अध्याय अकरा
त्यानं जागरूक राहून वाट पाहिली
१, २. यहोवाला प्रार्थना करण्याआधी एलीयाला काय करावं लागणार होतं, आणि तो व अहाब राजा या दोघांमध्ये काय फरक होता?
कधी एकदाचं आपण लोकांच्या गर्दीतून बाहेर पडतो आणि एकांतात आपल्या स्वर्गीय पित्याला प्रार्थना करतो, असं एलीयाला झालं होतं. देवाच्या या खऱ्या संदेष्ट्यानं स्वर्गातून अग्नी बोलावून नुकताच जो चमत्कार केला होता तो पाहिल्यावर लोक भारावून गेले होते; आणि साहजिकच त्यांच्यापैकी अनेक जण त्याची मर्जी मिळवण्यासाठी त्याची खुशामत करण्याचा प्रयत्न करत असतील. एलीया मात्र कर्मेल डोंगराच्या माथ्यावर जाऊन यहोवा देवाला प्रार्थना करण्यास अधीर झाला होता; पण, त्याअगोदर इच्छा नसतानाही त्याला अहाब राजाशी बोलावं लागणार होतं.
२ एलीया आणि अहाब राजा म्हणजे दोन अगदीच भिन्न व्यक्तिमत्त्वं. राजेशाही पेहराव केलेला अहाब लोभिष्ट आणि सहज कुणाच्याही बहकाव्यात येणारा एक धर्मत्यागी पुरूष होता. तर दुसरीकडे पाहता, प्राण्यांच्या कातडीपासून किंवा केसांपासून बनवलेला संदेष्ट्यांचा साधासुधा झगा घातलेला एलीया अतिशय धाडसी, सात्विक आणि विश्वासू पुरूष होता. आणि त्या दिवशी घडलेल्या घटनांवरून तर त्या दोघांमधला फरक आणखीनच स्पष्टपणे दिसून आला.
३, ४. (क) अहाब राजाची आणि बआलाच्या उपासकांची घोर निराशा का झाली होती? (ख) आपण कोणत्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत?
३ त्या दिवशी अहाबाची आणि इतर बआल उपासकांची घोर निराशा झाली होती. अहाब आणि त्याची पत्नी, ईजबेल राणी यांनी देशात मोठ्या प्रमाणात प्रसार केलेल्या या खोट्या धर्माला जबरदस्त तडाखा बसला होता. बआल किती खोटा आहे हे त्या दिवशी उघड झालं होतं. बआलाच्या उपासकांनी त्याला जीव तोडून याचना केल्या होत्या, त्याच्यापुढं नृत्य केलं होतं आणि त्यांच्या रिवाजानुसार स्वतःला रक्तबंबाळदेखील केलं होतं. पण, तो निर्जीव देव एक साधासा अग्नीसुद्धा लावू शकला नव्हता. एलीयानं बआलाच्या ज्या ४५० पुरुषांची कत्तल केली होती, त्यांचं रक्षण करण्यात बआल अपयशी ठरला होता. इतकंच नाही, तर आणखी एक १ राजे १६:३०–१७:१; १८:१-४०.
गोष्ट करण्यात बआल अपयशी ठरला होता आणि त्याचं हे अपयश लवकरच पूर्णपणे सिद्ध होणार होतं. देशाला होरपळून काढणाऱ्या दुष्काळाचा अंत करण्यासाठी बआलाचे संदेषटे तीन वर्षांपेक्षा जास्त काळापासून त्याचा धावा करत होते. पण, बआल त्यांच्यासाठी काहीच करू शकला नाही. आता मात्र स्वतः यहोवा दुष्काळाचा अंत करून तोच खरा देव असल्याचं सिद्ध करणार होता.—४ पण, हे नेमकं केव्हा घडलं? आणि तोपर्यंत एलीयानं काय केलं? तसंच, या विश्वासू पुरुषाच्या उदाहरणावरून आज आपण काय शिकू शकतो? या प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी आपण बायबलमधल्या अहवालाचं परीक्षण करू या.—१ राजे १८:४१-४६ वाचा.
प्रार्थनाशील मनोवृत्ती
५. एलीयानं अहाबाला काय सांगितलं, आणि दिवसभरात घडलेल्या घटनांवरून अहाबानं धडा घेतला नाही, असं आपण का म्हणू शकतो?
५ एलीया अहाबाकडे गेला आणि म्हणाला: “ऊठ, खा, पी; विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी होत आहे.” त्या दिवशी ज्या घटना घडल्या होत्या त्यांवरून या दुष्ट राजानं धडा घेतला होता का? अहवालात स्पष्टपणे तसं सांगितलेलं नाही. १ राजे १८:४१, ४२) पण, एलीयानं काय केलं?
