दानीएल ३:१-३०
-
नबुखद्नेस्सर राजाने उभा केलेला सोन्याचा पुतळा (१-७)
-
राजा पुतळ्याची उपासना करायची आज्ञा देतो (४-६)
-
-
तीन इब्री तरुणांवर आज्ञा मोडण्याचा आरोप (८-१८)
-
‘आम्ही तुमच्या देवांची उपासना करणार नाही’ (१८)
-
-
त्यांना धगधगत्या आगीच्या भट्टीत फेकलं जातं (१९-२३)
-
आगीतून त्यांची चमत्कारिक रितीने सुटका (२४-२७)
-
राजा त्या इब्री तरुणांच्या देवाचा गौरव करतो (२८-३०)
३ नबुखद्नेस्सर राजाने सोन्याची एक मूर्ती बनवली. ती ६० हात* उंच आणि ६ हात* रुंद होती. त्याने ती मूर्ती बाबेल प्रांतातल्या दूरा नावाच्या मैदानात उभी केली.
२ मग आपण उभ्या केलेल्या या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी नबुखद्नेस्सर राजाने सुभेदारांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना, राज्यपालांना, सल्लागारांना, खजिनदारांना, न्यायाधीशांना, न्यायाधिकाऱ्यांना आणि प्रांतांची व्यवस्था पाहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना एकत्र येण्याची आज्ञा दिली.
३ तेव्हा सगळे सुभेदार, प्रशासकीय अधिकारी, राज्यपाल, सल्लागार, खजिनदार, न्यायाधीश, न्यायाधिकारी आणि प्रांतांची व्यवस्था पाहणारे सर्व अधिकारी नबुखद्नेस्सर राजाने उभ्या केलेल्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी एकत्र जमले. ते सर्व येऊन त्या मूर्तीसमोर उभे राहिले.
४ तेव्हा घोषणा करणारा मोठ्याने म्हणाला: “वेगवेगळ्या राष्ट्रांतून आलेल्या आणि वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांनो, ऐका! तुम्हाला अशी आज्ञा दिली जात आहे, की
५ ज्या वेळी तुम्ही शिंग, बासरी, संतूर, वीणा,* तंतुवाद्य, पंचनलिका* आणि इतर संगीत वाद्यांचा आवाज ऐकाल, तेव्हा नबुखद्नेस्सर राजाने उभ्या केलेल्या सोन्याच्या मूर्तीला दंडवत घाला आणि तिची उपासना करा.
६ जो कोणी मूर्तीला दंडवत घालणार नाही आणि तिची उपासना करणार नाही, त्याला लगेच धगधगत्या आगीच्या भट्टीत फेकण्यात येईल.”+
७ म्हणून जेव्हा शिंग, बासरी, संतूर, वीणा, तंतुवाद्य, पंचनलिका आणि इतर संगीत वाद्यांचा आवाज ऐकू आला, तेव्हा सर्व राष्ट्रांतल्या आणि वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांनी नबुखद्नेस्सर राजाने उभ्या केलेल्या सोन्याच्या मूर्तीला दंडवत घातला आणि तिची उपासना केली.
८ त्या वेळी काही खास्दी लोक राजाकडे आले आणि यहुद्यांवर आरोप* करू लागले.
९ ते नबुखद्नेस्सर राजाला म्हणाले: “महाराज युगानुयुग जिवंत राहोत!
१० हे राजा, तुम्ही अशी आज्ञा दिली होती की शिंग, बासरी, संतूर, वीणा, तंतुवाद्य, पंचनलिका आणि इतर संगीत वाद्यांचा आवाज ऐकणाऱ्या प्रत्येकाने सोन्याच्या मूर्तीला दंडवत घालून तिची उपासना करावी.
११ आणि जो कोणी मूर्तीला दंडवत घालणार नाही आणि तिची उपासना करणार नाही, त्याला धगधगत्या आगीच्या भट्टीत फेकण्यात येईल.+
१२ पण महाराज, अशी काही यहुदी माणसं आहेत ज्यांनी तुमचा अनादर केलाय! तुम्ही ज्यांना बाबेल प्रांताची व्यवस्था पाहण्यासाठी नेमलंय त्या शद्रख, मेशख आणि अबेद्नगो+ यांनी तुमचा अनादर केलाय. ते तुमच्या देवांची सेवा करत नाहीत, आणि तुम्ही उभ्या केलेल्या सोन्याच्या मूर्तीची उपासनाही करत नाहीत.”
१३ हे ऐकून नबुखद्नेस्सर राजाच्या तळपायाची आग मस्तकात शिरली, आणि त्याने शद्रख, मेशख आणि अबेद्नगो यांना आपल्यासमोर आणण्याचा हुकूम दिला. तेव्हा त्यांना राजासमोर आणण्यात आलं.
१४ नबुखद्नेस्सर त्यांना म्हणाला: “शद्रख, मेशख आणि अबेद्नगो, तुम्ही माझ्या देवांची सेवा करत नाही+ आणि मी उभ्या केलेल्या सोन्याच्या मूर्तीचीही उपासना करत नाही, हे खरंय का?
