व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ११

बायबलमधल्या तत्त्वांमुळे आपल्याला कसा फायदा होतो?

बायबलमधल्या तत्त्वांमुळे आपल्याला कसा फायदा होतो?

१. आपल्याला देवाच्या मार्गदर्शनाची गरज का आहे?

बायबलच्या तत्त्वांमुळे आपण स्वतःच्या आणि दुसऱ्‍यांच्या सुरक्षेची कशी काळजी घेऊ?—स्तोत्र ३६:९.

आपला निर्माणकर्ता आपल्यापेक्षा कित्येक पटीने जास्त बुद्धिमान आहे. तो एक प्रेमळ पिता असल्यामुळे त्याला आपली काळजी आहे. तसंच, आपण त्याच्या मार्गदर्शनाशिवाय जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. कारण त्याने आपल्याला तशा प्रकारे निर्माण केलेलं नाही. (यिर्मया १०:२३) एका लहान मुलाला जशी आईवडिलांच्या मार्गदर्शनाची गरज असते, तशीच आपल्या सर्वांना देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. (यशया ४८:१७, १८) बायबलमध्ये दिलेल्या तत्त्वांमधून देव आपल्याला हे मार्गदर्शन पुरवतो आणि ही आपल्यासाठी एक भेट आहे.—२ तीमथ्य ३:१६ वाचा.

यहोवाचे नियम आणि तत्त्वं आपल्याला आज जीवनात कसं आनंदी राहता येईल हे शिकवतात. तसंच, आपण भविष्यात सर्वकाळाचे आशीर्वाद कसे मिळवू शकतो, हेही जाणून घ्यायला ते मदत करतात. देवाने आपल्याला निर्माण केलं आहे. म्हणून आपण त्याच्या मार्गदर्शनासाठी आभारी असलं पाहिजे आणि त्याचं मनापासून पालन केलं पाहिजे.—स्तोत्र १९:७, ११; प्रकटीकरण ४:११ वाचा.

२. बायबलमधली तत्त्वं काय आहेत?

बायबलमधली तत्त्वं ही कधीही आणि कोणत्याही परिस्थितीत न बदलणारी सत्यं आहेत. याउलट नियम आणि कायदे हे ठरावीक परिस्थितीसाठी असू शकतात. (अनुवाद २२:८) नियम सहसा अगदी स्पष्ट असतात. पण एखाद्या परिस्थितीत एक तत्त्व कसं लागू करता येईल, हे समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या विचारशक्‍तीचा उपयोग करावा लागेल. (नीतिवचनं २:१०-१२) उदाहरणार्थ, बायबल असं शिकवतं की जीवन ही देवाकडून आपल्याला मिळालेली एक भेट आहे. हे बायबलमधलं एक तत्त्व आहे आणि या तत्त्वावर विचार केल्यामुळे आपल्याला कामाच्या ठिकाणी, घरात किंवा प्रवास करताना स्वतःच्या आणि दुसऱ्‍यांच्या सुरक्षेची काळजी घ्यायला मदत मिळेल.—प्रेषितांची कार्यं १७:२८ वाचा.

३. कोणती दोन तत्त्वं सगळ्यात महत्त्वाची आहेत?

येशूने सांगितलं की दोन तत्त्वं सगळ्यात महत्त्वाची आहेत. यांपैकी पहिलं तत्त्व म्हणजे आपण यहोवावर प्रेम केलं पाहिजे. या तत्त्वावरून आपल्याला कळतं की देवाला जाणून घेणं, त्याच्यावर प्रेम करणं आणि त्याची विश्‍वासूपणे सेवा करणं हाच मानवाच्या जीवनाचा सगळ्यात मुख्य उद्देश आहे. आपल्या जीवनातला प्रत्येक निर्णय घेताना आपण या पहिल्या तत्त्वाचा विचार केला पाहिजे. (नीतिवचनं ३:६) या तत्त्वाचं मनापासून पालन केल्यामुळे आपल्याला देवाची मैत्री, खरा आनंद आणि भविष्यात सर्वकाळाचं जीवन मिळेल.—मत्तय २२:३६-३८ वाचा.

दुसरं तत्त्व हे आहे, की आपण आपल्या शेजाऱ्‍यावर प्रेम केलं पाहिजे. या तत्त्वामुळे आपल्याला दुसऱ्‍यांसोबत शांतीचे संबंध टिकवून ठेवायला मदत मिळते. (१ करिंथकर १३:४-७) या दुसऱ्‍या तत्त्वाचं पालन आपण कसं करू शकतो? यासाठी देव लोकांशी जसं वागतो, तसंच आपणही त्यांच्याशी वागलं पाहिजे.—मत्तय ७:१२; २२:३९, ४० वाचा.

४. बायबलमधल्या तत्त्वांमुळे आपल्याला कसा फायदा होतो?

बायबलच्या तत्त्वांमुळे कुटुंबातले सदस्य एकमेकांवर प्रेम करायला शिकतात. आणि यामुळे कुटुंबातली एकता टिकून राहते. (कलस्सैकर ३:१२-१४) देवाच्या वचनात आणखी एक महत्त्वाचं तत्त्व सांगितलं आहे. ते म्हणजे, विवाहाचं बंधन हे एक कायमचं बंधन असलं पाहिजे. या तत्त्वामुळे कुटुंबांचं संरक्षण होतं.—उत्पत्ती २:२४ वाचा.

बायबलच्या शिकवणींचं पालन केल्यामुळे, आर्थिक आणि भावनिक रितीनेही आपलं संरक्षण होतं. उदाहरणार्थ, बायबल सांगतं की आपण प्रामाणिक आणि मेहनती असलं पाहिजे. आणि कामाच्या ठिकाणी मालकांना सहसा असेच कर्मचारी हवे असतात, जे या तत्त्वांप्रमाणे वागतात. (नीतिवचनं १०:४, २६; इब्री लोकांना १३:१८) देवाचं वचन आपल्याला शिकवतं, की जर आपल्याजवळ गरजेच्या वस्तू असतील तर आपण त्यात समाधानी राहिलं पाहिजे. तसंच, धनसंपत्तीपेक्षा आपण देवासोबतच्या मैत्रीला जीवनात जास्त महत्त्व दिलं पाहिजे.—मत्तय ६:२४, २५, ३३; १ तीमथ्य ६:८-१० वाचा.

बायबलच्या तत्त्वांचं पालन केल्यामुळे आपल्या आरोग्याचंही रक्षण होतं. (नीतिवचनं १४:३०; २२:२४, २५) उदाहरणार्थ, दारूच्या आहारी न जाण्याबद्दल देवाच्या नियमाचं पालन केल्यामुळे आपलं गंभीर आजारांपासून आणि अपघातांपासून संरक्षण होऊ शकतं. (नीतिवचनं २३:२०) यहोवा आपल्याला मद्य पिण्याची मनाई करत नाही. पण आपण प्रमाणाबाहेर पिऊ नये असं बायबल सांगतं. (स्तोत्र १०४:१५; १ करिंथकर ६:१०) बायबलमधली तत्त्वं आपल्याला फक्‍त चुकीच्या कामांपासूनच नाही तर चुकीच्या विचारांपासूनही दूर राहायला शिकवतात. आणि यामुळे आपला फायदा होतो. (स्तोत्र ११९:९७-१००) पण देवाचे खरे उपासक फक्‍त आपल्या फायद्यासाठी त्याच्या स्तरांचं पालन करत नाहीत. तर यहोवाचा सन्मान करण्यासाठी ते असं करतात.—मत्तय ५:१४-१६ वाचा.