त्याला पश्चात्ताप झाल्याचं किंवा यहोवानं आपल्याला क्षमा करावी म्हणून प्रार्थना करण्यास त्यानं एलीयाला विनंती केल्याचं अहवालात सांगितलेलं नाही. उलट, तो “खावयाप्यावयास वरती गेला,” असं अहवाल म्हणतो. (६, ७. एलीयानं कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना केली, आणि का?
६ अहवाल म्हणतो: “इकडे एलीया कर्मेलाच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लवून आपले तोंड आपल्या गुडघ्यांमध्ये घातले.” अहाब खाण्यापिण्यासाठी निघून गेला. पण, एलीया मात्र आपल्या स्वर्गीय पित्याशी बोलण्यासाठी डोंगरमाथ्यावर गेला. एलीयानं किती नम्र होऊन देवाला प्रार्थना केली ते विचारात घेण्यासारखं आहे. नतमस्तक होऊन प्रार्थना करताना त्याचं तोंड त्याच्या गुडघ्यांपर्यंत आलं होतं. याकोब ५:१८ म्हणतं, की एलीयानं दुष्काळ संपावा म्हणून प्रार्थना केली. बहुधा त्यानं कर्मेल डोंगराच्या माथ्यावर जाऊन केलेल्या या प्रार्थनेविषयीच तिथं सांगितलेलं असावं.
७ “मी पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करणार आहे,” असं यहोवानं एलीयाला आधी सांगितलं होतं. (१ राजे १८:१) त्यामुळं, यहोवानं प्रकट केलेली ही इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना एलीयानं केली. एलीयाप्रमाणे, सुमारे एक हजार वर्षांनंतर येशूनंही आपल्या शिष्यांना देवाची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायला शिकवलं.—मत्त. ६:९, १०.
८. एलीयाच्या प्रार्थनेवरून आपण काय शिकू शकतो?
८ प्रार्थनेच्या बाबतीत एलीयाच्या उदाहरणावरून बरंच काही शिकण्यासारखं आहे. एलीयानं आपल्या प्रार्थनेत, देवाच्या इच्छेला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं. आपणसुद्धा प्रार्थना करताना नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे, की “[देवाच्या] इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल.” (१ योहा. ५:१४) साहजिकच त्यासाठी देवाची इच्छा काय आहे हे आपल्याला आधी माहीत असलं पाहिजे; आणि ती जाणून घेण्यासाठी बायबलचा नियमितपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. यहोवाची इच्छा पूर्ण होण्याविषयी कळकळ असण्यासोबतच, दुष्काळ संपून आपल्या लोकांची दुःखातून सुटका व्हावी असंही एलीयाला मनापासून वाटतं होतं. तसंच, त्या दिवशी यहोवानं कर्मेल डोंगरावर जो चमत्कार केला होता त्यामुळं नक्कीच त्याचं मन कृतज्ञतेनं भरून गेलं असेल. आपणही आपल्या प्रार्थनेत यहोवाचे मनःपूर्वक आभार मानले पाहिजेत आणि इतरांबद्दल काळजी व्यक्त केली पाहिजे.—२ करिंथकर १:११; फिलिप्पैकर ४:६ वाचा.
भरवसा आणि जागरूकता
९. एलीयानं आपल्या सेवकाला काय करायला सांगितलं, आणि आपण कोणत्या दोन गोष्टींबद्दल शिकणार आहोत?
९ दुष्काळ संपवण्यासाठी यहोवा नक्कीच काहीतरी करेल याची एलीयाला खातरी होती; पण, नेमकं केव्हा हे मात्र त्याला माहीत नव्हतं. मग, तोपर्यंत या संदेष्ट्यानं काय केलं? अहवाल काय म्हणतो ते विचारात घ्या: “त्याने आपल्या चाकरास सांगितले, वर चढ; समुद्राकडे दृष्टी लाव.” त्यानं जाऊन तसंच केलं आणि म्हटलं, “काही दिसत नाही.” त्यावर एलीयानं त्याला आणखी सात वेळा तसंच करायला सांगितलं. (१ राजे १८:४३) एलीयाच्या उदाहरणावरून आपण कमीतकमी दोन गोष्टी शिकू शकतो. एक म्हणजे, यहोवावर असलेला त्याचा भरवसा; आणि दुसरी म्हणजे, त्याची जागरूकता.
