेताच्या कानाकोपऱ्‍यातील धान्याची कापणी करू नये. या नियमांमुळे, इस्राएलमध्ये कोणावरही भीक मागायची पाळी येणार नव्हती.—अनुवाद १५:१-१४; लेवीय २३:२२.

परंतु इतिहासानुसार, काही इस्राएली लोकांना अत्यंत हलाखीत दिवस काढावे लागले होते. असे का? कारण त्यांनी यहोवाने घालून दिलेल्या नियमशास्त्राचे पालन केले नाही. त्यामुळे बहुतेक देशांत होते त्याप्रमाणे काही लोक श्रीमंत सावकार झाले तर इतर जण त्यांच्याकडे जमीनजुमला न उरल्यामुळे गरीब झाले. इस्राएल लोकांमध्ये गरिबी आली कारण काही जणांनी देवाच्या नियमशास्त्राकडे दुर्लक्ष केले व इतरांचे हित पाहण्याऐवजी स्वतःचा स्वार्थ पाहिला.—मत्तय २२:३७-४०.