तीत याला पत्र १:१-१६
१ मी पौल, देवाच्या निवडलेल्यांच्या विश्वासाप्रमाणे आणि सत्याच्या अचूक ज्ञानाप्रमाणे, देवाचा दास आणि येशू ख्रिस्ताचा प्रेषित आहे. हे सत्य देवाच्या भक्तीबद्दल आहे.
२ ते सर्वकाळाच्या जीवनाच्या+ त्या आशेवर आधारित आहे, जिच्याबद्दल देवाने, जो कधीही खोटं बोलू शकत नाही,+ फार पूर्वीच वचन दिलं होतं.
३ पण त्याच्या ठरवलेल्या वेळी त्याने त्याचं वचन, मला सोपवण्यात आलेल्या प्रचाराच्या सेवेद्वारे+ प्रकट केलं. ही सेवा मला आपला तारणकर्ता, देव याच्या आज्ञेप्रमाणे सोपवण्यात आली आहे.
४ तर, मी पौल हे पत्र माझा सहविश्वासू आणि खऱ्या अर्थाने माझं लेकरू असलेला तीत, याला लिहीत आहे:
देव जो आपला पिता आणि ख्रिस्त येशू जो आपला तारणकर्ता, यांच्याकडून तुला अपार कृपा आणि शांती मिळो.
५ मी तुला क्रेतमध्ये यासाठी सोडून आलो, की तू तिथे घडत असलेल्या चुकीच्या गोष्टी सुधाराव्यात* आणि प्रत्येक शहरात वडिलांना नियुक्त करावं. याबद्दल मी तुला अशा सूचना दिल्या होत्या:
६ वडील म्हणून अशा माणसाला नेमावं, ज्याच्यावर कोणताही आरोप नाही, ज्याला एकच बायको आहे आणि ज्याची मुलं विश्वासात असून त्यांच्यावर नीच वागणुकीचा* किंवा बंडखोरपणाचा आरोप नाही.+
७ कारण देवाचा कारभारी या नात्याने, मंडळीची देखरेख करणाऱ्यावर कोणताही आरोप असू नये. तो अडेल वृत्तीचा,+ तापट स्वभावाचा,+ दारुडा, हिंसक वृत्तीचा* किंवा बेइमानीच्या कमाईचा लोभ धरणारा असू नये.
८ तर तो पाहुणचार करणारा,+ चांगुलपणाची आवड असणारा, समंजस,*+ नीतिमान, एकनिष्ठ+ आणि संयमी असावा.+
९ त्याची शिकवण्याची पद्धत देवाच्या विश्वसनीय वचनाला* धरून असावी.+ यामुळे तो फायदेकारक शिक्षणाने+ इतरांना प्रोत्साहन देऊ शकेल* आणि त्यासोबतच जे हे वचन मान्य करत नाहीत, त्यांना ताडनही देऊ शकेल.+
१० कारण बंडखोर वृत्तीची, निरर्थक गोष्टींबद्दल बोलणारी आणि फसवणूक करणारी, विशेषतः सुंतेची* प्रथा पाळायचा आग्रह धरणारी बरीच माणसं आहेत.+
११ त्यांची तोंडं बंद केली पाहिजेत. कारण हीच माणसं, बेइमानीचं धन मिळवण्याच्या लोभाने नको त्या गोष्टींबद्दल शिकवून, संपूर्ण कुटुंबांचा विश्वास नष्ट करतात.
१२ त्यांच्याच एका संदेष्ट्याने असं म्हटलं आहे: “क्रेतचे लोक सहसा खोटारडे, जनावरांसारखे क्रूर, ऐतखाऊ आणि अधाशी असतात.”
१३ ही साक्ष खरी आहे. म्हणूनच, त्यांचं कडक शब्दांत ताडन करत जा, म्हणजे ते विश्वासात सुदृढ राहू शकतील,
१४ आणि यहुद्यांच्या कथा-कहाण्यांकडे आणि सत्यापासून बहकलेल्या माणसांच्या आज्ञांकडे लक्ष देणार नाहीत.
१५ जे शुद्ध आहेत, त्यांच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी शुद्ध असतात.+ पण जे अशुद्ध आणि विश्वासहीन आहेत, त्यांच्या दृष्टीने काहीच शुद्ध नसतं. कारण त्यांचं मन आणि त्यांचा विवेक दूषित झाला आहे.+
१६ चारचौघांत ते देवाला ओळखत असल्याचा दावा तर करतात, पण आपल्या कामांनी ते त्याला नाकारतात.+ कारण ते आज्ञा मोडणारे किळसवाणे लोक आहेत आणि कोणत्याही चांगल्या कामाच्या लायकीचे नाहीत.
तळटीपा
^ किंवा “तिथल्या उणिवा दूर कराव्यात.”
^ किंवा “स्वैराचाराचा; बेतालपणाचा.”
^ किंवा “इतरांना शब्दांनी दुखावणारा.”
^ किंवा “चांगल्यावाइटातला फरक ओळखणारा; समजदार.”
^ किंवा “भरवशालायक संदेशाला.”
^ किंवा “आर्जवू शकेल.”
^ शब्दार्थसूची पाहा.