यहोवाचं अभिवचन पूर्ण होण्याची वेळ आली आहे याचा काही पुरावा दिसतो का, हे पाहण्यास एलीया उत्सुक होता
१०, ११. (क) यहोवाच्या अभिवचनावर पूर्ण भरवसा असल्याचं एलीयानं कसं दाखवलं? (ख) आपणसुद्धा एलीयासारखाच भरवसा कसा बाळगू शकतो?
१० एलीयाचा यहोवाच्या अभिवचनावर पूर्ण भरवसा होता. त्यामुळं त्याचं अभिवचन पूर्ण होण्याची वेळ आली आहे याचा काही पुरावा दिसतो का, हे पाहण्यास एलीया उत्सुक होता. त्यानं आपल्या सेवकाला डोंगरावरील एका उंच ठिकाणी पाठवलं आणि पाऊस पडण्याचं काही चिन्ह दिसतं का, ते पाहायला सांगितलं. सेवकानं जाऊन पाहिलं, पण “काही दिसत नाही” असं त्यानं काहीशा निराशेच्या सुरात एलीयाला सांगितलं. आकाश अगदी स्वच्छ, निरभ्र होतं. इथं एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? एलीयानं नुकतंच अहाब राजाला सांगितलं होतं: “विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी होत आहे.” पावसाचं काहीच चिन्ह दिसत नसताना एलीया अहाबाला असं कसं म्हणू शकला?
११ यहोवानं दिलेलं अभिवचन एलीयाला माहीत होतं. शिवाय, यहोवाचा संदेष्टा आणि प्रतिनिधी असल्यामुळं एलीयाला याची पक्की खातरी होती, की देव त्याचं अभिवचन पूर्ण करेल. त्याचा देवावर इतका भरवसा होता, की पाऊस सुरू होण्याआधीच त्याला जणू पावसाचा आवाज ऐकू येत होता. यावरून, बायबलमध्ये मोशेचं जे वर्णन करण्यात आलं आहे त्याची आपल्याला आठवण होते. मोशेबद्दल बायबल म्हणतं: “जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.” तुमच्यासाठीसुद्धा देव तितकाच खरा आहे का? देवावर आणि त्याच्या अभिवचनांवर असाच भरवसा ठेवण्यासाठी त्यानं आज आपल्याला भरपूर पुरावे दिले आहेत.—इब्री ११:१, २७.
१२. एलीया जागरूक होता हे त्यानं कसं दाखवून दिलं, आणि एक लहानसा ढग दिसल्याचं कळताच एलीयानं काय केलं?
१२ यहोवाच्या अभिवचनावर भरवसा ठेवण्यासोबतच एलीया किती जागरूक १ राजे १८:४४.
होता हेही विचारात घ्या. पावसाचं काही चिन्ह दिसतं का हे पाहण्यासाठी त्यानं आपल्या सेवकाला एकदा-दोनदा नव्हे, तर चक्क सात वेळा पाठवलं! असं वारंवार पाठवल्यामुळं एलीयाचा सेवक कदाचित वैतागला असेल; पण, एलीया मात्र पावसाचं चिन्ह पाहण्यासाठी उत्सुक होता आणि त्यामुळं त्यानं हार मानली नाही. शेवटी, सातव्या वेळी जाऊन पाहिल्यानंतर सेवकानं येऊन एलीयाला म्हटलं: “पाहा, समुद्रातून मनुष्याच्या हाताएवढा एक लहानसा ढग वर येत आहे.” तो लहानसा ढग पाहून सेवकाला कदाचित काहीच विशेष वाटलं नसेल. भूमध्य सागराच्या क्षितिजावर दिसणारा तो लहानसा ढग केवळ तळहाताएवढा आहे असं एलीयाला दाखवणाऱ्या त्या सेवकाचं चित्र तुम्ही डोळ्यांपुढं आणू शकता का? पण, एलीयासाठी मात्र तो लहानसा ढगसुद्धा पुरेसा होता. त्यानं लगेच आपल्या सेवकाला सांगितलं: “अहाबाकडे जाऊन सांग, रथ जुंपून खाली जा, नाहीतर पाऊस तुला जाऊ देणार नाही.”—१३, १४. (क) जागरूक राहण्याच्या बाबतीत आपण एलीयाचं अनुकरण कसं करू शकतो? (ख) आवेशानं कार्य करण्यासाठी आज आपल्याकडे कोणती कारणं आहेत?
