बायबल प्रश्नांची उत्तरे
आपण प्रार्थना का केली पाहीजे?
यहोवा देवाची अशी इच्छा आहे, की आपण खुल्या मनाने आपल्या चिंतांविषयी नियमितपणे त्याच्याशी बोलावे. (लूक १८:१-७) तो आपले ऐकतो कारण त्याला आपली काळजी आहे. आपला स्वर्गीय पिता आपल्याला प्रेमळपणे त्याला प्रार्थना करण्याचे आमंत्रण देतो. तर मग, आपण ते आमंत्रण स्वीकारू नये का?—फिलिप्पैकर ४:६ वाचा.
प्रार्थना फक्त देवाकडे मदत मागण्याचा मार्ग नाही. तर प्रार्थना आपल्याला देवाच्या जवळ जाण्यास मदत करते. (स्तोत्र ८:३, ४) आपण जेव्हा नियमितपणे देवाकडे आपल्या भावना व्यक्त करतो, तेव्हा त्याच्याबरोबर आपण घनिष्ठ मैत्री विकसित करतो.—याकोब ४:८ वाचा.
आपण प्रार्थना कशी केली पाहीजे?
आपण प्रार्थनेत मोठमोठे, जड शब्द वापरावेत किंवा मग पाठ केलेल्या प्रार्थना पुन:पुन्हा म्हणाव्यात अशी अपेक्षा यहोवा देव आपल्याकडून करत नाही. शिवाय, आपण एका ठरावीक स्थितीतच प्रार्थना करावी अशीही अपेक्षा तो करत नाही. तर आपण मनापासून प्रार्थना करावी असे त्याला वाटते. (मत्तय ६:७) उदाहरणार्थ, प्राचीन इस्राएलमधील हन्ना नावाच्या एका स्त्रीने तिच्या कुटुंबात उद्भवलेल्या एका समस्येबद्दल कळकळून देवाला प्रार्थना केली. नंतर, तिची वेदनादायक स्थिती आनंदात बदलली तेव्हा तिने मनापासून प्रार्थना करून देवाचे आभार मानले.—१ शमुवेल १:१०, १२, १३, २६, २७; २:१ वाचा.
आपण निर्माणकर्त्याजवळ आपल्या चिंता व्यक्त करू शकतो. तसेच, आपण त्याची स्तुती करू शकतो आणि तो आपल्यासाठी जे काही करतो त्याबद्दल त्याचे आभार मानू शकतो. हा खरोखरच किती मोठा सुहक्क आहे! तेव्हा, प्रार्थनेला आपण कधीच कमी लेखू नये.—स्तोत्र १४५:१४-१६ वाचा. (w14-E 07/01)