१५ आता जेव्हा शिंग, बासरी, संतूर, वीणा, तंतुवाद्य, पंचनलिका आणि इतर संगीत वाद्यांचा आवाज तुम्हाला ऐकू येईल, तेव्हा मी बनवलेल्या मूर्तीला जर तुम्ही दंडवत घालायला आणि तिची उपासना करायला तयार झालात, तर ठीक. पण जर तुम्ही तिची उपासना केली नाही, तर तुम्हाला लगेच धगधगत्या आगीच्या भट्टीत फेकलं जाईल. असा कोणता देव आहे जो तुम्हाला माझ्या हातून सोडवू शकेल?”+
१६ त्यावर शद्रख, मेशख आणि अबेद्नगो राजाला म्हणाले: “हे नबुखद्नेस्सर राजा! आम्हाला याबद्दल आणखी काहीही बोलायचं नाही.
१७ हे राजा! आम्हाला जरी धगधगत्या आगीच्या भट्टीत फेकण्यात आलं, तरी ज्या देवाची आम्ही सेवा करतो तो देव आम्हाला त्या भट्टीतून आणि तुमच्या हातून वाचवू शकतो.+
१८ आणि त्याने जरी आम्हाला वाचवलं नाही, तरी हे राजा! एवढं मात्र नक्की, की आम्ही तुमच्या देवांची आणि तुम्ही उभ्या केलेल्या सोन्याच्या मूर्तीची उपासना करणार नाही.”+
१९ तेव्हा नबुखद्नेस्सर राजा शद्रख, मेशख आणि अबेद्नगो यांच्यावर भयंकर संतापला, आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.* त्याने आगीची भट्टी नेहमीपेक्षा सात पटीने जास्त तापवण्याचा हुकूम दिला.
२० त्याने आपल्या सैन्यातल्या काही ताकदवान माणसांना शद्रख, मेशख आणि अबेद्नगो यांना बांधून धगधगत्या आगीच्या भट्टीत फेकण्याचा हुकूम दिला.
२१ म्हणून त्या तिघांना त्यांच्या अंगावरचे झगे, टोप्या आणि इतर कपड्यांसहित बांधून त्या धगधगत्या आगीच्या भट्टीत फेकण्यात आलं.
२२ राजाचा हुकूम अगदी कडक असल्यामुळे आणि भट्टी नेहमीपेक्षा जास्त तापवल्यामुळे जी माणसं शद्रख, मेशख आणि अबेद्नगो यांना तिथे घेऊन गेली तीच आगीच्या ज्वालांनी जळून मेली.
२३ शद्रख, मेशख आणि अबेद्नगो हे तिघं मात्र बांधलेल्या अवस्थेतच धगधगत्या आगीच्या भट्टीत पडले.
२४ नंतर नबुखद्नेस्सर राजा अतिशय घाबरला आणि पटकन उठून आपल्या उच्च अधिकाऱ्यांना म्हणाला: “आपण तीन माणसांना बांधून आगीत फेकलं होतं ना?” त्यावर ते राजाला म्हणाले: “हो महाराज.”
२५ तेव्हा राजा म्हणाला: “पण बघा! मला तर चार माणसं आगीत मोकळी फिरताना दिसत आहेत! त्यांना काहीच झालेलं नाही. आणि त्यांच्यातला चौथा तर देवपुत्रासारखा दिसतोय.”
२६ मग नबुखद्नेस्सर त्या धगधगत्या भट्टीच्या दाराजवळ गेला आणि म्हणाला: “हे शद्रख, मेशख, अबेद्नगो! सर्वोच्च देवाच्या सेवकांनो,+ बाहेर या!” तेव्हा शद्रख, मेशख आणि अबेद्नगो हे तिघं त्या आगीतून बाहेर आले.
२७ तेव्हा तिथे जमलेले राजाचे सुभेदार, प्रशासकीय अधिकारी, राज्यपाल आणि सर्व उच्च अधिकारी यांनी पाहिलं,+ की या तिघा माणसांच्या शरीरावर आगीचा काहीच परिणाम झालेला नाही.+ त्यांच्या डोक्यावरचा एक केसही जळाला नव्हता, त्यांच्या अंगावरचे कपडे जसेच्या तसे होते, आणि त्यांच्या अंगाला धुराचा वासही येत नव्हता.
२८ मग नबुखद्नेस्सर राजा म्हणाला: “शद्रख, मेशख आणि अबेद्नगो यांच्या देवाची स्तुती असो!+ त्यानेच आपल्या स्वर्गदूताला पाठवून त्याच्या सेवकांना वाचवलं. कारण त्यांनी आपल्या देवावर भरवसा ठेवला. त्यांनी राजाची आज्ञा पाळली नाही. त्यांच्या देवाशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाची सेवा किंवा उपासना करण्यापेक्षा, ते मरायला तयार झाले.+
२९ म्हणून आता मी असा आदेश देत आहे, की कोणत्याही राष्ट्रातले लोक किंवा कोणतीही भाषा बोलणारे लोक जर शद्रख, मेशख आणि अबेद्नगो यांच्या देवाच्या विरोधात काही बोलले, तर त्यांचे तुकडे-तुकडे केले जावेत. आणि त्यांच्या घरादारांना सार्वजनिक शौचालय* बनवलं जावं. कारण, असा कोणताही देव नाही जो या देवासारखा वाचवू शकतो.”+
३० राजाने मग शद्रख, मेशख आणि अबेद्नगो यांना बाबेल प्रांतात आणखी मोठं पद दिलं.*+
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ बॅगपाईप नावाचं वाद्य.
^ किंवा “यहुद्यांची निंदा.”
^ किंवा “त्याची मनोवृत्ती पूर्णपणे बदलली.”
^ किंवा कदाचित, “उकिरडे; विष्ठेच्या टेकड्या.”
^ शब्दशः “त्यांची भरभराट केली.”