१३ खरोखर, जागरूक राहण्याच्या बाबतीतसुद्धा एलीयानं आपल्यासाठी एक उत्कृष्ट उदाहरण मांडलं. आज आपणही अशा एका काळात जगत आहोत, जेव्हा देव त्याचा प्रकट केलेला उद्देश पूर्ण करण्यासाठी लवकरच पाऊल उचलणार आहे. ज्याप्रमाणे एलीया दुष्काळाचा अंत होण्यासाठी थांबून राहिला, त्याचप्रमाणे देवाचे सेवकसुद्धा या दुष्ट जगाच्या अंताची वाट पाहत आहेत. (१ योहा. २:१७) पण, तोपर्यंत एलीयासारखं आपणही नेहमी जागरूक राहिलं पाहिजे. स्वतः देवाचा पुत्र, येशू यानं आपल्या शिष्यांना सल्ला दिला: “जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हास ठाऊक नाही.” (मत्त. २४:४२) अंत केव्हा येईल याची त्याच्या शिष्यांना अजिबातच कल्पना नसेल, असं येशूला म्हणायचं होतं का? नाही, कारण अंत जवळ येईल तेव्हा परिस्थिती कशी असेल याविषयी त्यानं सविस्तर माहिती दिली होती. जगाच्या अंताबद्दल त्यानं दिलेलं हे चिन्ह आज आपल्या डोळ्यांसमोर पूर्ण होत असल्याचं आपण पाहू शकतो.—मत्तय २४:३-७ वाचा.
यहोवा त्याचं अभिवचन पूर्ण करेल याची खातरी होण्यासाठी एक लहानसा ढगसुद्धा एलीयाला पुरेसा होता; त्याचप्रमाणे, शेवटल्या काळाचं चिन्ह पूर्ण होताना पाहून आपल्यालाही आवेशानं कार्य करण्याची प्रेरणा मिळते
१४ येशूनं दिलेल्या चिन्हाच्या प्रत्येक पैलूतून, आज आपण अंताच्या किती जवळ आहोत याचा जबरदस्त आणि खातरीलायक पुरावा आपल्याला मिळतो. अंत येण्याआधी आवेशानं यहोवाची सेवा करण्यासाठी हा पुरावा तुम्हाला पुरेसा
आहे का? यहोवा त्याचं अभिवचन पूर्ण करेल याची खातरी होण्यासाठी एलीयाला एक लहानसा ढगसुद्धा पुरेसा होता. मग, त्या विश्वासू संदेष्ट्याची निराशा झाली का?दुष्काळ संपून आशीर्वादांचा वर्षाव
१५, १६. एकापाठोपाठ एक कोणत्या घटना घडत गेल्या, आणि एलीयाला कोणती आशा होती?
१५ अहवालात पुढं म्हटलं आहे: “थोड्याच वेळात मेघ व तुफान यांमुळे आकाश काळेभोर झाले आणि मोठा पाऊस पडला. अहाब रथात बसून इज्रेलास चालला होता.” (१ राजे १८:४५) यानंतर, अतिशय वेगानं एकापाठोपाठ एक घटना घडू लागल्या. एलीयाचा सेवक, त्याचा निरोप अहाबाला सांगत असतानाच पुष्कळ ढग जमले आणि आकाश काळवंडलं. जोरदार वारा वाहू लागला. शेवटी, साडेतीन वर्षांनंतर इस्राएलमध्ये पाऊस पडला आणि कोरड्या, रूक्ष जमिनीची तहान भागली. पाहता पाहता, मुसळधार पाऊस पडू लागला आणि किशोन नदी भरून वाहू लागली. यामुळं, नुकत्याच वधलेल्या बआलाच्या संदेष्ट्यांचं रक्त धुवून निघालं. यहोवापासून भरकटलेल्या इस्राएल लोकांनासुद्धा आता देशातून बआल उपासनेचा कलंक दूर करून यहोवाची क्षमा मागण्याची संधी होती.
१६ इस्राएल लोक देशातून बआलाची उपासना नाहीशी करतील अशी एलीयाची मनापासून इच्छा होती. एकापाठोपाठ एक घडणाऱ्या नाट्यमय घटना पाहून अहाबाची काय प्रतिक्रिया असेल, असा कदाचित त्यानं विचार केला असावा. त्याला पश्चात्ताप होऊन तो अशुद्ध बआल उपासना करण्याचं सोडून देईल का? त्या दिवशी ज्या घटना घडल्या त्या पाहून त्यानं खरंतर तसं करायला हवं होतं. अर्थात त्या क्षणी त्याच्या मनात नेमकं काय चाललं होतं, हे आपण सांगू शकत नाही. अहवाल फक्त इतकंच सांगतो, की तो “रथात बसून इज्रेलास चालला होता.” या सगळ्यातून त्यानं काही धडा घेतला होता का? आपले चुकीचे मार्ग सोडून देण्याचा त्यानं निश्चय केला होता का? पुढं घडलेल्या घटनांवरून तरी असं काही झाल्याचं दिसत नाही. पण, तो दिवस अजून संपलेला नव्हता; पुढं अहाब आणि एलीया आणखी काही विलक्षण घटना पाहणार होते.
१७, १८. (क) एलीया इज्रेलच्या रस्त्यावरून जात असताना काय घडलं? (ख) एलीया कर्मेलपासून इज्रेलपर्यंत धावत गेला हे इतकं विशेष का होतं? (तळटीपही पाहा.)
१७ अहाब ज्या रस्त्यानं गेला त्याच रस्त्यानं एलीयासुद्धा निघाला. त्याला खूप लांबचा प्रवास करायचा होता. शिवाय, पावसामुळं आणि आकाश काळवंडल्यामुळं त्याचा हा प्रवास खूप खडतर असणार होता. पण, तेवढ्यात विलक्षण असं काहीतरी घडलं.
१८ अहवाल म्हणतो: “एलीयावर यहोवाचा हात होता व तो आपली कंबर १ राजे १८:४६, पं.र.भा.) स्पष्टच आहे, की “यहोवाचा हात” एका अद्भुत मार्गानं एलीयावर कार्य करत होता. इज्रेल हे जवळजवळ ३० किलोमीटर दूर होतं. शिवाय, एलीया काही तरुण नव्हता. * एलीया आपला झगा कंबरेपाशी बांधून त्या ओल्याचिंब रस्त्यावरून धावत असल्याची कल्पना करा. तो इतका वेगानं धावत होता, की त्यानं अहाबाचा रथ गाठला, एवढंच नाही तर रथ पार करून त्याच्या कितीतरी पुढं निघून गेला!
बांधून इज्रेलाच्या वेशीपर्यंत अहाबापुढे धावत धावत चालला.” (१९. (क) एलीयाला कशाची खातरी होती? (ख) एलीयाला देवाकडून जी शक्ती आणि उत्साह मिळाला त्यावरून आपल्याला कोणत्या भविष्यवाण्यांची आठवण होते?
१९ एलीयाला यहोवाकडून खरंच किती मोठा आशीर्वाद मिळाला होता! त्यानं आपल्या तरुणपणातसुद्धा अनुभवली नसेल, इतकी शक्ती, जोम आणि उत्साह अनुभवला. हा नक्कीच त्याच्यासाठी एक रोमांचक अनुभव असावा. त्या ओल्याचिंब रस्त्यावरून धावत असताना, आपला पिता आणि एकमेव खरा देव, यहोवा याची कृपा आपल्यावर आहे याबद्दल एलीयाच्या मनात कोणतीही शंका नव्हती! यावरून, आपल्याला बायबलमधल्या त्या भविष्यवाण्यांची आठवण होते, ज्यांत म्हटलं आहे, की लवकरच पृथ्वीवरील नंदनवनात देवाच्या सर्व विश्वासू सेवकांना परिपूर्ण आरोग्य आणि तारुण्यातला उत्साह पुन्हा अनुभवायला मिळेल.—यशया ३५:६ वाचा; लूक २३:४३, NW.
२०. आपण यहोवाचे आशीर्वाद कसे मिळवू शकतो?
२० यहोवा आपल्याला आशीर्वाद देण्यास आतुर आहे. त्याच्याकडून हे अनमोल आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण होताहोईल तितका प्रयत्न करू या. एलीयाप्रमाणेच, आपणही नेहमी जागरूक राहिलं पाहिजे. या शेवटल्या कठीण काळात यहोवा नक्कीच त्याची अभिवचनं पूर्ण करेल हे दाखवणारा सबळ पुरावा आपण पडताळून पाहिला पाहिजे. खरोखरच, “सत्याचा देव” यहोवा त्याची सर्व अभिवचनं नक्कीच पूर्ण करेल, असा भरवसा बाळगण्यास एलीयाप्रमाणेच आपल्याजवळही अनेक कारणं आहेत!—स्तो. ३१:५, पं.र.भा.
^ परि. 18 एलीया इज्रेलला धावत गेला तेव्हा तो वयस्कर असावा. आपण हे कशावरून म्हणू शकतो? कारण ही घटना घडली त्यानंतर लगेच यहोवानं अलीशाला एलीयाचा सेवक म्हणून नियुक्त केलं. त्यामुळंच, “एलीयाच्या हातावर पाणी घालणारा” म्हणून लोक अलीशाला ओळखू लागले. (२ राजे ३:११) यावरून दिसून येतं, की तो वृद्ध झालेल्या एलीयाला मदत करत होता.